असति का ऐसे कुणी?!

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे…..

हो… माझ्या भ्रष्टाचाराने पोखरलेल्या, महागाईने गांजलेल्या, भुकेल्या, निर्वस्त्र, बेघर देशावर माझे प्रेम आहे.

इथला कचरा, गटारे, बेशिस्त, हुल्लडबाजी, सिनेमाची थिल्लर गाणी, गुंड अन मवाली, प्रदूषण अवर्षण यावर माझे प्रेम आहे.

रस्त्यावरची भटकी कुत्री, गाय, बैल, डुकरे, कावळे… यांवर माझे प्रेम आहे.

इथली कोरडी क्षार शेते, मृत नद्या अन आटलेली तळी, काळवंडले समुद्रकिनारे अन हरवलेली जंगले यांवर माझे प्रेम आहे.

इथल्या रस्त्यातले खड्डे, फुटलेले नळ अन गळणाऱ्या टाक्या, गेलेली वीज अन दुर्मिळ पेट्रोल यांवर माझे प्रेम आहे.

रिकाम्या शाळा, भरलेली मल्टीप्लेक्स, धुळकट वाचनालये अन चकाकते बाजार यांच्यावर माझे प्रेम आहे.

कारण..

यांच्यावर नाहीतर कोणावर प्रेम करू? Iphone वर कि ipad वर?! यातले काहीही मला परवडत नाही. हा देश मला परवडतो. परवडतो काय, जन्मापासून फुकटच मिळाला आहे! तेव्हा मी त्याच्यावरच प्रेम करते.

तो दोषरहित आहे का? परफेक्ट आहे का? नाही…त्यामुळे याबद्दल मी प्रेम करू शकत नाही.

मात्र मी त्याला थोडासा बरोबर करू शकते. त्याचे चार दोष दूर करू शकते. प्रेम न करता कसा दुरुस्त करू? जनावराला ही जर माणसाळवायचे असेल तर प्रेम करावे लागते… Unconditional की काय तसले प्रेम. हा तर हजारो वर्षे वयाचा वयोवृद्ध तरुण देश आहे. याला पुढे न्यायचे असेल तर याच्या गुणदोषासहित याच्यावर प्रेम केले पाहिजे…

पण म्हणूनही मी याच्यावर प्रेम करत नाही! प्रेम तर उगाच दाटून येते! वात्रट मुलावर त्याच्या आईला येत असेल तसेच! चुका केल्या, उर्मटपणे वागलो म्हणून आमच्या आईबाबांनी आम्हाला सोडून दिले का?! उलट अमच्या चुका दुरुस्त करायला शिकवले…. आता त्यांच्यापेक्षा आम्ही शहाणे झालो, म्हणून आईबाबांना सोडून देतो का आम्ही? मग देश सुद्धा आईबाबांसारखाच असतो. त्याला दूषणे देऊन बाजूला कसे होता येईल? कार्ल शुर्झला देखिल असेच वाटले असावे, “माझा देश, बरोबर अथवा चूक, बरोबर असेल तर तसाच जतन करावा असा, अन चूक असेल तर दुरुस्त करावा असा.”

इथल्या चुकीच्या गोष्टी दिसत नाहीत असं नक्कीच नाही. अन रागही येतो की! आलाच पाहिजे राग! पण त्या रागातून सुधारणा व्हाव्यात. त्या रागातून काहीतरी सृजनशील घडावे.

स्वत:च्या देशाची प्रगती दुसऱ्याने दिलेल्या मापदंडाने मोजता येत नाही. दुसऱ्या देशातली प्रगती इथे “कॉपी पेस्ट” करून चिकटवता देखिल येत नाही. इथले हवा, पाणी, जमीन, संस्कृती, माणसं यांच्यामधून ती प्रगती घडवावी लागते. माणसाला देखिल त्याच्या भूतकाळाला सारून भविष्य घडवता येत नाही. इथे तर दहा हजार वर्षांचा बरावाईट इतिहास आहे. त्याला पुसून टाकून प्रगती होईल?! इतिहासातून देशाचे व्यक्तिमत्त्व घडत जाते. नाहीतर झकपक पोषाख केलेल्या अडाणी माणसासारखा देश नुसताच वरवर आधुनिक दिसतो. त्याला प्रगती म्हणाता येत नाही…. जागतिक हसे मात्र होते!

प्रश्न आहेत. पण त्या प्रश्नांकडे अपण किती creatively पाहतो? जर तसे पाहिले तर प्रश्नातच उत्तरे दडलेली दिसतील. आपले सगळ्यांचे एक उदास निराशावादी conditioning झाले आहे कदाचित. त्याला भेदून बाहेर पाहिले तर ती लपलेली उत्तरे आपल्याकडे पाहून हसताहेत असे वाटते…. “या नि काहितरी भारीपैकी करा बघू!” असे म्हणताहेत असे वाटते.

खूप प्रयत्न करावे लागतील, कष्टाला निलाजरेपणाने सामोरे जावे लागेल, खूप खूप झगडावे लागेल…. प्रवाहाविरुद्ध पोहावे लागेल. मात्र त्याकडे कष्ट म्हणून पाहिले तर सुरू करण्यापूर्वीच कंटाळा येईल ना! त्यात मुक्त आनंद, एक रगेल हास्य अन अशक्य समाधान दिसते आहे…. ते मिळवायचे असेल तर खूप चिकाटी, धीर अन कमालीची हिंम्मत हवी!

“असति का ऐसे कुणी?!”

चौकट….

शाळेत चित्रकला विषयात मला नेहमी दहापैकी नऊ गुण मिळत. एक गुण कापला जाई, चित्राला चौकट न काढल्याबद्दल! सुदैवाने कुणी दहापैकी दहा मिळव म्हणून भुणभुण करीत नसे! मलाही नऊ गुण मिळवून पुरेसा आनंद होत असे त्यामुळे साधी एक चौकट काढून दहा गुण मिळवायचे मात्र लक्षात आले नाही!

पुढे सरकारी चित्रकला परीक्षेत मी नापास झाले, बहुदा चौकट नसल्याने बाद केले असावे!! तर त्यामुळे मला कलेचा “गाभा” शोधावासा असे वाटू लागले! असा काही एक गाभा नसतो शोधण्यासाठी हे तर अगदी इतक्यात कळले. मात्र तोपर्यंत या रंग-रेषांच्या जगाने माझ्या दृष्टीभोवती एक अदृष्य वलय विणून टाकले आहे. या झिरझिरीत जादूच्या पडद्यातून बाहेर पाहताना, सारे जग एखाद्या अचाट चित्रविषयासारखे दिसते! तुमच्याशी संवाद साधण्यासाठी देखिल मला या वलयातून व्यक्त व्हावे लागते. पण त्याने माझ्या अभिव्यक्तीला मर्यादा पडण्याऐवजी अधिक खुलवून आणले आहे!

माझ्या चित्राला अजूनही चौकट नाही…. अन आताशा नापस झाल्याने कुणी माझे गुण कधीच कापत नाही! कला अशा प्रकारे माणसांना अतिशय आनंद देते!

प्रेमाने बांधलेले…

खूप वर्षांपूर्वी उंच उंच गगनचुंबी इमारती माझ्या पुण्यात बांधण्याचं स्वप्न मी पहात असे. हे शहर कुठल्यातरी उंच गच्चीवरून मनभरून पाहण्याचं स्वप्न! मी लहान होते, या शहराचा नवा अध्याय लिहिण्यासाठी उत्सुक होते! पुण्यावर अतोनात प्रेम करणारी अस्सल पुणेकर!

पण गेल्या वर्षभरात काहीतरी गडबड झाली आहे. नाही…. पुण्यावर प्रेम अजूनही आहे माझं, हेच घर आहे ना! पण आता मला त्या आकाशाला खिजवणाऱ्या इमारती नको आहेत….अगदी अज्जिबात! मी अन माझा सगळा गोतवळा इथेच रहात अहोत, किती पिढ्यांपासून! या नव्या शहरातील घर अन त्यासाठी आवश्यक अशी महागडी जीवनशैली आम्हाला परवडेल का?

कोणाला परवडेल, ते ठाऊक आहे मला आता. आम्ही ज्यांच्यासाठी रोज रोज कष्ट करतो, ज्यांची चाकरी करतो, त्यांना परवडेल हे सारे. ते लोक आम्हाला स्वप्न दाखवतील, “खूप मेहनत करा म्हणजे एक दिवस तुम्हीही आमच्यासारखे व्हाल!” मग आम्ही त्यांच्यासारखे होऊ…..सुख-सुविधा विकत घेण्याची ऐपत येईतो मान खाली घालून काम करून झिजलेले म्हातारे! आमच्या सोयी पुरवण्यासाठी कितीकांचा जगण्याचा हक्क हिरावला गेला आहे त्याची रोज जाणीव असेल आम्हाला. अन मग त्या सगळ्या सोयी अन सुविधा पोकळ वाटू लागतील. मग आम्ही त्या पोकळीला न जुमानण्याची सवय करून घेऊ….काहीही मनाला लावून न घेण्याची सवय करून घेऊ, अगदी शुद्ध आनंद देखिल!

हा विनोद इतका क्रूर आहे कि हसू येणार नाही. काचेच्या चकचकाटामागे लपलेल्या या बांधकाम क्षेत्राच्या सत्याने मला काही गुपितं शिकवली आहेत. मी ज्यांच्यासाठी कम करते ते लोक मला या शहराचा चेहरा अन नशीब कधीच बदलू देणार नाहीत. माझ्या स्वप्नातली नगरी प्रत्यक्षात बांधण्याची लोभसवाणी संधी ते मला देतील….फक्त काही तडजोडी करण्याच्या बोलीवर. माझे शहर पुन्हा उजळवण्यासाठी मी साऱ्या तडजोडी मान्य करत जाईन. पण माझ्या कल्पनाशक्तीचे मालक ते लोक असतील. माझं स्वप्न ते तुकड्या-तुकड्याने विकतील, तशी ऐपत असलेल्या लोकांना! माझे उरलेले आयुष्य एखाद्या काड्यापेटी- घरात घालवत मी अभिमानाने पाहेन त्या गगनचुंबी शहराकडे, “हे मी उभारले!”. मी कधीही न संपणाऱ्या रांगांमधे उभी राहीन, गर्दीत घुसमटेन, पण खोकत, गुदमरत मी वर पाहेन, “हे मी उभारले!”. गरीब अधिक गरीब होतील, श्रीमंत अधिक श्रीमंत होतील, दोघे एकमेकांना आळीपाळीने लुटतील, माझ्याने बघवले नाही तर मी नजर टाळण्यासाठी वर पाहेन, “हे मी उभारले!”

इथून पुढे, दहा वर्षांनी “हे मी उभारले” असा शिक्का नको आहे मला…. हे उभारण्यासाठी मी हातभार लावलेला नको आहे मला. मान्य आहे ते लोक माझ्याशिवाय देखिल बांधतील, अधिकच भयंकर बांधतील. पण मला त्यातला वाटा नको. माझे घर…माझे शहर कदाचित नष्ट होईल, पण मी मात्र स्वत:चा जीव वाचवण्यासाठी इथून पळून जाणार आहे. माझ्याआधी खूप लोक गेले आहेत! पूर्वी मी त्यांना हसत असे, घाबरट म्हणून हिणवत असे…. पण आता मलाही या बुडत्या नावेतून उडी मारावी लागेल.

नशीब माझे! मला बांधता येते! कुठल्यातरी अज्ञात जागी मी पुन्हा दुसरे घर बांधेन, ज्याच्या पायाभरणीत माझ्याच भाईबांधवांचे तळतळाट नसतील….जे घर केवळ एका विराग्याची गुहा असेल…कलाकाराचे झोपडे असेल….यहून अधिक काहीही नाही.

माझ्यासारखे अजूनही आहेत लोक….ते देखिल येतील. मी त्यांच्यासाठी सुद्धा प्रेमाने बांधेन. आमच्या स्पर्शाने या जमिनीच्या जखमा पुन्हा भरून येतील. ती मनापासून फुलेल. मीही बहरेन थोडी तिच्यासोबतीने, एके दिवशी शांतपणे मरण्यासाठी, माझी माती तिच्या मातीत मिसळून टाकण्यासाठी….