दिवास्वप्न- II

हा दिवास्वप्नाचा दुसरा भाग आहे.दिवास्वप्नाचा  भाग I इथे वाचा.

प्रबोधिनी गुरुकुलाचं स्वप्न जवळपास एक वर्षभर पहात होते मी. कदाचित स्वप्नाची सुरुवात माझ्या शाळेतच झाली होती… स्वप्न बघायला शिकवणारी शाळा…. ज्ञानप्रबोधिनीच्या शैक्षणिक लाडात वाढण्याचा एक तोटा आहे…. घटिया दर्जाचं शिक्षण सहन नाही होत. पण ज्ञानप्रबोधिनी बाहेरच्या दुनियेत शिकताना सतत मेकॉलेचं भूत पिच्छा करत राहतं. मेकॉलेच्या त्या भुताने जाळलेल्या विद्यार्थीदशेने एक चमत्कारिक सूडभावना रुजवली माझ्यात….या भुताला तडीपार करायला जे जे काही मला करता येईल ते रोजरोज करायला ही सूडभावना उद्युक्त करते!!

माणसाच्या बाळाला खरोखर मुक्त करणारं, माणूस बनवणारं शिक्षण मिळणं हा प्रत्येक मुलामुलीचा हक्क आहे. पण शाळांच्या नावाखाली आपण फक्त खून करतोय कितीक वर्षं.मुलांच्या स्वत्त्वाचा, सर्जनशीलतेचा….अभिमानाने मिरवतोय आकडे साक्षर झालेल्या ‘अ’शिक्षितांचे. सुजाण लोकांच्या पायांत खोडा अडकवायला आपण हेच (अ)शिक्षित लोक महत्त्वाच्या जागांवर बसवतो.

तेच मेकॉलेचं भूत अजून राज्य करतंय आपल्यावर….तरीही जगभर उच्चशिक्षित professionals (याला चांगला मरठी शब्द सांगा कोणीतरी) भारतातून पाठवले जातात. जर आतापेक्षा चांगलं शिक्षण देणाऱ्या शाळा सगळ्या मुलांना उपलब्ध झाल्या तर जगाला देण्यासारखं अजून खूप खूप मिळेल भारतात!

इथे पायभूत शैक्षणिक सुविधा (educational infrastructure) हा फ़ार जिकिरीचा मुद्दा आहे. कारण शाळेला काय लागतं हे पण आपण अजूनही मेकॉलेलाच विचारतोय! भारतीय दृष्टिकोनातून सुविधा देणं, कमी खर्चिक आणि जास्त उपयुक्त ठरणार आहे. असं काम करणारे लोक आहेत…पण गरज त्यापेक्षा कैक पटींनी मोठी आहे. मुक्त भारतीय शिक्षण हे बहुतांश मुलांच्या, पालकांच्या स्वप्नातही नाहिये.

या सगळ्या अंधारवाटेवरचे दिवे म्हणजे प्रबोधिनी गुरुकुलासारख्या शाळा…. इथे शिकण्यासाठी अन्य शाळांसारखी वार्षिक “फी” भरावी लागत नाही इथूनच गुरुकुलाचं वेगळेपण सुरू होतं. अन्न, औषधि आणि विद्या कधीही विकत द्यायची नाही हे तत्त्व गुरुकुलात कटाक्षाने पाळलं जातं. शाळेचे सर्व खर्च ऎच्छिक देणगीतून होतात.

मुलांना कुठलाही रुक्ष गणवेष वापरण्याची सक्ती नाही. साधी कानडी लुंगी आणि उत्तरीय घेऊन मुलं मोकळेपणाने वावरतात. त्या मुलांबरोबर मातीच्या पायवाटांवर, दवभरल्या गवतातून अनवाणी पाय़ांनी पळापळ करताना मला शहरातल्या मुलांची खरोखर दया आल्यावचून रहिली नाही…ज्यांचं बालपण पायतले बूट चमकदार ठेवण्यात आणि गणवेषाची इस्त्री सांभाळण्यात नासून जातं….

वेद, योग, कला, विज्ञान आणि कृषि हे पाच घटक गुरुकुलातल्या शिक्षणाचा पाया आहेत. प्रत्येक भारतीय व्यक्तीला या सर्वांची ओळख असणं गरजेचं आहे, असा इथल्या आचार्यांचा विश्वास आहे. सकाळी वेदपठणाने सुरु होणारा गुरुकुलातला प्रत्येक दिवस शिक्षणाच्या या पाचही अंगाना पुढे नेतो. पण सगळ्यात अधिक भर मुलांच्या संस्कारांवर दिला जातो. कारण संतुलित मनाशिवाय कितीही चांगलं शिक्षण व्यर्थ असतं.

गुरुकुलाची साफसफाई, फुलझाडांची निगा, दैनंदिन पूजाअर्चा अशी सगळी कामं आचार्यांच्या मदतीने मुलंच करतात. स्वयंपाकात मदत करण्यापासून गोशाळेची निगा राखण्यापर्यंत सगळ्या कामात मुलांचा हातभार असतो. इतकंच काय, गुरुकुलाची वास्तू बांधण्यात देखिल मुलांनी हौसेने भाग घेतला होता. अतिशय रस घेऊन रोजचं साधंसोपं आयुष्य जगताना ही मुलं खूप मोठी तत्त्व अंगी बाणवत असतात. साध्या शहरी शाळेतल्या किती मुलांना स्वत:पुरता तरी स्वयंपाक करता येतो? किती मुलं आपली राहण्याची खोली, आपली शाळा, आपलं शहर स्वच्छ ठेवण्याबद्दल आग्रही असतात? किती मुलं रस्त्यावर गाय, बैल किंवा कुत्रा बघून दगड न मारता पुढे जातात?

हिंदू जीवनपद्धतीमध्ये गोसेवेचं महत्त्व इतकं का आहे हे प्रत्यक्ष गायींची काळजी घेतल्यानंतरच समजू शकतं. तसंच शेतीच्या बाबतीतही आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेती करण्याला कवडीमोलाचा मान नाही. कारण मानपानाच्या कल्पना अजूनही ब्रिटिशांच्याच पाळतो आहोत आपण. गुलामगिरी संपली नाही अजूनही….

या गुरुकुलात मुलं वेदाध्ययन करतात, शेती करतात, गायी पाळतात, उत्तम संस्कृत बोलतात, अत्याधुनिक वैज्ञानिक संशोधनाविषयी माहिती बाळगून असतात, जरूरीपुरती संगणक-साक्षर असतात…. थोडक्यात सांगायचं तर इथे भारतीय शिक्षणाचं दिवास्वप्न प्रत्यक्षात पहायला मिळतं…

गुरुकुलात संपूर्ण शिक्षण मुलांच्या मातृभाषेत, कन्नडमधे दिलं जातं. जीवनावश्यक कौशल्य शिकल्यानंतर ‘vocation’ अर्थात वृत्ती म्हणून काय क्षेत्र निवडावं हे संपूर्णपणे मुलांच्या कलाने ठरवू दिलं जातं. गुरुकुल हे डॉक्टर, इंजिनियर छापायचा कारखाना नाही हे मुलांना पक्कं ठाऊक असतं. कुठल्याही अवास्तव स्पर्धेला बळी न पडता ही मुलं स्वत:चं करियर घडवतात. संशोधन, शिक्षण, शासकीय सेवा अशा अनेक क्षेत्रांत गुरुकुलाची मुलं हळूहळू उतरत आहेत. कित्येक मुलांनी गुरुकुलाचाच आदर्श पुढे ठेवून आचार्य होऊन गुरुकुलात परत येणं पसंत केलं आहे.

अतिशय सौम्य तरीही शिस्तबद्ध, रसिक तरीही नियमित असे आचार्य त्यांच्या निव्वळ अस्तित्त्वानेच मुलांवर संस्कार करताना मी पाहिले. पोक्त गणिताचार्यांपासून नुकत्याच पदवी मिळवून आलेल्या (जवळपास माझ्याच वयाच्या) संस्कृताचार्यांपर्यंत सगळा अध्यापकवृंद स्वत:च जिवंत गुरुकुल आहेत. अध्यापकांपैकी विवाहित आचार्यांच्या पत्नी देखिल मुलांच्या देखभालीत महत्त्वाची जबाबदारी घेतात… वयाच्या नवव्या वर्षी आईबाबांना सोडून गुरुकुलात आलेली मुलं यांना ’मातु:श्री’ म्हणतात. मुलांची पाठांतरे घेण्यापासून आईची आठवण आल्यावर जवळ घेण्यापर्यंत सगळं या मातु:श्री प्रेमाने करतात.

दोन दिवस माझ्या राहण्या-झोपण्याची सगळी सोय मातु:श्रींनी फार प्रेमाने केली…भाषेचा अडसर ओलांडून मला संस्कृतात बोलतं केलं…त्यांच्या हसऱ्या पाहुणचारानंतर गुरुकुल सोडून निघताना सख्ख्या आईला सोडून निघण्याइतकं रडू आलं…आज अजूनही मला त्यांची आठवण येते…मी कुणाची कोणीच लागत नसताना त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमाची गोडी माझ्यातलं माणूसपण रोज जागं ठेवते.

तरीही, सगळंच काही गोडगोड आहे असं मी म्हणणार नाही. काही गोष्टीत तुटपुंज्या आर्थिक सुविधेमुळे गुरुकुल मागे पडत आहे. पुरेसे संगणक नाही आहेत. मुलांना बाहेरच्या जगात फिरण्याचा फ़ारसा अनुभव नाही मिळत. गुरुकुलाच्या सुरक्षित वातवरणाची सवय झाल्याने मुलं सुरुवातीला थोडी बुजरी वाटतात. जगतिकीकरणाच्या लाटेवर स्वार व्हायला या मुलांची तयारी कदाचित पुरी नाही पडणार. सफ़ाईदार इंग्लिश संभाषण या मुलांच्या हुशारीचं मोजमाप नसलं तरीही सगळ्या जगाशी संवाद साधण्यासाठी गरजेचं आहे. आपण निव्वळ उत्तम असून भागणार नाही आता. आपली उत्तमता सगळ्या जगासमोर मांडता येणं जरुरीचं आहे.

आर्थिक मदतीपासून आपला वेळ देण्यापर्यंत खूप काही करता येईल गुरुकुलासाठी…. जे जमेल ते तरी किमान आपण केलं पाहिजे. शहरातल्या सोईसुविधांनी जखडलेल्या आपल्या जिवाला कदाचित गुरुकुलाचं राहणीमान नाही झेलणार! पण जे वैयक्तिक स्वार्थ सोडून असं गुरुकुलाचं दिवास्वप्न प्रयक्षात आणत आहेत त्यांना आपला काहीतरी हातभार लावता आला पाहिजे असा माझा आग्रह आहे.

www.prabodhinigurukula.org या संकेतस्थळावर गुरुकुलाची सगळी माहिती, संपर्क इत्यादी मिळेल… आपल्या दृष्टीने लहानशी म्हणून सहज खर्च केली जाणारी रक्कम या दिवास्वप्नासाठी कदाचित मोठा हातभार ठरू शकते.