गीताई माऊली माझी….

जगातल्या बहुतेक सर्व धर्मांचे काही ना काही धर्म ग्रंथ आहेत. त्या त्या धर्माचे संस्थापक अवतार अथवा संतांनी त्यांच्या पश्चातही अनुयायांना मार्गदर्शन मिळत रहावं म्हणून अशी साधी सोपी सोय केली. हा ग्रंथ जर सतत वाचनात राहिला तर व्यवहारी जगात वावरतानाही आपला अनुयायी आयुष्याचं सार, मूळ उद्देश विसरणार नाही. म्हणून बहुतेक सगळेच धर्म त्या त्या धर्मग्रंथाचं वाचन पिढ्यानपिढ्या करण्याबद्दल अतिशय आग्रही (बरेचदा दुराग्रही) असतात.

हिंदुधर्म ह एकच असा सहिष्णु धर्म आहे जो कित्येक शतकांच्या कालावधीत अनेक दैवी व्यक्तींच्या, संतांच्या, विचारवंतांच्या प्रवाहातून हळूहळू उदयाला आला, ज्याचा कोणी एक संस्थापक नाही आणि जो अनेक अक्रमणांमधुन अधिकाधिक गंभीर, सखोल अन स्वतंत्र होत गेला. हिंदु धर्माची चिवट, विजिगिषुता निव्वळ धर्मांधतेमुळे कधीच नव्हती. हिंदुत्वाच्या स्थिर, संयमी आणि तरीही भारदस्त धार्मिकतेचं मूळ हे सद्विवेकी लवचिकपणामधे आहे. वेळ आल्यावर धर्मग्रंथ आलवणात गुंडाळून हातात शस्त्र घेणारा हा धर्म प्रसंग पाहून हाती लेखणी सुद्धा “जबाबदारीने” घ्यायला शिकवतो. ईश्वराचा शब्द जसा धर्मग्रंथात प्रकट होतो तसाच तो तुमच्या माझ्या लेखनातूनही व्यक्त होतो. काळ, व्यक्ती अन स्थळानुसार नवनवीन रूपात हिंदुत्व व्यक्त होत रहातं. विचारवंताला अध्यात्मातून, प्रेमिकाला भक्तीतून, कर्तव्यदक्ष व्यक्तीला कर्मयोगातून हा धर्म ईश्वराशी जोडून घेतो.

हा जगातला असा एकमेव धर्म आहे जो नस्तिकालाही मोठ्या प्रेमाने आपल्यात मिसळून घेतो. धर्मावर, देवावर विश्वास नसलेली व्यक्ती हिंदु समाजात आपल्या स्वतंत्र विचाराने जगू शकते.

म्हणूनच भारतीय हिंदुत्वाने भगवद्गीतेला धर्मग्रंथ म्हणून मान दिला असला तरी हिदु धर्म प्रत्येकाला गीता वाचनाची सक्ती करत नाही. इथे भारतीय हिंदुत्व असा शब्दप्रयोग अशासाठी कि हिंदुत्वाची कितीक रूपं जगाच्या पाठीवर विखुरली आहेत…. जावा, सुमात्रा, थायलंड पासून मेक्सिको पर्यंत हिंदुत्वाचे अंश विखुरले आहेत. बौद्ध, जैन अशा अनेक उपधर्मातून हिदुत्वाची गर्भतत्त्वं अनेक रूपात, भाषांत घुमत आहेत…. ज्यांनी गीतेचं, कृष्णाचं नावही ऐकलं नाही असे कित्येक हिंदु असतील. आणि तरीही त्यांच्या हिदुत्वावर कोणी भारतीय हिंदू बोट ठेवू शकत नाही. अशा या व्यापक जागतिक हिदुत्वाचा आवाका फार थोड्या द्रष्ट्यांना असतो. आपण सामान्य भारतीय हिंदु  व्यक्तीचा विचार केला तर ती गीतेचा तसा आदरच करते. पण म्हणून वाचतेच असंही नाही. आपल्याकडे सक्ती नाही नं! म्हातारपणी वाचू जमलं तर…..

पण परीक्षा देऊन झाल्यावर गेल्या वर्षीच्या अभ्यासाचं पुस्तक वाचण्यात जसा अर्थ नाही तसाच आयुष्य जगून झाल्यावर गीता वाचण्यात अर्थ नाही. गीता म्हणजे कुणा एका इतिहासकालीन अर्जुनाला कृष्णाने (ज्याच्या मुळात अस्तित्वाबद्दलच आपले इतिहासकार तंडत असतात) दिलेलं boring lecture नाहीये!! गीता म्हणजे ईश्वरी स्पंदन आहे… गीता म्हणजे साक्षात देवाचं प्रत्येक आस्तिक-नास्तिक कसल्याही प्रकारच्या माणसाला दिलेलं आश्वासन आहे…. तुमचा देवावर विश्वास नसला तरीही देवाचा तुमच्यातल्या देवत्वावर असलेला प्रगाढ विश्वास गीतेच्या प्रत्येक चरणात आहे…. अविश्वासाने, कलुषित मनोवृत्तीने घेरलेल्या जगात बावरलेल्या प्रत्येक निरागस माणसाचा आधार गेतेत आहे. कारण गीता म्हणजे तुमच्या माझ्या साध्या अयुष्याची गाथा आहे.

ऐनवेळी हातून शस्त्र गाळणारे बावरलेले अर्जुन आपणच आहोत. आयुष्याच्या युद्धभूमीवर स्वकीयांशीच लढायची वेळ आपल्यावरच कितिदा येते! कितीदा प्रश्न पडतो स्वत:च्याच validity चा! बरोबर चूकच्या पुस्तकी मात्रा रोज रोज बदलतात. आणि हे सगळं शिक्षण शाळेच्या आवाराबाहेर पडल्यावर सुरु होतं….. अशा क्षणी “गात्रेचि गळती माझी होतसे तोंड कोरडे” अशी अवस्था नाही का होत आपली?!

गीतेच्या पहिल्या अध्यायात अर्जुनाचं हे स्वगत फार वाचनीय आहे. यात आपलीच प्रतिमा शोधल्यास गीता वाचनात मोठी गंमत आहे! मूळ श्लोक जरी रसभरित संस्कृतात असले तरी सगळ्यांना समजतील असं नाही. म्हणून विनोबांनी त्या श्लोकांचा रस, गेयता कायम ठेवून भाषांतरित केलेल्या गीताईतले श्लोक इथे देत आहे….

अर्जुन म्हणाला…

“कृष्णा, स्वजन हे सारे, युद्धीं उत्सुक पाहुनी

गात्रेंचि गळती माझी होतसे तोंड कोरडे

शरीरीं सुटतों कंप उभे रोमांच राहती

गांडीव न टिके हातीं सगळा जळते त्वचा

न शकें चि उभा राहू मन हे भ्रमलें जसें

कृष्णा, मी पाहतों सारीं विपरीतचि लक्षणें

कल्याण न दिसे युद्धी स्वजनांस वधूनियां

नको जय नको राज्य नकोत मज ती सुखें

राज्यं भोगें मिळे काय किंवा काय जगूनि ही

ज्यांच्यासाठी अपेक्षावी राज्य भोग सुखे हि ती

सजले तेचि युद्धास धना-प्राणास सोडुनी”

“अरेरे केवढे पाप आम्ही अरंभिले असे

लोभे राज्य सुखासाठी मारावे स्वजनांस जें

त्याहुनि शस्त्र सोडूनि उगा राहीन ते बरें

मारोत मग हे युद्धीं शस्त्रांनी मज कौरव”

यापुढे प्रत्येक अध्याय म्हणजे कृष्णार्जुनाची रोचक अशी प्रश्नोत्तरं आहेत. जिवानिशी सगळ्याची आस सोडून आयुष्यातून अक्षरश: उठलेल्या माणसाला पडणारे प्रश्न अन त्याची बेतोड उत्तरं आहेत…. संयत आयुष्य अन त्याही पलिकडचं अजून बरंच काही गीतेत आहे. काय खावं प्यावं इथपासून ते ईश्वरी अद्वैतानुभवापर्यंत सगळ्याचा समाचार कृष्णार्जुनाने घेतला आहे. गीता ही कुणीही वाचावी. जर आपण साधी माणसं असू तर मग नक्किच वाचावी! हेच गीतेचं मर्म आहे. गीता हा माणसाच्या अस्तित्वाचा सरळ शोध आहे. तुमचा देवाशी direct phone call आहे. गीतेचा अर्थ सांगण्यासाठी कुठल्या व्याख्यानाची, पुराणाची गरज नाही…. सावकाश बसून, शब्दांशी रेंगाळून रस घेत जो वाचेल त्याला पदोपदी वाचवणारी गीता ही सर्वार्थाने गीताई आहे… आईशी बोलायला जसा मध्यस्थ लागत नाही तसाच गीता वाचनाला कोणी प्रवचनकार जरुरीचा नाही. गीताई म्हणूनच माझ्यासोबत सतत आहे…