मुन्नारकथा…

केरळबद्दल इतके ऐकले होते कि खाचखळग्यातून उसळ्या घेत जाणाऱ्या पर्यटक बसमध्ये अवघडून दिवसभर फिरून केरळ पाहिल्याचे समाधान मिळेना.

मुन्नारमधला पहिला दिवस गाईडसाहेबांच्या कडक शिस्तीत घालवल्यावर मी दांडी मारायची असा निश्चय केला! आमचे गाईड हे स्वत:ला बालगुन्हेगारांच्या शाळेचे हेडमास्तर समजत बहुदा, पण त्यामुळे खूप वर्षांनी दांडी मारून गाव भटकायला मजा आली!

अनोळखी गाव… अनोळखी लोक…खरेखुरे, जितेजागते, चालतेबोलते लोक! एका पर्यटन स्थळाच्या चेहऱ्यामागे जगणारे लोक…. त्यांच्या गावात मी मनसोक्त भटकले! रंगीत रिक्षातून झुइकन फिरले! मल्याळी भाषा न समजल्याने मूकबधीर असल्यागत हातवारे करत गप्पा मारल्या!

त्यांच्या इमारती अन बांधकामे पाहिली. त्यात एक केविलवाणा प्रयत्न होता, त्यांच्या नैसर्गिक डोंगराळ वास्तुशैलीला पाश्चिमात्य प्रगतीच्या साच्यात बसवण्याचा….अन त्या प्रयत्नाचं हताश अपयश देखील.

शहरातील लोकाना आवडतील म्हणून त्यांनीही काचेच्या इमारती बांधल्या…. शहरातील लोकच पर्यटनाच्या माध्यमातून त्या सगळ्याचे अन पर्यायाने रोजगाराचे पैसे देणार होते ना! अतिसुंदर पश्चिम घाटाला लागलेल्या खरुजेसारख्या त्या ठोकळ्यांच्या गर्दीत एखादे अनघड दगडांचे छोटेसे घर गच्च झाडांच्या दातीमागून डोकावत असे…. काळ्याभोर लबाड डोळ्यांच्या डोंगराळ आदिवासी पोरासारखे!

बाजाराच्या मुख्य भागातून बाहेर पडण्यासाठी मला एकदोन टेकाडे ओलांडावी लागली. पर्यटकांच्या भागातून न दिसेल अशा डोंगराच्या भागात स्थानिक लोकांची वसाहत होती… दगडी चिरे लावून टिकवलेले जुने रस्ते अन जुनी दगड-लाकडात बांधलेली छोटी छोटी घरं… लाकडाच्या टिकाऊपणावर शंका घेणाऱ्या माणसांपेक्षा अधिक वयाची ही घरं खालच्या काचेचा महालांना ठेंगणी करीत होती…

मानवी वस्तीपालीकडे चहाच्या मळ्यांचं न संपणारं राज्य होतं…. तिथल्या दरीडोंगरात चिवलेबावले पक्षी झेपावत होते. कडक शिस्तीत आखलेल्या चहाच्या मळ्यापूर्वी तिथे असलेल्या उत्कृष्ट जंगलाचे गाणे गात भिरभिरणारे ते पक्षी कदाचित माझ्याच मनाचे होते! माझ्यातील रसिकतेवर निसर्गप्रेमाने केलेली कुरघोडी मला बेशर्त मान्य आहे. चहाच्या एकांड्या लागवडीने मारून-मुटकून हिरवे केलेल्या पश्चिम घाटात मी हिरमुसून शोधत होते शतकांपूर्वी कापलेलं वैभवशाली सदाहरित जंगल….

कदाचित अशा पर्यटनस्थळाचा उपभोग मी घेऊ शकत नाही हा धडा गाठीशी बांधून मी मुन्नार सोडायला बसमध्ये चढले… अलवार धुक्यात केवळ विरोधाभासाने खुलून दिसणाऱ्या पश्चिम घाटाच्या रांगडेपणाला मात्र मी आजन्म मनात जपेन… त्याच्या दिलदार, मूक अन राजसी वनवैभवाला रोज रोज आठवेन….

तपश्चर्या

सकाळचं कोवळं सोनं आकाशात चढत चढत गेलं. सूर्याचं तापट बिंब आता ओढ्याच्या हिरवट निळसर पाण्यात चमचमू लागलं. लाल-हिरवे चतुर स्तब्ध पाण्यावर थरथरते तरंग उमटवीत असताना पाण्याखाली छोट्या माश्यांची अन्न शोधायची लगबग अजून चालू होती.

ओढ्याच्या दोन्ही काठांना ही इवली इवली जीवनचक्र नि:शब्द नांदत होती. काठांवर ओठंगलेली गर्द झाडी, अन ओढ्याच्या पात्रातच ठिय्या देऊन बसलेली शेरणीचे झुडपं आपल्या मुळ्याच्या आडोश्याने कितीक इवले संसार फुलताना पहात होती…

कडेच्या निळ्या हिरव्या डोहांमध्ये डोकावून आपलीच प्रतिमा कौतुकाने न्याहाळणारे बांबू आपापली बेटं बनवून झुलत होते मदमस्त हत्तीच्या डौलात!

सकाळी पाण्यावर उतरलेले हॉर्नबिल अन बगळे आपले रुंद पंख पसरून दिमाखात उडून गेले होते जोड्या जोड्यांनी….

आता ओढ्याकाठी होती नीरव शांत दुपार अन आपली जाडजूड मुळ पाण्यात सैलावून बसलेला पोक्तसा वृक्ष… त्याच्या खरबरीत खोडावर पाण्यावरून कवडसे उमटत होते…. त्याचे प्रतिबिंब पाण्यात अन पाण्याचे प्रतिबिंब जणू त्याच्यात उतरले होते…

ही एकरूपता कित्येक वर्षांची तपश्चर्या होती…..वृक्षाने ओढ्याकाठी अन् ओढ्याने वृक्षाखाली मांडलेली…

विंचुर्णी….

गतजन्मीचे हरवलेले वेडे पुन: सापडताच माणसाला वेडेपणाचे अधिकच डोहाळे लागत असावेत. त्यामुळे हिमालयाच्या जादूगिरीतून बाहेर येतायेता आम्हाला आता विंचुर्णीच्या माळाचे वेध लागले. सामान्य मानवी डोळ्याना जिथे वैराण माळ दिसत होता तिथे आम्हाला जैवविविधतेचे अभयारण्य दिसणार होते….!

धुळीच्या लोटांमधून पहिले दर्शन होताच लक्षात आले, गौरी देशपांडेच्या विंचुरणीशी आपली जुनीच ओळख आहे कि! मैलोनमैल पसरलेले मोकळेढाकळे सोनेरी माळ. त्यावर वेड्या बाभळीचे हिरवे ठिपके….त्याखाली मोठ्या मुष्किलीने दिसणारी…..सावली. वैराण डोळ्यांना सुखावणारी गारव्याची बेटं.

थकलेले, थबकलेले, आटून आक्रसलेले ओढे-नाले. पावसाळ्याच्या एखाद्या ओल्या आठवड्यात त्यांना भरभरून वाहण्याचं सुख मिळतं. इथे वर्षाचा सगळा पाउस केवळ काही तासात पडतो. मग सगळे ओढे नाले भरून ओसंडून जाणार…रानससे अन मेंढरांचे कळप त्या चार दिवसांच्या हिरवळीवर पोसणार… त्यांच्या मागे संधी साधत एकटे दुकटे रेंगाळणारे लांडगे! कितीक वर्षांच्या चक्रात अडकलेले हे विंचुर्णीचे माळ…

अधूनमधून पाहुणचाराला हक्काने येणारे अवर्षणाचे सावट… अन त्याच्याशी खेळत भांडत असल्या रानवटपणात संस्कृती वसवणारा माणूस…. त्यानं वर्षातून एकदाचा भरभरून ओसंडणारं पाणी थांबवलं, जिरवलं…पुरवून पुरवून वापरलं.फळबागा तगवल्या. डाळिंब चिक्कू रुजवले. चिंच पिंपळ अन वडाच्या गरगरीत वृक्षांनाही अवर्षणाचं कौतुक नव्हतं. कडुनिंबाची हिरवट बेटं देखिल बांधाबांधावर तग धरून रहात….

निरखून पाहिलं तरच या सोनेरी माळाचं हिरवं काळीज उलगडतं. दुरूनच आठ्या घालून पाहणाऱ्या नवख्या पाव्हण्याला हा आडमुठा माळ एका झुळकेसरशी धूळ चारतो!

तोच ठसका घेऊन जन्माला येत असावीत विंचुर्णीची माणसंही?! कठोर, शुष्क पण गुंतवून ठेवणारी….कपड्यांत अडकलेल्या कुसळासारखी मनात रुतलेली माणसं…टोचरी पण तुटल्याशिवाय पदर न सोडणारी…

तुम्ही चाचपडत हसाल तर तोंडभर हसून उत्तर देणारी….एखाद दोन तासात चिंब भिजवून जाणाऱ्या विंचुर्णीच्या पावसासारखी…..

 

देणार्‍याचे हात….

माणूस हा सामाजिक प्राणी आहे यावर विश्वास बसायला मला कितीक वर्षे लागली! मुळातच एकटी रमत होते कि परिस्थितीनुरूप तशी होत गेले कुणास ठाऊक, पण जगाशी जमवून घेण्यास जरा वेळच लागला….

माणसांचे तर्‍हेतर्‍हेचे स्वभाव, लकबी, सवयी, संस्कृती, भाषा, आचारविचार, बरोबर चूकच्या विविध कल्पना, सरळपणा, लांड्यालबाड्या हे सगळे समजण्याचे ते वयही नव्हते…. इवल्या मनात किती प्रश्न वादळ होऊन घोंघावत….

खूप लहानपणी कुठल्याशा रागाने पिसे चढलेल्या मला बाबाने शिकवले होते…. “माणूस जगात स्वत:ची किंमत अन जागा केवळ उपयुक्ततेच्या जोरावर मिळवू शकतो. जर तुम्ही इतरांसाठी काही करू शकत असाल तर आणि तरच पैसा, आदर अन मैत्र कमावता येते.”

हा काही क्रूर अमानवी व्यवहार नाही, साधा सोपा निसर्गनियम आहे. जे जे अस्तित्त्वात आहे त्याचा काही उपयोग आहे. अन जेथे उपयुक्ततेचा नाश होतो, तेथे विघटन अन पुनर्वापर सुरू होतो. त्याला काळाची न थांबवता येणारी गती आहे.

रागाचे अन रडण्याचे उमाळे एका क्षणात शांतवले, जेव्हा त्याने मला जगाच्या कुलुपाची साधी सोपी किल्ली सहजच हाती दिली. त्या एका वाक्याचे किती अर्थ, पडताळे शोधण्यात राग अन दु:ख करायचे विसरून गेले मी….

आजही या किल्लीने किती दरवाजे माझ्यासाठी आनंदाने हात पसरताना पाहतेय! विनाकारण दुरावलेले किती डोळे पुन: माझ्यावर हास्याची बरसात करताना पाह्ते आहे. त्यात प्रेम असते, कौतुकमिश्रित अचंबा असतो…..क्वचित आदरही असतो….. माझ्या वरकरणी निरपेक्ष देण्यातला स्वार्थ त्यांना दिसत नाही. केवळ मदतीचे शस्त्र उगारून त्यांना जिंकले गेले आहे हेच समजण्यास वेळ लागत असावा!

विश्वनियम आहे हा, ज्याचा उपयोग त्यास भरभराट….जेथे साठा, साचलेपणा तेचे कुजट वाया जाणे हेच सर्वत्र पहावयास मिळते.

जितके द्यावे तितके अधिक हाती पडत राहते…. जितके साचवावे, तितके नासून जाते…

पाहता पाहता देण्यातला आनंद भिनत जातो…. हसत हसत हजार हातांनी सारे काही या जगावर लुटून मोकळे व्हावे इतका आनंद मनात नाचू लागतो…. या आनंदाची लागण असपासच्यांना नकळत होणारच! त्यांच्या हास्याचे श्रीमंत धनी केवळ तुम्हीच असणार नाही का? कितीही मनांवर राज्य करावे असल्या हसर्‍या हातांनी….त्यांना कधीच काही कसे कमी पडावे?!

देणार्‍याचे ते हात जमेल तेव्हा जमेल तसे हावरेपणाने घेत जावे….त्या हातांना लक्ष्मीचे वरदान असते…. त्या हातांना तुटले बंध सांधण्याचे कौशल्य असते….टोचरे दु:ख शांतवण्याचा स्पर्श असतो….निराशेच्या अंधारात सावरणारा आधार असतो…. केवळ मानवी जगातच नव्हे तर चल अचल सृष्टीत मानाने, आनंदाने जगण्याचा अधिकार असतो….

दिवास्वप्न….

(हा दिवास्वप्नाचा पहिला भाग आहे. सगळं एकाच वेळी लिहिणं मला आणि वाचणं तुम्हाला शक्य नाही म्हणून….)

दु:स्वप्नासारखा सुरु झालेला प्रवास होता तो….सहा तास बेंग्लोर बस स्थानकावर संपूर्ण उनाडक्या करण्यात घालवले होते…रात्री आठ वाजता हरिहरपुराची बस आली तर खरी, पण तिने बेंग्लोर सोडायला दहा वाजवले… रस्त्यात दुसऱ्या बसला ठोकून झालं, चाकाचं पंक्चर (ला मराठी शब्द?!) काढून झालं, डायवरसायबांचं खाऊन (पिऊन?!) झालं… मग कुठे खडखडत प्रस्थान ठेवलं!

अतिमानवी पाठीच्या हिशेबाने बनवलेल्या “आराम” सीटवर रात्रभर अवघडून बसायची मनाची तयारी केली होतीच मी. पण रात्रीच्या लांब पल्ल्याच्या बसमधे एकटीच प्रवास करणारी तेवीस वर्षांची मुलगी असणं आजकालच्या काळात इतकी डोळे फाडफाडून बघायची गोष्ट असते हे जरा मला नवीन होतं!

माझ्या फ़ोनने वीसबावीस तासांच्या सेवेनंतर मान टकली होती… म्हणजे आता मी सर्वार्थाने एकटी असणार होते…. कानात गाण्याची बुचं (ipod) घालून शाल गुंडाळून मी मनोभावे झोपदेवीची आराधना सुरु केली. पण ती येते कसली?! सामान आणि शेजारच्या डोळेफाडू सहप्रवाशांच्या कृपेने झोपेची गाडी फारशी ताल धरत नव्हती. बसचे धक्के आणि आचके होतेच सोबतीला….आणि तो रात्रीच्या “यष्टीतला” खास रंगीत उजेड!

या सगळ्यातून पोहोचेन ते ठिकाण अजून काय काय समोर घेउन येणार आहे ही विवंचना पण माझी (आधीच अवघडलेली) पाठ सोडत नव्ह्ती…. बसने हळूहळू सूर आणि रस्ता पकडला… गार वाऱ्याच्या झुळुका शांतवायला झेपावत आल्या…. बसच्या धक्क्यांच्याच तालावर डोळा लागला माझा थोडासा….

बसच्या धुरकटलेल्या काचेबाहेर रात्रीचं गहिरं आकाश पसरलं होतं…. कुणीतरी तिथे गालात हसत माझ्या वैतागात झोपलेल्या चेहऱ्याकडे पहात होतं….

कचकचून ब्रेक मारत डायवरमहाशयांनी माझ्य झोपेला ब्रेक मारला…. दचकून उठत मी खिडकीबाहेर नजर टाकली…बसच्या हेडलाईट्च्या (ला मराठी शब्द?) झोतात रस्ता उजळत होता खरा… पण पहाटेच्या धुक्याच्या पडद्यातून फार दूरचं दिसतच नव्हतं…. रस्त्याच्या दोन्ही बाजूने गच्च दाटून आलेलं बांबूचं बन वरून झुंबरासारखं दोलायमान झालेलं…. त्यातल्या प्रत्येक फटीतून दिसणाऱ्या आकाशाचा इंचन्‌इंच रत्नचांदण्यांनी मढला होता….माझ्या दु:स्वप्नासारख्या प्रवासाचं इतक सुंदर स्वप्न झालं होतं?! मी खरंच जागी झाले होते का असा प्रश्न पडला मला…!!

पुढ्चे दोन दिवस त्याच सुंदर दिवास्वप्नात घालवले मी… सुंदरतेच्या परिसीमा पुन: बदलायला लावेल असा निसर्ग, आणि त्यावर मात करतील असे सुंदर मनाचे लोक माझी वाट पहात होते….

त्या आकाशामागून गालात हसणाऱ्या कुणाकडे तरी पाहून आता मलाही हसू आलं! पुन्हा हुरुप आला त्याची जादुभरली कथाकादंबरी पुढे न्यायचा…!

हरिहरपुर यायला सकाळचे सहा वाजले…अन स्वप्ननगरीत उतरल्यासारखी मी रिकाम्या बस स्थानकावर उतरले…मला तिथे टाकून बस पुढे गेली… आता रिक्षा शोधायचं दिव्य करायला मी निघतच होते कि एक घनदाट काळा अजस्र मनुष्य पुढे झाला…

जिथल्या भाषेचा मला गंधही नाही, अशा अनोळखी गावात अपरिचित चेहऱ्यावरचं हास्य किती आश्वसक वाटतं! तो रिक्षावाला मला न्यायला बस स्थानकावर गेला तासभर उभा होता….. बस उशीरा आल्याबद्दल मीच त्याची तोडक्यामोडक्या भाषेत माफी मागत हलक्या मनाने त्याच्या रिक्षेत बसले… एरव्ही सगळीकडे स्वत:चं सामान उचलायची सवय होती मला. पण माझ्या सगळ्या प्रयत्नांना दूर सारून त्याने माझं सामान स्वत:च उचलून ठेवलं. रिक्षावाल्यांनी एवढं चांगलं वागवायची सवय नसते आपल्याकडे!

मी हौसेने आणि नवीन आलेल्या उत्साहाने त्याला नाव विचारलं… रावणा!!

हसऱ्या चेहऱ्याने हा रावण माझं कुठं हरण करून घेऊन जात होता कुणास ठाऊक. पण रिक्षेबाहेर पाहताना अशी काही दृष्य उलगडत होती कि मनातल्या शंकाकुशंका धुळीसारख्या धुवून जात होत्या…. फुटबॉलच्या मैदानासारखी विस्तीर्ण भाताची शेतं सकाळच्या कोवळ्या उजेडात स्तब्धपणे उजळत होती…. सह्याद्रीतल्या पायरीदार छोट्या शेतांची सवय असलेली मी त्या भाताच्या मैदानांना पाहून अचंबित झाले होते.

त्या पावसाळी मार्दवी हवेत पोसलेली बांबूची बेटं सगळ्या दृष्यांना आधी लपवून ठेवतात… दर पुढच्या वळणावर नवा नजारा पेश करत हसतात माणसाच्या ऱ्हस्वदृष्टीला! पुन: त्या दृश्याभोवती आपल्या वळसेदार पानांची चौकट विणत राहतात…

अशाच एका वळणानंतर या सगळ्या मायाजगाची मालकीण…. तुंगभद्रा नदी प्रकट झाली. वळणं घेत…धीरगंभीर प्रवाहाने वहात बांबूच्या बेटांतून ती जात होती…हे सगळं स्वप्नवत जग तिचंच होतं. तिच्याभोवती एकवटलेलं, तिच्याच जीवनरसावर पोसलेलं कर्नाटकातलं हे छोटंसं हरिहरपूर तिच्याच वळसेवेलांट्यांत ढगांची दुलई लपेटून अजून झोपलं होतं….

रिक्षा थांबली तेव्हा प्रबोधिनी गुरुकुल समोर होतं….सगळ्या विचित्र प्रवासाच्या शेवटच्या टोकाला.. तिथेच… स्थिर असलेलं. किती स्वप्नं पाहिली होती मी…किती मनोरे रचले होते…नियोजन केलं होतं…पैसे जुळवले होते…चमत्कारिक प्रवास केले होते…. पण त्या क्षणी रिक्षातून खाली पाऊल ठेवताना पहिल्यांदा मला जिवंतपणा समजला होता… सगळ्या जगण्याची धडपड का करतो माणूस ते समजलं होतं…..डोळे मिटून, झोपेत चालल्यासारखं रोजचं आयुष्य “वास्तव” म्हणून मुकाट जगता जगता मी त्या स्वप्नवत गावात अचानक डोळे उघडले होते….

तो एक जिवंतपणाचा सोनेरी क्षण….उरलेल्या निद्रिस्त वर्षानुवर्षांच्यापेक्षा मौल्यवान होता…. पावसाने ओथंबलेल्या आकाशाच्या आडून माझ्या स्तिमित अवस्थेला पाहून पुन: कोणीतरी गालात हसत होतं….

तळ्टीप: हरिहरपूरच्या आधिक फोटोंसाठी: http://picasaweb.google.com/anujnaa/PrabodhiniGurukula?feat=directlink

(क्रमश:)

दिवास्वप्न भाग II


गीताई माऊली माझी….

जगातल्या बहुतेक सर्व धर्मांचे काही ना काही धर्म ग्रंथ आहेत. त्या त्या धर्माचे संस्थापक अवतार अथवा संतांनी त्यांच्या पश्चातही अनुयायांना मार्गदर्शन मिळत रहावं म्हणून अशी साधी सोपी सोय केली. हा ग्रंथ जर सतत वाचनात राहिला तर व्यवहारी जगात वावरतानाही आपला अनुयायी आयुष्याचं सार, मूळ उद्देश विसरणार नाही. म्हणून बहुतेक सगळेच धर्म त्या त्या धर्मग्रंथाचं वाचन पिढ्यानपिढ्या करण्याबद्दल अतिशय आग्रही (बरेचदा दुराग्रही) असतात.

हिंदुधर्म ह एकच असा सहिष्णु धर्म आहे जो कित्येक शतकांच्या कालावधीत अनेक दैवी व्यक्तींच्या, संतांच्या, विचारवंतांच्या प्रवाहातून हळूहळू उदयाला आला, ज्याचा कोणी एक संस्थापक नाही आणि जो अनेक अक्रमणांमधुन अधिकाधिक गंभीर, सखोल अन स्वतंत्र होत गेला. हिंदु धर्माची चिवट, विजिगिषुता निव्वळ धर्मांधतेमुळे कधीच नव्हती. हिंदुत्वाच्या स्थिर, संयमी आणि तरीही भारदस्त धार्मिकतेचं मूळ हे सद्विवेकी लवचिकपणामधे आहे. वेळ आल्यावर धर्मग्रंथ आलवणात गुंडाळून हातात शस्त्र घेणारा हा धर्म प्रसंग पाहून हाती लेखणी सुद्धा “जबाबदारीने” घ्यायला शिकवतो. ईश्वराचा शब्द जसा धर्मग्रंथात प्रकट होतो तसाच तो तुमच्या माझ्या लेखनातूनही व्यक्त होतो. काळ, व्यक्ती अन स्थळानुसार नवनवीन रूपात हिंदुत्व व्यक्त होत रहातं. विचारवंताला अध्यात्मातून, प्रेमिकाला भक्तीतून, कर्तव्यदक्ष व्यक्तीला कर्मयोगातून हा धर्म ईश्वराशी जोडून घेतो.

हा जगातला असा एकमेव धर्म आहे जो नस्तिकालाही मोठ्या प्रेमाने आपल्यात मिसळून घेतो. धर्मावर, देवावर विश्वास नसलेली व्यक्ती हिंदु समाजात आपल्या स्वतंत्र विचाराने जगू शकते.

म्हणूनच भारतीय हिंदुत्वाने भगवद्गीतेला धर्मग्रंथ म्हणून मान दिला असला तरी हिदु धर्म प्रत्येकाला गीता वाचनाची सक्ती करत नाही. इथे भारतीय हिंदुत्व असा शब्दप्रयोग अशासाठी कि हिंदुत्वाची कितीक रूपं जगाच्या पाठीवर विखुरली आहेत…. जावा, सुमात्रा, थायलंड पासून मेक्सिको पर्यंत हिंदुत्वाचे अंश विखुरले आहेत. बौद्ध, जैन अशा अनेक उपधर्मातून हिदुत्वाची गर्भतत्त्वं अनेक रूपात, भाषांत घुमत आहेत…. ज्यांनी गीतेचं, कृष्णाचं नावही ऐकलं नाही असे कित्येक हिंदु असतील. आणि तरीही त्यांच्या हिदुत्वावर कोणी भारतीय हिंदू बोट ठेवू शकत नाही. अशा या व्यापक जागतिक हिदुत्वाचा आवाका फार थोड्या द्रष्ट्यांना असतो. आपण सामान्य भारतीय हिंदु  व्यक्तीचा विचार केला तर ती गीतेचा तसा आदरच करते. पण म्हणून वाचतेच असंही नाही. आपल्याकडे सक्ती नाही नं! म्हातारपणी वाचू जमलं तर…..

पण परीक्षा देऊन झाल्यावर गेल्या वर्षीच्या अभ्यासाचं पुस्तक वाचण्यात जसा अर्थ नाही तसाच आयुष्य जगून झाल्यावर गीता वाचण्यात अर्थ नाही. गीता म्हणजे कुणा एका इतिहासकालीन अर्जुनाला कृष्णाने (ज्याच्या मुळात अस्तित्वाबद्दलच आपले इतिहासकार तंडत असतात) दिलेलं boring lecture नाहीये!! गीता म्हणजे ईश्वरी स्पंदन आहे… गीता म्हणजे साक्षात देवाचं प्रत्येक आस्तिक-नास्तिक कसल्याही प्रकारच्या माणसाला दिलेलं आश्वासन आहे…. तुमचा देवावर विश्वास नसला तरीही देवाचा तुमच्यातल्या देवत्वावर असलेला प्रगाढ विश्वास गीतेच्या प्रत्येक चरणात आहे…. अविश्वासाने, कलुषित मनोवृत्तीने घेरलेल्या जगात बावरलेल्या प्रत्येक निरागस माणसाचा आधार गेतेत आहे. कारण गीता म्हणजे तुमच्या माझ्या साध्या अयुष्याची गाथा आहे.

ऐनवेळी हातून शस्त्र गाळणारे बावरलेले अर्जुन आपणच आहोत. आयुष्याच्या युद्धभूमीवर स्वकीयांशीच लढायची वेळ आपल्यावरच कितिदा येते! कितीदा प्रश्न पडतो स्वत:च्याच validity चा! बरोबर चूकच्या पुस्तकी मात्रा रोज रोज बदलतात. आणि हे सगळं शिक्षण शाळेच्या आवाराबाहेर पडल्यावर सुरु होतं….. अशा क्षणी “गात्रेचि गळती माझी होतसे तोंड कोरडे” अशी अवस्था नाही का होत आपली?!

गीतेच्या पहिल्या अध्यायात अर्जुनाचं हे स्वगत फार वाचनीय आहे. यात आपलीच प्रतिमा शोधल्यास गीता वाचनात मोठी गंमत आहे! मूळ श्लोक जरी रसभरित संस्कृतात असले तरी सगळ्यांना समजतील असं नाही. म्हणून विनोबांनी त्या श्लोकांचा रस, गेयता कायम ठेवून भाषांतरित केलेल्या गीताईतले श्लोक इथे देत आहे….

अर्जुन म्हणाला…

“कृष्णा, स्वजन हे सारे, युद्धीं उत्सुक पाहुनी

गात्रेंचि गळती माझी होतसे तोंड कोरडे

शरीरीं सुटतों कंप उभे रोमांच राहती

गांडीव न टिके हातीं सगळा जळते त्वचा

न शकें चि उभा राहू मन हे भ्रमलें जसें

कृष्णा, मी पाहतों सारीं विपरीतचि लक्षणें

कल्याण न दिसे युद्धी स्वजनांस वधूनियां

नको जय नको राज्य नकोत मज ती सुखें

राज्यं भोगें मिळे काय किंवा काय जगूनि ही

ज्यांच्यासाठी अपेक्षावी राज्य भोग सुखे हि ती

सजले तेचि युद्धास धना-प्राणास सोडुनी”

“अरेरे केवढे पाप आम्ही अरंभिले असे

लोभे राज्य सुखासाठी मारावे स्वजनांस जें

त्याहुनि शस्त्र सोडूनि उगा राहीन ते बरें

मारोत मग हे युद्धीं शस्त्रांनी मज कौरव”

यापुढे प्रत्येक अध्याय म्हणजे कृष्णार्जुनाची रोचक अशी प्रश्नोत्तरं आहेत. जिवानिशी सगळ्याची आस सोडून आयुष्यातून अक्षरश: उठलेल्या माणसाला पडणारे प्रश्न अन त्याची बेतोड उत्तरं आहेत…. संयत आयुष्य अन त्याही पलिकडचं अजून बरंच काही गीतेत आहे. काय खावं प्यावं इथपासून ते ईश्वरी अद्वैतानुभवापर्यंत सगळ्याचा समाचार कृष्णार्जुनाने घेतला आहे. गीता ही कुणीही वाचावी. जर आपण साधी माणसं असू तर मग नक्किच वाचावी! हेच गीतेचं मर्म आहे. गीता हा माणसाच्या अस्तित्वाचा सरळ शोध आहे. तुमचा देवाशी direct phone call आहे. गीतेचा अर्थ सांगण्यासाठी कुठल्या व्याख्यानाची, पुराणाची गरज नाही…. सावकाश बसून, शब्दांशी रेंगाळून रस घेत जो वाचेल त्याला पदोपदी वाचवणारी गीता ही सर्वार्थाने गीताई आहे… आईशी बोलायला जसा मध्यस्थ लागत नाही तसाच गीता वाचनाला कोणी प्रवचनकार जरुरीचा नाही. गीताई म्हणूनच माझ्यासोबत सतत आहे…

पुनर्जीवन…

करकरीत उन्हाळी दुपार होती….करकरीत ऊन, करकरीत सावल्या, करकरीत चटका अणि करकरीत शांतता….

जिवाची तलखी करणारी उन्हाळी दुपार, जराही मार्दवाची सय नाही तिला….

ती अनाम अस्वस्थता नक्की कसली होती मलाही ठाऊक नव्ह्तं. दुपारचं ऊन माझ्या मनावर सांडलं होतं… सगळं शोषून कोरडं, शुष्क….अणि करकरीत झालेलं मन….. त्याला भेगा पडलेल्या, दुष्काळी जमिनीसारख्या…. अशा वेळी शांतवणारा वाराही उन्हाला फितूर झालेला. आलीच एखादी झुळुक तर कढत उसासा अंगावर यावा तशी…. भेगाळलेल्या मनावर अजुन एक लसलसता वार करणरी झुळुक…..

आताशा तर रडायला अश्रुही उरले नव्हते…. माझे डोळेही त्या उन्हाळी दुपारीसारखे कोरडे. केव्ह्ढंतरी रडू मुकाट गिळून सुकल्या डोळ्यांनी मी ती दुपार पहात होते…. स्वत:ला समजावत होते कि मला तुझी आठवण येतच नाहिये मुळी, जरा पाऊस पडला कि मला बरं वाटणारच आहे मुळी…..

आणि अशा त्या उन्हाळी दुपारी पाहता पाहता वारा सुटला…कढत हवेचा तो क्रूर झोत सगळ्या पृथ्वीला जाळत आला…. आणि माझ्या डोळ्यासमोर मधुमालतीचं नाजुक खोड उभं थरथरलं. तिचं कोसळणंही किती नि:शब्द! सगळे दोर सग्ळे आधार तुटून गेलेले…आणि तिचा मऊ हिरवा संभार निश्चेष्टपणे जमिनीकडे झेपावला….

कुठुनतरी बळ आलं माझ्या निश्चेष्ट शरीरात….अशी धावले बागेत माझ्या सखीला सावरायला…. कल्पनाही नव्हती मला ती मधुमालती माझी किती सख्खी होती! तिच्या निष्कंटक कोवळ्या फांद्या माझ्या अंगावर कोसळल्या त्यही किती अलवार….जणु वजनच नव्हतं तिला! गळ्यात पडून हमसून रडणारया सखीसारखी ती वेल झुळुकेसरशी थरथरत होती माझ्या मिठीत… तापलेल्या जमिनीचा तळपायाखालचा चटकाही दोन क्षण विसरले मी….

तिच्यासारखंच कोसळावंसं वाटत होतं…रडावंसं वाटत होतं…. पण मीही नाही उभी रहिले तर मधुमालतीचं नाजुक खोड तर पाहता पाह्ता मोडून जाईल….

धीर करून तो पानांचा संभार गोळा केला…जमेल तितक्या फांद्या जपून जपून आधारांनी उभ्या केल्या… मुख्य खोड वर ओढल्यावर बरीच सावरली ती…. पण तिचं असं चुरगाळलेलं, वेडं वाकडं झालेलं रुपडं अगदी पाहवत नव्हतं. पुन्हा काळजी होती तिच्या जगण्याची…. कधीकधी असा आधार तुटून कोसळलेल्या वेलींची खोडं पुन्हा सावरतच नाहीत. जर झाडाने जगय्चं नाही असं ठरवलं तर सगळे आधार, खत, पाणी काहीकाही काम नाही करत…..

चार दिवस तिच्या कोमेजलेल्या हिरवाईकडे साशंकपणे पहात होते मी…. उन्हाचा, वारयाचा…सगळ्यांचा राग आला होता मला…. तुझासुद्धा राग आला होता…. त्या वेलीसारखी मी जेव्हा कोसळत होते…तेव्हा निघून गेलास….उन्हात अशीच उभी होते मीही….

ती जशी माझ्या मिठीत थरथरत रडली होती तशीच आज मी तिच्या खोडाशी बसून रडत होते…. तिच्या पानांच्या करकरीत सावल्या माझ्या भोवती नाचत होत्या मऊ वारयावर… सगळा माझा राग तिच्यासमोर वाहून गेला… माझं दु:ख तिच्या दु:खात मिसळून गेलं…

अश्रूंनी धूसर झालेल्या डोळ्यांनी मी भोवती पाहिलं…सावल्यांचा करकरीतपणा हळूहळू धूसर होत चालला होता…. चमकून वर पाहते तर काय! ढगांच्या गर्दीने सूर्याला झाकलं होतं…. काळे सावळे प्रेमळ राक्षस गडागडा हसत होते अम्हा दोघींकडे पहात! टपक टपक थेंब झेपावत आले तिच्या पानांवर अन माझ्या हातांवर…. सगळ्या उन्हाचा शीण क्षणात नाहीसा झाला… चटोर वारा पुन्हा पक्ष बदलून गारेगार होऊन आला… खरपूस मातीवर पडलेल्या पावसाचा वास घेऊन पानांशी गिरक्या घेऊ लागला!

त्या वासाने… त्या पावसाने जणु पुनर्जीवन आणलं….कोमेजल्या फांद्याना आणि मनाला तजेला दिला…. दोनच दिवसांत मधुमालतीने जीव धरला… छोटे हिरवे फुटवे तिच्या गाठाळ खोडावर शोभून दिसले…. आणि एके दिवशी मी पाह्ते तर पानाआड लाजून लपलेल्या कळ्यांचे घोसच्या घोस लटकलेले! माझी सखी पुन्हा खूश होती….

मीही खूश होते…काल रात्रीच्या तुझ्या फोनवरची शांतता मला सांगून गेली होती कि तुलाही माझी खूप आठवण आली होती त्या पावसानंतर….

धर्म…

धर्म..खूप जळता आणि विनाकारण अतिरेकी झालेला विषय आहे…. आधीच धर्म खूप प्रकारचे… आणिक आता नास्तिक धर्म नावाचाही नवीन धर्म उदयाला आला आहे…

अधर्मवादी, धर्मवादी अन निधर्मवादी सुद्धा कट्टर असतात आताशा! यातला प्रत्येक वाद आधीच्या वादाची प्रतिक्रिया म्हणून सुरु झाला… धर्माचं मूळचं सात्त्विक स्वरूप जेव्हा सवर्णांनी स्वत:च्या स्वर्थासाठी मोडून वाकवून वापरलं तेव्हा त्याची प्रतिक्रिया उमटली…आम्हाला तुमच्या धर्माचे जोखडच नको अशा मुक्त विचाराचे वारे आले, अन त्यांनी भलं बुरं सगळंच उधळून लावलं. माझ्या आधीच्या पिढीने तिची उमेदीचे वर्षं धर्माच्या पताकेच्या चिंध्या करून घोषणा देण्यात घालवली.

सहाजिक परिणाम होता…. एक असा समाज जन्म घेऊ लागला, ज्याच्या जगण्याला योग्यायोग्यतेची बंधनंच नको होती. स्वातंत्र्याचा अर्थ प्रत्येकाने मन मानेल तसा लावावा. स्वत:च्या वागण्याला गोजिरवाण्या समाजवादी शब्दांची रंगरंगोटी करावी…मान सन्मान आणि job satisfaction मिळवावं!! पण या सगळयात एक गोष्ट हरवत जात होती… साध्या अश्राप निरागसतेची किंमत….श्रद्धा आणि विश्वास, सगळ्या समाजाचा आत्मा सगळं नामशेष होत होतं. अंधश्रद्धा निर्मूलन करता करता आम्ही श्रद्धा पण खरवडून काढून फेकली होती. आता आयुष्याला बंधनं कमी होती पण काही आधार…काही पायाच उरु दिला नाही.

मग सायन्सवादी जन्माला आले. कुणाच्या लक्षातच आलं नाही कि आपण राम-कृष्णाच्या जागी आइनस्टाइन आणि स्टीफन किंग्सची स्थापना केली. अंधविश्वास इथेही होताच! बोहरला दिसलेल्या ऍटमवर आमची कणादाच्या अणुपेक्षा जास्त श्रद्धा होती. न दिसलेला ऍटम “असतो” असं लिहितात बाबा सातवीच्या पुस्तकात…मग असेलचकी खरं! पण देव दिसत नसला सध्या, तरी तो आहे असं म्हणणारे मात्र ढोंगी थोतांडवादी ठरत गेले. बुद्धिवादाची फॅशन “इन” झाली. आम्ही देव बिव काही मानत नाही असं अभिमानाने सांगणं ओघाने आलंच!

ज्या काही परंपरा, संस्कार उरले होते..त्यांचीही फॅशन व्हायला वेळ नाही लागला. मनाचे श्लोक हे पाठांतर स्पर्धेत पहिला नंबर पटकावण्यासाठीच रचले आहेत असा समज चिमुकल्या मुलांनी करुन घेतला तर काय चुकलं? लग्नसमारंभ दिवसेंदिवस आलिशान होत गेले…हा एक मोठा corporate व्यवसायच झाला. पण आगीभोवती फे~या मारणं आम्हाला intellectually पटत नसल्यामुळे स्वागत समारंभ हेच खरं लग्न झालं…

करणा~यांचा ही डोळस विश्वास नसेल तर न करणारेच परवडले असं म्हणायची पाळी आली…. छोटे छोटे धक्के, अपयश अन व्यक्तिगत दु:ख यातून उभं रहायला जी ताकद लागते ती कुठूनच मिळेनाशी झाली…. देवाशी भार घालून निष्काम कर्म करण्यासाठी आधी देव तर असावा लागतो तुमच्या आयुष्यात!

नाही! तसाही तो असतोच…तुम्ही नाकारल्याने त्याला कुठं फरक पडला?! फरक तर आपल्याला पडतो! का आलो जन्माला? अन असल्या अपघातांनी भरलेल्या जगात रोज हजारो माणसं मरत असताना आपणच बुवा कसे जगलो?! खूप हुषार होतो म्हणून जगलो असा समज असेल तर मृत्यू तुमच्यापेक्षाही भल्या भल्यांना रोज शेंडी लावतो हे लक्षात असू द्या!

सुया टोचून आणि face-lift surgery करून लोकांसमोर तरुण दिसणं शक्य आहे. पण मरण टळणं शक्य नाही. त्याच्यावर मात जर करायची असेल तर त्याच्यापलीकडे जगण्याचं कसब शिकलं पाहिजे. आजकाल अशा खरोखर जीवनोपयोगी गोष्टी शाळेत शिकवायची फॅशन नाही. मेकॊलेचा आत्मा बोकांडी बसत असावा…. (अर्थात त्याला आत्मा होता का हा प्रश्नच आहे!)

माणसाला मुळात धर्माची गरज असते ती असं जगण्याचं शिक्षण मिळवण्यासाठी….म्हणून धर्म तयार होतात. धर्म म्हणजे यज्ञयाग कर्मकांड अशा भातुकलीसाठी उत्तर म्हणून बनवलेला नसतो.

धर्म म्हणजे तलवारी अन एके ४७ उचलून बेछूट नरसंहार करायचं लायसन्स नसतं…

धर्म म्हणजे आपली लायकी जन्मानेच महान असल्याचा पुरावाही नसतो…

धर्म म्हणजे अस्पृश्यतेचा, असमानतेचा आधार नसतो…

धर्म खरंतर या सगळ्याचा विपर्यास असतो! खूप खूप शतकांपूर्वी तो धर्म हरवला आपण…त्याच्या छिन्नविच्छिन्न तुकड्यांतून आता शोधला पहिजे तो…

धर्म म्हणजे जगण्याचं सायन्स…

धर्म म्हणजे माणूसप्राण्याचा “माणूस” करण्याची कला…

धर्म म्हणजे मनुष्यजन्माचा स्थायीभाव…

धर्म म्हणजे जगताना समोर येणा~या बिकट समस्यांवर उत्तर शोधायचं पाठ्यपुस्तक… यात गाइडबुकाप्रमाणे readymade उत्तरं नाही मिळणार. पण उत्तर शोधयचं कसं हे शिकवलं जाईल.

जो डोळसपणे वापरेल त्याचं आयुष्य साधं सोपं का होईना पण सार्थ करणारी गुरुकिल्ली म्हणजे धर्म…

असा धर्म पुन्हा शोधायला हवा…. त्यासाठी भारतयात्रा वगैरे करण्याची गरज नाही, हातात बॅनर घेऊन…. तो धर्म आपल्या मनात, आत्म्यात सुप्त आहे, जो निश्चयाने स्वत:च्या आत निरखून बघेल त्याला सापडेल असा गुप्त खजिना आहे….

प्रत्येकाचा एक धर्म असतोच…नास्तिकवाद हाही एक धर्मच असतो! पण जो माणूस त्या धर्माच्या गाभ्याला हात घालतो त्याला एक दिवस उमगतं कि सगळे धर्म, सगळं सायन्स, सगळं सगळं शेवटी एकवटत जातं… सगळे फरक, सगळ्या सीमरेषा पुसून जातात…. एक दिव्य प्रकाश भारून टाकतो त्याला… म्हटलं तर तोच त्याचा देव असतो… काही म्हणा, नका म्हणू, फरक कुणाला पडतो?!

सलाम…

त्याच्या मनाला शरीराचं जडत्व नव्हतं. त्याला दिसत नव्हते समोरचे निर्जीव शिळाखंड….त्याच्या शरीराच्या हजारपट विशालकाय आणि जड… त्या तरल विदेही मनाला दिसत होतं एक अतुल्य शिलाकाव्य. संपूर्ण जगातलं प्रेम अन उत्तुंग आनंद त्या मनात दाटला होता… त्याच्या उमेदीला शरीराचे किंवा समोरच्या शिळेचे बंध मान्यच नव्हते! त्या मनातली अतिमानवी ताकद असह्यपणे शरीरातून ओसंडत होती. त्याचे थरथरणारे हात शिळेवरुन फिरत होते. त्यांच्यातून स्रवणरा आनंद त्या शिळेचा आत्मा बनत होता…..

तेच हात जेव्हा छिन्नी-हातोडी घेऊन शिळेवर उठले तेव्हा ते स्थिर होते, अचूक अन शक्तिशाली. तिथे सुरु झाला प्रतिभेचा सगळ्यात खडतर प्रवास. मनातलं तरल, स्पर्शातीत काव्य शिळेत उतरवायचा भगीरथ प्रयत्न… तरलतेला धक्का लागू न देण्याची धडपड आणि शरीराच्या मर्यादा…

आजही ती शिल्पं पाहताना जणवतो त्यांचा प्रवास. तो शिल्पकार तर हजारो वर्षांपूर्वीच नामशेष झाला. पण ती शिळा मागे उरली. त्याचा उन्माद, त्याचा विषाद….त्याच्या प्रवासाची ecstasy त्या शिळेवर आजही रेखलेली आहे…

तेव्हा जर त्याच्याकडे काळापुढची तंत्रकुशलता असती, (technology असं आता ज्याला मराठीत म्हणतात ना, तेच ते!!) तर त्याने शिळेतून विश्वनिर्मिती केली असती. पण त्याने जशी मिळाली तशी आदिम शस्त्रं वापरून जी निर्मिती केली तिलाच आपण शिरसावंद्य आश्चर्य मानतो!! अपौरुषेय, अतुल्य कलाकृती मानतो!! आता हाताशी असलेल्या technology ने त्याच्या शिल्पकाव्याच्या (Xerox) photocopies सरसकट सगळ्या दगडांवर, कागदांवर काढून दाखवतो अभिमानाने! शिल्पकाराचं तरल मन अजूनही घुटमळतं त्या शिळेभोवती. आक्रोश करतं मानवी कानांना ऎकूच न येणारा…. “अरे, हे तर अयशस्वी शिल्प होतं रे!! कुणीतरी यापेक्षा सुंदर काहीतरी घडवा रे! कुणीतरी या दगडाचं खरं सौंदर्य बाहेर काढा रे….”

पण माणसं बहिरी आहेत….त्यांना हा आक्रोश ऎकूच येणार नाही…. ती तर या बिचाऱ्य़ाच्या अयशस्वी प्रयोगाचा कीस पाडत राहतात….कौतुक करत राहतात…तेच अपयश पुन: भोगत राहतात….त्याच्या दु:खावर जणु डागण्या देत राहतात….

आज त्या शिल्पकाराच्या जमिनीने साद घातली आहे….त्याच्या स्वप्नातली तंत्रकुशलता इथल्या शिळांवर उतरवा….त्यच्यासारखं अपौरुषेय स्वप्न या जमिनीच्या अंगावर प्रसवा…. तिच्या हृदयातला उकळता, रसरसता दगड तिने समोर ओतलाय… त्यातून घडवा तुमच्या तरल कल्पनेचे चमत्कार….त्या अज्ञात शिल्पकाराला तुमच्या प्रतिभेचा सलाम घडू द्या…

तळटीप:  हा सगळा मनोव्यापार फार जुना आहे…. महाबलीपुरम् मधल्या गल्ल्याबोळांतून पसरलेल्या शिल्पांकडे पहात रस्त्यावरच मुक्काम ठोकून एका शिल्पकन्येच्या आधाराने लिहिलेलं एक चिठोर सापडलं माझ्या अजागळ संसारात! त्यावर बेतून ही गोष्ट लिहिली आहे… तेव्हा कथेला सत्याचा आधार कसा असतो हे मला ठाऊक आहे!