“मन्दाकिनी की आवाज” बांधताना….

पुरानी दिल्ली स्टेशन, कमसम येथून नमस्कार!

आज इंटरनेट उपलब्ध आहे, स्थानबद्ध वेळ आहे अन दुसरं काही व्यवधान नसल्याने शहाण्यासारखी ब्लॉग लिहितेय! जरा जगाशी जोडल्यागत वाटतंय….

***

तर निघताना मी विचारलं, “मला जमेल का? काही चुकलं, गडबड झाली तर?!”

त्या म्हणाल्या, “तू काम कर फक्त. अनुभव महत्त्वाचा, त्यातून शिकत रहा, सगळं ठीक होईल”

हा अशीर्वाद अन चार कागदांवर रेखाटलेली स्केचेस एवढाच आधार घेऊन निघाले….

कारण यावेळी डीडीच्या हिमाचलमधून माझी उचलबांगडी झाली होती थेट उत्तराखंड राज्यात गुप्तकाशीजवळच्या गावात. “सेना गडसरी” गावाचं नाव खालच्या फाट्यावरच्या बाजारात देखिल कोणाला ठाऊक नाही, नकाशावर शोधायच्या फंदातच पडू नका!

या गावामधे गेलं वर्षंभर बेंगलोरच्या “पीपल्स पॉवर क्लेक्टिव्ह” या संस्थेचं त्रिकूट जाऊन राहिलंय. लंडनमधे बीबीसीसाठी दीर्घ काळ काम करून परतलेली रेडियो पत्रकार अन संस्थेची सह-संस्थापक, सरिता, वयाने सगळ्यात छोटी पण अतिविलक्षण श्वेता अन अबोल, शिस्तशीर तरी सौम्य स्वभावाचा त्यांचा इंजिनियर, विन्सेंट यांनी मिळून गावातल्या स्थानिक गढवाली लोकांना सोबत घेऊन एक सामुदायिक रेडियो केंद्र सुरू केलं.

सगळ्या सांस्कृतिक, भाषिक अन वैयक्तिक विसंवादातून संवादाचं एक माध्यम उभं राहिलं…..

रेडियो केंद्राचे सगळे कार्यक्रम हिंदी-गढवाली भाषेत, गावागावांत फिरून ध्वनिमुद्रित केले जातात. गाणी, कविता, नाटुकली अन विनोद यांचा देशी खजिना जमवला जातो अन रोज ठराविक वेळी “मंदाकिनी की आवाज”चे एकाहून एक वरचढ रेडियो निवेदक त्याचं प्रसारण करतात.

छोट्या गावात राहून एक स्वप्न पाहणाऱ्या मानविंदर नेगींसाठी त्या स्वप्नापासून प्रत्यक्षात रोज बोलणाऱ्या रेडियो केंद्रापर्यंत घेऊन येणारा प्रवास खूप अवघड होता. मानविंदरजी अन त्यांच्या पत्नी, उमादीदी यांचं व्यक्तिमत्त्वच रेडियोने पालटून टाकलंय!

वीज गेलेली असताना, मिणमिणत्या उजेडात चुलीतली लाकडं सरसावून रात्री आम्हाला “आलू के पराठे” रांधून घालणाऱ्या उमादीदीकडे पहात मी त्यांचं दिवसाचं रूप आठवायचे…

हातात लॅपटॉप घेऊन प्लेलिस्ट बनवणाऱ्या अन मधेच कोणी त्यांच्याशी बोलयला गेलं तर वर न पाहताच हाताने थांबवणाऱ्या व्यग्र उमादीदी….

असंख्य बटनांनी ग्रासलेल्या स्टुडियोत भारतीय बैठकीवर ताठ बसलेल्या, आत्मविश्वासाने निवेदन करणाऱ्या शांत उमादीदी!

कालपर्यंत स्वयंपाकघराबाहेर न ऐकला जाणारा त्यांचा आवाज मंदाकिनीच्या खोऱ्यात, घराघरांत जात असणार…

एका रेडियोने हे सगळं घडवलं!

पण या रेडियो केंद्राला इमारतीच्या रूपात घडवणं इतकं सोपं नाही, हे देखिल मला लवकरच समजलं! जन्माने मुलगी असणं अन वयाने फार प्रौढ नसणं हे एका आर्किटेक्टच्या कामातले सगळ्यात मोठे अडथळे असतात.

मुळातच आपल्याकडची कार्यसंस्कृती खूप किडवून ठेवली आहे आपण. आता तर ब्रिटिशांना दोष देण्याचीही पळवाट उरली नाही! श्रमाला कवडीची किंमत नाही अन दिल्या शब्दाला देखिल. काम करणाऱ्यांना अन काम करवून घेणाऱ्यांना देखिल कामाविषयी आस्था नसण्याचाच प्रघात आहे. तो मोडायचा म्हणजे, त्यापेक्षा हिमालय सर केलेला सोपा!

पण चांगल्या माणसांचं एक अदृष्य जाळं असतं, ते सगळ्यातून सांभाळून घेऊन जातं, जिथे जाईन तिथे! रेडियो स्टेशनच्या बांधकामावर नियमितपणे येणारे दोन सहायक (उद्धट मराठीत त्यांना मजूर म्हणतात) महावीरजी- प्रमोदजी इथे मदतीला आले. त्यांच्या भावकीतले जीतपालजी अतिशय सरळ, मेहनती अन सौम्य स्वभावाचे मिस्त्री आहेत. मला पाहताच बिडी विझवून लपवतात अन मला “जी सर” म्हणतात! माझ्या मुलगी असण्याबद्दल त्यांना काही आक्षेप नसणं हा देखिल एकत्र काम करण्याच्या दृष्टीने मोठाच घटक होता!

नकाशा समजावून सांगताना ते अतिशय शांतपणे लक्षपूर्वक ऐकतात. त्यांचे प्रश्न इतके वास्तववादी अन थेट असतात कि खूप विचारपूर्वक उत्तर द्यावं लागतं अन एका चांगल्या प्रश्नाचं उत्तर देता आल्याचा सुप्त आनंद होतो!

या काम करण्यातूनच खूप धीर आला मलाही. एकटीच बाजारात जाऊन, बांधकाम साहित्य विकत घेऊन, ट्रक भरून साईटवर आणत असे.

माझ्या बांधकामाच्या टीमसोबत खडी फोडली, वाळूचा ट्रक उतरवला, कॉक्रीट केलं, घमेली वाहून नेण्याच्या साखळीत काम केलं, दगडांचं बांधकाम, ज्याला “चिनाई” म्हणतात ते केलं…. गजांची जाळी बनवून जोत्याचा बीम भरला.

रोज आमच्या माणसांच्या आधी मी अन आमचा इंजिनियर, विन्सेंट साईटवर हजर रहात होतो. अन सारे घरी परतल्यावर, सगळी अवजारं जागच्याजागी गेल्याची खात्री करूनच आम्ही परत जात होतो. सारे चहा एकत्र पीत बसायचो, कामही एकत्र करायचो. एका पोळीवर मध्यात भाजी वाढून घेऊन उभ्यानेच खाऊन अख्खा दिवस काम चालायचं, पण कधीच कुणी तक्रार करत नसे.

याशिवाय सरिताने आधीच कल्पना दिल्याप्रमाणे, इतरही अव्हानं होती. रेडियो स्टेशनच्या स्थानिक भागीदार संस्थेचे लोक मातीच्या बांधकामाबद्दल खूप साशंक आहेत. अनेक पिढ्या दगड-मातीच्या घरांत राहिलेल्या गढवाली लोकांना आता शहरातल्यासारखी “पक्की” सिमेंटची इमारत हवी आहे. त्यांना शाब्दिक वाद घालून हे कसं समजावणार कि शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेलं दगड-मातीचं बांधकाम अधिक चांगलं आहे?!

सुरुवातीला त्यांच्या विरोधाची तीक्ष्ण धार सहन करून उभं रहायचं होतं.

डिझाईनवर चर्चा करण्यासाठी बैठक ठरवली तर ते कधीच भाग घेत नसत, मात्र स्वयंपाकघरात, रात्रीच्या जेवणवेळेला वाद होत. आवाज चढत जात. माघार न घेता पण कोणावरही कुरघोडी न करता उत्तर देत राहणं अवघड होतं. कोण चूक, कोण बरोबर हे फाट्यावर मारून, आपण सगळ्यांनी मिळून, न भांडता “मन्दाकिनी की आवाज” बुलंद करायचा आहे, यावर अधिक जोर देत होते.

त्यांनी कितीही बोचरे प्रश्न उगारले तरी चिडता येत नाही त्यांच्यावर, कारण मुळात हे सतत बोचत असतं कि त्यांच्या चांगल्या इमारतीच्या कल्पना आमच्या शहरी लोकांनी बिघडवल्या….. चूक त्यांची नाही आहे.

मात्र बांधकामाच्या साईटवर मी स्वयंपाकघरातलं मवाळ रूप घरी विसरून पाऊल ठेवायचे. इथे चर्चांना, लोकांना समजावण्याला अजिबात जागा न देता, दिलेल्या सूचना अचूक पाळल्या जाणं महत्त्वाचं आहे. माझ्या बांधकामाच्या टीमसमोर मी स्थानिक लोकांच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देत नसे, कुठल्याही प्रकारची अरेरावी, उर्मटपणा खपवून घेत नसे.

हळूहळू ही सगळी शिस्त त्यांच्या पचनी पडत गेली. मला हाताने बांधकामावर काम करताना रोज रोज पाहून देखिल त्यांचा विरोध सौम्य होत गेला. हळूहळू त्यांच्याही नकळत गरजेच्या वेळी त्यांचे हात माझ्या मदतीला येऊ लागले…. स्वयंपाकघरात वादांची जागा चर्चा अन गप्पा घेऊ लागल्या! एका दिवशी, बांबूची झुलती बेटं फार सुंदर दिसतात यावर आमचं एकमत झालं अन चुलीवर एकदा केलेला फोडणीची पोळी नावाचा अजब पदार्थ, दुसऱ्या दिवशी परत करण्याची फर्माइश झाली!

एकीकडे या भेटीत ठरवलेलं काम पुरं होत होतं. डीडीच्या मनात जन्माला आलेली रेडियो स्टेशनची इमारत आता जमिनीवर डोकं काढतेय. पायाच्या खोदकामात निघालेले दगड, आसपास मिळणाऱ्या मातीच्या, न भाजता, उन्हात सुकवलेल्या विटा वापरून भिंती उभ्या राहतील. अन गावाबाहेर डोंगरात मिळणारा स्लेट दगड वापरून केलेलं छत डिसेंबर २०१४ पर्यंत होईल.

पाया अन जोत्याचं काम संपवून पी. पी. सी. च्या त्रिकूटाबरोबर उंडारायला बाहेर पडले. देहरादूनमधे दिवसाउजेडी दिव्यांच्या झगझगीत प्रकाशात उजळवलेल्या मॉल्स पाहून गुदमरत होते…. मात्र खूप दिवसांनी ताटाकडे लक्ष देऊन, पोटभर खातपीत होते!

दोन दिवस माझ्यासोबत ऋषिकेशला राहून बाकीचे आपापल्या कामाला निघून गेले, अन त्यानंतर मी खरी सैलावले! निवांत गाव पहात फ़िरले…. घाटावर गंगास्नान केलं, संध्याकाळी गंगामाईची आरती अन पात्रात झरत जाणारे द्रोणातले दिवे पहात बसले… रात्री कॅफे निर्वाणात इझरायली वादकांची उडती थिरकती मैफल जमत असे… हे खास ऋषिकेशमधलं सांस्कृतिक वैविध्य! असतीलही वाईट माणसं, पण मला मात्र सगळी चांगलीच भेटली. अपरात्री चांदण्यातून लक्ष्मण झूल्यावरून एकटीच चालत हॉटेलवर परत जायचे तेव्हा माझा एकांत छेदून कोणीसुद्धा वळून पहात नसे. मग पुन्हा हॉटेलच्या गच्चीवर रात्र पहात उभी रहायचे…. मागे हिमालय प्रचंड उभाआडवा पसरलेला अन पुढ्यात गंगामाई चांदणं लेऊन संथसंथ मऊ वहात असलेली…

काहीतरी आहे त्या पहाडात अन नदीत…. सरळसाधे डोंगर-नदी नाहीच येत त्यांना राहता! काहीतरी गारूड करून टाकतात माणसाच्या अस्तित्त्वावर… मग आपणही सरळसाधे माणूस रहात नाही….

जर खूप खूप पूर्वी, ते आतून थरथरून उठणं, नदी होऊन वाहणं, पहाड होऊन गगनाला भिडणं माणसाने गंगाकिनारी अनुभवलं असेल, अन त्याला हिंदू असणं म्हणलं असेल, तर ते त्या रात्रीगत तलम निळंहिरवं देखिल आहे…. पहाटेच्या रक्तिम भगव्याइतकंच!

आता ऋषिकेशहून घरी परतण्यासाठी दिल्ली गाठली आहे, गजबजलेली, येताजाता वरून खाली बेशरमपणे पाहणारी दिल्ली.

पुरानी दिल्ली स्टेशन, कमसम येथून आता निरोप घेते… पुन्हा पुढच्या प्रवासासाठी!

शेजार….

माणसांच्या आयुष्याचे…. त्यांच्या बरोबर-चूकचे संदर्भ असतात वेगवेगळे. सरळ आयुष्याला कौतुकमिश्रित तिरस्कार वाटतो आडनिड्या वाटेने भटकणाऱ्या स्वच्छंदी आयुष्याचा…. अन मुक्तपणे विहरत उलघडत जाणाऱ्या आयुष्याला त्याच सरळ आयुष्याच्या स्थिरतेचे….. विश्वासाचे असाध्य अप्रूप असते….

माझ्या शेजारणीला षोक आहे स्वच्छतेचा….. माझ्याहूनही जास्त! तिच्या दाराखिडक्यांनाच काय सभोतीच्या भिंतीना देखिल तिच्या भुश्शकन पाणी ओतणाऱ्या बादलीची सवय! बरं पुन्हा तिच्या स्वच्छतेचे शिंतोडे माझ्या घरात उडले तर काय फरक पडणार असा?!

असंही माझ्या घराला स्वच्छतेच्या शिस्तीपेक्षा लहरी नादिष्टपणाचेच अधिक डोहाळे….. मग तिच्या घरातून अलगद वाऱ्यावर स्वार होत आलेल्या कचऱ्याचा अनमान कसा करावा, तोही निमूट माझ्या केराच्या टोपलीत जाऊन बसतो….. शेवटी आम्हा दोघींची घरे स्वच्छ झालीच ना!

माझ्या बागेतल्या कचऱ्याच्या वाफ्याशी मात्र सखी शेजारणीचे कट्टर वैर आहे…. जिथे मला ओल्या कचऱ्यापासून पाहता पाहता उमलणारी मोगऱ्याची फुलं दिसतात तिथे तिला कांद्याची साले, मटाराची टरफले अन असलंच काहीबाही दिसतं…..

चौदा वर्षात हळूहळू कंपोस्टच्या वासावर माझे प्रेम जडले आहे! इतका मऊसूत, जमिनीशी बांधलेला, मार्दवी वास लोकांना दुर्गंध कसा वाटू शकतो असा कैक वेळा विचार करून पाहिला…. पण तरीही पुन्हा मातीत हात घालताना सुखाची शिरशिरी आल्याखेरीज रहात नाही! शेजारीण मात्र पहात असते तिला शिसारी आल्यागत!!

कदाचित माझ्या हसण्याची बाधा तिला होऊ नये म्हणून आठ्यांचे संरक्षण घेत असावी!

मला मात्र कचऱ्यावर पोसलेल्या अळूचे, दोडक्या-कारल्यांच्या वेलींनी घातलेल्या वळ्से-वेलांटयांचेच कौतुक….. कचऱ्यातच पडलेल्या मिरच्यांच्या बिया रुजून जेव्हा चांदणीदार फुलोरे वाऱ्यावर डोलले तेव्हा तर आमच्या घरात नव्या बाळजन्मागत आनंद झाला साऱ्यांना….. त्या झुडपातल्या मिरच्या शोधून तोडून स्वयंपाकघरात नेल्या जात तेव्हा उगाच स्वयंपाक अधिक चांगला झाल्यागत वाटत असे….

या बागेत मी हौसेनी लावलेल्या रोपा-झाडांपेक्षा स्वत:च्या मर्जीने मूळ धरणाऱ्या उत्साही झाडांचेच राज्य अधिक चालते! त्याभोवतीच्या पसाऱ्यात आमच्या घरातल्या इतर छंदांचे अवशेष सापडतात ते वेगळेच! गेल्या चैत्रातल्या मातीकामाचे वेडाचे भेगाळलेले नमुने, पुनरुज्जीवनाची वाट पहात बसलेल्या फुटक्या कुंड्या, गेरूची सुकली ढेकळं अन मातीच्या गिलाव्याची नवी पद्धत आजमावून पाहताना भिंतीवर केलेले नमुन्याचे सारवण!

तिथंच मांडी ठोकून चहा घेत, आपल्याच पसाऱ्याचे कौतुक करत, येत्या रविवाराला आवराआवरीचे खोटेच वचन देत मी रोजची सकाळ घालवते! टागोरांच्या पोरवयापासून ते रविवार लोकसत्तेच्या पुरवण्यांपर्यंत साऱ्या “साहित्यावर” माझ्या बागेच्या मातीचे शिक्कामोर्तब कधीनाकधी होतेच! आमच्या घरातून नव्या जुन्या गाण्यांच्या लकेरी आकंठ येत राहतात जाग असेपर्यंत सारा वेळ….. अन असल्या पावसाळी हवेत इथे उंच डोंगरातून जेव्हा वारा घुमतो तेव्हा दुपारच्या नीरव शांततेलाही कसलीशी राकट, आदिम नैसर्गिक ओढ लावून जातो…. झुळकेवरला श्रावणगंध हुंगून मन भरत नाही….

सारे आकाश ढगाळ ढगाळ…. अन बाहेरच्या कदंबावर फुलोऱ्यांचे चेंडू लटकत असतात वाऱ्यावर झोके खात! सकाळी थोडे जरी ऊन आले तर त्यांवर झुंबड उडते पक्षी, फुलपाखरं अन मधमाश्यांची! खिडकीत अडकावलेल्या खोक्याच्या घरट्यातून चिमणा-चिमणीची पोक्त लगबग चालूच असते….. खाली दरीत माझं लाडकं पुणं उन्हाची वाट पहात सुस्तावलेलं…… कट्ट्यावर आमचा शुभ्र पांढरा बोका देखिल तसाच पहुडलेला, उन्हाची तिरीप आलीच एखादी तर पाठीवर लोळून सूर्यस्नान घेणारा!

मग मीही नि:श्वास सोडत वेताच्या झुल्यात अंग सोडून देते….पुढच्या रविवारच्या सफाईचे नियोजन करत करत डोळा बरा लागतो! जाग येते तेव्हा मी कौतुकाने पहाते तिच्याकडे, शेजीबाई मात्र घसघसून खिडक्या पुन्हा धूत असते आठ्या घालून!