हे एक भाषांतर फार दिवसांपासून अधांतरी होते. पूर्ण करून ब्लॉगावर टाकेपर्यंत पुढच्या दक्षिणयात्रेची वेळ झाली आहे!! तरीही……
***
ते बाकी काही असो, आयुष्य ही एक खाद्ययात्राच असते! एका जेवणाकडून दुसऱ्या जेवणापर्यंत माणसाचा प्रवास निव्वळ पुढच्या मेजवानीच्या आशेवर होत असतो! तसं पाहिलं तर एकाच प्रवासाचं अनेक प्रकारे वर्णन करता येतं, पण या प्रवासाची गोष्ट मात्र चवीपरीने चाखता येईल अशी आहे!
असं म्हणतात कि साक्षात आदिशक्तीच माणसाच्या भौतिक गरजा जसे की भूक, भागवण्याचं काम करत असते. या समजामागे हेतू असा कि माणसाने आयुष्यात छोट्यामोठ्या गरजांपाठी धावत राहू नये. त्याच्या जगण्यामागे काही मोठा हेतू असावा. मनुष्य जर विश्वाच्या पसाऱ्यात काही कळीची भूमिका पार पाडत असेल तर विश्वच त्याचे क्षेम वहात असते. यात अंधविश्वासापेक्षाही साधा उपयुक्ततेचा विश्वनियम आहे. याला तुम्ही वैश्विक शक्ति म्हणा, मदर मेरी म्हणा, आदिशक्ति, अंबाबाई, ग्वादलूपे किंवा आई, आज्जी, काकी, मामी म्हणा! नाटकातले नट बदलत राहतात मात्र भूमिका तीच असते. कुणीही रांधले तरी शेवटी काय?! आपले पोट रोज भरले जाते.
तर ते दोन आठवडे माझेही पोटपाणी आदिशक्तीच्या कुठल्या ना कुठल्या रूपाने सांभाळलेच! ही एक मजेदार गोष्ट आहे जी पोटाला आत्म्याशी सांधून घालते!
पहिला एक आठवडा मी ऑरोविलमधे मातीचे बांधकाम शिकण्यात घालवला. माझा दिवस लेक्चर्स, केसस्टडी, डिझाइन स्टुडिओ अन भाराभार पुस्तके खाण्यात जात असे. असल्या बौद्धिक कसरतींशिवाय पहिले दोन दिवस ऑरोविलचा नकाशा मनात पक्का करणे, एका हातात टॉर्च धरून सायकल चालवणे इत्यादी कौशल्य शिकण्यात गेले. इथे एकापेक्षा एक वरचढ खायच्या जागा असल्या तरी मला झाडीतून निवांत सायकलवर फिरत त्या शोधण्याचा वेळ अजिबात नव्हता.
दगडी ब्रेडवर बटर अन जाम थापटून खाणे हा माझ्या रात्रीच्या जेवणाचा ठरलेला बेत होता. माझ्या खोलीच्या मध्यात फ़रशीवर, पुस्तकांच्या गराद्यात बसून मी रोज नित्यनियमाने ब्रेड बटर “जेवत” होते. बंद न करण्यासाठी बनवलेल्या खिडक्यांमधून डासांसोबत देशोदेशीचं संगीत खोलीत शिरत असे. फ्रेंच, इटालियन, ग्रीक किंवा मध्यपूर्वेतील लोकसंगीत हा माझ्या जेवणातला एकमेव नवा पदार्थ असे!
पण त्या एका आठवड्याची आठवण येतात मनामधे एकच चित्र उभे राहतं, अर्थ इन्स्टिट्यूटचं उजळ ग्रंथालय, तिथली नीरव शांतता भंग करण्याचे अधिकार फक्त चिरचिरत झाडांवर फिरणाऱ्या खारींना अन मोरांच्या केकांना आहेत. जेव्हा भोवतीच्या डहाळ्यांतून वाऱ्याची झुळुक फिरायची, तेव्हा पानातून गाळून खाली उतरणाऱ्या उन्हाचा सोनहिरवा नाच सुरू व्हायचा…
मातीच्या बांधकामावरच्या जगातल्या उत्तमोत्तम पुस्तकांच्या रांगांचा वास! या वासाला दिवसातून दोनदा खंड पडायचा, गरमागरम तामिळ कॉफीच्या सुगंधाने! इन्स्टिट्यूट्मधील दुपारचे जेवण हा एक साग्रसंगीत कार्यक्रम असतो. बांधकाम, पर्यावरण, देशोदेशीच्या कार्यसंस्कृतीचे अनुभव हे सारे तिथला जागतिक विद्यार्थी समुदाय एका तितक्याच जागतिक खाद्यानुभवासाठी एकत्र जमतो! नारळाच्या दुधातले डोसे, “चपाथी”चे तामिळ रूप, भात अन सांबाराचे अनेक प्रकार! मात्र एका दिवशी पास्ता अन सांबार एकाच ताटात वाढून मिळाले तेव्हा मात्र मी हातच जोडले!
दुपारचे जेवण हेच एक खरे जेवण मिळणार असल्याने इन्स्टिट्यूटमधल्या अंजनी अम्माला मनोमन धन्यवाद दिले. जे काही रांधले असेल ते अम्मा एकदम हसऱ्या चेहऱ्याने वाढत असे! मी चुकून लायब्ररीतच खूप वेळ घालवला तर माझ्यासाठी राखून ठेवत असे…
तर अशा प्रकारे एक अभ्यासू अन भुकेला आठवडा संपत आला अन मी पॉंडिचेरीला जाऊन मनसोक्त खऊन घेण्याची संधी साधली! एका मस्त कोवळ्या सकाळी पॉंडिचेरीत पोहोचताच मी सरळ तामिळ रेस्टॉरंट गाठले. इडली वडा सांबरम अन गरम कॉफीच्या कपात मला, देवाशपथ, स्वर्गप्राप्तीच झाली. खरं सांगते, सांबाराच्या वाटीत कढिपत्त्याची फोडणी दिसली कि माणसाचा जगण्याचा दृष्टिकोनच सुधारतो!
गाडीच्या मागच्या सीटवर बसलेल्या अबोल खाद्यप्रेमीचा एव्हाना ड्रायवरला अंदाज आला होता! त्याने दुपारच्या जेवणाला एका खास जागी गाडी थांबवली. हे एका फ्रेंच आर्किटेक्टने चालवलेले रेस्टॉरंट होते. अर्थात हे सांगण्याची गरज नाही कि हा गोरा देखिल ऑरोविलचाच आहे! फ्रेंचांची हलकाफुलकी पण रुचिपूर्ण सौंदर्यदृष्टी इथे पुरेपूर उतरली होती…त्यात तामिळ किनारपट्टीच्या बांधकाम कौशल्याची भर!
मी एका कोपऱ्यातल्या वेताच्या टेबलाशी जाऊन टेकले. अन मग बेसिल सॉसमधला मासा, उकडलेले बटाटे, फ्रेंच ब्रेड अन माणकं वितळवल्यागत हलणारी फ़्रेंच वाईन… तो तामिळ सर्व्हर मेन्यूवरील खास पदार्थ उत्साहाने सुचवत होता. हसऱ्या चेहऱ्याने खाऊ घालणाऱ्या आदिमातेच्या या रूपाला देखिल माझी काही म्हणता काहीसुद्धा हरकत नव्हती!
ऑरोविलमधून आपला गाशा गुंडाळण्यापूर्वी मी पूर्ण वसाहतीमधून एक फेरफ़टका मारला, ऑरोविलच्या सदस्य किंवा पाहुण्यांसाठी राखीव असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर भटकून आले. इथली शेवटची संध्याकाळ विझिटर सेंटरच्या मोकळ्या ढाकळ्या रेस्टॉरंटमधे घालवावी हे तर विचार न करताच मनाशी ठरून गेले होते. लाल मातीच्या ब्लॉक्स वापरून बांधलेल्या कमानी अन पुस्तकांच्या दुकानांनी वेढलेला लहानसा चौक म्हणजे हे रेस्टॉरंट. माडांच्या उंच खांबांमागे सूर्य मावळत होता. माझ्याभोवती रेस्टॉरंटची गजबज होती. टेबलावर एका कागदी कंदिलात दिव्याची ज्योत फुरफुरत होती. योगी अरविंदांच्या शिक्षणदृष्टीवर आधारित पुस्तकाला सोबत म्हणून डाळिंबाच्या रसाचा पेला अन केकचा तुकडा देखिल होते!
गेल्या काही दिवसात या आदिमायेने फक्त माझ्या पोटालाच नाही तर आत्म्याला देखिल खाऊ घातले होते. ती संध्याकाळ मी मनाशी जपून ठेवली आहे, आईच्या मऊ स्पर्शासारखी, शाळेत पोंक्षेसरांच्या घनदाट दाढीत हसणाऱ्या शाब्बासकीसारखी अन भविष्याच्या आश्वासक अभिवादनासारखी…
मी ऑरोविल सोडले तरी तिची हळुवार काळजी मला सोडत नव्हती. विमानवाल्या गारढोण सॅंडविचवर दिवस ढकलून मी त्रिवेंद्रममधल्या हॉटेलात सामान टाकलं अन सरळ जवळच्या खानावळीचा रस्ता धरला. खानावळीची मालकीण एक गोड मल्याळी बाई होती. तिच्या गजऱ्यातल्या जाईच्या सुवासाने मला खरोखर केरळात आणून ठेवले!
आपले मोठाले डोळे रोखून मालकीणबाईंनी माझी पूसतास केली. कित्येक तास आवरून धरलेली भूक मला नीटशी लपवता येत नाही बहुदा! तिने लगोलग माझ्या पनात भाताचा शीग लावला. दोन चार प्रकारची सांबारं अन केरळी चटण्या वाढल्या. मग गोड हसून तळलेल्या माशाचे दोन तुकडे देखिल वाढले, मी न मागता!! माझा अर्धा रडवेला अन अर्धा हसरा चेहरा काय ते सांगून गेला असावा कारण अम्हा दोघीत शब्दांची कुठलीच भाषा शक्य नव्हती!
त्रिवेंद्रमचे रिक्षावाले मात्र इतके हळुवार अजिबात नाहीत! अगदी पिसाळलेल्या वळूसारखे गाडी चालवतात! विचित्र पत्ते शोधून काढण्याच्या त्यांच्या हातखंडा कौशल्याशिवाय माझी लॉरी बेकर तीर्थयात्रा सफळ संपूर्ण झाली नसती हे मात्र इथे मान्य केले पाहिजे. चांगली टीप हवी असेल तर मला त्यातल्यात्यात अस्सल जागी खायला उतरवायचे हे त्या चलाख रिक्षावाल्याला अंतर्ज्ञानानेच कळले!
जेऊनखाऊन मी जेव्हा कन्याकुमारीला जाण्यासाठी गाडीत बसले तेव्हा मात्र झोप अगदी डोळ्यावर आली. कोवलमच्या समुद्रकिनाऱ्याचा खारा वारा अमली पदार्थागत काम करत होता. मधूनच जाग आली तर एक हिरव्या रंगाची सलग भिंत मागे धावत असावी तशा नारळीच्या बागा खिडकीतून दिसत होत्या. इतका हिरवा रंग पहात झोपलं तर स्वप्नसुद्धा हिरवी पडतात, मी खात्रीशीर सांगू शकते!
विवेकानंद केंद्राच्या शांत आवारात उतरले ती एका स्वप्नातून दुसऱ्या स्वप्नात अल्लद उतरावं तसंच काहीतरी. एका दीर्घ मुलाखतीनंतर ज्यात माझ्या भेटीच्या उद्देशापासून ते पूर्वजांपर्यंत सगळे सखोल चौकशी झाली, मला केंद्राच्या अतिथिगृहात रहायची परवानगी मिळाली. विवेकानंद केंद्राचं हे आवार म्हणजे एक छोटं शहरच आहे. कार्यकर्ते, सदस्य अन कर्मचारी यांशिवाय पाच हजार केवळ अतिथी एकाच वेळी इथे राहू शकतील! स्वच्छ नेटक्या खोल्या अन सुरेख खारा वारा, बस्स मी तर खूष होते.
सुरवातीची कडक चौकशी वगळता, एकदा आत घेतल्यावर मात्र केंद्राच्या लोकांनी भरभरून कोडकौतुक पुरवलं! सख्ख्या घरच्यागत खाऊपिऊ घातलं! विवेकानंद केंद्राचं कॅंटीन, “गौरीशंकर” ही एक अजब जागा आहे जिथे केंद्राचे कार्यकर्ते, पाहुणे, माझ्यासारखे विनाकारण अभ्यासू असले सगळे नमुने एकगठ्ठा सापडतात. गौरीशंकराचे लुंगीबद्ध म्यानेजर साहेब हसून मला टेबलापाशी बसवून गेले अन मला अचानकच मोकळं वाटू लागलं…..परकेपणा विसरूनच गेले मी! तिथला “लिमिटेड रैस मीळ” माझ्या पोटाच्या लिमिटच्या पलीकडेच होता. पण मी ताट कसंबसं रिकामं करतेय तोवरच वाढपी दादा आपल्या शुभ्र दंतपंक्ती दाखवीत भात वाढायला सरसावले. त्यांची “लिमिटेड” ची संकल्पना नक्की काय होती? माझ्यात ठासून भात भरून पाठवणे?! तोवर म्यानेजर साहेब माझ्यासाठी केळं घेऊन आले, “गुड फार डायजेशण्ण!” स्वत: एका केळ्याचा समाचार घेत म्हणाले!
मला एकटीला जेवायला आवडतं, कारण मग वाचता वाचता जेवता येतं. मात्र गौरीशंकरातल्या सगळ्यांना माझी ही खोड विचित्र वाटत असे. माझे “व्हायब्रेशन” म्हणे फार चांगले होते, असा अभिप्राय एका जेव्याने दिला तेव्हा मी सपाटच! आपल्याला बुवा लोकांची “व्हायब्रेशन” नुसार वर्गवारी करता येत नाही!
तिथे एक मलेशियन बाई येत असत. आपली चिनी नववर्षाची सुट्टी त्या केंद्रात योग व अन्य काहीबाही शिकण्यात घालवत होत्या. एक अत्तिशय चिवित्र कार्यकर्ता देखिल येत असे. तो अध्यात्म-भुकेल्यांची एक फेसबुक जत्रा चलवत असे. त्याने मलाही जत्रेत सामील करून घेण्याचा बराच यत्न चालवला. माझ्या “व्हायब्रेशन”चा परिणाम कि काय कोण जाणे! शेवटी हात जोडून स्पष्टच नाही म्हणल्याशिवाय काही लष्टकं सुटत नाहीत हेच खरं.
केंद्रात विवेकानंदांवर एक अतिशय सुरेख चित्रप्रदर्शन आहे. तिथल्या तिकीटमास्तरांनी मला “टॉप आर्किटेक्ट” होण्याचा आशीर्वाद दिला आहे! आहेम! मी त्यांना “असं टॉप नावाचं काही नसतं हो” असं समजावायचा वायफळ प्रयत्न केला…. पण जाऊदेत.
खूपदा जेव्हा तुम्ही सपक, साधं, अनग्लॅमरस खरं बोलता तेव्हा लोकांना तो तुमचा मानभावीपणा वाटतो अन अधिकच पंचाईत होते! मग ती मोठेपणाची अवजड टोपी घालून घेण्यावाचून पर्यायच नाही उरत. त्यात काही गौरवाची भावना होत नाही, तर अतीगोड औषध प्याल्याची भावना होते….. नंतर जिभेवर कडवटपणा रेंगाळवणारं मिट्ट गोड औषध…..
त्यांची निरागस सद्भावना माझ्या फटकळपणाने का दुखवा असा विचार करून मी माझा जुनाच निरागस बहिरेपणाचा आव आणून प्रश्न निकालात काढला. हे सगळेच लोक मला गोड हसून सामोरे आले, माझ्याशी फार प्रेमाने वागले. त्यात त्यांचा काहीही हेतू नव्हता, माझ्याकडून मिळण्यासारखं काहीएक नव्हतं. मी केवळ एक पाहुणी होते, दोन चार दिवसात कायमची निघून जाणारी…. तरीही त्यांच्यासाठी मी परकी नव्हते…..पुन्हा “व्हायब्रेशन”चा परिणाम बहुदा!!!
केंद्राला भेट देण्याचा माझा मुख्य हेतू होत वासुदेवजींची भेट घेणे. विवेकानंद केंद्राच्या natural resource development प्रकल्पाचे प्रमुख अन अनेक भाषा ज्ञात असलेला हा एक सुरेख माणूस जो organic architecture बद्दल एक आनंददायी जीवनानुभव असल्यागत बोलतो!
त्यांच्याच हाताखाली बांधला गेलेला “technology research center” चा परिसर हे पर्यावरणपूरक वास्तुरचनेचं एक सरळसोट उदाहरण आहे! सिस्टर सरस्वथी तिथल्या व्यवस्थापनाची जबाबदारी पाहतात. मी त्यांना प्रथम भेटले तेव्हा ही चिटुकली बाई स्वयंपाकघरामागे “हरिभजनम” गुणगुणत “पाप्पडम” तळत बसली होती. सरस्वथीअक्कानी मला “सगळा परिसर पाहून जेवायला इथे ये” अशी आज्ञा केली. मी बारीक आवाजात “कँटीनमधे जाईन मी” असं पुटपुटले मात्र अन ती आदिमाया आपले काजळ रेखलेले डोळे माझ्यावर वटारून म्हणाली, “अम्मा जेव्हा आमच्या सोबत जेवायची आज्ञा करते तेव्हा नाही म्हणायचं नसतं”. मी बिचारी काय बोलणार! त्या अम्माने पुन्हा डोळे वटारू नयेत अशी प्रर्थना करून स्वयंपाक घरात मदतीला सरसावले.
एकदा मी जेवणाला थांबायचे कबूल केल्यावर मात्र सरस्वथीअक्का एकदम खुषीत आल्या अन म्हणाल्या कि तुमचं पुणं फारच बाई बकवास शहर आहे. मी लगोलग मनापासून हो म्हणून टाकलं!! मग त्या म्हणाल्या कि आर्किटेक्ट लोक फारच उपद्रवी जमात असते. मी त्यालाही मान डोलावली! अन अशा प्रकारे आमच्यात एकमत झाल्याने सुसंवाद प्रस्थापित झाला! अक्कांच्या ताबेदारीत मी “कुंजुम” तामिळ देखिल शिकून घेतलं. “मोदुम” म्हणजे ताक अन “पोडुम” म्हणजे पुरे झालं. माझं तामिळचं अज्ञानप्रदर्शन देखिल इथेच पोडुम झालं.
हळूहळू अक्कांचं सगळं जग माझ्यापुढे उलगडू लागलं. त्यांची झाडं, त्यांचे लोक, त्यांचे विद्यार्थी, त्यांचं स्वयंपाकघर, पाळलेली मांजरं, पक्षी…. अन मी देखिल…. सरस्वतीअक्कांनी त्यांच्या नकळतच मला माझ्या सगळ्या प्रवासांचं सार काढण्यापर्यंत आणलं…. इतके दिवस मला का अन कोण जेऊ घालत होते याचा आश्चर्यकारक उलगडा त्यांच्या रागे भरण्यातून होऊ लागला आहे. जेवणाची किंमत हजार रुपये, चाळीस रुपये किंवा नुसताच एक रागीट कटाक्ष असो, मात्र या दक्षिणयात्रेत मला दररोज जेऊ घातले गेले. काहीतरी कारण नक्कीच असणार…..