धामापूरचा तलाव…

हरवणे हा लहानपणी माझा फावल्या वेळातला छंद होता. बाहेर गेल्यावर मोठ्यांचा हात सोडून कुठेतरी कोपऱ्यात तंद्री लावून बसणे तर ठीकच…मी घरात अन आजूबाजूला देखिल हरवत असे! सरावाने आईला माझ्या “हरवण्याच्या” जागा बऱ्यापैकी ठाऊक झाल्या होत्या. ती मला बरोबर हुडकून काढीत असे घराभोवतीच्या बागेतून!

त्यावर माझी आजी शेलका मालवणी शब्दखजिना उपडा करीत असे, “चुकला ढॉर धामपूरच्या तळ्यावर!” म्हणी कळण्याचे वय नव्हते त्यामुळे आपली जनावराशी तुलना झाली एवढे सुद्धा कळत नसावे मला तेव्हा!

मात्र धामापूर अन तळे ही स्वप्नवत जोडगोळी मनाच्या अडगळीत उगाच जमून राहिली. जरा मोठी झाले तेव्हा आईने मला सुनीता देशपांड्यांची “ती” गोष्ट सांगितली…. “यक्षाचं तळं”. अन तेव्हापासून धामापूरच्या तलावावरला स्वप्नवत धुक्याचा अलवार पडदा अधिकच मनात भरला…

झुळझुळीत चंद्रकळा नेसून, हिऱ्यांचे दागिने लेवून भगवतीच्या देवळाच्या पयरीवर उभ्या असलेल्या सुनीताबाई, त्यांच्या मनातून माझ्या मनात उतरल्या…तलावाच्या पायऱ्या उतरून पाण्याशी गुज करावे तसे हसल्या माझ्या मनात….

तलावातल्या प्रतिबिंबात सुनीताबाईंना त्यांची आजी कशी दिसली असेल? देवळाच्या आवारातले चाफे अजूनही फ़ुलत असतील का पन्नास वर्षांपूर्वी फुलले असतील तसेच?! अशा अनेक प्रश्नांची गूढ किनार धामापूरच्या तलावाभोवती होती…..DSC_0432

बऱ्याच वर्षांनी कधीतरी मामा-मामीसोबत कोकणात गेले होते… अन अचानक सुपारीच्या उभ्य उभ्या स्तंभांची गर्दी समोर आली…. त्यांच्या हिरव्या गर्दीत हरखून गेलेल्या मला खरेच वाटेना की मी खरोखरी त्याच स्वप्नातल्या गावात…. धामापुरात आलेय! मामीच्या मागेमागे भगवतीच्या देवळाकडे निघाले अन बाळपणीचा मित्रसखा अवचित हात पसरून हसत सामोरा यावा तसा तो आरस्पानी तलाव दिसला.

संध्याकाळचं लाल जांभळं आकाश पसरलं होतं तलावाच्या आरशात….अन तलावाचा काठ गच्च हिरव्या झाडीने विणून काढला होता. जांभ्याच्या खरबरीत पायऱ्या उतरून पाण्याशी आले अन डोकावून पाहिले…तेव्हा माझी आजी खरीच होती माझ्या मागे उभी! तिची मऊसूत साडी अन पायरी उतरताना माझ्या हातावर टेकलेला सुरकुतला स्पर्श….सुनीताबाईंच्या आजीचा हातही त्यांना असाच वाटला असेल का?!

जुन्या दगडी देवळात अंधार दाटला होता. भगवतीसमोरच्या इवल्या दिवलीने मात्र एकटीनेच प्रकाशाचा उत्सव साजरा केला होता…. गर्भगृहातून गाऱ्हाणं घुमत होतं…त्याचा ठेका अन आर्त स्वर वाऱ्याने कापरा होत असे तलावाशी येतायेता….DSC_0399-001

संध्याकाळभर दगडी पायरीवर बसून पावलाशी झोंबणाऱ्या माशांना पहात राहिले मी मनभरून….. मामीने हाक दिली तेव्हा तलावावर चांदण्यांची नक्षी उमटली होती….सुनीताबाईंची चंद्रकळाच का तलावावर लहरत होती? कोण जाणे… त्यांनी गोष्ट लिहिली होती त्यांच्याच भूतकाळाची…. कि माझ्यासारख्या छोट्या पोरींच्या स्वप्नाची?!

मुक्यानेच घरी परतले त्या रात्री अन माझे काहीतरी त्या तलावातच विसरून आले जणू…. माझे मन त्या चुकलेल्या ढोरागत पुन्हा पुन्हा त्या तलावाभोवती घुटमळते अजून.

अगदी अलीकडेच मामी पुन्हा मला घेऊन गेली कोकणात. पुन्हा ती सुपाऱ्यांची गर्दी समोर आली अन मी बावचळून गेले! मामीने अगदी न सांगता मला अलगद नेले त्याच तळ्याच्या भेटीला, मला पुन्हा एकदा हरखलेली पहाण्यासाठी… मीही उत्साहात निघाले आजीचा हात धरून पुन्हा त्याच भगवतीला भेटायला. “नवरा सापडला किनी, कि मला याच तळ्याकाठी लग्न करायचे आहे!” असा उफराटा बेत देखिल मी मामीला सांगून चुकले!

मात्र यावेळी काहीतरी वेगळेच झाले. माझ्या जांभ्याच्या पायऱ्या आता सिमेंटच्या झाल्यात. मातीच्या वाटेवर फरश्या लागल्यात. चाफ्याच्या झाडाभोवती कुंपण आले…. तलावाच्या नितळ गहिऱ्या रंगावर भडक प्लॅस्टिकचे तराफे आलेत. त्यांच्या आड कचरा साठून कुजतो आता अन त्याचा उग्र तवंग रेंगाळतो पाण्यावर. आता बोटिंगची सोय आहे धामापुरात!! विकास झालाय खरा…..

उगाच भडभडून आले मला…. त्या जुन्या बालमित्राने अचानक सुटबुटात येऊन ओळख दाखवल्या न दाखवल्यासारखे केले तर कसे वाटेल ना, तसेच काहीतरी….

असं म्हणतात बालपणीची स्वप्न मोठेपणी विसरली जातात…. माझं धामापूरच्या तलावाचं स्वप्न मात्र दुखरी नस बनून ठसठसत राहिलं आहे खोल आतवर. माझ्या स्वर्थासाठी विकासालाच पायबंद बसावा असं म्हणत नाहीये मी…. मात्र विकास म्हणजे काय हो नक्की?! असं विचारावंसं वाटतंय काकुळतीला येऊन….

DSC_0404

माझी आजी सांगते, पूर्वी म्हणे धामपूरच्या तळ्यात एक यक्ष रहात असे. गावात कुणाच्या घरी देवकार्य असेल तर त्या घरची स्त्री तलावाच्या पायरीशी फुलांचे दागिने परडीत घालून ठेवत असे, अन यक्षाने दिलेले सोन्याचे दागिने घेऊन जात असे. मात्र कार्य पूर्ण होताच ते दागिने तलावात परत द्यावे लागत. एकदा कुणीतरी लोभापायी ते परत केले नाहीत अन तेव्हापासून यक्षाने मदत करणे बंद केले…

आजही आम्ही माणसं कदाचित हेच करत आहोत. विकासाच्या नावाखाली निसर्ग ओरबाडून खात आहोत….निसर्गाचे दान आदरपूर्वक वेळीच परत दिले नाही तर एके दिवशी तो आम्हाला अन्नाला महाग करेल. त्या तलावाची हाय लागू नये अशी प्रार्थना त्या भगवती देवीसमोर करून आले. तिला सांगून आले हळूच कि आम्हा माणसांना आमच्यातल्याच दैत्यावर मात करण्याची बुद्धी दे…. तुझ्या हिरव्या पदराला राखण्याची शक्ती दे.

देवळातून निघताना वळून पाहिले तिच्याकडे दोन क्षण. ती हसलीशी वाटते माझ्या वेड्या गाऱ्हाण्याला…. तिची हिऱ्याची चमकी दिवलीच्या प्रकाशात हललीशी वाटते.DSC_0448