मानसपूजा…

मी हिंदू आहे, याचा मला ना गर्व वाटतो ना कमीपणा. मला नास्तिक असूनही हिंदू म्हणवून घेण्याची पूर्ण मुभा आहे, परंतु विचाराने आणि माझ्या मर्जीने मी आस्तिक आहे.

ग्रामदैवत, कुलदैवत तसेच अन्य घरांतून पुजल्या जाणाऱ्या देवतांविषयी मला कुतुहल वाटते. आणि अद्वैतवादापासून तेहतीस कोटी देवतांपर्यंत सगळ्या धार्मिक मतांचा मला आदर वाटतो.

धर्म, संस्कृती अन परंपरांच्या श्रीमंतीत वावरताना या तिन्हींचे नुसते परस्परसंबंध नव्हे तर अगम्य गुंतागुंत पाहते आहे पण त्याचा मी भाग कदाचित उरले नाही.

ठराविक दिवशी गर्दीतून कुठल्याही देवळात दर्शनासाठी जाणे, कुठल्या आध्यात्मिक अथवा धार्मिक गुरूंचा अनुनय करणे, नित्य अथवा नैमित्तिक पूजा घरात करणे, हिंदू सण, उत्सव साजरे करणे यातून मला माझी आस्था व्यक्त करावी असे आता वाटत नाही.

किंबहुना दर वर्षी पुन्हा पुन्हा तेच सण तशाच प्रकारे साजरे करण्याचा मला कंटाळाच आला आहे. दर वर्षी बाजारातून त्याच त्याच सामग्री चढत्या भावाने विकत घेणे, दुसऱ्या दिवशी त्याचे निर्माल्य सजग नागरिक असल्याच्या तोऱ्यात कंपोस्ट करणे. सजावटीचे सामान, कपडे, इतर अविघटनशील पूजासाहित्य खरेदी करताना सतत पर्याय शोधत डोक्याचा भुसा करून घेणे. बाजारातील पैशांचा उत्सव अन उत्सवाचा बाजार मांडलेला पाहून उगाच विचार करणे… एकुणातच सणाचा आनंद घेण्याचे सोडून त्रास, मनस्ताप अन दमछाक करून घेणे याचा कंटाळा आला. यात कुठेही आत्मिक समाधान काही दिसेना, मात्र भयंकर साचलेपणा वाटू लागला.

शहरात सण साजरे करताना त्या सणांच्या मागची खरी सामजिक वीण, त्याचे कृषिसंस्कृतीशी, पर्यावरणाशी असलेले मार्दवी नाते तर कधीच संपून गेल्याची जाणीव सतत होऊ लागली. सणांचे बाजारू, दिखाऊ रूप जणू माझे व्यक्तिगत शल्य होते. इतर सगळीजण पथकाच्या तालबद्ध आवाजात, लाऊडस्पीकरवर गाजणाऱ्या आरत्यांच्या गजरात सुखी आहेत पण आपलेच मन त्यात रमत नाही ही जाणीव किती अस्वस्थ करते म्हणून सांगू…

मग पुन्हा एकदा पाटी स्वच्छ करून आपल्याला नक्की काय पाहिजे याचा शोध घ्यायला हवा.

इष्टदेवतेशी आपले अत्यंत खासगी अन जिव्हाळ्याचे नाते असावे अन त्या प्रेमातून, सात्विक आनंद मिळावा, चित्त शांत व्हावे एवढीच माणसाची माफक अपेक्षा असते. हा आनंद सामूहिकपणे घेता येतो किंवा एकांतात.

आपण एका अत्यंत उदारमतवादी संस्कृतीचा भाग आहोत, जी आपल्याला आपापल्या जडणघडणीनुसार, स्वभावानुसार यातील निवड करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देते; आपल्या निवडीबद्दल कुठलाही रोष बाळगत नाही.

आज मी माझ्या सवडीने, साध्या घरच्या कपड्यात, एकांतात बसून, कुठल्याही मूर्ती अथवा पूजा साहित्याशिवाय, नाच, गाणी, सजावट, गोड पदार्थ, साग्रसंगीत जेवणाच्या बेताशिवाय, समोर केवळ गणेश प्रतिष्ठापनेची पोथी ठेवून गणपतीची मानसपूजा केली…. मनापासून.

त्यातून मला काय मिळालं, काय अनुभव आला हे मी सांगू इच्छित नाही.
इतरांनी सण कसे साजरे करावे, त्यांच्या धार्मिक भावना कशा व्यक्त कराव्या यावर भाष्य करण्यासाठी देखिल मी हे लिहीत नाही. त्यातले सामाजिक, आर्थिक, भावनिक पदर अन त्यांची गुंतागुंत मी समजू शकते.
सणांच्या निमित्ताने जी समोर येते ती आपली महान भारतीय संस्कृती खरंच आहे कि नुसता नट्टापट्टा? हा प्रश्न देखिल मी इतरांना विचारणार नाही. मला तो हक्क मुळीच नाही.
असंच का? तसं का नाही… आमचेच सण दिसतात, ’त्यांना’ जाऊन का सांगत नाही… या असल्या प्रतिक्रियांना काही उलट प्रतिक्रिया देण्याची गरज नाही…
मात्र जर समविचारी असे कोणी असतील तर त्यांना साद देण्यासाठी मी लिहीत आहे…. मानसपूजेला षोडशोपचारी पूजेच्या समान, किंबहुना अधिकच मान देणाऱ्या सहिष्णुतेला सामोरी जाण्यासाठी लिहिते आहे….

तत्त्वांपासून फरकत घेऊन त्यांच्या संदर्भहीन भगव्या प्रतिकांना मिरवण्यापेक्षा आज ’असेलच’ तर मला अधिक गरज विविधतेला कमतरता न मानून उदारतेने सामावून घेणाऱ्या, लवचिक अन विजिगिषु हिंदुत्वाची वाटली, म्हणून लिहिते आहे.

बाकी मोदक तर काय मला कधीही खायला आवडतील!