सकाळचं कोवळं सोनं आकाशात चढत चढत गेलं. सूर्याचं तापट बिंब आता ओढ्याच्या हिरवट निळसर पाण्यात चमचमू लागलं. लाल-हिरवे चतुर स्तब्ध पाण्यावर थरथरते तरंग उमटवीत असताना पाण्याखाली छोट्या माश्यांची अन्न शोधायची लगबग अजून चालू होती.
ओढ्याच्या दोन्ही काठांना ही इवली इवली जीवनचक्र नि:शब्द नांदत होती. काठांवर ओठंगलेली गर्द झाडी, अन ओढ्याच्या पात्रातच ठिय्या देऊन बसलेली शेरणीचे झुडपं आपल्या मुळ्याच्या आडोश्याने कितीक इवले संसार फुलताना पहात होती…
कडेच्या निळ्या हिरव्या डोहांमध्ये डोकावून आपलीच प्रतिमा कौतुकाने न्याहाळणारे बांबू आपापली बेटं बनवून झुलत होते मदमस्त हत्तीच्या डौलात!
सकाळी पाण्यावर उतरलेले हॉर्नबिल अन बगळे आपले रुंद पंख पसरून दिमाखात उडून गेले होते जोड्या जोड्यांनी….
आता ओढ्याकाठी होती नीरव शांत दुपार अन आपली जाडजूड मुळ पाण्यात सैलावून बसलेला पोक्तसा वृक्ष… त्याच्या खरबरीत खोडावर पाण्यावरून कवडसे उमटत होते…. त्याचे प्रतिबिंब पाण्यात अन पाण्याचे प्रतिबिंब जणू त्याच्यात उतरले होते…
ही एकरूपता कित्येक वर्षांची तपश्चर्या होती…..वृक्षाने ओढ्याकाठी अन् ओढ्याने वृक्षाखाली मांडलेली…