गाण्यासारखा हेल काढीत घोळवलेल्या इंग्रजीत प्रत्येक मल्याळी माणसाने मला बजावले होते कि जर तू लगून पहिले नाहीत तर तू केरळ पुरता पहिलाच नाहीस! मी देखील हसून मान डोलावली होती. आमच्या गाईडसाहेबांच्या नियोजनात लगून होते कि नाही समजणे अवघडच होते!
पण “त्याने” त्याच्या या देवभूमीत माझ्यासाठी काही खास योजले होते!
परतीची रेलवे तिकिटं शेवटच्या दिवसापर्यंत पक्की झालीच नाहीत. पुण्यात येण्यासाठी पुढची सोय होईतो मला कुमारक्कमच्या वेम्बनाद लगूनमधल्या हाउसबोटवर एक रात्र काढण्यावाचून पर्यायच उरला नाही!!
परतीच्या सोयीची चिंता वाऱ्यावर अन गाईडवर सोडून मी दात काढत हाउसबोटीकडे मोर्चा वळवला. नारळाच्या झावळ्यांनी विणलेली हाऊसबोट मंद लाटांवर डोलत होती. तिच्या अणीवर चकचकीत पितळी पाटीवर तिचे नाव कोरले होते, “वॉटरलिली” मनात तिचे मराठी बारसे करूनच टाकले….कोय-कमला!
या कमलेचे मालक, थॉमस अब्राहम आपले सुदन्त हास्य करीत स्वागताला आले. त्यांचे टोपण नाव “अनियन कुंजू” (म्हणजे छोटा भाऊ) त्यांच्या मूळ नावापेक्षा मोठे नाही का हा प्रश्न मी गिळला. साधे मुंडू नेसलेला हा मल्याळी छोटा भाऊ हाउसबोटीसोबत लगूनमधल्या काही भात खाचरांचा देखिल मालक होता!
आम्ही बोटीवर (शक्य तितके) स्थिरस्थावर होताच दोन आडदांड दिसणाऱ्या अबोल मल्याळी माणासांनी बोटीचा सुकाणू हातात घेतला. काठाने हळूवार मागे सरत जाणाऱ्या नारळाच्या बागा अन त्यात लपलेली मंगळूरी कौलाची घरं पाहण्यात मी हरखून गेले असताना आमची बोट बंदर सोडून लगूनच्या जादुई विश्वात शिरत होती….
वरच्या डेकवर, मुख्य डेक सारखा गलबलाट अन गोंगाट नव्हता….तिथल्या शांत एकांतात, गार वारा अन सोनेरी निवते ऊन मान उंचावून चेहऱ्यावर घेत कुणालाही जॅक डॉवसनसारखे वाटेल! विश्वाचे सम्राट असल्यागत!
या हाउसबोटीवर तथाकथित ऐष-आरामाच्या सर्व सुविधा असतात… वातानुकूलित खोल्या, अत्याधुनिक स्नानगृह, जेवणाचा डेक अन सर्व तऱ्हेची मदिरा! इथले जेवण म्हणजे एक साग्रसंगीत कार्यक्रमच असतो. चमचमीत मासे अन जोडीला वाईनचे ग्लास टेबलावर येत होते…त्यासोबत गप्पांना ऊत आला होता… सरतेशेवटी सगळ्यांचा हसून निरोप घेतला…
आता वरचा डेक पूर्ण शांत, निर्मनुष्य होता… चांदण्यात न्हायलेल्या तिथल्या लाकडी फ़रशीवर चालताना कसे आबदार वाटत होते…. डेकच्या दुसऱ्या टोकाला टेबलावर वाईनचे ग्लास मंद चमकत हेलकावत होते…. केरळी लघुकथांचं माझं पुस्तक हलक्या वाऱ्यावर पान फलकावत राहिलं होतं….
खालच्या तळ्यात चंदेरी लाटांच्या रेषा उमटत होत्या….जणू वितळलेल्या चांदण्यातच माझी बोट हेलकावत उभी असावी. दूर क्षितिजाजवळ माडांच्या काळयासावळया आकृती धुक्याने झिरझिरीत झाल्या होत्या…. सगळ्या आसमंतात “त्याचे” मिष्किल मंद स्मित भरून राहिले होते… मग मीही उत्तरादाखल हसले किंचित, माझ्या तिथे असण्याला…. अन असूनही हरवण्याला….
मला समजले होते कि त्या रात्रीचे सौंदर्य अन अविस्मरणीय जादू ही काही त्या तलावतून, चांदण्यातून किंवा बोटीतून जन्माला येत नाही…. तर ते आपल्यातल्याच अंत:स्थ सुंदरतेचं प्रतिबिंब असतं.
सगळी रात्र मी जागी होते की स्वप्नात कोण जाणे… पण पूर्वेला पहाटेची गुलाबी छटा येताना मी मनात एक अविस्मरणीय रात्र साठवून घेतली होती. सकाळ उत्साही अन जिवंत झाली तीच बोटीभोवती पक्ष्यांच्या हालचालीने…. बदकं, बगळे अन किती तऱ्हेचे पाणपक्षी आपापल्या पोटापण्याच्या कामाला लागले होते. जवळच्या एका तारेवर वेडा राघू मोठ्या गंभीर आविर्भावात बसला होता. मधेच एखादी अनपेक्षित झेप घेऊन तो पुन्हा त्याच्या जाअगेवर बसे तेव्हा चोचीत एखादा गलेलठ्ठ चतुर पकडलेला असे!
आमचे कॉफीचे कप रिते होईतो ऊन चढू लागलं होतं. घरी परतण्याची तयारी करताना, हे घर नसल्याची उदास जाणीव टोचू लागली! मुख्य डेकवर आमच्या बोटीचे “खलाशी” सज्जीवन-अन्टोनी निघायची तयारी करीत होते. मी सज्जीवनला विचारले, “मल्याळम मधे बोट चालवणाऱ्याला काय म्हणतात?” हा काय प्रश्न झाला?! अशा थाटात त्याने सहज उत्तर दिले, “सारंग!”
कोकणापासून कितीक किलोमीटर दक्षिणेला मला माझ्याच मायबोलीतला शब्द पुन्हा भेटला… कोकणातला एखादा सख्खा नातलग भेटावा तस्साच!
सज्जीवनने सुकाणू माझ्या हाती दिला अन बोटीचे पंखे उजवी-डावीकडे कसे फ़िरवायचे याचे शिक्षण दिले…. पाणवनस्पतींच्या बेटाबेटांतून वाट काढत आम्ही पाण्यावरच्या अन काठावरच्या आयुष्यावर गप्पा मारत निघालो. सज्जीवनला त्याचे काम अन लगूनवर राहणे आवडत होते. त्याचे उरलेले कुटुंब कोट्टयमला होते अन त्याची मुलगी, “अनुश्री” तिथे इंजिनियरिंग कॉलेजात शिकत होती. (बाकी केरळभर इंजिनियरिंग कॉलेजांची रेलचेल आहे!)
या सारंगाच्या कुशल हाताखाली आमची कमला हेलकावत बंदराला लागली…. सवयीच्या लाडक्या मातीवर पाय ठेवला अन निरोप घ्यायला वळले… कमलासारंग सज्जीवन-अन्टोनीच्या जोडगोळीला हसून हात करताना पावले जड होण्याचे काही कारण नाही असे स्वत:ला दटावले.
परतीच्या प्रवासात सज्जीवनचे सहज शब्द मनात घुमत होते, “नाव वळवतो तो…..सारंग”
या विचित्र अनुभवांच्या बेटांतून मला वळवतो अन त्याचे चंदेरी प्रतिबिंब साऱ्या जगाच्या तळ्यात दाखवतो तो….. सारंग
संतसाहित्यात देवाला नेहमीच नावाड्याची उपमा दिली ती उगाच नाही. जगाच्या खडकाळ किनाऱ्यापासून आत्म्याची नाव अथांग आनंदाच्या खोल समुद्रात वळवणारा….. सारंग.