प्रेमाने बांधलेले…

खूप वर्षांपूर्वी उंच उंच गगनचुंबी इमारती माझ्या पुण्यात बांधण्याचं स्वप्न मी पहात असे. हे शहर कुठल्यातरी उंच गच्चीवरून मनभरून पाहण्याचं स्वप्न! मी लहान होते, या शहराचा नवा अध्याय लिहिण्यासाठी उत्सुक होते! पुण्यावर अतोनात प्रेम करणारी अस्सल पुणेकर!

पण गेल्या वर्षभरात काहीतरी गडबड झाली आहे. नाही…. पुण्यावर प्रेम अजूनही आहे माझं, हेच घर आहे ना! पण आता मला त्या आकाशाला खिजवणाऱ्या इमारती नको आहेत….अगदी अज्जिबात! मी अन माझा सगळा गोतवळा इथेच रहात अहोत, किती पिढ्यांपासून! या नव्या शहरातील घर अन त्यासाठी आवश्यक अशी महागडी जीवनशैली आम्हाला परवडेल का?

कोणाला परवडेल, ते ठाऊक आहे मला आता. आम्ही ज्यांच्यासाठी रोज रोज कष्ट करतो, ज्यांची चाकरी करतो, त्यांना परवडेल हे सारे. ते लोक आम्हाला स्वप्न दाखवतील, “खूप मेहनत करा म्हणजे एक दिवस तुम्हीही आमच्यासारखे व्हाल!” मग आम्ही त्यांच्यासारखे होऊ…..सुख-सुविधा विकत घेण्याची ऐपत येईतो मान खाली घालून काम करून झिजलेले म्हातारे! आमच्या सोयी पुरवण्यासाठी कितीकांचा जगण्याचा हक्क हिरावला गेला आहे त्याची रोज जाणीव असेल आम्हाला. अन मग त्या सगळ्या सोयी अन सुविधा पोकळ वाटू लागतील. मग आम्ही त्या पोकळीला न जुमानण्याची सवय करून घेऊ….काहीही मनाला लावून न घेण्याची सवय करून घेऊ, अगदी शुद्ध आनंद देखिल!

हा विनोद इतका क्रूर आहे कि हसू येणार नाही. काचेच्या चकचकाटामागे लपलेल्या या बांधकाम क्षेत्राच्या सत्याने मला काही गुपितं शिकवली आहेत. मी ज्यांच्यासाठी कम करते ते लोक मला या शहराचा चेहरा अन नशीब कधीच बदलू देणार नाहीत. माझ्या स्वप्नातली नगरी प्रत्यक्षात बांधण्याची लोभसवाणी संधी ते मला देतील….फक्त काही तडजोडी करण्याच्या बोलीवर. माझे शहर पुन्हा उजळवण्यासाठी मी साऱ्या तडजोडी मान्य करत जाईन. पण माझ्या कल्पनाशक्तीचे मालक ते लोक असतील. माझं स्वप्न ते तुकड्या-तुकड्याने विकतील, तशी ऐपत असलेल्या लोकांना! माझे उरलेले आयुष्य एखाद्या काड्यापेटी- घरात घालवत मी अभिमानाने पाहेन त्या गगनचुंबी शहराकडे, “हे मी उभारले!”. मी कधीही न संपणाऱ्या रांगांमधे उभी राहीन, गर्दीत घुसमटेन, पण खोकत, गुदमरत मी वर पाहेन, “हे मी उभारले!”. गरीब अधिक गरीब होतील, श्रीमंत अधिक श्रीमंत होतील, दोघे एकमेकांना आळीपाळीने लुटतील, माझ्याने बघवले नाही तर मी नजर टाळण्यासाठी वर पाहेन, “हे मी उभारले!”

इथून पुढे, दहा वर्षांनी “हे मी उभारले” असा शिक्का नको आहे मला…. हे उभारण्यासाठी मी हातभार लावलेला नको आहे मला. मान्य आहे ते लोक माझ्याशिवाय देखिल बांधतील, अधिकच भयंकर बांधतील. पण मला त्यातला वाटा नको. माझे घर…माझे शहर कदाचित नष्ट होईल, पण मी मात्र स्वत:चा जीव वाचवण्यासाठी इथून पळून जाणार आहे. माझ्याआधी खूप लोक गेले आहेत! पूर्वी मी त्यांना हसत असे, घाबरट म्हणून हिणवत असे…. पण आता मलाही या बुडत्या नावेतून उडी मारावी लागेल.

नशीब माझे! मला बांधता येते! कुठल्यातरी अज्ञात जागी मी पुन्हा दुसरे घर बांधेन, ज्याच्या पायाभरणीत माझ्याच भाईबांधवांचे तळतळाट नसतील….जे घर केवळ एका विराग्याची गुहा असेल…कलाकाराचे झोपडे असेल….यहून अधिक काहीही नाही.

माझ्यासारखे अजूनही आहेत लोक….ते देखिल येतील. मी त्यांच्यासाठी सुद्धा प्रेमाने बांधेन. आमच्या स्पर्शाने या जमिनीच्या जखमा पुन्हा भरून येतील. ती मनापासून फुलेल. मीही बहरेन थोडी तिच्यासोबतीने, एके दिवशी शांतपणे मरण्यासाठी, माझी माती तिच्या मातीत मिसळून टाकण्यासाठी….