मुन्नारकथा…

केरळबद्दल इतके ऐकले होते कि खाचखळग्यातून उसळ्या घेत जाणाऱ्या पर्यटक बसमध्ये अवघडून दिवसभर फिरून केरळ पाहिल्याचे समाधान मिळेना.

मुन्नारमधला पहिला दिवस गाईडसाहेबांच्या कडक शिस्तीत घालवल्यावर मी दांडी मारायची असा निश्चय केला! आमचे गाईड हे स्वत:ला बालगुन्हेगारांच्या शाळेचे हेडमास्तर समजत बहुदा, पण त्यामुळे खूप वर्षांनी दांडी मारून गाव भटकायला मजा आली!

अनोळखी गाव… अनोळखी लोक…खरेखुरे, जितेजागते, चालतेबोलते लोक! एका पर्यटन स्थळाच्या चेहऱ्यामागे जगणारे लोक…. त्यांच्या गावात मी मनसोक्त भटकले! रंगीत रिक्षातून झुइकन फिरले! मल्याळी भाषा न समजल्याने मूकबधीर असल्यागत हातवारे करत गप्पा मारल्या!

त्यांच्या इमारती अन बांधकामे पाहिली. त्यात एक केविलवाणा प्रयत्न होता, त्यांच्या नैसर्गिक डोंगराळ वास्तुशैलीला पाश्चिमात्य प्रगतीच्या साच्यात बसवण्याचा….अन त्या प्रयत्नाचं हताश अपयश देखील.

शहरातील लोकाना आवडतील म्हणून त्यांनीही काचेच्या इमारती बांधल्या…. शहरातील लोकच पर्यटनाच्या माध्यमातून त्या सगळ्याचे अन पर्यायाने रोजगाराचे पैसे देणार होते ना! अतिसुंदर पश्चिम घाटाला लागलेल्या खरुजेसारख्या त्या ठोकळ्यांच्या गर्दीत एखादे अनघड दगडांचे छोटेसे घर गच्च झाडांच्या दातीमागून डोकावत असे…. काळ्याभोर लबाड डोळ्यांच्या डोंगराळ आदिवासी पोरासारखे!

बाजाराच्या मुख्य भागातून बाहेर पडण्यासाठी मला एकदोन टेकाडे ओलांडावी लागली. पर्यटकांच्या भागातून न दिसेल अशा डोंगराच्या भागात स्थानिक लोकांची वसाहत होती… दगडी चिरे लावून टिकवलेले जुने रस्ते अन जुनी दगड-लाकडात बांधलेली छोटी छोटी घरं… लाकडाच्या टिकाऊपणावर शंका घेणाऱ्या माणसांपेक्षा अधिक वयाची ही घरं खालच्या काचेचा महालांना ठेंगणी करीत होती…

मानवी वस्तीपालीकडे चहाच्या मळ्यांचं न संपणारं राज्य होतं…. तिथल्या दरीडोंगरात चिवलेबावले पक्षी झेपावत होते. कडक शिस्तीत आखलेल्या चहाच्या मळ्यापूर्वी तिथे असलेल्या उत्कृष्ट जंगलाचे गाणे गात भिरभिरणारे ते पक्षी कदाचित माझ्याच मनाचे होते! माझ्यातील रसिकतेवर निसर्गप्रेमाने केलेली कुरघोडी मला बेशर्त मान्य आहे. चहाच्या एकांड्या लागवडीने मारून-मुटकून हिरवे केलेल्या पश्चिम घाटात मी हिरमुसून शोधत होते शतकांपूर्वी कापलेलं वैभवशाली सदाहरित जंगल….

कदाचित अशा पर्यटनस्थळाचा उपभोग मी घेऊ शकत नाही हा धडा गाठीशी बांधून मी मुन्नार सोडायला बसमध्ये चढले… अलवार धुक्यात केवळ विरोधाभासाने खुलून दिसणाऱ्या पश्चिम घाटाच्या रांगडेपणाला मात्र मी आजन्म मनात जपेन… त्याच्या दिलदार, मूक अन राजसी वनवैभवाला रोज रोज आठवेन….