देणार्‍याचे हात….

माणूस हा सामाजिक प्राणी आहे यावर विश्वास बसायला मला कितीक वर्षे लागली! मुळातच एकटी रमत होते कि परिस्थितीनुरूप तशी होत गेले कुणास ठाऊक, पण जगाशी जमवून घेण्यास जरा वेळच लागला….

माणसांचे तर्‍हेतर्‍हेचे स्वभाव, लकबी, सवयी, संस्कृती, भाषा, आचारविचार, बरोबर चूकच्या विविध कल्पना, सरळपणा, लांड्यालबाड्या हे सगळे समजण्याचे ते वयही नव्हते…. इवल्या मनात किती प्रश्न वादळ होऊन घोंघावत….

खूप लहानपणी कुठल्याशा रागाने पिसे चढलेल्या मला बाबाने शिकवले होते…. “माणूस जगात स्वत:ची किंमत अन जागा केवळ उपयुक्ततेच्या जोरावर मिळवू शकतो. जर तुम्ही इतरांसाठी काही करू शकत असाल तर आणि तरच पैसा, आदर अन मैत्र कमावता येते.”

हा काही क्रूर अमानवी व्यवहार नाही, साधा सोपा निसर्गनियम आहे. जे जे अस्तित्त्वात आहे त्याचा काही उपयोग आहे. अन जेथे उपयुक्ततेचा नाश होतो, तेथे विघटन अन पुनर्वापर सुरू होतो. त्याला काळाची न थांबवता येणारी गती आहे.

रागाचे अन रडण्याचे उमाळे एका क्षणात शांतवले, जेव्हा त्याने मला जगाच्या कुलुपाची साधी सोपी किल्ली सहजच हाती दिली. त्या एका वाक्याचे किती अर्थ, पडताळे शोधण्यात राग अन दु:ख करायचे विसरून गेले मी….

आजही या किल्लीने किती दरवाजे माझ्यासाठी आनंदाने हात पसरताना पाहतेय! विनाकारण दुरावलेले किती डोळे पुन: माझ्यावर हास्याची बरसात करताना पाह्ते आहे. त्यात प्रेम असते, कौतुकमिश्रित अचंबा असतो…..क्वचित आदरही असतो….. माझ्या वरकरणी निरपेक्ष देण्यातला स्वार्थ त्यांना दिसत नाही. केवळ मदतीचे शस्त्र उगारून त्यांना जिंकले गेले आहे हेच समजण्यास वेळ लागत असावा!

विश्वनियम आहे हा, ज्याचा उपयोग त्यास भरभराट….जेथे साठा, साचलेपणा तेचे कुजट वाया जाणे हेच सर्वत्र पहावयास मिळते.

जितके द्यावे तितके अधिक हाती पडत राहते…. जितके साचवावे, तितके नासून जाते…

पाहता पाहता देण्यातला आनंद भिनत जातो…. हसत हसत हजार हातांनी सारे काही या जगावर लुटून मोकळे व्हावे इतका आनंद मनात नाचू लागतो…. या आनंदाची लागण असपासच्यांना नकळत होणारच! त्यांच्या हास्याचे श्रीमंत धनी केवळ तुम्हीच असणार नाही का? कितीही मनांवर राज्य करावे असल्या हसर्‍या हातांनी….त्यांना कधीच काही कसे कमी पडावे?!

देणार्‍याचे ते हात जमेल तेव्हा जमेल तसे हावरेपणाने घेत जावे….त्या हातांना लक्ष्मीचे वरदान असते…. त्या हातांना तुटले बंध सांधण्याचे कौशल्य असते….टोचरे दु:ख शांतवण्याचा स्पर्श असतो….निराशेच्या अंधारात सावरणारा आधार असतो…. केवळ मानवी जगातच नव्हे तर चल अचल सृष्टीत मानाने, आनंदाने जगण्याचा अधिकार असतो….

अदृष्य प्रेम…

काही माणसं चालतात खाली पहात…. चित्रविचित्र दगड, वनस्पती, रानफुलं, कीटक….अन प्राण्यांच्या पाऊलखुणा. काही माणसं चालतात वर पहात…वृक्ष, त्यावरल्या वेली, पक्षी, आकाश अन चांदणं.

प्रत्येकाचा मानेचा कोन त्याचा दृष्टिकोनच उलगडून सांगत असतो! प्रत्येकाच्या नजरेला त्याच्या त्याच्या कोनातून हे जग वेगळे दिसते…

याशिवायही असतात लोक…सगळीकडेच भिरभिर नजरेने पाहणारे. काहीजण शोधत असतात अस्तित्त्वाची मुळं, जगाच्या विस्तृत पटावर….काहीना दिसतात गहिरे अर्थ, वरकरणी निरर्थक वाटणार्‍या भौतिकात. काहींना जग दिसतच नाही, दिसतात ती फक्त स्वप्नं!

कोणी असतात सगळ्याच्या पल्याड, निराकारावर दृष्टी लावून….

असे ऐकले होते कुठेतरी, कि डोळे म्हणजे आत्म्याची खिडकी…. आपल्या असण्याचे इतके स्वच्छ प्रतिबिंब दर्शवणारे हे डोळे…

काही डोळे संवेदनशील….समोरच्याला नखशिखांत वाचणारे. काही डोळे अतीव बोलके! कधी ते सजग, अन कधी हरवलेले…. कुणाचे बेभान अन कुणाचे लाजरे…. क्वचित भेटतात कणखर डोळे, सूर्यासारखे तेजाळलेले…. कधी मनस्वी, अन कधी हातचे राखून ठेवणारे…..

प्रत्येकाचे हे दोन डोळे म्हणजे एक स्वतंत्र महाकाव्य….प्रत्येक दोन डोळ्यात उभा आहे इतिहास मानवी नात्यांचा… त्यातले भावनिक नाट्य…भरती-ओहोटीच्या हेलकाव्यांसहीत ओसंडताना दिसते प्रत्येक दोन डोळ्यांतून….

माणासाचे डोळे सुसंस्कृत्तेच्या सगळ्या आवरणांमधून थेट छेद देउन नि:शब्द आदिमनात नेऊन सोडतात. छोट्या छोट्या आशा, अपेक्षा, थोडी हाव, थोडा त्याग, लज्जा अन धारिष्ट्य, भीति, असूया अन राग… मुख्य म्हणजे युगायुगांचे प्रेम…. रोज माझ्यावर विनाकारणच अमर्याद प्रेम करणारे अनंत डोळे दिसतात मला… त्यांचे प्रेम साक्षात आदिदेवापासून कितीक डोळ्यांमधून वहात आले असावे माझ्यापर्यंत!

रोज “त्याच्या” अदृष्य प्रेमाचा दृष्टांत होतो.

तोच जाणे या प्रेमाची परतफेड किती जन्म करत आहे मी बिचारी!

तरीही माझे ऋण काही फिटत नाही….

“त्याचे” मजवरले प्रेम अदृष्य, तरीही आटत नाही….

गैरसमज…

प्रत्येक बाईच्या मनात काही निरागस अन ठाम गैरसमज असतात. त्यातून तिचे भावविश्व कितीही फुलत असले तरी ती त्याचा कधी न कधी त्रास करून घेते…

त्यातलाच एक समज म्हणजे तिला जे हवे ते मिळवण्यास ती एकटी (बरंका, ए क टी) समर्थ आहे! पण तरीही प्रत्येक बाईच्या मनात एक गुप्त वळकटी असते देवाला घातलेल्या साकड्याची…. आता ही एवढी समर्थ असलेली बाई देवाला कशाला मनोमन आळवीत असेल?! गंम्मत अशी आहे कि ही बाई देवाला इतके काही मागून भंडावून सोडत असते, ते सारे असते तिच्या जवळच्या माणसांसाठी! तिची प्रेमाची माणसे मात्र इतकी नाजूक असावीत कि हिच्या साकड्याशिवाय त्यांचे कसे व्हावे! हाही अचाट गैरसमज! तिच्या या गैरसमजांभोवती वळसे घेत, त्यांना जोपासत जेव्हा जग तिलाच सांभाळून घेत असते तेव्हा तिच्या स्त्रीसुलभ प्रेमाचा वर्षाव होऊ लागतो. तिच्या वेड्या गैरसमजात ताकद असते विस्कटलेले घर बांधून घालायची…..चुकलेले पाऊल पुन: सावरायची….सतीच्या राखेतून पार्वती बनून उभं रहायची…..

तिचे गैरसमज दूर करून तिला शहाणपण शिकवू पाहणार्‍यास अरसिक नाहीतर स्त्रीवादी म्हणत असावे….!