उन्हाळी दुपार….

ऊन पावसाबद्दल माणसाने कितीही कुरकुर केली तरी पृथ्वीला जितके प्रेम पावसाचे तितकेच उन्हाळ्याचे. त्या प्रेमाची छटा वेगळी…गंध वेगळा….

वसंतात भरभरून आलेली कोवळी पालवी, तिची उन्हात चमचमणारी पोपटी तकाकी…केवळ उन्हाळी शोभा! यासारखे दुसरे दृश्य नाही! उन्हाच्या तलखीने तापलेल्या डोळ्यांना शांतवणारा मधुमालतीचा उन्हाळी बहर…. त्याचे सुगंधी तीर वाऱ्याच्या दर झुळकेवर स्वार होऊन गारद करतात…

कलकलणारा जीव अचानक शांत, स्थिर होऊन जावा… चंचल मनाचा तलाव संथ पारदर्शी व्हावा, असा तो सुगंधी हल्ला!

माधुमालतीच्या परमाळलेल्या संभारात चिमण्यांचा अखंड संसार चालू… आतबाहेर चिवचिवत नाचणार या इवल्या भावल्या…अन् मांजरपावलाने अलगद माधुमालातीच्या खोडाशी घोटाळणारा लबाड मृत्यू…दोहोंना तिची सुगंधी सावली मायेनी पोटाशी घेते…

गुबगुबीत मऊशार मृत्यूला घरातून माशाच्या दोन तुकड्यांचा प्रसाद मिळताच तो गपगार झोपी जातो त्याच माधुमालतीच्या गार सावलीत…आपल्या मऊसूत अंगावरून एखादी जीभ फिरवीत आपणच शिकार केल्याच्या ऐटीत शेपटीचा गोंडा उडवीत!

ही अशी उन्हाळी दुपार अगदीच घरगुती…तिला श्रावणातल्या रानवट दिवसाशी मुलीच तोलू नये…

तिच्यातला सृजनाचा ओलावा जरी सुकून गेला असला तरी आयुष्याच्या ग्रीष्मातून सुखरूप पार पाडणारी मायेची ऊब मात्र उदंड आहे. जेवढंकाही आहे, जसं आहे तसंच अपरिपक्व अर्धवट आयुष्य देखील जपायचं, सावरायचं आहे हे त्या उन्हाळ्याला पक्कं ठाऊक आहे.आता जपलं तर उद्याच्या पावसात अजून एक संधी दडलेली असेल…आपली अपरिपक्वता दूर करण्याची…अपूर्णाला पूर्ण करण्याची….

“बचेंगे तो और भी लडेंगे” असं मनाशी म्हणत माधुमालातीच्या सावलीत बोकोबांसारखी ताणून द्या…येत्या पावसात सारे जग जिंकायचे काम बाकी आहे!….हा उन्हाळ्याचा सांगावा आहे.

आयुष्याचा हा नि:श्वास आहे…..गतिमान काळातून चोरलेला…थबकलेला एक कालातीत क्षण आहे… याच्या मागे अस्थैर्य अन् पुढे अशाश्वती. या इथे, या क्षणी मात्र स्थिर शाश्वत सत्य आहे. “मी आहे” “अस्मि” यापेक्षा मोठं सत्य नाही. यापेक्षा मोठा दिलासा नाही…