सुंदर “असावे” यापेक्षाही….. स्त्रीने सुंदर “दिसावे”!!
सुंदर दिसावे… म्हणजे कसे दिसावे?!!
बारीक दिसावे…. गोरेपान अन नाजूक दिसावे….!! जमल्यास अक्कल वापरावी, पण पुरुषापेक्षा कमीच! अन्यथा वापरू नये!!
स्त्रीच्या सौंदर्याची मोजमापांसकट एक अर्धनग्न प्रतिमा समाजात रुजवली कोणी? सुंदर दिसण्याच्या स्त्रीसुलभ स्वभावाला आव्हान दिले कोणी? तिच्या बुद्धीपेक्षा… तिच्या प्रेम करण्याच्या अचाट क्षमतेपेक्षा…तिच्या “दिसण्याने” तिला मोजले कुणी?!
साडी नेसली तर काकूबाई अन स्लीवलेस शर्ट घालून फिरली तर अगोचर!
स्त्रियांच्या पेहरावावर कुणीही टिप्पणी करावी?! त्यामुळे पुरुषाची नजर विचलित होते हा युक्तिवाद करावा?!
“पंजाबी ड्रेस घालून स्कार्फ बांधून बसमधे अंग चोरून बसलेल्या मुलींना कुठलाही पुरुष घाण नजरेने पाहणार नाही…हात लावणार नाही अशी छातीठोक गर्जना जर कुणी करू शकत असेल तर मुलींनी कसे वागावे याचे धडे द्या….”
हे असे उर्मट काही एखादी मुलगी बोललीच….तर,
“बघ बाई…तुझ्याच सुरक्षेसाठी आम्ही सांगतोय… नाही ऐकायचे तर, कर तुला हवे ते…. उद्या कुणी काही केले तुला, तर तूच जबाबदार!!”
म्हणजेच जर स्त्री स्वतंत्र विचाराची असेल तर तिच्या सुरक्षेची जबाबदारी तिची, समाजाची नाही!
अर्थात…हा फार छोटा भाग आहे…. जिथे मुलीला जन्मालाच येण्याचा हक्क नाही…. जन्माला आलीच चुकून, तर स्वतंत्र विचार करण्याचा, आपले आयुष्य आपणच घडवण्याचा अधिकार नाही….
आपल्याला हे अधिकार नसल्याची तिला जाणीव व्हावी इतकी प्रगल्भताच तिच्यात येऊ दिली नाही… तिथे तिने कपडे काय घालावे हे ठरवण्याचा अधिकार तिला कसा मिळावा?!
वेळोवेळी मुलीनी हे अधिकार हिसकावून घेतल्याचे दिसते. सुंदर दिसल्याने जग पायाशी येते अशी जाहिरात रोज टीव्हीवर पहात या मुली मोठ्या होत आहेत……..स्वतंत्र विचार न अंगीकारता स्वतंत्र पेहराव मात्र उचलत आहेत…
अतिशय स्वाभिमानी, समाजोपयोगी अन स्वतंत्र आयुष्य जगणाऱ्या स्त्रिया देखील आहेत… आपल्या आयुष्यातून माणूस असण्याचा सुंदर परिपाठ समोर ठेवणाऱ्या या स्त्रिया अतिशय प्रसिद्धिविन्मुख आहेत! आपल्याच आजूबाजूला असलेल्या या विश्वसुंदरींना कदाचित आपण कधीच ओळखले नसावे!
बहुसंख्य मुली मात्र उथळ वागण्याची स्पर्धाच जणू लावत आहेत….त्या स्पर्धेचे अमानुष घाव मनावर झेलत हसऱ्या चेहऱ्याने झिजत आहेत…..
मानवी आयुष्याचा यापेक्षा मोठा उपहास नाही!