चहाटळ…

असं, नक्की कधीपासून ते नाही सांगता येणार पण हे प्रेमात पडायचं वेड लागलंच. सभ्यासभ्यतेच्या चौकटींनी मनाला बांधून घेण्याचा संस्कार झालेला असूनही हे खूळ कुठूनतरी वाट काढत मनात शिरलं. त्या नादाने साऱ्या चौकटी, मान मर्यादा झुगारून देऊन माझं मन ज्याच्या-त्याच्या प्रेमात पडायला लागलं….

भलतंच रंगेल आहे ते, असं माझ्या लक्षात येतंय. मित्र म्हणू नका, मैत्रिणी म्हणू नका… पुस्तकातल्या कथानायकांपासून ते पहाडात भेटलेल्या गवंड्यांपर्यंत कुणाच्याही प्रेमात!

सरळ बाईने सरळ बाईवर प्रेम करणं तसं सोपं, नुसत्या गप्पा छाटाव्या दिवसरात्र… एकमेकींना खायला-प्यायला करून द्यावं अन आपापल्या आवडत्या पुरुषांच्या चहाड्या कराव्या!!

सरळ पुरुषावर प्रेम करणं थोडंसं नाजुकच… इथे आपलं मादी असणं घुटमळत असतं मनात.

एखाद्याचे हात भलतेच सुंदर… राकट पण तरीही रेखीव, तसल्याच हातांत छिन्नी देऊन, कातळातून कोरून काढल्यागत….

कुणाचे डोळे घनगंभीर खोल… त्याने बोलतच रहावं माझ्याकडे पहात अन मी बुडून जावं त्याच्या त्या तसल्या डोळ्यांमधे…नुसतं हं हं म्हणत त्याच्या स्वगताची गाडी मी ढकलत राहते पुढे… आकंठ बुडालेली असतानाही!

कधी नुसत्याच आवाजाच्या प्रेमात… खर्जातला खरखरीत आवाज असतो काहींचा… नुसता दुरून ऐकला नं तरी माझ्या मऊ गालांवर त्याच्या दाढीची खुंट घासली की काय असं वाटावं…. असल्या आवाजाच्या माणासाशी रात्री उशीरा फोनवर बोलावं मुद्दाम… गोड घट्ट शांततेत तो तसला अशरीर आवाज नुसता कानांत ओतून घ्यावा….

अन त्यावरून आठवलं… नेमकं जे नसतं ते हवं वाटतं ते हे असं… बाईच्या जन्माला आलेय तर मला या पुरुषांच्या दाढी-मिशांचं वेड! गुळगुळीत घोटून दाढी केलेले पुरुष चांगले मित्र होऊ शकतात. पण तरीही ते आपले साधे… नॉर्मल लोकच राहतात माझ्या लेखी….

भरदार मिशीवाल्या पुरुषासमोर जे वाटतं ते काही वाटणार नाही त्यांच्याबद्दल, कि बाई याच्या मिशांचा पोत कसा असेल… मऊ की खरखरीत?! अंगावर कुठे, कशा फिरल्या तर नक्की कसं कसं वाटेल आपल्याला…. चेहरा मख्ख ठेवून त्याच्यासमोर रुक्ष पण भयंकर विद्वान काहीतरी बोलताना मनात हे असलं काहीतरी चालू! आतल्या चहाटळपणाला बाहेरून कडेकोट बंदोबस्त!

आता नॉर्मल लोक म्हणतील की, “छ्याह! हे काय प्रेम असतं का?! आजकालच्या पिढीची खुळचट फ्याडं!!” (बाईपणाचा समानार्थी शब्द, “मधेच डायव्हर्शन”: या नॉर्मल लोकांना गौरी देशपांडेंच्या पायाशी घालावं. माझ्या आजीच्या वयाच्या या बाईनी माझं शिस्तबद्ध गर्वहरण केलंय एके काळी! अन आता माझी पिढी ही झालीच की कालची!)

बरं मग ते म्हणतात तसं गंभीर प्रेमही करून पाहिलंय नं! जेव्हा एखाद्या पुरुषालाच माझ्यावर असं पिच्चरमधल्यासारखं प्रेम करावंसं वाटलं तेव्हा तसंही केलं की! अगदी पूर्ण झोकून देऊन! पण ते ही चुकलंच असावं… म्हणजे, रिलेशनशिप वगैरे ठीक आहे…. की बुवा, ही माझी गर्लफ्रेंड हं काय आजपासून! पण तिनं असं प्रेमात बेभान वगैरे काही होऊ नये. नॉर्मलच वागावं हे बरं. आता सिरियसली प्रेमात पडायचं ठरल्यावर मग पुन्हा नॉर्मल कसं वागायचं?!

बरं मी प्रेम करणार म्हणजे त्यापेक्षा सीमेवर जाऊन युद्ध केलेलं बरं. ही बया प्रेमात पडल्यावर जास्तच कशी भांडते?! काही पुरुष कसे रासवटपणे झोंबतात, तशा आम्ही काही बायका रासवटपणे भांडतो…(सन्मानीय अपवादांनी स्वत:ला सभ्यपणे वगळावं!) संस्कृतमधल्या प्रेम या अर्थी वापरलेल्या रागाला मराठीत बहुदा आम्हीच पार उलटलं असावं!

आपल्या आवडत्या पुरुषाशी जीव खाऊन भांडल्यावर त्याचे लाड करण्यात कोण सुख मिळतं ते आम्हालाच ठाऊक! त्या बिचाऱ्या नर प्राण्याच्या डोक्यात मात्र कणभर प्रकाश पडलेला नसतो बरेचदा. क्वचितच एखादा महापुरुष जन्माला येतो ज्याला ही स्त्री नावाची शक्ती नीट हाताळता येते… उद्रेक होऊ न देता तिच्या रासवटपणाला रिचवून घेणारा असा पुरुष खरा! इतरांनी तिच्या राग-अनुरागाचं गणित न मांडता फक्त ठरवावं की हे कोडं तुमच्या नशिबातला भोग की उपभोग.

हे सगळं लिहिताना खरंतर कंटाळाच आला होता… लेबलांचा कंटाळा. एक लेबल असं सोज्वळपणाचं… सभ्य, सात्विक, सोशीक बाई…. दुसरं लेबल असतं गावभवानीचं… चहाटळ, मनस्वी, उथळ, निलाजऱ्या बाईचं.

पहिली बाई बुद्धिवती असते, शब्द जपून वापरते, दुसऱ्यांचा विचार करते, तडजोडी करते….

दुसरी बाई अकलेनं कमीच, बोलायचं ताळतंत्र नसलेली, मन मानेल तसं वागणारी… बाईपणाला काळं!

कायम पहिली बाई असल्याचा दावा करून कंटाळा आला. बरेचदा असतेच की सात्विक अन विचारबिचार करणारी, म्हणून चहाटळ अन मनस्वी नसते असं वाटलं की काय?!

प्रत्येक बाईला ठाऊक असतं की या दोन्ही बायका आहेत तिच्या आत… पण दुसरीला आम्ही येऊच देत नाही नं बाहेर! मग ती चिडते, रडते…. भांडते…. अधिकच अगोचर असेल तर सगळ्यात आधी आपल्या आवडत्या पुरुषाच्या शेपटीलाच आग लावते!

मग जळू देत शेपट्या साऱ्या…. अन सारी अश्मीभूत लेबलं… ही होलिकादेवी ही बाईच नं!

तर…. ती तुमच्या शेपटाला लागलेली आग ही मीच अन तुमच्या जिभेवर विरघळणारी गोडघट्ट मिठाई देखिल मीच… असं आहे बघा!