सत्तरी गाठलेले तरुण राष्ट्र…

दरवर्षीप्रमाणे यंदाही १४ ऑगस्टला आमच्या शेजाऱ्यांनी अन १५ ऑगस्टला आम्ही मोठ्या थाटामाटात स्वातंत्र्यदिन साजरा केला. शेजाऱ्यांना शुभेच्छा देणाऱ्या देशद्रोह्यांना फेसबुकाच्या भिंतीवर जाहीर (पण प्रतीकात्मक) फाशी देऊन सुरु झालेला हा सोहळा, ध्वजवंदने, भाषणे, संचलने अशा ठरलेल्या मार्गाने शुभ्र वस्त्र मिरवीत, जवळच्या चहा-मिसळ कट्टयांवर जाऊन शांत झाला.

पांढऱ्या कपड्यांतल्या ग्रूप-सेल्फींनी देशद्रोहावरच्या ई-चर्चांना भिंतीवरून खाली ढकलले अन राष्ट्रवाद वगैरे वादांना कोणीच वाचत नसलेल्या वैचारिक वृत्तपत्रांसाठी सोडून देण्यात आले.

विषयांतर: वृत्तपत्रांमधेही “सर्वात लोकप्रिय” अन “बुद्धिवाद्यांचा पेपर” असे दोन प्रकार असतात. लोकप्रिय म्हणजे ज्यात कोथरूडच्या काकवा आपण कामवालीला कशी मदत केली किंवा सुनेशी कसे जुळवून घेतले असल्या जिन्यात गप्पा मारण्याच्या विषयांवर “लेख” लिहितात. उरलेली पाने राजकीय पक्षांच्या, त्यांच्या त्यांच्या शिक्षणसंस्थांच्या जाहिराती, पाककृती, फॅशन, सिनेमा, राशिभविष्य असल्या गोष्टींनी अत्यंत रसिकपणे भरवलेली असतात. बुद्धिवाद्यांचा पेपर मात्र कंटाळावाणा असतो. त्यात संपादकीयच काय ते असतं! अन लेखक, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार इत्यादी अनोळखी लोक स्तंभलेखन करतात. असली वृत्तपत्रे फारशी खपत नाहीत. त्यांना भरपूर जाहिराती देखिल मिळतातच असे नाही. विषयांतर समाप्त!

तर. या निमित्ताने एका दुसऱ्या प्रकारच्या, कंटाळावाण्या वृत्तपत्राने देशप्रेमाची प्रचलित व्याख्याच चर्चेला काढली. असल्या संपादकियांमुळेच ते दुसऱ्या प्रकारात मोडतात!

मुळातच, कुठल्याही निष्ठा, अभिमान वगैरे गोष्टी धडधत्या जाज्वल्य ठेवण्यासाठी विचारधारा असावी लागते हा एक बुद्धिवादी गैरसमज! विचारधारा या शब्दातच प्रवाहीपण आहे, स्थैर्य नाही. विचार अन त्यानुसार निष्ठाही काळाशी सुसंगत रहात बदलल्या पाहिजेत, अधिकाधिक प्रगल्भ अन न्याय्य झाल्या पहिजेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील राजनिष्ठा मागे पडून स्वातंत्र्यलढ्याच्या काळात राष्ट्रनिष्ठा पुढे आली. स्थानिक राज्यांशी, राज्यभाषांशी असलेल्या निष्ठा देखिल काळानुसार बदलल्या.

मात्र समाज कधीच आपल्या निष्ठा सहजसहजी पुढे नेत नाही. प्रत्येक विचार सार्वत्रिक झाला, त्याच्याशी लोकांच्या निष्ठा जोडल्या गेल्या कि यथावकाश अश्मीभूत होत जातो. त्याच्याभोवती तयार होणाऱ्या प्रतीकांना लोक उराशी धरून उत्सव साजरे करत राहतात. विचारधारेत होऊ घातलेले नैसर्गिक बदल भितीपोटी अमान्य करून जुन्याच निष्ठांना चिकटून राहण्याचा प्रयत्न नेहमीच होत आला आहे अन त्यामधूनच बंड पुकारत मोठी सत्तांतरे जन्माला आली आहेत.

नव्यानेच पुन्हा पेटू घातलेला जुना राष्ट्रवाद हा डोळस राष्ट्रप्रेमातून जन्माला न येता केवळ प्रतीकांचे पुनरुत्थान तर नव्हे ना, हे तपासून पाहिले पाहिजे.

एकूणातच आपल्या निष्ठा आपण कुठे अन कशा प्रकारे दर्शवतो हेच तपासले पाहिजे. मध्यंतरी चिनी कंदिलांवर बहिष्कार घालण्यासाठी बराच ई-आरडाओरडा झाला. मागाहून चिनी मालाच्या खोलवर पसरलेल्या मुळांची माहिती त्याच मेड इन चायना इलेक्ट्रॉनिक्सने भरलेल्या फोनांवरून इकडेतिकडे पसरली. ज्या क्षणी ही राष्ट्रप्रेमाची धग माझ्याच आधुनिक उपभोगांना लागते त्या क्षणी आम्ही राष्ट्रप्रेमाची प्रतीके सोयिस्करपणे फिरवून घेतो.

आपल्या शेजारी राष्ट्रांशी अन उरलेल्या जगाशी असलेल्या आपल्या राजकीय, व्यापारी अन सामरिक संबंधाची आपल्याला फार तोकडी माहिती असते. आपले राज्यकर्ते, प्रसार माध्यमे, मोठमोठे व्यापारी अन औद्योगिक समूह अन बाजारपेठा ही माहिती आपापल्या स्वर्थानुसार चितारीत असतात.

त्यावर आधारित मते बनवणे अन याचा-त्याचा झेंडा घेऊन ते नाचवतील तसे नाचणे यात कसले आले राष्ट्रप्रेम अन स्वाभिमान?! जोपर्यंत आपण आपल्या वर्तणुकीवर, जीवनशैलीवर कठोर, तर्कनिष्ठ प्रश्न उगारत नाही, जोवर आपण प्रतीकांची शेपूट सोडून डोळे उघडून किमान स्वत:पुरता तरी विचार करत नाही तोवर आपल्या स्वातंत्र्यदिन साजरा करण्याला काहीएक अर्थ नाही.

संस्कृतीने अमेरिकन अन चीनमधे उत्पादित केलेल्या कित्येक वस्तू आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झालेल्या आहेत. जवळपास प्रत्येक घरातील किमान एक तरुण व्यक्ती शिक्षण अन नोकरीसाठी देशाबाहेर स्थायिक होत आहे. आपापल्या संस्कृतीचे रंग घेऊन तिथल्या स्थानिक संस्कृतीमधे मिसळून जाण्याचे सोडून कित्येक परदेशस्थ भारतीय आपापल्या राज्यांचे, जाती-धर्मांचे कळप बनवून तिथे राहतात. भरतातून आठवणीने साबुदाणे नेऊन उपवास बिपवास करतात. वसुबारसेला गाय शोधत बोचऱ्या थंडीत फिरतात! या गोंधळात पाडणाऱ्या राष्ट्रप्रेमाने धड ना देशी धड न विदेशी अशा सांस्कृतिक कचाट्यात बिचारी सापडतात. भारतातच राहूनही आधुनिक जीवनशैली अन सांस्कृतिक प्रतीकांमधे ओढाताण करून घेणाऱ्या अनेक पतिव्रता ऑफिसला जायच्या आधी घाईघाईने वडाच्या थोटकाला तरतरा फेऱ्या घालीत गुदमरवून टाकतातच म्हणा, तिथे आपल्या सांस्कृतिक प्रतीकांचा खजिनाशोध विदेशात कसा खेळावा?!

आपल्या धार्मिक निष्ठा तपासून पहायला हव्या असे म्हणताच, “हे जाऊन त्या लांड्यांना सांगा” अशी गर्जना ऐकायला मिळते. मग सुरुवात नक्की कोणी करावी विचार करायला?!

धार्मिक निष्ठा कुठल्याही पाळीव अथवा वन्य प्राण्याशी, स्त्रियांच्या गुप्तांगांशी किंवा इतरांच्या सामिष-निरामिष आहाराशी जोडलेल्या असणं खरोखरच धर्मसुसंगत आहे का?! अजून तर्कसुसंगततेपर्यंतचा प्रवास तर बाकीच आहे.

इस्लाम धर्मीयांची मने राखण्यासाठी आपण पोर्क (डुकराचे मांस) कायद्याने निषिद्ध मानत नाही. जैन धर्मीयांचे मन राखण्यासाठी मांस, मासे, अंडी, दूध, दुधाचे पदार्थ, मध व अन्य प्राणिजन्य खाद्य पदार्थ, मेण, चामड्याच्या वस्तू इत्यादी बंद होत नाही. मग दुसऱ्यांनी गोमांस खाल्याने आम्हा हिंदूचे बरे पोट दुखते?! हिंदू बहुसंख्य आहोत म्हणून?!

ज्या हिंदूंना हे गोमातेचे प्रेम अचानक उफाळून आले आहे त्यांनी सावरकर कधी वाचलेच नाहीत. सावरकरांचे आडनाव त्यांना आवडत नसावे! वेद, वेदांत, त्यांवरील इतर भाष्ये, विवेकनंद यांना तर आम्ही विसरलोच कारण आम्हाला शिवाजी महाराजांच्या आधीचा-नंतरचा इतिहास जाणूनच घ्यायचा नाही. मग कुठल्या हिंदुत्वाचे हे रक्षक?! हिंदुत्व म्हणजे केवळ भगवा ध्वज, ढोल पथके, नऊवारी साडी, नथ, मंगळागौर, गाय अन प्रमाणभाषेच्या चिंधड्या उडवीत लिहिलेले भडक ई-मजकूर इतकेच का?!

अफगाणिस्तानापसून ते बालीद्वीपापर्यंत अनेकानेक संस्कृतींमधी विरघळून कित्येक शतके प्रवाही राहिलेले हिंदुत्व इतक्या तोकड्या प्रतीकांनी मर्यादले जात नाही. त्याच्या राखणीसाठी यांच्या दंडुक्यांची अन बेगडाने मढवलेल्या तलवारींची काहीएक गरज नाही.

आणि हो, या सगळ्याचा कुठला पक्ष सत्ताधारी आहे याच्याशी काही संबंध नाही. कारण जे आपण खोल, आत मनात म्हणत असतो पण करायचा धीर होत नाही, तेच आपले सत्ताधारी उघड उघड करत असतात. लोकशाही हा त्या अर्थी भस्मासुराला मिळालेला वर आहे! आता फक्त स्वत:च्या शिरावर हात ठेवण्याचीच खोटी!

मुळात आपणच जर एक नंबरचे स्वार्थी, लाचखोर, कोत्या मनाचे, नियमांतून पळवाटा शोधणारे, न्यायाची अजिबात चाड नसलेले अन वरकरणी संस्कृती, राष्ट्रप्रेमाचा आव आणणारे असू तर आपले शासन चालवणारे तसेच वागणार, आपल्याला चेतवण्यासाठी त्याच जुनाट प्रतीकांचा अजून उदो उदो करणार.

लोकांना झिंगवण्यासाठी सण, उत्सव, देव, देवता, सिनेमा, गाणी, टीव्ही, फेसबुक, मॉल्स, दारू, निवडणुका इत्यादी जामानिमा भरपूर आहे. कोण तो आपल्या फयद्यासाठी यशस्वीपणे वापरतो ते महत्वाचे.

स्वातंत्र्यदिनाची एक राष्ट्रीय सुट्टी असल्या विरोधाभासांनी भरलेल्या, “नाईलाज आहे” या वाक्याने प्रत्येक डोळस प्रश्न मोडीत काढणाऱ्या आपल्या सर्वार्थाने परतंत्र आयुष्याचा विचार करण्यासाठी वापरता येईल तर स्वातंत्र्याच्या दिशेने एक पाऊल तरी उचलले असे मला वाटेल.

आजचा दिवस माझ्या सत्तरीतल्या तरूण राष्ट्राला प्रेमादरपूर्वक समर्पित….