व्यसन या शब्दाविषयी मुळात फार अज्ञान आहे, असं नाही का वाटत तुम्हाला? सामान्यत: लोकांना दारु, तंबाखू, धूम्रपान आणि फारफार तर अमली पदार्थ हीच व्यसनं असतात असं वाटतं. पण या सगळ्या उघड व्यसनांचा इलाज शक्य आहे…. यापेक्षाही भयानक व्यसनी लोक आपल्या भोवती राहात आहेत, ज्यांचा आपल्याला पत्ताही लागत नाही….
हे पैशाचे, सत्तेचे, प्रतिष्ठेचे व्यसनी लोक आपल्या व्यसनांना अतिशय सुरेख शब्दांत मांडतात…. त्यांच्या यशाचं सगळी दुनिया कौतुक करते…. उघड उघड पहाता हे लोक जणु सगळ्या जगाचे सूत्रधार असावेत असाच समज असतो!
आपल्या आयआयएम पदवीला सगळ्यात मोठा अलंकार मानणा़या, अगडबंब पगाराची धुंदी चढलेल्या, पण निर्व्यसनी माणसापेक्षा दारुच्या नशेत देवाचं नाव गात बसलेला कुणी वेडा बैरागी कित्येक पटीने बरा! पण लौकिकार्थाने एक जण यशाच्या शिखरीचा राजा आणि हा मात्र दारुडा!!
याचा अर्थ दारु चांगली आहे! असा सोयिस्करपणे काढू नये. पण यश आणि योग्यता मोजण्याच्या आपल्या मोजपट्टीत काहीतरी चूक जरुर आहे. अतिशय हलकट आणि बेजबाबदार व्यक्तींच्या हाती सत्ता, शक्ती देतो आपण. प्रत्येक चुकीची दिसणारी गोष्ट सरकारवर, देशावर, समाजावर आणि कुणीच नाही सापडलं तर परिस्थितीवर ढकलून आपण समोरच्या चहाच्या कपात मोठ्या समाधानाने बुडून जातो. हेही एक व्यसनच!
देशाची सत्ता चालवणाऱ्यापासून हाउसिंग सोसायटीची सत्ता चालवणाऱ्यांपर्यंत सगळ्यांना सत्तेचं व्यसन आहे….
साजुक तुपातल्या मऊसूत उकडीच्या मोदकासारख्या मध्यमवर्गाला उच्चवर्गात उडी मारण्याच्या तथाकथित “महत्त्वाकांक्षेचं” व्यसन आहे….
पालकांना मुलांच्या करियरचं व्यसन आहे…. तिथे मुलाच्या आयुष्याची वाट का लागेना, पण कंप्युटर इंजिनियर तर झालंच पाहिजे किमान! वरचे आवेश बदलतात….पण आत असतं फक्त आंधळं व्यसन….
जी प्रत्येक गोष्ट आपण निव्वळ सवयीने, न समजून घेता करतो, ती म्हणजे व्यसन…. जेव्हा माणूस विचार करून, एखादी गोष्ट मनावर घेतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने व्यसनमुक्त होतो….डोळस होतो….तेव्हा तो “माणूस” होतो. माणसाच्या जन्माला येणं, आणि खरंच माणूस होऊन जगणं यात देवाने मुद्दाम फरक ठेवलाय. त्याने स्वातंत्र्य दिलंय माणसाला… व्यसनमुक्त माणूस किंवा व्यसनाधीन जनावर होण्याचं. आपल्याला काय व्हायला आवडेल?
जनावर होणं खूप सोपं आहे….आजकाल तर अधिकाधिक सोपं करुन देत आहेत आजुबाजूचे लोक! सगळी दुनियाच जर नाचत गात जनावर व्हायला जात असेल तर आपणही जाऊया की! डोळे मिटा, मिटता येत नसतील तर करियर, धर्म, कुटुंबाची जबाबदारी, सत्ता, पैसा अशी कुठलीतरी नशा शोधून काढा…अन नाचत सुटा…जिथे जाल तिथले व्हा!
पण हे माणूस होणं म्हणजे कर्मकठिण काम आहे. दर क्षणी स्वत:शी युद्ध मांडावं लागेल…मनातल्या जनावराला रोज रोज शिस्त लावावी लागेल…. सगळी व्यसनं हात धुवून पाठीशी लागतील, तरीही डोळे उघडे ठेवावे लागतील…. कधी तुमच्या संवेदनशीलतेवर हल्ले होतील जनावरांच्या झुंडींचे…कधी पायाखालची जमीन खेचली जाईल…. शरिरावरच्या जखमा भरून काढाल…पण मनाचीही जपणूक करावी लागेल… रोज नवे प्रश्न पडणार, माणूस व्हायचं असेल तर….. रोज रोज विचारांच्या गर्तेत प्रवास करणार….त्याचा कोणी प्रवासखर्चही नाही देणार! इतकी सगळी उठाठेव करायचीच असेल, तर माणूस व्हायचं बघा!
खरंतर तेही एक व्यसनच आहे… पण एक मोठा फायदा असलेलं हे एकमेव व्यसन आहे… माणूस व्हायची धडपड जो करतो त्याला एक दिवस, “देव कसा असेल” असा प्रश्न पडतो…ज्याला असा प्रश्न पडतो त्याच्या नशिबात अजून थोडी धडपड येते…. सगळी पार पडापड झाली कि मग एके दिवशी मोठ्ठा प्रकाश पडतो! अरेच्चा! देव तर इथेच आहे, माझ्या आतून ही सगळी धडपड करवणारा!