लेखकराव अन तसलंच काहीबाही….

हे सगळं लिहिण्याचं कारण असं कि, आज खूप दिवसांनी गिरिशरावांना भेटले. ते ज्ञान प्रबोधिनी नावाच्या मोठ्ठ्या संस्थेचे संचालक वगैरे असले तरी भयंकर गोड हसतात अन त्यांची भिती वाटायच्या ऐवजी छानच वाटायला लागतं उगाच. तर, ते म्हणाले कि, “तुझ्याबद्दल बाहेरच्या लोकांकडून बरंच ऐकायला येतं.” वरकरणी मी हसण्यावारी नेलं अन उलट विचारलं कि, “चांगलंच ऐकलंत नं, मग ठीकंय.” पण दोन क्षण माझ्या पोटात वेड्यासारख्या लाटा उसळ्या मारून गेल्या! हे असे काही मोजके लोक असतात, गिरिशराव अन पोंक्षे सरांसारखे ज्यांनी आपल्याला अडनिड्या वयात, मळक्या कपड्यात, चष्मा सावरत, अडखळत बोलताना पाहिलेलं असतं अन त्यांनी जर थोडं जरी कौतुक केलं नं, तरी आपण विरघळून मरून जाऊ की काय असं होतं!!

***

झोकून देऊन काम करताना माणसाला कौतुकाची भूक नसते. कौतुक व्हायला लागल्यावर ती भूक जागी होते. सुरुवातीला छान वाटतं नुसतंच, कामाचा हुरूप वाढतो. आत्मविश्वास वाढतो, कधीकधी नको तेवढा वाढतो.

हे कौतुक भलतंच दुधारी शस्त्र आहे. पाहता पाहता स्वतंत्र बुद्धीला आपलं गुलाम करून टाकणारं मायावी शस्त्र!  गेल्या काही वर्षांत अनेक “तारांकित” लोकांना लक्ष देऊन पाहते आहे. त्यांच्यापासून दुरावलेले खरे हितचिंतक अन  त्या जागी चिकटलेले चमचे हा एक चमत्कारिक प्रकार असतो. मनापासून काम करणाऱ्या, सरळ-साध्या माणसांना प्रसिद्धीलोलूप होताना पाहूनच कौतुकाची भितीच बसत गेली आहे. तोंडावर अपमान करणाऱ्या जुन्या दोस्तांना आजकाल जिवाच्या कराराने धरून ठेवलंय मी.

कौतुक करणारे लोक खरोखरीच मनापासून करत असावेत, असं जरी आपण धरून चाललो तरी, त्यातल्या त्यात आपल्या परोक्ष होणारं कौतुक ठीक. मात्र सार्वजनिक कौतुक सगळ्यात भयंकर. ते कधीच सत्याला धरून रहात नाही. सार्वजनिक कौतुक लहान सहान विपर्यासांनी सुरू होऊन विचारापेक्षा व्यक्तीचं उदात्तीकरण करण्यापर्यंत कधी जाऊन पोहोचतं ते कौतुक सहन करणाऱ्यांच्या लक्षातच येत नाही.

साध्या कार्यरत माणसाचा कार्यकर्ता झाला की सामान्य माणसांना त्याच्यापासून वेगळं राहता येतं… सामान्य राहता येतं. इतरांना मोठेपणाच्या खुर्चीत बसवलं की आपण आपलं विरोधाभासाने भरलेलं आयुष्य जगत टाळ्या वाजवायला मोकळे राहतो हा मोठा चाणाक्ष विचार सो कॉल्ड “सामान्य माणसं” करतात! ते लक्षात येईपर्यंत पुलंच्या भाषेत “लेखकाचा लेखकराव” झालेला असतो.

आपल्या अतिरंजित सार्वजनिक प्रतिमेतून खऱ्या स्वत:ला शोधण्याची धडपड करण्यातच भल्याभल्यांचे हकनाक बळी गेले. याविरुद्ध, प्रसिद्धीपासून दूर राहण्यासाठी येणाऱ्या-जाणाऱ्याचा तुसडेपणाने अपमान करून कित्येक पुणेरी महाभागांनी त्यांच्या चांगल्या कामात विनाकारण अडसर निर्माण केल्याचीही उदाहरणं कमी नाहीत.

पाय जमिनीवर ठेवून कौतुक झेलता येणं, तरीही कौतुकाच्या शब्दांनी मर्यादून न राहणं हे प्रत्यक्ष चांगलं काम करण्यापेक्षाही अवघड आहे. चांगलं काम करू इच्छिणाऱ्या माणसांवर आपल्या कामाव्यतिरिक्त ही दुहेरी जबाबदारी पडते. पण स्वत:ला सामान्यपणाच्या परिभाषेत बांधून ठेवणाऱ्या लोकांना आपण मनापासून काम करणाऱ्यांना नकळत दूर करतो आहोत याची कल्पनाही नसते.

समाजमाध्यमांची पकड जसजशी विस्तृत अन खोल होत जात आहे तसतसं कौतुक फारच स्वस्त होत चाललं आहे. आपल्या जबाबदारीची जाणीव पुरती रुजण्याआधीच आमच्या पिढीचं भलतंच कौतुक झालं अन अनेक आश्वासक तरुण मुलामुलींमधून उद्याचे कणखर नेते, कलाकार, विचारवंत, कार्यकर्ते उभे राहता राहता भलतीकडे वाहून गेले.

आपलं काम अधिकाधिक परिणामकारक होण्यासाठी जर आणि जितक्या प्रसिद्धीची खरोखर गरज आहे तर अन तेवढीच प्रसिद्धी मान्य केली पाहिजे. ती प्रसिद्धी स्वत:च्या प्रतिमा-उन्नतीसाठी नसून आपल्या कामाच्या अन त्यामागच्या विचारसरणीच्या पुरस्कारासाठी आहे याचा कधीही विसर पडता कामा नये. काही प्रकारच्या कामांसाठी खरंतर अज्ञात राहणं अधिक उपयुक्त असतं हे वेळीच ओळखता आलं पाहिजे. अन तरीही जर लोक तुमच्या कामाचं कौतुक करत असतील तर त्याचा आनंद आपल्या गुरुजनांना अन घरच्यांना घेऊ द्यावा. आपल्या कौतुकावर केवळ त्यांचा हक्क असतो.

माझ्यासारख्या कौतुकाशिवायच डोकं हवेत असणाऱ्यांना याची परत परत आठवण करून द्यावी लागते. तेव्हा कान ओढून जमिनीवर उतरवणाऱ्या मित्रांना, गुरूंना अन आप्तांना अजिबात अंतर देऊ नये! त्यांनी कधीकाळी चुकून केलंच तर तेवढं कौतुक मात्र बिनधास्त मनावर घ्यावं अन खूष व्हावं!!

आज्जीच्या मांडीत डोकं घुसळून केस विस्कटून घेण्यात, बाबाच्या हातचा कालवलेला वरणभात खाण्यात, मित्रांबरोबर तिलकला चहा मारत आचरटपणा करण्यात, शाळेतल्या शिक्षकांकडून अजूनही हक्काने पुस्तकं मागून वाचण्यात जे अक्राळविक्राळ सुख आहे नं ते घालवण्याइतकं महत्त्वाचं जगात काहीही नस्तंच मुळी. बस्स, बाकी लहानपण मागे सोडून मोठं झाल्याबद्दल काही तक्रार नाही!