पर्यावरण रक्षणासाठी नव्हे तर मानवी अस्तित्वासाठी…

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपणाच्या आकडेवाऱ्या आता सालाबादाप्रमाणे चर्चेला येतील. जागतिक परिषदांमधील चर्चेचे रकाने, पर्यावरण तज्ञांचे ईशारे प्रसिद्ध होतील. नेहमी प्रमाणे बहुतेक प्रश्नाचे खापर शासकीय अनास्था व उदासीनतेवर फोडले जाईल. पण त्यासोबत दिवसेंदिवस वरकरणी तरी वाढत चाललेल्या जागरूकतेतून आपल्या विचारसरणीत, पर्यावरण विषयक दृष्टिकोनात काय बदल होत आहेत याचाही वेध घेणे गरजेचे आहे. चर्चांपलीकडे आचरणात येणारे बदल, म्हणजेच जीवशैलीतील बदल हे आतून होणाऱ्या बदलांचे खरे निदर्शक असतात.

सध्याची  पिढी अधिकाधिक व्यवहारी होत जात असल्याची टीका अधूनमधून होत असते. अर्थात, आक्षेप व्यवहारीपणा वाढण्यापेक्षा संवेदनशीलता बोथट होत जाण्यावर अधिक असतो. मात्र याच व्यवहारी पिढीचा एक लहानसा पण संवेदनशील हिस्सा पर्यावरणाशी जवळीक साधण्यासाठी वेगळ्याच वाटा नक्कीच धुंडाळत आहे. यात उत्फूर्तताही आहे आणि सहजताही आहे.

जीवनशैली बदलाची सुरुवात

निसर्गस्नेही जीवनशैली ही अतिआदर्शवादी, अव्यवहारी लोकांचा चमत्कारिकपणा नसून एक सशक्त जीवन पर्याय म्हणून आत्मसात केली जाऊ शकते हे हळूहळू लक्षात येत जाते. मुळातच जीवशैली न बदलता निसर्गाच्या जवळ जाणे, त्याच्याशी “स्नेह” करणे शक्य नाही. निसर्गस्नेही जीवनशैली ही बदलांची शृंखला असते. सगळ्याच नैसर्गिक बदलांप्रमाणे हे बदल देखिल जीवनाच्या सर्व अंगाना स्पर्श करणारे असतात. एकाच सरळ रेषेतले (लिनीयर) बदल नसून एकच चक्रीय (सायक्लिक) बदल असतो.

कचऱ्याचे व्यवस्थापन, पाण्याचे व्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापन, मृदा संवर्धन, निसर्गस्नेही अन्न उत्पादन, निसर्गस्नेही इमारत बांधणी हे सगळे अन असेच अनेक पैलू याला आहेत. यातील कुठल्याही एक पैलूने सुरुवात करता येते. परंतु जीवनशैलीतील असा बदल केवळ एकाच विषयापुरता मर्यादित ठेवता येत नाही. एकतर तो बदल स्थायी (सस्टेनेबल) रहात नाही, कालांतराने मागे पडतो. किंवा तो जीवनातील इतर पैलू बदलण्यास आपल्याला हळूहळू भाग पाडतो. प्रत्येक पुढच्या बदलाच्या उंबरठयावरच त्याचे अनेक पर्याय उभे राहतात. जीवनशैलीतील असे बदल हे सावकाशच झाले पाहिजेत. त्यांच्याशी जुळवून घेण्यास, मनापासून समजून बदल अंगिकारण्यास जो वेळ लागतो तो वेळ देखिल नैसर्गिक प्रक्रियेचाच भाग असतो. अनेक लोक उतावळेपणाने जीवनशैली बदलू पाहतात अन दोन-चार दिवसात मूळपदावर येतात, कारण निसर्गाच्या जवळ जाणारे बदल हे निसर्गाच्या नियमांशी फटकून होऊच शकत नाहीत !

शास्त्रीय माहिती न घेता, पर्यावरणाच्या ढोबळ, वरवरच्या कल्पना मोठ्या प्रमाणावर राबवत सुटल्यानेही निसर्गाशी स्नेह होत नाही. उलट त्यामुळे नुकसानच अधिक होते हे अभ्यासकांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. जीवनशैलीतील आपल्याला अपेक्षित निसर्गस्नेही बदल हे अभ्यासपूर्वकच केले पाहिजेत. जनजागृती, पर्यावरण शिक्षण, जंगलांची पर्यायाने प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासांची निगा, स्थानिक-पारंपारिक ज्ञानाचे जतन हे सगळे बदलांचे पैलू तिथून फार पुढे असले तरी ओघानेच येतात.

बदलाची गरज निसर्गाला नव्हे आपल्याला

मोजकेच का होईना परंतु आतापर्यंत सुखवस्तु पार्श्वभूमी असलेले साधेसुधे लोक या बदलांची सुरुवात स्वत:पासून करत आहेत. आपल्या तांत्रिक, व्यावसायिक कौशल्यांचा कल्पकतेने वापर करून स्वत:पुरती “कस्ट्ममेड” जीवनशैली निर्माण करत आहेत. निसर्गाच्या प्रेमाला व्यावहारिकतेची जोड देऊन चाकोरीबाहेर, मुक्त, आनंदात जगत आहेत! फारसा गाजावाजा न करता, जगाच्या लोंढ्याच्या न दिसणाऱ्या कडेकडेने हे लोक बदल घडवत असतात. दिलीप कुलकर्णींपाठोपाठ अदिती-अपूर्वा संचेती सारख्या नव्या पिढीतल्या अनेक लोकांनी आपली जीवनशैली बदलून नवा पायंडा पाडला आहे.

परंतु जीवनशैली बदलण्याच्या आपल्या हेतूकडे देखिल बारकाईने पाहिले पाहिजे. जगाला दाखवून देण्यासाठी, पर्यावरण वाचवण्यासाठी वगैरे केलेले बदल टिकाऊ नसतात. मुळातच पर्यावरण वाचवणे हा एक वादाचा मुद्दा आहे. निसर्गाला आपल्या मदतीची गरज किती आहे यापेक्षा मानवी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी निसर्गाशी जरा जुळवून घेण्याची आपल्यालाच गरज किती आहे हा निसर्ग-अभ्यासकांचा खरा प्रश्न आहे! माळीण गावाची दुर्घटना असो किंवा केदारनाथची. तेथील लोक नैसर्गिक आपदेचे नव्हे तर मानवी हव्यासाचे बळी आहेत.

स्वत:च्या जगण्याचा दर्जा अधिक चांगला चांगला व्हावा, आपल्या विचार अन आचारात सुसूत्रता आल्याने जे स्थैर्य अन समाधान मिळते त्यासाठी आपण बदलत असू तर ते बदल सहज होत जातात. जगाच्या उलट दिशेला वाहणाऱ्या रेट्याचा फार त्रास होत नाही.

पर्यावरणस्नेही जीवनशैलीचे परिणाम

हळूहळू त्या बदलांचे कधीच लक्षात न आलेले चांगले परिणाम दिसून येतात. जीवनशैलीचा अमानवी वेग थोडा कमी होतो. त्यातून येणारा हताशपणा, निराशावाद कमी होतो. विचारांना, कल्पनाशक्तीला चालना मिळतच जाते. कंटाळा येणं, टीव्ही-फोन शिवाय अस्वस्थ होणं असले मानसिक आजार होत नाहीत! आपण जगाकडेच नव्हे तर स्वत:कडे देखिल संवेदनशीलतेने पहायला शिकतो. आपली राहणी आजच्या आज, आत्ताच्या आत्ता शंभर टक्के निसर्गस्नेही झालीच पाहिजे नाहीतर काहीच बदल करण्यात अर्थ नाही असला हेकेखोरपणा केला जात नाही! “एवढं असेल तर जंगलातच जाऊन का रहात नाहीस?!” असा फुकट सल्ला स्वतः ए.सी. मधे बसून देणाऱ्या लोकांकडे स्मितपूर्वक दुर्लक्ष करण्याची सिद्धी लवकरच प्राप्त होते.

आजूबाजूला असे बदल करण्यासाठी प्रयत्न करणारे अनेक लोक दिसत जातात. त्यांच्याकडे पाहून फक्त जीवनशैली बदलांचे वेगवेगळे पर्यायच मिळत नाहीत तर एक उभारी देखिल मिळते. अशा मैत्रांचे दिसून न येणारे परंतु घट्ट जाळेच विणले जात आहे…. या जाळ्यात एकमेकांच्या गरजेच्या, मात्र जगाच्या मुख्य प्रवाहात सहजी न मिळणाऱ्या सेवा-सुविधा उभ्या राहतात. बी-बियाणी, अवजारे अन पाककृतींपासून निसर्गस्नेही बांधकामापर्यंत अनेक प्रकारची माहिती, पर्यावरणाशी सुसंगत तांत्रिक मदत दिली-घेतली जाते. आपल्या आवडीच्या कौशल्यांचा निसर्गाशी संवेदनशील राहून प्रत्यक्षात उपयोग होऊ लागतो.

अतिरेकी हव्यासामुळे तंत्रज्ञान बदनाम

तंत्रज्ञान अन निसर्ग हे परस्पर विरोधी असल्याची ओरडदेखिल मुळातच खोटी आहे. मात्र जेव्हा तंत्रज्ञान विकसित करण्याचा हेतू जेव्हा अतिरिक्त फायदा मिळवण्याचा असतो तेव्हा तंत्रज्ञान निसर्गनियमाच्या विरुद्ध विकसित होऊ लागते. केवळ माणसाचा असा हावरटपणा अनैसर्गिक अन विरोधाभासी आहे. निसर्गाशी मैत्री केलेला माणूस तंत्रज्ञानाकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो. त्याचा विकास अन वापर केवळ गरजेपुरता अन स्वत:च्या तात्कालिक फायद्यापलीकडे सगळ्यांच्या दीर्घकालीन भल्याकरता करतो.

यात अव्यवहार्य, काल्पनिक अथवा अतिआदर्शवादी काहीच नाही कारण असे जीवन जगणारे लोक आपल्याच आजूबाजूला आहेत. ते असामान्य नाहीत, अतिश्रीमंत किंवा अचाट बुद्धिमान देखिल नाहीत. मात्र आपणच डोळे उघडून पाहण्याची, उठून आपल्या जीवनशैलीत स्वतःहून बदल करण्याची गरज आहे. अन्यथा निसर्ग तो बदल करण्याची सूत्रे हाती घेईल आणि माणसाला ते बदल अगतिकपणे स्वीकारावे लागतील !