पुनर्जीवन…

करकरीत उन्हाळी दुपार होती….करकरीत ऊन, करकरीत सावल्या, करकरीत चटका अणि करकरीत शांतता….

जिवाची तलखी करणारी उन्हाळी दुपार, जराही मार्दवाची सय नाही तिला….

ती अनाम अस्वस्थता नक्की कसली होती मलाही ठाऊक नव्ह्तं. दुपारचं ऊन माझ्या मनावर सांडलं होतं… सगळं शोषून कोरडं, शुष्क….अणि करकरीत झालेलं मन….. त्याला भेगा पडलेल्या, दुष्काळी जमिनीसारख्या…. अशा वेळी शांतवणारा वाराही उन्हाला फितूर झालेला. आलीच एखादी झुळुक तर कढत उसासा अंगावर यावा तशी…. भेगाळलेल्या मनावर अजुन एक लसलसता वार करणरी झुळुक…..

आताशा तर रडायला अश्रुही उरले नव्हते…. माझे डोळेही त्या उन्हाळी दुपारीसारखे कोरडे. केव्ह्ढंतरी रडू मुकाट गिळून सुकल्या डोळ्यांनी मी ती दुपार पहात होते…. स्वत:ला समजावत होते कि मला तुझी आठवण येतच नाहिये मुळी, जरा पाऊस पडला कि मला बरं वाटणारच आहे मुळी…..

आणि अशा त्या उन्हाळी दुपारी पाहता पाहता वारा सुटला…कढत हवेचा तो क्रूर झोत सगळ्या पृथ्वीला जाळत आला…. आणि माझ्या डोळ्यासमोर मधुमालतीचं नाजुक खोड उभं थरथरलं. तिचं कोसळणंही किती नि:शब्द! सगळे दोर सग्ळे आधार तुटून गेलेले…आणि तिचा मऊ हिरवा संभार निश्चेष्टपणे जमिनीकडे झेपावला….

कुठुनतरी बळ आलं माझ्या निश्चेष्ट शरीरात….अशी धावले बागेत माझ्या सखीला सावरायला…. कल्पनाही नव्हती मला ती मधुमालती माझी किती सख्खी होती! तिच्या निष्कंटक कोवळ्या फांद्या माझ्या अंगावर कोसळल्या त्यही किती अलवार….जणु वजनच नव्हतं तिला! गळ्यात पडून हमसून रडणारया सखीसारखी ती वेल झुळुकेसरशी थरथरत होती माझ्या मिठीत… तापलेल्या जमिनीचा तळपायाखालचा चटकाही दोन क्षण विसरले मी….

तिच्यासारखंच कोसळावंसं वाटत होतं…रडावंसं वाटत होतं…. पण मीही नाही उभी रहिले तर मधुमालतीचं नाजुक खोड तर पाहता पाह्ता मोडून जाईल….

धीर करून तो पानांचा संभार गोळा केला…जमेल तितक्या फांद्या जपून जपून आधारांनी उभ्या केल्या… मुख्य खोड वर ओढल्यावर बरीच सावरली ती…. पण तिचं असं चुरगाळलेलं, वेडं वाकडं झालेलं रुपडं अगदी पाहवत नव्हतं. पुन्हा काळजी होती तिच्या जगण्याची…. कधीकधी असा आधार तुटून कोसळलेल्या वेलींची खोडं पुन्हा सावरतच नाहीत. जर झाडाने जगय्चं नाही असं ठरवलं तर सगळे आधार, खत, पाणी काहीकाही काम नाही करत…..

चार दिवस तिच्या कोमेजलेल्या हिरवाईकडे साशंकपणे पहात होते मी…. उन्हाचा, वारयाचा…सगळ्यांचा राग आला होता मला…. तुझासुद्धा राग आला होता…. त्या वेलीसारखी मी जेव्हा कोसळत होते…तेव्हा निघून गेलास….उन्हात अशीच उभी होते मीही….

ती जशी माझ्या मिठीत थरथरत रडली होती तशीच आज मी तिच्या खोडाशी बसून रडत होते…. तिच्या पानांच्या करकरीत सावल्या माझ्या भोवती नाचत होत्या मऊ वारयावर… सगळा माझा राग तिच्यासमोर वाहून गेला… माझं दु:ख तिच्या दु:खात मिसळून गेलं…

अश्रूंनी धूसर झालेल्या डोळ्यांनी मी भोवती पाहिलं…सावल्यांचा करकरीतपणा हळूहळू धूसर होत चालला होता…. चमकून वर पाहते तर काय! ढगांच्या गर्दीने सूर्याला झाकलं होतं…. काळे सावळे प्रेमळ राक्षस गडागडा हसत होते अम्हा दोघींकडे पहात! टपक टपक थेंब झेपावत आले तिच्या पानांवर अन माझ्या हातांवर…. सगळ्या उन्हाचा शीण क्षणात नाहीसा झाला… चटोर वारा पुन्हा पक्ष बदलून गारेगार होऊन आला… खरपूस मातीवर पडलेल्या पावसाचा वास घेऊन पानांशी गिरक्या घेऊ लागला!

त्या वासाने… त्या पावसाने जणु पुनर्जीवन आणलं….कोमेजल्या फांद्याना आणि मनाला तजेला दिला…. दोनच दिवसांत मधुमालतीने जीव धरला… छोटे हिरवे फुटवे तिच्या गाठाळ खोडावर शोभून दिसले…. आणि एके दिवशी मी पाह्ते तर पानाआड लाजून लपलेल्या कळ्यांचे घोसच्या घोस लटकलेले! माझी सखी पुन्हा खूश होती….

मीही खूश होते…काल रात्रीच्या तुझ्या फोनवरची शांतता मला सांगून गेली होती कि तुलाही माझी खूप आठवण आली होती त्या पावसानंतर….