शर्यत!

त्या जंगलात एक सिंह रहात होता… मस्त सोनेरी पिवळा… भरगच्च आयाळवाला सिंह.

एकदा टीव्हीवर जाहिरात बघून त्याला इच्छा झाली की उंदरांच्या शर्यतीत भाग घ्यावा. मग तो शर्यतीच्या ठिकाणी गेला अन तिथल्या वृद्धश्या उंदरासमोर रांगेत उभा राहिला.

सिंहाची पाळी आल्यावर तो पांढऱ्या मिश्यावाला, सुरकुतलेला उंदीर आपल्या चष्म्यावरुन पहात म्हणाला…. “ठीक आहे. तू उंदरासारखा वागायला तयार असशील तर शर्यतीत भाग घेऊ शकतोस.”

सिंह खूष झाला…. इतर उंदरांच्या मानाने त्याने खूपच चांगली सुरुवात केली… पण तो पुढे जाताच मागचे उंदीर त्याची शेपटी कुरतडीत… राग आला तरी बिचारा आवरत असे…. उंदराप्रमाणे वागण्याचे कबूल करून चुकला होता ना! फारतर थोडेफार चीची चूचू करावे…

अगदी शर्यतीच्या शेवटाला मात्र कहरच झाला…. सिंहाला राग आवरला नाही… आणि त्याने रक्त गोठवणारी एक जोरदार डरकाळी फोडली…

सगळीकडे शांतता पसरली…. पांढऱ्या मिश्यावाला म्हातारा उंदीर पुढे आला अन त्याने सिंहाला शर्यतीतून बाद केले. हताश बिचारा सिंह कडेला जाऊन बसला…. तटस्थपणे शर्यत पाहताना त्याच्या अचानक लक्षात आले… त्या स्पर्धेत एकही उंदीर नव्हताच मुळी! सगळे वेगवेगळे प्राणी उंदरांसारखे वागत होते!!

आणि तो डरकाळ्या फोडत हसला! कारण त्याच्या लक्षात आले…. शर्यती लावण्याएवढी अक्कल उंदराना असते का कुठे?! ते तर बिचारे बिळात लपून धान्यधुन्य नासवण्यात गर्क असतात! कायच्याकाय वेड्यासारखे धावलो आपण!

मग आपली उरलीसुरली शेपूट नीट साफसूफ अन झुपकेदार करून हवेत उडवीत आपला सिंह मजेत शिकारीवर निघून गेला!!

आकाशात खोचलेला….

 

अथांग कोलाहलाच्या मध्यात वाद्यांच्या तालाची रिंगणं… हृदयात रेंगाळणारं कंपन मागे सोडणारी…

उन्मादाने नाचणारी पावलं…खोल हुंकार देत आदळणारं टिपरू…

सगळ्याच्या मध्यात…. जणू सगळ्यांचा एकमेव मानबिंदू असलेला ध्वज… असा नाचत लहरणारा, जणू त्याला ध्वजदंडाची…ती तोलून धरणाऱ्या चिवट कणखर हातांची मदतच लागत नसावी!!

तो नाचतोय म्हणून सारे नाचत आहेत… तो फडकतो म्हणून टिपरातून हुंकार येत आहेत…

तो म्हणजे या सगळ्यांचा परमोच्च बिंदू…अन तोच या सगळ्याची सुरुवातही…

हा केवळ उन्माद नाही… धिंगाणा नाही…

मद्याची उफराटी नशाही नाही….

रोजच्या आयुष्यात आम्ही लढतोय तोच हा जोहार आहे…

सोपं अन सामान्य ते डावलून पेललेलं असामान्यत्वाचं शिवधनुष्य आहे…

आंधळेपणाने नाही तर “बुद्ध्याचि” घेतलेलं सतीचं वाण आहे….

प्रत्येक धीराच्या निर्णयाची कणखर धार आहे…

आमच्या पावलांना धरणीहून अचल आधार आहे…

हा आमचा अहं नसूनही अभिमान आहे…

आमच्या विवेकाचा, जबाबदार कर्तबगारीचा चढता आलेख आहे….

ऋजुता…निरागस प्रेम..अन समर्पण आहे…

हा आमचा सत्यावरचा विश्वास आहे…

खोल आत जपलेल्या देवत्वाचा फक्त एक…छोटा आविष्कार आहे…

 

एका क्षणी सगळा कोलाहल ऐकू येईनासा होतो… वाद्यांचा हुंकार एकसंध अनाहत ऐकू येतो….

पाय उरतात ना हात…. अशरीर अस्तित्वाचा एकच पुरावा इथे उरतो….

तो आकाशात खोचलेला ध्वजाचा कळस…