समुद्रावरचे बंधारे…

अस्तित्वात नसलेल्या प्रिय “तुला”,

माफ कर हं, खूप दिवसांत, नव्हे, खूप वर्षांत मी काही लिहिलं नाही तुझ्यासाठी. तू कोण आहेस, कसा दिसतोस, मी वेड्यासारखं लिहिते ते तू वाचतोस की पान उलटून टाकतोस, हे काहीच माहिती नाही मला. पण जेव्हापासून मी स्वत:ला “मी” म्हणायला शिकले तेव्हापासूनच, तू, “तू” झालास. तेव्हापासून सतत अखंड बोलतेच आहे नं तुझ्याशी. तुला ही असली पत्रं लिहिणं तर माझा एकमेव आवडता चाळा!

तर, रागावू नकोस, मी लेखणी जरा टाकून दिल्याबद्दल…. तुला किस्से सांगण्यासाठीच तर आयुष्याचा विचित्र खेळ डोळे विस्फारून, जटा पिंजारून खेळते आहे नं!

लिहित नव्हते ती काही लिहिण्यासारखं काही नव्हतं म्हणून नव्हे. उलट या गेल्या काही वर्षांतच खरं आयुष्य जगायला शिकलेय…. शिकतेय. हे शिक्षण इतक्यात पुरं होईल अशी काही सुतराम शक्यता नाही. इथे मृत्यू हाच माझा पदवीग्रहण समारंभ! तेव्हा भेटूच कदाचित!

तर, लिहित नव्हते कारण, असं उगाच वाटत होतं की, माझे अजब अनुभव, त्यातून उचंबळून इतस्तत: विखुरणाऱ्या माझ्या भावना हे सगळं माझं गुप्त, व्यक्तिगत आयुष्य आहे. तुला अन पर्यायाने सगळ्या जगाला उघड्या करून दाखवाव्या अशा काही या गोष्टी नव्हेत.

प्रवाहाविरुद्ध वगैरे असली कितीही लेबलं लावली लोकांनी तरी तशी जनाची लाज बाळगूनच होते आजवर. माझे नियम, माझी मूल्यं…. लहानपणीपासून आजूबाजूच्या लोकांना पाहून बनवलेली, तरीही माझी स्वत:ची म्हणून ठामपणे धरून ठेवलेली मतं…. मतं कसली, माझे हट्टच! तर या सगळ्यांना अधुनमधून सुरुंग लागलाच पाहिजे. व्यस्त होते, ती या विस्फोटक कामांमधे…. तरीही तुझ्याशी संवाद सुटला नाही. थोडीशी लाज वाटत होती, म्हणून फक्त मनातच बोलत होते…. बौद्धिक चर्चा हिरिरीने करणारी वावदूक मी, भावनांच्या, माणसांच्या विश्वात मात्र पुरती भांबावून गेले रे…. शब्दच फुटत नव्हते इतके दिवस! कधीमधी खूपच उधाण आलं मनाला तर रडायचे, भांडायचे तुझ्याशी… तू उत्तर नाहीच द्यायचास, मग इतरांशी ही भांडायचे. मग फक्त मनातलं वादळ डोळ्यात आणून पहायचे तुझ्याकडे, मुक्यानेच. तुला काय कपाळ कळत असणार तूच जाणे! कधीकधी तुझ्या नजरेत धीर असायचा, मला तात्पुरता, उसना देण्यासाठी…. कधी तसंच अफाट प्रेम, मी तुझ्यावर करते तसलं….. कधी हसायचास माझ्या रडवेल्या तोंडाकडे पाहून…. मग अजूनच चिडायचे नं मी!

आता कदाचित माझ्याच भरती-ओहोटीला कमी घाबरायला शिकते आहे, म्हणून शब्द गवसताहेत. असे खवळलेले किनारे सगळ्यांच्याच मनाला असतात का हे नाही माहिती मला. पण, त्यात लज्जास्पद, गुप्त ठेवण्यासारखं काही असलंच पाहिजे का?! व्यक्तिगत गोष्टी, आपल्या भल्या-बुऱ्या भावना या लपवूनच का ठेवायच्या?

“राग, दु:ख, असूया, चीड यांची अभिव्यक्ती संयत, समाजमान्य शब्दातच करावी. प्रेम, आकर्षण, वेड, भक्ती यांना तर व्यक्त करूच नये.”

बुद्धीला आकळणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत सर्वमान्य गृहितकांना धुडकावून लावणारी मी, मनाला वाटणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत बावळटपणे लोकांच्या मताने का बरं वागले आजवर? मनाला बांध घालून त्याचं प्रवाही अस्तित्वच सपवून टाकलं असतं “त्यांच्या”सारखी वागत राहिले असते तर…. पण जसं माझ्या बुद्धीला पटेल तेच केल्याशिवाय मला राहवतच नाही, मग भले ते समाजमान्य असो वा नसो, तसंच मनाच्या बाबतीतही होतंय. ते तर माझ्या बुद्धीपेक्षाही अनावर रासवट ताकदीने फुरफुरणारं आहे! इतक्या सगळ्या बंधाऱ्यांना धडका देत, उसळ्या खात विध्वंस करत आहे…..

सगळे म्हणतात की बांध गरजेचे असतात, विध्वंस टाळण्यासाठी. मीही घालून घेतले शहाण्यासारखे. मात्र एखाद्याचं मन नसतंच नं झुळझुळणाऱ्या ओढ्यागत निमूट. काहीकाही मनं अशी असतात खवळलेल्या समुद्रासारखी कुठल्याच धरणांनी न धरली जाणारी…. बांधायला गेलं नं त्यांना तर अधिकच विध्वंस करणारी ही जंगली मनं फारच भयंकर.

त्या धरणातल्या भगदाडांनी झोप उडवली आहे माझी. अन तरीही भरतीच्या लाटा धडका मारतच आहेत… असा न तसा विध्वंस तर होणारच आहे हे दिसतंय की स्पष्टच! तर आता हळूहळू तुझं ऐकणार आहे मी अन हे सगळे बांध अन धरणं हळूहळू उतरवणार आहे. सोपं नाही ते काम कळतंय मला. पण आजवर धाडस कमी पडलं म्हणून माघार घेऊन कधी घरी येऊ दिलं नाही माझ्या जिवलगांनी…. तुझी नजर टाळून घाबरटपणा करत लपून बसले, तर मरेपर्यंत पुन्हा डोळे वर करून तुझ्याकडे पाहता येणार नाही. अन असली भयंकर शिक्षा मी काही मला देऊ शकत नाही.

प्रयत्न करेन…. धाडस करेन लिहायचं…. तू उत्तर द्यावंस अशी मुळीच अपेक्षा नाही, कधीच नव्हती. माझ्या विचित्र शब्दांनी, माझ्या उद्रेकांनी कधी तू दुखावून घेऊ नकोस स्वत:ला प्लीज. तेवढं एकच वचन दे मला. माझ्या विध्वंसक कल्लोळाच्या मध्यात तू असाच अविचल, अभंग रहा. पहात रहा असाच माझ्याकडे तुझ्या मऊशार डोळ्यांनी….

हजार भानगडी करूनही सदैव तुझीच,

मी.