१.     प्रेमकथा

तर गोष्टीची सुरुवात होते अगदी सुरुवातीला, जेव्हा भारतात टीव्ही सार्वजनिक होते आणि पुण्यात सायकलींचं राज्य होतं…. मुलं बेल-बॉटमच्या विचित्र पाटलोणी घालत अन मुली केसांचे बॉब करायला हळूहळू धजावत….

तर असा तो १९८० चा जमाना होता… थोडासा ब्लॅक न व्हाईट आणि थोडासा टेक्निकलर! बारावीनंतर स्वत:चं आयुष्य स्वत:च घडवायला माझी आई मुंबई सोडून पुण्यात आली. त्या काळीही असला उलटा प्रवास करणारी ती एकमेवच असावी! विद्यार्थी सहायक समितीचं वसतिगृह, वाडिया कॉलेज याभोवती तिच्या आयुष्यातला सगळ्यात उमलता काळ फुलत गेला. या काळात तिने जोडलेले मित्र-मैत्रिणी तिच्या पश्चात माझेही आप्त झाले आहेत.

तेव्हा कुठून कोण जाणे, समाजकार्याचं वारं पुण्यात जोरदार होतं (खरंतर हे वारं पुण्यातून कधी जात नाही) आणि आईला त्याचीच लागण झाली असावी. भूकंपग्रस्तांसाठी चंदा गोळा करत फिरण्यापासून पुण्याजवळच्या गावांमधून अभिरुचि वर्ग चालवण्यापर्यंत काहीही करत ही मुलं. एक प्रकारचा झपाटा लागला असावा जणू तसाच काळ होता तो. त्या सगळ्या गोतावळ्यात एक माझा बाबा होता…. सगळ्या गोतावळ्याचा केंद्र्बिंदू…. कथेचा नायक!

भाषणे, कथाकथन, नाट्यवाचन, पथनाट्ये सगळ्यावर प्रभुत्त्व असलेला, सुंदर दंतकळ्या दाखवत गोड हसणारा, बाणेदार मुलगा. त्याला गरिबीचा चटका ठाऊक होता, अन त्यातून स्वत:च्या जोरावर अर येण्याची हिंमत होती. मुंबईतल्या मध्यमवर्गीय, हळुवार जगातून आलेल्या माझ्या आईच्या जगण्याच्या परिसीमाच बदलून गेल्या…. मुळातला मदतशील स्वभाव उफाळून आला. या देशातल्या असहाय गरीबगुरीबांसाठी आपण तरुणांनीच काहीतरी केलं पाहिजे असं या मुलांना कळकळीने वाटत होतं. त्यासाठी आयुष्य वेचणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे वगैरे विचार पण सुळ्सुळत असणार!

त्यात खूप डोळस, वस्तुनिष्ठ विचार किती होता?! निरागस भाबडेपणा, भावुक समर्पण मात्र अधिक होतं. पण त्या त्या क्षणी जे वाटतं तेच त्या वेळचं सत्य असतं. त्यातून बदल होतात….माणसात अन परिस्थितीतही.

जाणीव संघटनेचा जन्म या टोळक्याच्या सामाजिक जाणिवेतून झाला. आईने स्वत:ला या कामात पूर्ण झोकून दिलं. मराठवाड्यातल्या भोगजी नावाच्या छोट्याश्या गावात ही ढालगज भवानी एकटीच जाऊन काम करायला लागली. लोकहितासाठी सरकारच्या योजना खूप असतात. पण त्याचा सगळा फायदा समाजातल्या तळाच्या घटकांना मिळतच नाही. रोजगार हमी सारख्या अनेक योजना, माझ्या आईने गावागावातून हट्टाने राबवून घेतल्या. सरकारी अधिकार्‍यांना ठणकावून जाब विचारायला स्थानिक लोकांना तयार केलं.

तिच्या हाताखाली शिकलेली कितीतरी मुलं आता मराठवाड्यात सामाजिक संस्था चालवतात. तिच्या कामातून सुरू झालेली अनेक छोटी छोटी कामं आजही उभी आहेत. तिच्या भाबड्या आशावादावर मी नेहमी टीका करत असे. “हे सगळे सामाजिक जाणिवेचं ढोंग करणारे लुटारू आहेत”, असे म्हणत असे. त्यावर खूप साधं उत्तर ती देत असे, “उडदामाजि काळेगोरे सगळीकडेच असतात गं, पण चार चांगली माणसं, चार आशेचे किरण टिकून तर राहतात!”

या सगळ्या कामाच्या झपाट्याने आईची कीर्ती पंचक्रोशीत न पसरती तर नवल. बरं कीर्ती कधीच वास्तवाला धरून नसते! सामाजिक कार्यकर्तीच्या वेषात आलेली ही मुलगी पोलीस आहे, सरकारी गुप्तहेर आहे वगैरे कथा तिच्या भोवती विणल्या गेल्या होत्या! त्या आठवून आई अगदी आतापर्यंत हसत असे!

अशी बंडखोर मुलगी अन गॅंगचा हिरो एकमेकांच्या प्रेमात पडले नाहीत असं आमच्या बॉलीवूड्मधे तर होत नाही. आई-बाबांचं लग्न म्हणजे खरोखर चित्रपटाचं स्क्रिप्ट होतं! घरच्यांचा विरोध, आत्महत्येच्या धमक्या, नवर्‍या मुलाचं गोड अपहरण असा साग्रसंगीत गोंधळ होता! आमच्या बॉलीवूडमधे प्रेमकथांचे शेवट पण नेहमी गोडच असतात. तर तसा गोड शेवट म्हणजे आईबाबांच्या संसाराची चालत अडखळत झालेली सुरुवात.

आई बाबांच्या लग्नाला फक्त बाबाच्या घरच्यांनीच विरोध केला असं नाही. ती ज्या संस्थेचं काम मराठवाड्यात करत होती त्या संस्थेतल्या लोकांनी देखिल बाबाला तिच्याशी लग्न करून समाजापसून दूर केल्याबद्दल माफी मागायला लावली. तो दुखावला असला तरी आईच्या बाणेदार रागापुढे ते काहीच नाही. तिने मराठवाड्याला रामराम ठोकला अन बाबासोबत पुण्यात रहायला आली. मन ओतून उभे केलेले काम सोडून, जड मनाने आई पुण्यात परत आली तेव्हा मी तिच्या पोटात होते. तिचा आत्मा मात्र तिथेच सोडून आली होती ती….अन ही गोष्ट तिला आयुष्यभर खात राहिली.

 

२.     आईपण

पत्र्याच्या खोलीत सुरु झालेला हा उत्तरार्ध खरंतर कठिण काळ असणार, पण दोघांच्या चेहर्‍यावर त्या दिवसांच्या आठवणींनी उजळ हसू पसरताना पाहिलंय मी कायम. माझ्या जन्माच्या गोंधळात अन बाळ सांभाळण्याच्या नादात तिचं भोगजीचं दु:ख जरा मागे पडलं. औंधजवळ सांगवी गावात आईच्या आईचं घर होतं. माझ्या जन्मानंतर आई बाबा तिथे रहात होते. घराला पुढे मागे मोकळी जागा होती, तिथे आईने हौसेने बाग केली होती. माझ्या पहिल्या आठवणी त्या बागेच्या आहेत… दारातला प्राजक्त, त्यावर बुलबुलाचं घरटं अन दर हंगामात त्यातून खाली पडणारी पिल्लं. मग आसपासच्या मांजरांच्या भुकेल्या डोळ्यांपासून वाचवायला आई ते पडलेलं पिल्लू कापडात हळुवार उचलून घेत असे.

दुपारी दामटून झोपवलेली मी, डोळे उघडून पाहाते तो माझ्या शेजारी एक इटुकलं बुलबुलाचं पिल्लू बोळ्याने दूध पिऊन झोपलेलं! अन त्याशेजारी आठवतो आईचा खुललेला चेहरा!

बागेतल्या प्रत्येक झाडाशी तिने माझा परिचय करून दिला होता… प्राजक्त, गुलमोहर, चिकू, पपई यांची झाडं, पावसाळ्यात बागभर पसरणारा तेरडा, गुलाब अन सायलीचे वेल माझे सोबती होते…नातलग होते. खूप कोवळ्या वयात तिने मला निसर्गाच्या स्वाधीन करून दिलं होतं. त्या नि:शब्द वयातल्या झाडा-फुलांच्या सहवासाने माझ्यावर खोल ठसा सोडला. त्यांच्याशी एक तादात्म्यभाव तयार झाला आहे, जो माझ्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक विचारात उमटत राहतो. निसर्गाच्या सोबत राहून माणसामधली एक वेगळी सर्जनशीलता, विजिगीषा, उन्मेष आणि चिवट लढाऊ वृत्ती नकळत व्यक्त होऊ लागते. तिच्या अनघड संगोपनात तसाच माळरानाचा मोकळेपणा होता…

आईसाठी मात्र तो काळ धावपळीचा होता. तिने पूर्वी जितक्या सहजतेने सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिलं होतं तितक्याच सहजतेने आईपणाला वाहून घेतलं. नोकरी सांभाळून मला वेळ देताना तिची परवड रोजची होत असे. पाळणाघरातले तासचे तास मला जितके असह्य होत, त्यापेक्षा कैक पटीने तिला होत. पुन्हा एका हातात मला धरून उभ्या उभ्या बसने ये-जा करत असे….

हळूहळू माझ्या विश्वात आई बाबा आज्जी आणि बागेच्या पलीकडचे लोक येत होते. खूप लहान वयात आईशिवाय परक्या लोकांत मिसळावे लागत असे. अस्वच्छ मुलांची मला त्या वयातही जाम किळस वाटे. अन दंगेखोर मुलांची तर दहशतच बसली होती. पण मी तिला काही सांगत नसे. तिला अजून त्रास होऊ नये असा एवढा विचार तेव्हा मी केला असेल?!

माणसांचं जग बागेइतकं निरागस नसतं हे अजूनही समजत नाही मला. पण मानवी जगात तयार होणारे ताण आपणच झेलायचे असतात हे तेव्हाच माझ्या मनावर बिंबले गेले. इतर पालकांसारखी माझी आई खूप प्रोटेक्टिव्ह वगैर अजिबात नव्हती. त्याचे मला फायदे-तोटे दोन्ही झाले. ती आदर्श आई वगैरे तर अजिबात नव्हती. पण वेगळी होती, स्वतंत्र होती.

तिच्या आणि माझ्या मूळ घडणीत, स्वभावात फरक होता. त्यामुळे जे तिला स्वत:साठी योग्य वाटे, ते माझ्यासाठी त्रासदायक देखिल कैकदा होत असे. पण हे तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण तोंड उघडून बोलावे लागते हे मी अगदी जाणत्या वयात येईतो शिकले नाही.

तिचं माणसांशी वागणं देखिल झाडांशी प्राण्यांशी वागण्याइतकंच सहज होतं. ते मात्र मला कधीच जमलं नाही. मानवी जगात माझा व्यवहार खूप काळ अवघडलेला, घुसमटलेला राहिला. जसं तादात्म्य झाडांशी पावता आलं तसं माणसांशी जमायला मला वेळ लागतो आहे.

मात्र तिच्या सहजतेचा, स्पष्टपणाचा गैरफायदा घेतला गेलेला मी पाहिला आहे. कदाचित त्याचाच प्रतिसाद म्हणून माणसांच्या भोवती मी खूप साशंक राहिले.

माझी आई अशी काही अप्सरा नव्हती, पण स्पष्ट रेखीव चेहरा अन माणसाचा ठाव घेणारं मोकळं हसू तिच्या डोळ्यांत दिसत असे. मी खूप लहान होते तेव्हा तिचे केसही लांबसडक काळेभोर होते. एके दिवशी मी बागेत खेळत होते, अन तिला दुरून येताना पाहिलं. पण त्या चालत येणार्‍या बाईचे केस छोटे कापलेले होते. अगदी जवळ येईतो मी मनात म्हणत होते, ही आपली आई नसणारच. पण माझी धास्ती खरी ठरली, आईने केस कापले होते. तिने पुन्हा कधीच लांब केस ठेवले नाहीत. अन ही गोष्ट का कुणास ठाऊक मला खूप खूप बोचली होती. नेहमीप्रमाणे मी बोलले काहीच नाही… अगदी आता आता कधीतरी मी तिला ही गोष्ट सांगितली, तर हसली होती मलाच.

आईच्या राज्यात व्यक्तिस्वातंत्र्य हा पहिला नियम होता. मला नको असेल तरी ते स्वातंत्र्य घ्यावे लागत असे. वयाच्या पाचव्या वर्षीही मराठी शाळेत जावे कि इंग्रजी हा निर्णय मीच घ्यावा असा आग्रह ती धरू शके! काय कपाळ अक्कल होती असला विचार करायची?! पण तो घेण्यासाठी मला मदत केली जात असे. माझ्या प्रश्नांना उत्तरे मिळत, त्यावरून मी स्वत:च्या मतीने काय ते तात्पर्य काढावे! आश्चर्य म्हणजे मी बरोबर तात्पर्यापर्यंत पोहोचत असे! किंवा कदाचित मी जे काही तात्पर्य काढेन त्याला, “बरोबरच आहे तुझं!” असं म्हणून ती टाळ्या वाजवत असे.

अगदी न कळत्या वयापासून तिने मला गोष्टींची पुस्तकं वाचून दाखवायचा सपाटा लावला होता. तासचे तास ती वाचून दाखवी. कृष्णाची गोष्ट अन शंकर पार्वतीची गोष्ट या खास लाडक्या होत्या. एकदाच मी प्रश्न विचारला होता, कि “कृष्णाने कंसाला मारले मग कंसाने त्याला उलटून मारले असते तर?!”

अग, मार म्हणजे नुसता ठोक दिला नाही काही, कंस मेला.” आईने हसू आवरत स्पष्टीकरण दिले खरे पण त्यातून गोंधळ अधिकच वाढला.

“मेला म्हणजे काय झाला?”

त्यानंतर मृत्यू या विषयावर एक मोठ्ठा संवाद झडला…. प्रत्येक जण मरणार आहे, प्रत्येकाचं असणं संपणार आहे हे चवथ्या पाचव्या वर्षी पचवणं फार अवघड होतं. पण तिने मला ते करू दिलं. आत्मा, परमात्मा, वैश्विक शक्ति वगैरे पण समजावून झालं!

“मी आणि तुझा बाबा सुद्धा कधीतरी मरणार आहोत. मग तू तुझी तुझी असणार. तू पण मोठी होणार आणि खूप खूप वर्षांनी आमच्यासारखीच तूही हे जग सोडणार. पण आत्ता घाबरण्याची गरज नाही. या सगळ्याला अजून खूप खूप वर्षं आहेत”

खूप रडले होते… घाबरले होते…. कितीक रात्री झोपले नव्हते… पण तेव्हाच मी बहुदा आईच्या मृत्यूचं दु:ख रडून टाकलं असावं…. पुन्हा कधी मृत्यूच्या भीतीने आयुष्य थांबलं नाही.

मला तिच्या विश्वासाचं आश्चर्य वाटतं. एवढी कठिण गोष्ट मला कळेल कि नाही ही शंका तिला आली नाही. मी धास्तावेन अशी काळजी तिला वाटली नाही. कदाचित त्या विश्वासानेच मला कणखर बनवलं….

कृष्णासारख्या पुराणातल्या गोष्टींप्रमाणे ’एका कोळियाने’ वगैरे मोठ्या पुस्तकांचा देखिल आम्ही दोघी फडशा पाडून टाकत असू. त्या कथाही मला त्यांच्या अनेकपदरी खोलीसकट समजावून देत असे आई…

’ugly duckling’ चं एक जाडजूड पुस्तक आणलं होतं तिने. ते माझं खास आवडतं होतं. अगदी गळ्याशी प्राण आणून मी आधी इंग्रजी अन मग तिचे मुक्त भाषांतर ऐकत असे. हट्टाने तिला वाचायला बसवीत असे! अन ज्या दिवशी कथा कळसाला पोहोचली त्या दिवशी तर मला खाणेपिणे सुचेना. शेवटी त्या बदकाच्या पिलाला आपण राजहंस असल्याचा साक्षात्कार झाला एकदाचा अन मी जी काही हमसून हमसून रडू लागले कि तिला समजेना काय झालंय! त्या बदकाच्या पिलाच्या खडतर प्रवासवर्णनात एकदाही न रडलेली मी गोष्ट सुखांत होताहोता रडू लागले होते! तेव्हा मलाही कळलं नव्हतं माझ्या रडण्याचं कारण….आताशा कळतंय थोडंथोडं.

मला मराठी वाचता येऊ लागल्यावर आईच्या मागचं हे एक काम हलकं झालं. साने गुरुजींच्या गोड गोष्टींना मी गुळाच्या ढेपेला मुंगी चिकटावी तशी चिकटले. माझ्या बावळटपणाकडे झुकलेल्या सज्जन मनाला त्या गोष्टी आपल्याशा वाटत. हे वेड देखिल घरात चेष्टेचा विषय झाले होते. तरीही तिने मला पुस्तके खाऊ घालणे कमी केले नाही. एखादे खेळणे, कपडा कमी खरीदला जाई, पण पुस्तकांची आवक चालू राही. तो पुस्तकांचा वास माझ्या लहानपणीच्या आठवणींशी जोडला गेला आहे.

बाहुलीचे घर बांधण्यापासून चित्र काढायला शिकवण्यापर्यंत सगळ्यात आई भाग घेत असे. तिच्या आईने (आज्जी) मला संस्कृत श्लोक अन स्त्रोते वगैरे शिकवायचा सपाटा लावला होता. त्यातली गेयता, उच्चार आवडले म्हणून मी उचलले. पण त्यापलीकडे आज्जीची जुनी शिस्त मी फारशी लावून घेतली नाही अंगाला! आईच्या मुक्तछंदातच मला सूर सापडत गेला होता.

मधला एक मोठा काळ आई, बाबा अन मी आपापल्या कामात व्यस्त होत गेलो. शाळेचा दट्ट्या मागे लागताच आईचा अपुरा वेळ मला कमी टोचू लागला. नव्या मित्र-मैत्रिणींच्या जगात मी रमत गेले. अन आईच्या मनातली मोठी धास्ती कमी झाली. तिनेही शाळेत शिकवण्याच्या कामात रस घ्यायला सुरुवात केली. हट्टाने बाबाला स्वत:चं घर घ्यायला लावलं. सदाशिव पेठेतलं ते घर आमच्याच नव्हे तर येणार्‍या जाणार्‍या पाहुण्यांच्याही मनात घर करून राहिलं आहे. तिने हौसेनं सजवलेलं नटवलेलं तिचं घर!

सगळ्या सामान्य घराप्रमाणे तिथेही आमची भांडणं, रडारड अन समेट झाले. वाढदिवस झाले, उन्हाळ्याच्या सुट्ट्या झाल्या…. त्या घराला पूर्वीसारखी बाग नव्ह्ती पण घराएवढीच मोठी गच्ची होती. तिथे मोठा झोपाळा असे… १९९०मधल्या सदाशिव पेठेच्या मानाने आमचं घर चवथ्या मजल्यावर म्हणजे स्वर्गातच होतं. आजूबाजूला एकही उंच इमारत नव्हती. क्षितिजापर्यंत ताणलेलं आभाळ मी रोज पहात असे. मोकळा वारा घरातून माझ्या सोबत धावत असे. त्याचं अप्रूप तेव्हा नव्हतं. कधीतरी त्या गच्चीत आई बाबा अन मी रात्री उशीरा ठिक्कर खेळत असू! भयंकर मजा येत असे. त्या मोजक्या रात्रींच्या आठवणी आजही चवीने निघतात.

माझ्या शाळेच्या उपक्रमातही तिला माझ्यापेक्षा रस असे. हौसेने साड्या वगैरे आणून मला सजवत असे! बाबाला मात्र मी त्याच्यासारखं कथाकथन, वक्तृत्त्व वगैरे गाजवावं असं वाटे. लहान असल्यामुळे मी ते सारं मुकाट केलं, पण बक्षिसं वगैरे मिळाली तरी मला त्याचं अप्रूप नसे. एकूणात लोकांसमोर उभे राहून काहीही करणे माझ्या आवडीचे नाही हे आई बाबांनी एके दिवशी कधीतरी मान्य करून टाकले! इतर उपक्रम जोरदार चालत! चित्र काढणे, रंगवणे, लेखन, वाचन, टिपणे काढणे असल्या गोष्टी ती मला हसत खेळत शिकवत गेली. वैदिक गणित बेहद्द आवडलं पण शाळेच्या गणिताने अम्हा दोघींना वेगळाच ’धडा’ शिकवला! मग शालेय अभ्यास मदतीशिवाय स्वत:च करायचा हे निश्चित झालं. पुन्हा मी कधी शाळेच्या वेळेव्यतिरिक्त अभ्यासाला म्हणून हात घातला नाही. शिकवण्या वगैरे तर आयुष्यात लावल्या नाही. शिकायला म्हणून कुणाच्या समोर बसून मी कधीच काही शिकत नसे. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली असल्या उफराट्या सवयी आम्ही दोघींनी पोसल्या! पण तिच्या स्वत:च्या उदाहरणातूनच शिकत राहण्याची भूक जबरदस्त लावली तिने मला…अगदी शेवटच्या क्षणापर्य़ंत ती शिकतच होती.

ज्ञान प्रबोधिनीतली सहा वर्षं तिने माझ्याएवढी होऊन उपभोगली! शाळेतून आल्यावर मी स्वयंपाकघरात ओट्यावर बसत असे. अन काम करता करता आईला माझा दैनंदिन वृतांत ऐकावा लागत असे. या शाळेच्या विचित्र पद्धती अन माझ्या विचित्रपणाला मिळणारं स्वातंत्र्य पाहून तिला अगदी भरून येत असे! या शाळेवर तिची माझ्याइतकीच भक्ती होती असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

तिचेही अन्य उपक्रम कमी नव्हते. १९९१ साली आमच्या घरात संगणक आला. खूप मोठी गोष्ट होती त्या काळाच्या मानाने! मग आधी ती शिकली अन तिच्या पाठी मी अन बाबा शिकलो! जेव्हा इतर मुलांना कंप्युटर गेम्सचे वेड लागले तेव्हा मी खेळून तृप्त होऊन बाजूला झाले होते! आईला ग्राफिक्सची कामं करताना पाहून मला कंप्युटर हे साधन आहे खेळणे नव्हे हे समजलं अन रुचलं होतं. ’कोरल ग्रफिक्स’ शी तिने माझी मैत्री घालून दिली तेव्हा माझ्या वयाची मुलं टीव्हीच्याच जगात होती.

मला अन बाबाला शिकवून गप्प बसते तर माझी आई कुठली?!! शेजारपाजार्‍यांच्या मुलांना शिकवून झालं… पुढे विद्यार्थी सहायक समितीमधे सरळ संगणक प्रशिक्षण वर्गच सुरू केले. इथून तिथून देणगी म्हणून संगणक घेऊन यायचे, कबाड का जुगाड करून ते चालू करायचे अन कोण कुठल्या गावागावांतून आलेली मुलं प्रोग्रामिंग शिकू लागली तिच्या हाताखाली!

पुण्यात संगणक साक्षरतेची लाट आणणार्‍यातली माझी आई एक लढाऊ सरदारीण होती. बालभारतीची पुस्तके लिहिणे, महाराष्ट्र बोर्डाचे संगणक अभ्यासक्रम बनवणे…जिथून जिथून ज्ञानाच्या वाटा उघडता येतील तिथून तिथून ती चालत राहिली, जुने, गंजके दरवाजे तोडून, सगळ्यांना उजेडाकडे हाकलतच होती म्हणा ना! तुमची तयारी असो वा नसो, ती तुम्हाला उजेड दाखवणार म्हणजे दाखवणारच!

क्रांतिकारक होणं सोपं नसतंच मुळी. अन आईलाही खूप झगडावं लागलं. सरकारी मुजोरपणाशी, लोकांच्या जुनाटपणाशी… बुरसटलेल्या पण अधिकाराच्या जागी बसलेल्या वृद्ध अंधत्त्वाशी…. रोज रोज ती लढली. तरीही कितीकदा उभं केलेलं काम हातचं जाताना पहावं लागलं… रागाने रडू आलं तरी कुणी अबला म्हणू नये म्हणून दाबावं लागलं. घरच्या दारच्या सगळ्या आघाड्यांवर ती बाजीप्रभूसारखी लढत राहिली. अन तरीही कुठेतरी काहीतरी सतत शिकत राहिली…शिकवत राहिली.

कुठला विषय तिला वर्ज्य नव्हता अन कुठला माणूस अस्पर्श्य नव्हता. पैरोहित्य, भारतीय इतिहास, पुरातत्त्व, विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, इंजिनियरिंग सगळेच तिचे विषय होते. पुन्हा एखादी रिकामी दुपार विमला ठकार, विवेकानंद, ओशो किंवा जे कृष्णमूर्ति पण तिला सोबत करायचे.

घोड्याबरोबर नळ्याची यात्रा घडावी तशी या सगळ्या विषयांत मलाही मोफत डुबकी मिळत असे. टि. म. वि.च्या इंडोलॉजी एम. ए. चा ’तिचा’ अभ्यास आम्ही दोघींनी मिळून धमाल करीत केला होता. माझी दहावीची परीक्षा पण होती तेव्हाच, पण तो फारसा अडथळा नसावा! दहावीच्या पुस्तकांइतकाच मला नाणकशास्त्र, पुरातत्त्व अन वेगवेगळ्या कालखंडातल्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास ओळखीचा झाला होता.

आईच्याच बरोबर मोडी शिकले, वेद, उपनिषदे, संस्कृत नाटके माझ्या चहूबाजूना पसरलेली असत. जे दिसेल ते उचलून वाचत सुटावे, ही केवढी श्रीमंती झाली!

खूप वर्षं झाली ती नियमाने अग्निहोत्र करत असे. ज्ञान प्रबोधिनीच्या संस्कृत संस्कृति संशोधिकेत पौरोहित्य शिकली. विपश्यना सुरू केल्यानंतर तिचा क्रोध सुट्टीवर गेला! पुढे पुढे बरीच शांत होत गेली. पण तरी तिच्या कामाचा पसारा कमी नाही झाला.

या सगळ्या चौफेर घोड्दौडीत एक गोष्ट मात्र तिला आवडत नसे, स्वयंपाक! घरात हळूहळू कामवाल्या मावशींचं राज्य होत गेलं. आईच्या मोकळ्या, न्यायी स्वभावामुळे तिला कामाला लोकही चांगले भेटत, टिकून रहात. पण तरीही तिच्या हातचे जेवायचा माझा आणि बाबाचा छुपा हट्ट असे. अधून मधून अशी मेजवानी मिळाली कि आम्ही तोंड फाटेतो कौतुक करत असू! तिला मात्र आमच्या हेतूची भयंकर शंका येत असे. कौतुक खरे नसणार असा तिचा ठाम गैरसमज होता!

इतर घरची कामे मात्र हौसेने करत असे! त्यात बाबाचा, माझा वाटा आमच्याकडून करवून घेत असे. बाईचं काम अन पुरुषाचं काम असा भेदभाव नव्ह्ता. बाबाचे आर्थिक व्यवहार नेटके तिला लावता येत असत. अन बाबाच्या हातच्या मसालेभाताला आम्ही दोघी जिभल्या चाटीत असू.

आम्हा दोघांना तिने कधीच अवलंबून पांगळे होऊ दिले नाही. घरच्या कामातच केवढीतरी गंमतजंमत चालत असे. अन तरीही कितीक कंटाळवाणी कामं ती बिनबोभाट उरकून टाकत असे ते आम्हाला पुसटसे ठाऊक असे!

ओला कचरा घरीच जिरवून बायोकल्चर बनवण्याचा प्रघातही तिनेच सुरू केला. गेली दहा वर्षं आमच्या घरातून शेपूचं एक सडकं पान देखिल वाया गेलेलं नाही. हा माझ्या आईचा संस्कार आहे.

 

३.     उत्तरार्ध

मी मोठी होत गेले तसे माझे प्रश्न अधिक क्लिष्ट होत गेले. आताशा तिलाही उत्तरं ठाऊक नसत. तो मधला काळ खूप कठिण होता माझ्यासाठी. आता माझी मीच उत्तरं शोधायची आहेत हे स्पष्टच केलं होतं तिने…. त्यावरून खूप चिडाचीड चाले माझी… कधी तिने समजून घ्यावे कधी मी धीर धरावा. दोघींचा बांध सुटला तर मनमुराद वाद घालावा! तासाभराने शांत होऊन तिसर्‍याच चर्चेत गुंतून जावे!

आदर्श घरात कदाचित भांडणं, वाद होत नसतील… पण आम्हा दोघींना वाद टाळण्यापेक्षा त्यातून मिळणार्‍या धड्यांचा अधिक शौक होता. तुझे माझे जमेना अन तुझ्यावाचून करमेना हे रोजचेच होते अन आम्हाला मान्य होते!

तिला सगळ्यात अधिक भिती होती तिची मुलगी चुकून नॉर्मल…सामान्य तर होत नाही ना याची! सामान्य विचार करणे, टिपिकल शहरी, स्वार्थी, बेजबाबदार वागणे तिला अजिबात सहन होत नसे. याप्रकारच्या वागणुकीची किंचित छटा देखिल माझ्यात दिसली तर तिला माझी आई म्हणून भयंकर अपराधी वाटे…हरल्यासारखे वाटे. मीही बंडखोरीच्या वयात होते…. समाज बिमाज असलं काही नसतं ग! असं तिला बिनधास्त समजावत असे!

तिचा कॅन्सर उफाळल्यावर मात्र खूप काही बदलले. तो तिचा अवघड काळ सुरु झाला होता. अन अचानक आमच्या भूमिका बदलू लागल्या होत्या. आता तिची चिडचिड मी मुकाट सहन करणार होते… अन तिच्या प्रश्नांना आता माझ्याकडे उत्तर मिळणार होते…. आजवर तिने मला संरक्षण दिलं होतं. पण आता तिचा हात मी धरणार होते.

तिच्या पहिल्या ऑपरेशनच्या आदल्या रात्री अम्ही तिघं जेवायला बाहेर गेलो होतो. एका खूप मोठ्या बदलाच्या तोंडाशी उभे होतो. आईकडे पहाताना ती आतून किती घाबरली असेल त्याचा विचार करत होते. पण त्या विचाराचाही थांग लागत नव्हता, असा काहीतरी बोथटपणा चढत होता…. भुलीच्या औषधासारखा….

तो सुरुवातीचा धक्का अन त्याने आणलेले बदल पचवणंच अवघड होतं. आम्ही तिघे एकत्र शांत होतो. त्या शांततेत एक अवघडलेलं नि:शब्द रडू होतं. पण तेव्हढंच. त्यापुढे सगळे कसे युद्धाला तयार व्हावे तसे वागत गेलो.

त्यापूर्वी मी कधी हॉस्पिटलमधे फारसं पाऊलही ठेवलं नव्हतं. अन अचानक ते सगळे वास आणि दृष्य धाडकन सामोरे येत होते. पण आईच्या समोर हसून “बेस्ट ऑफ लक, अज्जिबात घाबरू नकोस!” असं म्हणू शकले. मी तिला घेऊन जाताना पहात होते तेव्हा कोणीतरी कागद पुढे केले, त्यावर लिहिलं होतं कि, “शस्त्रक्रियेदरम्यान पेशंटला काही बरंवाईट झालं तर हॉस्पिटल जबाबदार राहणार नाही.” निमूट सही करताना मात्र सगळा शूरपणाचा आव उतरत गेला. त्या सहीने सुरुवात केली होती जबाबदारी उलटवायची. तिच्या पुढच्या आयुष्याला जबाबदार रहायचं जणू कबूल करून आले मी.

त्यानंतर काय होत गेलं ते धूसर आठवतंय…. जणू काही ते वाट पहात बसलेले क्षण असून नसल्यासारखे झाले आहेत. मी आणि बाबा फक्त पहात असू अधून मधून एकमेकांकडे, दुसर्‍याचा धीर टिकला आहे ना हे चाचपत असू! हळूहळू इतर लोक आमच्या आजूबाजूला येत गेले. प्रश्नोत्तरांच्या फैरी झडत गेल्या…. काय, कसं, कोण डॉक्टर, कधी, कधीपासून….. तेच तेच पुन्हा पुन्हा… पण शब्दांच्या फेकाफेकीने एक खोटा धीर येतो, वास्तवापासून सुटका होते, मन सैलावतं. मला पहिल्यांदा समजलं, लोक खूप बोलतात का ते!

आई घरी आली, ती कॅथेटरचा डबा, नळी, औषधं…आणि कॅन्सरची मानसिकता घेऊन. वेदना सहन करून आक्रसलेले खांदे, त्यावर लटकावलेला कॅथेटर आणि संपूर्ण हरलेला, चिडचिडा चेहरा….. “मीच का? मलाच का म्हणून?” तिच्या वावरण्यातही प्रश्न असे, देवावर उगारलेला…

खूप चिडचिड करत असे सगळ्यांवर. अर्थात, मलाही सवय नव्हती जबाबदारी घेण्याची, हलगर्जीपणा अमाप होत असे, कितीही काळाजीपूर्वक वागले तरी. मग तिला तिच्या अपंगत्वाची आठवण दिल्यासारखे वाटे. कधी स्वत:ला बोल लावावा, कधी घरातल्यांना तर कधी नियतीला….

या काळात तिची काळजी घ्यायला तिची आई येऊन रहात होती. आई मुलीच्या तीन पिढ्या…. अन तिघींचे तीन ध्रुव यापलीकडे त्याला शब्द नाहीत. आई अन आजी दोघींच्या विखारी शब्दात मी दिवसेंदिवस निर्विकार वागणे शिकून घेतले होते. जे बरोबर वाटेल ते करत रहायचे, कोण काय बोलेल त्याकडे बहिरा कान केल्यासारखे वागायचे. त्यात काही सुधारणा करून घेण्यासारखे असेल तर लक्षात ठेवायचे. पुढे एक शब्दही उच्चारायचा नाही हे एक्मेव धोरण मी पाळत होते. माझ्यासारख्या मनस्वी स्वभावासाठी इतकी स्वयंशिस्त खूप अवघड होती खरी. आणि, रागाला पेटलेला माणूस समोरच्याच्या थंडपणाने अधिकच भडकतो. एके दिवशी असेच झाले. माझ्या थंड निर्विकार वागण्याला वैतागून आजीने आईला रागातच विचारले, “ही मुलगी आताच इतकी निर्विकार आहे, तुझ्यानंतर ही माझे काही पाहील का?!” संतापाने उभी जळत होते मी. इतका राग आला होता आजीचा! आपल्याच मुलीच्या मृत्यूबद्दल इतका आत्मविश्वास?!! असा ती विचारच कसा करते हेच समजेना…. रडले होते, पण काही बोलले नव्हते तरीही. त्या प्रसंगानंतर कितीतरी वर्षं मी आजीशी कोरड्या चार शब्दापलीकडे बोलत नसे. खूप वर्षांनी मला तिच्या अशा बोथट वागण्यामागची हरलेली मनस्थिती समजत गेली. तेव्हा रागाची जागा हळूहळू दयेनी घेतली….

त्या क्षणी मी जरी निमूट राहिले, पण अधिकाधिक कडवट होत गेले त्या काळात. जणू, हृदयशून्य नर्सबाई झाले होते. आईला ’जगवणे’ बस दुसरं काही मला ना दिसणार होतं ना जाणवणार होतं. आईची ढाल झाले होते खरी, पण शत्रू कोण अन मित्र कोण कळत नसे. वार अतून बाहेरून कुठूनही होत….

ऑपरेशन नंतरचा पुढचा सहाजिक टप्पा असतो केमोथेरपी. सगळ्या कॅन्सर पेशंट्सचं दु:स्वप्न…. ऐकलेल्या कथा कहाण्या असतात… केमोने असह्य त्रास होतो, उष्णता होते, केस जातात, उलट्या मळमळ होते…. आजाराहून उपचार जीवघेणे असतात वगैरे. हौशी लोक कॅन्सर पेशंट्सनी लिहिलेली पुस्तकं हाती देऊन अजूनच धास्ती भरवतात. आधीच आईची मन:स्थिती संपूर्ण हारलेली होती. त्यात असलं काहीतरी वाचून ती अधिकच बिथरली. तिने चक्क केमोथेरपी घ्यायला नकार दिला. कुठल्याही डॉक्टरला ती बधेना.

आजवर तिचेच म्हणणे ऐकायची सवय होती मला. ती म्हणते त्यात नेहमीच तथ्य असतं असा माझा बालिश विश्वास होता. तिला जे करायचे नाही ते तिला कोणी करायला लावता कामा नये असे वाटत तर होते. पण बरोबर काय अन चूक काय ते कळेनासे झाले होते. बाबाने खूप प्रयत्न केला तिला केमोसाठी तयार करायचा, पण ती हट्टालाच पेटली होती. नाही म्हणजे नाही.

मग समांतर उपचार शोधणे सुरु झाले. एक होमिओपथी तज्ञ होते, जे कॅन्सर बरा करू शकण्याचा दावा करीत. आता त्यांच्याकडे फ़ेर्‍या सुरू झाल्या. कधी फरक पडे, कधी खूप त्रास होई. तिच्या छातीवरच्या जखमा दिवसेंदिवस बिघडत होत्या… पण हळूहळू….. खोकल्याची ढास सुरू झाली होती. आईने तर मरणाची वाट पहाणेच सुरू केले होते.

रात्रीची झोप संपलीच होती. सगळा वेळ तिला उशीला पाठ टेकून बसून रहावे लागे. आडवे होताच श्वास गेलाच म्हणून समजावे. खोल गेलेले डोळे, हडकलेलं शरीर, जखमांनी चिघळलेलं…..

दिवसरात्र तिची पाठ चेपून देत बसत असे मी….. हात दुखून, दुखण्यापलीकडे गेले होते…. माझ्या मुळातल्या दणकटपणाचा हा एक फायदा होता कि तासचे तास मला चेहर्‍यावरची माशी हलू न देता तिच्यापाशी बसता येई. कधीतरी थकून झोपले तरी हलक्या आवाजावरून लक्षात येत असे, माझी जागा बाबाने घेतली असे….. बाबाही तेव्हा बदलीच्या गावी, ओतूरला रहात असे. शनिवार-रविवारपुरता घरी आला तरी त्याला फारसा आराम नसे.

अंधारातून चालल्यासारखा काळ होता. पण का कोण जाणे मला ती यातून बाहेर येणार आहेच मुळी असा आंधळा विश्वास तेव्हा वाटत असे. तिला सहन करताना पाहून त्रास होत होता, पण फारशी चिंता किंवा निराशावाद नव्हता माझ्यात. त्या काळात आईच्या चिघळलेल्या जखमांची सफाई करून ड्रेसिंग करायला सुरू केले होते. तिला असले काम माझ्याकडून करून घेणे अजिबात आवडत नसे. पण माझं मन घट्ट होतं अन हात हलका होता. मला ते काम बरोबर साधले होते. पण आता मान्य करेन मी, त्या सगळ्याचा खोल परिणाम होत होता माझ्यावर….

आईची अवस्था जशी जशी खालावत गेली तसे होमिओपथीवाले डॉक्टर कर्म, नियती वगैरेबद्दल बोलू लागले. माझा प्रचंड संताप होत असे, पण काय करायचं ते कळत नसे. हळूहळू आईच्याही लक्षात येत होतं कि हे समांतर उपचाराचं लक्षण काही ठीक दिसत नाही. त्याच काळात दोनतीन माणसांनी आईच्या केमोविरोधाला सुरुंग लावला. आमच्या घराशेजारचे डॉक्टर रोज रोज येऊन तिला जवळपास रागावत असत म्हणा ना. आईची मावसबहीण एक दिवस कोप्पीकरांना ’नुसतंच’ भेटायला म्हणून चल म्हणाली.

आजाराने मरेन तर सुटेन पण केमोचा छळ सहन करणार नाही असं म्हणणारी माझी आई, त्या रेंगाळत, कणाकणाने मारत येणार्‍या मरणाची वाट पाहून जेरीला आली होती. वेदनेच्या पलीकडे थकूनभागून पोहोचलेली, शेवटी तयार झाली. मावशी, बाबा अन मी आईला घेऊन जेव्हा रूबीच्या कॅन्सर सेंटरमधे गेलो तेव्हा सकाळचा कोवळा स्वच्छ उजेड पसरला होता….

कोप्पीकरांना पाहताच सकाळची सोनेरी ऊब किती दिवसांनी जाणवली आईला…. त्यांच्यासमोरच रडली भरपूर. तिच्या आणि माझ्या अश्रुपिंडांमधे काहीतरी वायरिंग होतं. आम्हा दोघींना एकमेकांच्या रडण्याचं कारण ठाऊक नसेल तरीही एकत्र रडू येत असे. सगळयाच आई-मुलांत असेच असेल कदाचित, पण ते वायरिंग जादूचे असते खरे! तरी बरं अताशा मला ती रडली तरी न रडायचा भरपूर सराव झाला होता.

त्या दिवशी एक नवीन पर्व सुरू झालं…

 

४.     पुनर्जीवन…

कोप्पीकरांनी आईच्या मनातली भिती, पूर्वग्रह यांना अजिबात स्पर्श न करता मोडीत काढलं. “I don’t want to hurt her anymore” यातच खूप काही पोहोचलं. त्यांच्या हाताखाली कुशल नर्सिंग स्टाफ होता…. आईच्या जखमा आजवर इतक्या व्यवस्थित कधीच हाताळल्या गेल्या नव्हत्या. सामान्यत: नातेवाईकांना पडद्याआड थांबावे लागते, पण आईच्या हट्टाखातर मला तिच्याजवळ थांबू दिले गेले. नवीन औषध अन ड्रेसिंग मला पाहून घेता आले.

सगळ्या तपासण्या करून कोप्पीकरांनी दुसरे ब्रेस्ट काढून टाकण्याचा सल्ला दिला. असंतुलित वजनाने तिच्या पाठीला त्रास होत होताच, अन कॅन्सर आता तिच्या फुफ्फुसांशी लगट करू पहात होता. ऑपरेशनचे दुसरे दिव्य आधीच्यापेक्षा सह्य वाटले…कदाचित आम्हाला सवय झाली होती इतक्या वर्षांत. आणि जहांगीर हॉस्पिटलचा सगळा कर्मचारीवर्ग अतिशय समजूतदार, मदतशील होता. त्यांचे हसरे, आत्मविश्वासपूर्ण चेहरे पाहूनच आम्हाला धीर येत असे. रोज न चुकता कोणी तुमच्याकडे हसून पाहील तर उत्तरादाखल न हसता किती काळ रहाल?! शेवटी हसू येणारच ओठांवर… आणि मग कळणार कि किती महिन्यांत…वर्षांत आपण हसलेलो नाही…. त्या वातावरणाचा अईवर औषधासारखाच परिणाम झाला. ती हसायला शिकली. किती वर्षांनी मी तिला घरात गुणगुणताना ऐकले!

हॉस्पिटलचं जग सगळं विचित्र असतं. तिथे जन्म आणि मृत्यू हातांत हात घलून वावरतात. आनंद, दु:ख सगळं अधिक ठळक, जिवंत जाणवतं. अन तरीही मनाची संवेदना सतत वाढतच राहते, अधिकाधिक भावना सामावून घेत रहाते… इथे प्रत्येकाची आयुष्य एकमेकांना छेद देऊन तरीही वहात राहतात आपापल्या दिशांना….

किमोथेरपीसाठी जहांगीरच्या नियमित फेर्‍या होत होत्या. ते जणू सेकंड होम झालं होतं. हॉस्पिटलच्या आवारातल्या दोराबजीकडला चहा आईला आवडत असे! किमोची भरपाई म्हणून असले छोटे छोटे आनंद आम्हीच शोधून काढत असू. माझ्या हट्टी सकारात्मकतेचा परिणाम तिच्या निराशावादापेक्षा अधिक होता.

त्या काळात तर आम्हा दोघींना एकत्र बोलायला बांधून घातल्यासारखा वेळ असे. तासचे तास तिच्या शिरेतून किमोची औषधे थेंब थेंब जात असत. अन आम्ही दोघी हळू आवाजात खुसूखुसू करीत असू. कधीतरी त्या औषधांनी तिला झोप लागे अन माझे डोळे त्या विचित्र थेंबावर रोखलेले रहात. तासंतास मी त्या ठिबकणार्‍या काळाकडे पहात असे. जणू त्या थेंबातून आईच्या शरीरात एकेका दिवसाचं आयुष्य रिचवलं जात होतं… पाहता पाहता एक तंद्री लागत असे….ते थेंब…तो प्रत्येक क्षण मी होते… हजार मृत्यू….हजार जन्म दर क्षणामागून जात….तरीही काळ त्या सगळ्याला लपेटून पुढे वहात राही. किती थेंब मोजले तरी त्या काळाचा थांग लागत नसे. ना सुरुवात ना अंत…थेंब थेंब….चालूच. काळ वहात होता कि स्थिर होता कोण जाणे….

किमोचा त्रास तिच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी होता. उष्णता होत असे, रोज शहाळ्याचं पाणी, धणेजिर्‍याचं पाणी चालू असे. हिमोग्लोबिन कमी होई. त्यासाठी रोज बीट खात असे. एके दिवशी केस भसाभस गळायला लागले. खूप रडली होती…. स्कार्फ काढायला तयार होईना. पण ते अर्धवट गळणारे केस कापून टाकणं गरजेचं होतं. माझ्या याच दोन हातांनी कात्री घेऊन आईचे मऊसूत केस कापले तेव्हा मला लहानपणीची केस कापून दुरून चालत आलेली आई आठवली… त्या लहानपणीच्या धक्क्यापेक्षा किती वेगळी होती आजची परिस्थिती!

ते काही महिने आईला कायम स्कार्फमधेच पाहिलंय. पण कॅन्सरची मात्र चांगलीच हटाई झाली होती. फुफ्फुसं पुन्हा श्वास घेऊ लागली होती. छातीवरच्या जखमा कधीच सुट्टीवर गेल्या होत्या. किमो सुरू केल्यावर एका महिन्यात आई रात्री नीट आडवं पडून झोपू शकली. दोन वर्षांनी तिला गाढ झोपताना पहात होते…..

रोज रात्री काशाच्या वाटीवर तूप घेऊन तिचे तळपाय चोळत असे मी, गप्पा अखंड चालत त्याबरोबर! किती बोलत असू आम्ही दोघी, तरीही रोज काहीतरी बोलायचे असे! वेळ कमी आहे.. त्यात किती बोलून घेता येईल ते घ्या असे नियती म्हणत असेल, पण आम्हाला ते ऐकू येत नव्हते.

बोलणे बंद असले तरी एकत्र असण्याची वीज सळ्सळत असे दोघींमधे…. अमृताचे घोट असावे तशी नि:शब्द शांतता पीत असू आम्ही…. दोघींमधे एक प्रकारचा सौम्य, सहनशील अन तरीही आयुष्याबद्दल आग्रही उत्साह येत होता. किमोच्या एकेका थेंबासोबत काळ सैलावत होता.

सगळ्या टेस्टस परत एकदा झाल्या… पप्पू पास झाला होता! कॅन्सर ऑलमायटी तडीपार झाले होते….पण सध्यापुरते. इथून पुढेही नियमित टेस्ट्स करत रहायचं बजावलं होतं. पण रोजच्या जहांगीरच्या फेर्‍या थांबल्या. केवढी खूश झाली होती! हळूहळू केस पूर्ववत होऊ लागले. हिमोग्लोबिन कधीच काळजी करण्याइतकं खालावलं नव्हतं तिचं…. आणि इतर व्यवहार सुरू करण्याची ताकद आली होती.

 

५.     सेकंड इनिंग…

कॅन्सरच्या महाराक्षसाला सर केल्याचा आनंद आणि आत्मविश्वास आईच्या नुसत्या असण्यातून व्यक्त होत असे. केमोथेरपीला घाबरणार्‍या नवख्या रुग्णांना ती डोळे मोठ्ठे करकरून सांगत असे कि घाबरण्यासारखे काहीच नाही. दिवसेंदिवस वैद्यकीय तंत्रज्ञान इतके सुधारते आहे कि काही वर्षांपूर्वीच्या केमोचा त्रास आता अर्ध्याहूनही कमी झाला आहे.

रोजचे नियमित आयुष्य सुरळित झाल्यावर नव्या अव्हानांची तिला निकड वाटू लागली. आता तर हे बोनस मिळालेलं आयुष्य आहे, याचा तर खूप सदुपयोग केला पाहिजे असा काहितरी ग्रह तिने करून घेतला होता! प्रयास संस्थेच्या संगणक विभागाची घडी बसवून द्यायची मोहीम सुरू झाली. प्रयासच्याच काळात एक नवीन संधी पुढे आली. अमेरिकेत फेमिनिझमचा अभ्यास करणार्‍या मुलींचा एक गट भारतात अभ्यासासाठी आला होता. त्यांचा सगळा अभ्यासदौरा प्रयासने करवला होता. या मुलींबरोबर मदत म्हणून आईला राहता येईल का असा प्रस्ताव आला. ती दगदग तिच्याने सोसली नसती पण मी त्या मुलींबरोबर महिनाभर राहिले. त्यांच्याबरोबर फिरताना आपल्याच देशाची, इथल्या समाजव्यवस्थेची नवीनच ओळख होत गेली. तो एक महिना माझ्या विचाराच्या कक्षा अचानक रुंदावत गेला. या कामाच्या मिळालेल्या मोबदल्यात भर घालून बाबाने माझ्यासाठी हा लॅपटॉप घेतला तेव्हा ’अनूचा लॅपटॉप’ म्हणत माझ्यापेक्षा आईच अधिक नाचली होती!

प्रयासचे सगळे संगणक सुरळीत होताहोताच आईला हेमलकशाच्या लोकबिरादरी प्रकल्पाचे वेध लागत होते.दोन दोन बस बदलून दोन दिवसांचा विचित्र प्रवास करून हेमलकशाच्या फेर्‍या सुरू झाल्या. एकदा तिथे गेल्यावर महिनाभर तरी जात असे तिचा. मग रोज फोनवर तासंतास वृत्तांत देत असू दोघी. तिच्याशिवाय घर सुरळीत चालायची सवय होती मला अन बाबाला. पण तरी कुठेतरी काहीतरी चुकत असे. या काळात माझ्या अभ्यासाच्या बाबतीत खूप हलगर्जीपणा सुरू झाला. आर्किटेक्चरचं चवथं वर्ष चालू होतं अन माझं मन त्यातल्या तडजोडींना वैतागत होतं. माझा मूळचा पिंड फारसा स्पर्धात्मक नाही. अन ही लादलेली शैक्षणिक स्पर्धा मला हळूहळू झुगारून द्यावीशी वाटत होती. मुलीमुलींच्या कॉलेजातल्या हिणकस राजकारणाचाही कंटाळा आला होता. या काळात मला खूप जुन्या प्रश्नांची उत्तरं मिळू लागली होती. आजूबाजूच्या लोकांपेक्षा असलेलं माझं वेगळेपण हळूहळू सहज घ्यायला शिकत होते. इतर वेगळ्या लोकांशी संपर्क येत होता. माणसाची प्रगती जशी जशी खोल आत होऊ लागते तसा एक मधला काळ बाह्य प्रगतीकडे दुर्लक्ष करण्याचा येऊन जातो. हा काळ तसाच होता. तासंतास मी एका जागी बसून विचार करायला, वाचायला, लिहायला तयार होते. पण कॉलेज अन तिथले हलकेफुलके उथळ वातावरण मात्र मला गुदमरून टाकत असे.

आईला काळजी वाटत होती…माझे शिक्षणच सुटते कि काय अशी भिती तिला वाटत होती. मला वाटत नाही त्याने काही फरक पडला असता माझ्यात. प्रगतीची दिशा या काळात बदलत होती. हे चांगले बदल होते, पण खूप मानसिक, वैचारिक कष्ट होते त्यात. जगाशी खूप घर्षण होण्याचा तो काळ होता, त्यातून तावून सुलाखून निघाले तेव्हा बदक-पिलाच्या राजहंस होण्यातली नशा कळात गेली मला.

त्यानंतर मात्र स्वत:ची आंतरिक प्रगती आणि शैक्षणिक जबाबदारी एकाच वेळी हाताळता येईल असा विश्वास वाटू लागला. मी आर्किटेक्चर सोडणार नाही. वेळ गेला तर जाऊदे, पण मी हे पूर्ण करेन, अशी घोषणा मी घरात करून टाकली अन आईबाबांनी हुश्श म्हटलं!

तोवर हेमलकशातलं काम आईने आटोपतं घेतलं होतं. तिथले मेडिकल रेकॉर्ड संगणकीकृत झाले होते. डेटा-एंट्रीसाठी स्थानिक मुलं मुली प्रशिक्षण घेऊन तयार होती. लोकबिरादरीच्या शाळेत संगणक वर्ग सुरू झाले होते. मायबोलीवर आईने तिच्या हेमलकशाच्या गोष्टी लिहिल्या. त्यावर प्रतिसाद म्हणून कितीतरी मदत आली, जुने संगणक, पैसे, शैक्षणिक सीडीज वगैरे.

एका द्रष्ट्या व्यक्तीभोवती उभं राहिलेलं कुठलंही सामाजिक कार्य एकखांबी तंबूसारखं तकलादू असतं हे तिला पक्कं समजलं होतं त्यामुळे ती प्रत्येक काम सुरू करून स्वावलंबी ’सिस्टीम’ करून देत होती. एकदा ते काम एक चांगला प्रघात बनून स्वत:चा जोर पकडू लगलं कि ते लोकांच्या हाती देऊन ती पुढे चालू पडत असे. पुन्हा नवं काम…नवी माणसं… नव्या गरजा तिला दिसू लागत….

तिचा स्वावलंबी पिंड तिच्या जगण्यात….कामात….बोलण्यात तिच्या नकळत अभिव्यक्त होत असे. सरधोपट विचाराला छेद देत थेट मुद्द्याला भिडण्याचा स्पष्ट्पणा तिच्यात होता. तसाच स्वभाव ती कामातही ओतत गेली. प्रत्येक कामात तिच्या मदतीची गरज कमी कमी होत जावी अन मग नव्या कामाला वेळ देता यावा असा तिचा प्रयत्न असे. तिच्या कामाच्या या उडत्या पद्धतीला मी ’social freelancing’ म्हणत असे. She was highly professional at social work.

खूप resourceful होती. लोकांच्या ज्या गरजा तिला पूर्ण करणे शक्य नसे त्यासाठी चपखल योग्य माणसे गाठून देण्यात तिचा हातखंडा होता. ती सगळ्या प्रकारच्या लोकांना ओळखत होती…अन सगळ्या प्रकारचे लोक तिला आपल्यातील एक मानत असत. कामवाल्या बायकांपासून पुण्यातल्या विद्वान बुजुर्गांपर्यत अन शाळकरी पोरांपासून ते यशस्वी व्यावसायिकांपर्यंत सगळे “तिचे” लोक होते.

6.    पुनरागमन

ही सेकंड इनिंग तिच्या आयुष्यातलं खूप मौल्यवान पर्व होतं…. सगळ्या अनुभवांचं एकवटून येणं तेव्हा होत होतं. त्याची एक परिपक्व शांतता तिच्या अस्तित्त्वात उमटताना मी पहात होते. अधिकाधिक उदार, सहनशील आणि दयापूर्ण होत असताना तिच्यातलं निरागस बाल्य कधीच जुनाट होत नसे. माझ्या अकाली आलेल्या प्रौढत्त्वाला तिच्या या बाल्याचं फार कुतुहल होतं!

या काळात आई खूपच व्यस्त रहात असे… मित्र- मैत्रिणींचा गोतावळा, विद्यार्थी, शिक्षक, पालक, शेजारी, माझे मित्र मैत्रिणी अन संपूर्ण अनोळखी लोक सुद्धा! मलाही आताशा तिने जरा सुट्टे व्हायची ताकीद दिली होती. खूपदा ती म्हणत असे, “ सतत माझ्यासोबत राहिल्यने तुला जवळचे मित्र मैत्रिणी नाहीत. जरा बाहेर जा, काहीतरी कर… नवीन माणसं शोध….”

सख्ख्याहून सख्ख्या मैत्रिणीसारखी ती असताना मला कधी गरजच पडली नव्हती अन्य लोकांची…. तिच्या कोषातल्या आयुष्यातच मला राजकन्येसारखे रहायची सवय झाली होती. पण वाघिणीच्या बछड्यांसारखे फटकारून तिने मला बाहेरच्या जगात ढकलण्याचा खूप प्रयत्न केला… पण मी महाहट्टी! जोपर्यंत मला माझ्या मनासारखे मैत्र मिळले नाहीत तोवर मी बाहेरच्या जगात मिसळण्यासाठी काडीचाही प्रयत्न केला नाही.

प्रत्येक गोष्टीचा  योग्य काळ अन स्थळ असते असा माझा निवांत विश्वास होता. तोवर मी अमूक केले पाहिजे म्हणून मी मुळीच करणार नव्हते. यथावकाश मला माझ्याजोगते लोक भेटत गेले… बाहेर वावरताना येणारा “अनिवासी”पणा देखिल कमी होत गेला… माझ्या विस्तारत्या जगातही ती लहान मुलीसारखी मिसळत गेली!

कॅन्सरचा महाराक्षस दडी मारून बसला होता. पण तो आहे कुठेतरी याची जाणीव होती. कधी डोके वर काढेल त्याचा नेम नव्हता, पण एकदा त्याच्याशी दोन हात केल्याने पुन्हा तिची लढाऊ वृत्ती जागली होती…. आणि तो आलाच परत. एक बराच काळ गोळ्या घेऊन त्याला थोपवण्यात येत होतं. या सगळ्याच उपचारांचे खर्च अफाट आसतात. तिला सगळे सोडून औषधापायी जाणार्‍या पैशांचे खुटखुटत राही. त्यातल्यात्यात कमी खर्चात कुठे औषधे मिळतील याचाच ती शोध घेत राही. अन यावरून मी तिच्यावर चिडचिड करीत राही….

आम्ही दोघी आदर्श मायलेकी अजिबात नाही. चिडचिड, वादावाद, टोकाचे हट्ट हा देखिल आमच्यातला समान धागाच असावा… अजूनही जेव्हा मी स्वत:ला भावनांच्या कडेलोटात पहाते तेव्हा तिचाच भास होतो…. तिच्या काही सद्‍गुण अन काही दुर्गुणांच्या पुरचुंड्या विनाकारण वागवते आहे मी…. कदाचित चूक आहे…. किंवा कदाचित आठवणीची साठवण आहे…

 

७. शेवटाची सुरुवात.

गोळ्यांचे डोस कमी पडू लागले हळूहळू. अन एका नियमित तपासणीत कॅन्सरचा नवा चेहरा समोर आला. यावेळी बेट्याने आईच्या कण्यावरच आघात केला होता. त्या रिपोर्टचा एकेक शब्द पोटात गोळा आणत होता. तिच्या मनात तर काय उलघाल झाली होती त्याचा मला पूर्ण आवाकाच येऊ शकत नाही.

पुन्हा एकदा केमोच्या फेर्‍या सुरू करणार हे ऐकताच डॉक्टरसमोर तिचा बांध फ़ुटला…. “तुम्ही प्लीज खूप खर्चिक काही करायला सांगू नका हो!” आपल्या जिवाशी गाठ असतानाही तिला खर्चाचा जाच कसा होऊ शकतो हे कोडं मला आजतागायत सुटलं नाही….

इथून पुढचा भाग जागवणे अन लिहिणे फार कठिण आहे माझ्यासाठी. पण या लिहिण्यातूनच जुने बोजे हलके होऊ शकतील. कठिण असले तरीही मी हे लिहिलेच पाहिजे….

तर, तिने नाना खटपटी करून सह्याद्री हॉस्पिटल मधे त्यातल्यात्यात कमी खर्चात केमो होऊ शकते असा शोध लावला अन तिथेच उपचार घेण्याचा हट्ट नेहमीप्रमाणे पुरवून घेतला. अकुशल, उद्दाम अन रुग्णांच्या तुलनेनं अपुरे कर्मचारी, अव्यवस्थित व्यवस्थापन अन रुग्णांचा कणा फेर्‍यांपोटीच मोडणारी सगळी व्यवस्था याच्याशी कधी तडजोड करीत, कधी भांडण करीत आईच्या सह्र्याद्री वार्‍या सुरु झाल्या. जहांगीरच्या संवेदनशील, हसर्‍या आशावादी चित्रापेक्षा हे वातावरण आतिशय खचवणारं होतं. पण मी चिडचिड करताच तिने मलाही सोबत येण्याची मनाई करण्यास सुरुवात केली.

इथल्या पद्धतीप्रमाणे डेकेअर वॉर्डमधे केवळ रुग्ण बसू शकतो. सोबत आलेल्या नातलगाने त्या मजल्यावरच्या वेटिंग लाऊंज मधे अवघडून बसावे. तिथल्या उद्दाम परिचारिकांसोबत तिला आत एकटं सोडून तासंतास बाहेर बसणे तापदायक होत असे. मग ती मला घरी हाकलत असे. किमो संपल्यावर तिचा फोन आला कि बिलांचे कागद नाचवून, पैसे भरून तिला घेऊन यायला मी किंवा बाबा जात असू.

यावेळी आतून कितीही थकली तरी ती कुणाला दाद देत नव्हती. माझ्या इंटर्नशिपच्या धांदलीत मी पुरती गुरफटले होते. तिने कितीही दूर केले तरीही पुन्हा पुन्हा तिच्या विश्वात घुसण्याचा काळ मागे पडला होता. जोवर तिचे ठीक चालल्यासारखे दिसते तोवर मधे न पडणेच तेव्हा मला शक्य होते. कधी तिच्या उपचारात दखल द्यावी अन कधी गप्प बसावे हा फार नाजूक संतुलनाचा भाग झाला. ती म्हणेल त्यावर विश्वास ठेवून शांत राहणे किती धोकादायक ठरू शकते याचा अंदाज मला अन बाबाला व्यवस्थित होता. दुरून का होईना पण आम्हा दोघांची बारीक नजर असे तिच्यावर, त्याचाही राग येत असे तिला! अधून मधून बाबाला प्रवेश मिळत असे पण मला मात्र अगदीच अडल्याशिवाय ती येऊ देत नसे. स्वत:च्या सावलीपासून मुलीला दूर ठेवण्याचा असा प्रयत्न फक्त आई करू शकते…. पण या प्रयत्नाचा फोलपणा तिला इतक्यात कळणार नव्हता. तिच्या बर्‍यावाईटाशी मी नाळेने बांधलेली आहे. तिने दूर केल्याने मी दूर नाही होत. अन होण्याचे गरजच काय? असा दुरावा मला तिच्याआजूबाजूच्या वाईट गोष्टींपासून वाचवू शकत नाही. ते सगळे तिने माझ्या खोल आतमधे पेरले आहे. माझ्या घडणीचा हिस्सा आहे ती. मीच तिची सावली असताना, तिच्यावर येणार्‍या बर्‍यावाईटापासून मी अलिप्त कशी राहीन?

अशा तिच्या दूर लोटण्याचाही मी रागराग करत असे…. माझ्या असल्या रोषाला सामोरं जाणं किती कठीण असेल तिच्यासाठी! पण तिच्या रुक्ष वास्तववादाचाच भावनिकतेवर खूप जास्त अंकुश होता.

पाहता पाहता तिची तब्येत ढासळतच राहिली. माझ्या आंधळ्या अशावादालाही पोटात गोळा येत असे मधूनच…. हातात आहे ते उपचार चालू होते पण आताशा एक हतबलता आली होती माझ्यातच…. पुढचे काहीच दिसत नव्हते. केमोचे डोस ढकलत राहणे यापलीकडे काय करावे? एकच तर शस्त्र ठाऊक आहे आपल्याला…..

पण या राक्षसाचे चेहरे दरवेळी किती वेगळे….एकाहून एक हिंस्त्र अन जीवघेणे… कदाचित एकाच शस्त्राने लढत राहणे चुकले का आमचे?

अन्न पोटात टिकत नव्हते. उलट्यांनी हैराण झाली होती. पण हा किमोचाच दुष्परिणाम आहे. कमी होईल हळू हळू अशी मीच समजूत घालत असे तिची. त्या उलट्यांचा दुसरा काही अर्थ तेव्हा कळलाच नाही मला. सह्याद्रीच्या डॉक्टरांनाही तिने कैक वेळा सांगितले. पण फोनवर तेच तेच ऍन्टासिड घ्यायचा सल्ला देऊन ती मोकळी होत असे. उलट्या थांबेनात. अशक्तपणाने पलंगाला खिळली होती. उठून उलटी करण्याचेही त्राण उरत नसे तिच्यात….

हट्टाने रागावून दिला तर छोटी वाटी भात खात असे. अन्यथा त्या दहा पंधरा दिवसात तिने अन्नाचा कण खाल्ला नव्हता.

 

८. घराबाहेर…

तिचे अन्नपाणी सोडणे हा काळजीचाच विषय होऊन बसला. शेवटी आमच्या वैद्यांनी तिला थोडे दिवस हवापालट म्हणून पुण्याबाहेर राहून येण्याचे सुचवले. रोज त्यच घरात त्याच पलंगावर पडून राहून अजून आजारी वाटते. अन्न जात नाही. म्हणून आईला घेऊन बाबा तळेगावला मामाच्या घरी गेला. २७जानेवारी २०११ ला तिने घर सोडले…. कायमचे.

तीन दिवसात तिच्या प्रकृतीत अजूनच बिघाड होत गेला. तळेगावातच एका नर्सिंग होममधे तिला ठेवले. पुन्हा सगळ्या टेस्ट्स सुरू झाल्या. इकडे पुण्यात माझे शेवटच्या वर्षाचे प्रोजेक्ट अगदी हातघाईला आलेले. रोज फोनवर बाबा मला घरीच थांबायला सांगत असे. तो आठवडा कसातरी ढकलताच पुढच्या सोमवारी तिला पुण्यात आणण्याशिवाय पर्याय उरला नाही.

बाबा, आज्जी, मावशी, मामा सगळे तळेगावातून आईबरोबर आले…..ते सरळ जहांगीर मधे. त्यांची वाट पहात जहांगीरच्या लॉबीमधे घालवलेला एक तास…. तो फक्त सुरुवात होता…..

गाडीचं दार उघडलं…..आणि मी फक्त भितीचा गोळा पोटात गिळला…. तिला उठताही येत नव्हतं. स्ट्रेचरवरून इमर्जन्सी रूममधे नेतानाच तिचा चेहरा वेदनांनी पिळवटलेला होता…..  श्वास थरथरता…अन डोळे भितीने विस्फारलेले… त्या डोळ्यांना ते दिसत होते जे मी अद्याप पाहिले नाही.

तिथून पुढे एक क्षणही मी तिचा हात सोडायला तयार नव्हते. जहांगीरचे संवेदनशील लोक खरोखर समंजस आहेत. अशा अवस्थेत रुग्णाच नव्हे तर नातेवाईक देखिल विचित्र वागतात…. पण त्यांनी मला एकदाही तिच्यापासून दूर केले नाही. त्यांच्या विश्वासानेही किती ताकद येते!

आईला आत घेताच तिच्या वेदना कमी करण्यापुरते उपचार सुरू झाले होते. मावशी अन मी आईजवळ. दादा, काका अन बाबा सगळी धावपळ करते होते. आजीला तर आईकडे पहावतही नसावे. बाबाने तिला मामासोबत थोडे बाहेरच बसवले. आईची medical history प्रत्येक बारकाव्यानिशी तपासून झाली…. डॉक्टर शोना नाग अन त्यांची cancer team फोनवरून मदतीला होतीच.

वेदनाशामकांचा थोडा परिणाम होताच तिला semi privet ward मधे हलवले. सगळ्या परिचारिका, डॉक्टर्स इतके धीराचे कि त्यांच्या हसर्‍या चेहर्‍याकडे पहात दुखणेही थोडे उजळावे! आईला तिच्या बेडवर हलवले अन थोडी स्थिरावले मीही. पुन्हा युद्धाच्या तयारीत आले. आता हेच घर अन हीच आमची युद्धभूमी होती…. ज्याला घराला इतके दिवस घर म्हणत आले ते असे सुटेल हे तेव्हादेखिल वाटत नव्हते. बस, थोडे दिवस, मग पुन्हा पसार्‍याने भरलेल्या, मांजरी पायात घोटाळणार्‍या “आपल्या” घरी आईला घेऊन जायचेच आहे असा बावळट विश्वास आमच्यात होता….

वेदनाशामकांचा उपयोग फार काळ रहात नसे. ग्लानी अन वेदनेच्या लाटा दर पंधरा वीस मिनिटांनी आदळत रहात. ग्लानीचा काळ शांत जाताच तिचा श्वास फुलत जात असे….दुखत तर इतके असावे पण तिच्यात तळमळून हालचाल करायची देखिल ताकद उरत नसे. दुखणे अगदी टिपेला जाता, तिचा श्वास थांबत असे, डोळे शून्यात लागत….

मी तिला हलवून हलवून सांगत असे, श्वास घेत रहा…. आखडलेले हात सैल करून देत असे….दुखून भणाणणारे डोके चेपत असे… त्या वॉर्डमधली पहिलीच रात्र हळूहळू संपत होती. त्यातला फक्त एक दीड तास, तिला झोप मिळाली असेल… मला तर झोपेची भीती बसलेली… न जाणो माझा डोळा लागेल अन् तेव्हढ्यात तिला काही झाले तर…

डोळ्यांसमोर पुस्तक घेऊन दर दोन मिनिटांनी तिच्याकडे लक्ष ठेवून बसायची सवयच झाली हळूहळू. पुढचा दीड महिना ही सवय अधिकाधिक पक्की होत गेली….

पहाट होता होता तिला जाग आली….तेव्हाही उजाडलं नव्हतं. चेहऱ्यावर किंचित हुशारी आली होती हे पाहून थोडी सैलावले मीही… तिला bed pan नको होता. toilet पर्यंत घेऊन चल म्हणाली. मला किंचित भीती वाटत होती, पण आईचा आत्मविश्वास वाढणं खूप जरूरी होतं तिच्या बरं होण्यासाठी.

स्वत:च्या पायाने उठून जाऊन येण्याने ते साध्य होईल असा विचार करून मी तिला पलंगावरून हात देऊन उचलले. तिचे सगळे वजन मला पेलवणार नव्हते. पण जमली तशी लंगडी शर्यत WC पर्यंत पोहोचली. तिला बसती करून मी सरळ होताच तिने मला toilet च्या दाराबाहेर थांबण्यास फर्मावले. आता वाद घालण्याची परिस्थिती नव्हती. मी गपचूप बाहेर थांबले, कानोसा घेत, आत पाळायच्या बेतात. अन् तिच्या धडपडण्याचा आवाज येताच आत घुसले अन् पहाते तर स्वावलंबनवीर स्वत:चा उठून बेसिनकडे जाणार होत्या… त्या गारढोण पण सुदैवाने कोरड्या फरशीवरून तिला उचलताना दोन क्षण वाटले, की हे जमणारच नाही मला…. धीर करून तिच्या कमरेभोवती हात घालून हळूहळू वर उचलले. toilet seat वर बसताच तिने माझ्या डोळ्यातली भीती पाहिली… अन् मी तिच्या डोळ्यात विजयाचा आनंद पहिला!

खरंतर तिच्या झुंझारपणापुढे हात जोडावेसे वाटत होते; पण मी हात सोडले असते तर आम्हाला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागली असती! त्या दोन क्षणांच्या देवघेवीत आम्हा दोघींचे एक गुपित ओवले गेले. हे विचित्र साहस मी कधी दुसऱ्या कुणाशी बोलले नाही. आई परत पलंगावर स्थानापन्न होताच मी नि:श्वास टाकला…. ती मात्र किंचित खूश होती स्वत:वर!

थोडीथोडी सकाळ होत होती… एखादा आशावादी किरण बाहेरच्या गर्द हिरव्या पानाच्या नक्षीतून अलगद तिच्या अंथरुणात उतरत होता….

 ९. दुसरे महायुद्ध…

सकाळच्या डॉक्टरांच्या फेऱ्या सुरू झाल्या. एक गोड हसरी dietician आली. तिने आईला चांगला प्रेमळ दम भरला. साधे जेवण जात नसल्यास काय काय पर्याय देता येतील हे ती सांगत गेली. मग आमचा नवा आहार ठरवला गेला. ब्रेड टोस्ट, चहा चालत असे. फोडणीच्या वासाचे कुठलेही पदार्थ नकोसे होत. custard वर मर्जी होती… पण भाजीच्या वासाने उमासे येत… सुका भात, दहीभात दोन चार चमचे गेला तर शर्थ…. आत्याच्या हातचा डबा आला तर मात्र उत्साहाने विचारी काय आहे ते! मात्र कधी सफरचंदाच्या एक दोन छोट्या फोडीवर भागत असे. मग एकदा नन्नाचा पाढा सुरू झाला की झाला. आई घट्ट ओठ मिटून घेई. अजून आग्रह केला तर सोबत डोळे देखील घट्ट बंद!

इतर रंजक प्रकार चालूच असत… वेगवेगळ्या नर्सबाई, सिस्टर्स, डॉक्टरांच्या फेऱ्या… किती डॉक्टर येऊन जात! neurologist, onchologist, physician, dietician हे तर झालेच. शिवाय एक मानसोपचारतज्ज्ञ बाई देखील विचारपूस करून एक हसरा संवाद ठोकून गेल्या.

सगळ्यांच्या प्रश्नावलीना पुरे पडता पडताच आजार बरा होतो कि काय कोण जाणे पण तिच्या वेदनांच्या लाटा अन् श्वास थांबणे कमी होत गेले. असे वाटू लागले कि युद्ध जिंकणे शक्य आहे.

अनेक तज्ञांचे सल्ले… असंख्य चर्चासत्र होऊन मग रेडिएशन सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यातल्या धोक्यांची कल्पना होती. पण दुसरा काय मार्ग होता?

तिच्याशी खूप बोलायचे होते…. पण बोलणे तिला खूप थकवत असे. मी एक लहानसे पत्र लिहून तिच्या शेजारी ठेवले. त्यात पूर्वी तिने कॅन्सरशी कसे दोन हात केलेत त्याच्या आठवणी होत्या… हे युद्ध पुन्हा जिंकण्याचा विश्वास होता…अन थोडा धीर होता.

ते पत्र तिने वाचले अन लगोलग फोन केला मला. खूप रडत होती…. काहीबाही आशीर्वाद देत होती…. मी मात्र सैनिक मूडमधे असल्याने तिला फक्त शांत केलं. दुसरं मी बोलणार तरी काय होते.

दुसऱ्या दिवशी रेडिशन रूममधे जाताना तिने हसून मला हात केला. केवढी आशा होती तिला. अन माझ्या लढण्यावर विश्वास होता! आमचे एक तालबद्ध संचलन चालू झाले. दुपार ते रात्र एकाने आईजवळ थांबावे. तोवर एकाने घरी आराम करावा, मांजराना पाहावे, हव्या नको त्या वस्तू घेऊन रात्र पाळीसाठी हॉस्पिटलमधे यावे. रात्रभराचा पहारा झाला कि सकाळी तिचा नाश्ता-जेवण होईतो परत पुढची पाळी सुरू. संध्याकाळी रेडिएशनसाठी आईला घेऊन जाणे हा एक मोठा कार्यक्रम होता, तेव्हा मी अन बाबा दोघेही बरोबर थांबणे आवश्यक होते. त्यानंतर एकजण घरी जात असे.

रेडिएशन सुरू होताच तिची प्रकृती अधिक खालावत असल्यासारखे वाटत होते. बोलणे कमी…झोप अधिक… हे लक्षण चांगले कि वाईट हेच समजत नसे. भरवले ते खात असे. अन तशीच झोपत असे. मग पुन्हा धाप लागणे सुरू झाले.

१०. युद्धांत

त्या रात्री तिचा श्वास खूप उथळ अन भराभत होत होता. रात्रीचे डॉक्टर येऊन पाहून गेले. सगळे vital counts ठीक होते. ICU मधे नेण्याची गरज नाही असं म्हणाले. तोंडाने श्वास घेऊन तिचा घसा सतात कोरडा पडत होता. दर १५-२० मिनिटानी तिच्या तोंडात चमचाभर पाणी देत होते. उशीर रात्री बाबा घरी गेला. मी मात्र रात्रभर शेजारी बसून होते. तिच्या गतीने श्वास घेत होते…. तिच्या लयीत सोडत होते…. जणू मी श्वास घेत राहिले तर तीही घेत राहणार होती….

सकाळी तिला पुसून घ्यायला अन चादरी बदलायला नर्स आली. आईला बसते करून पुसले, कपडे चढवले अन पुन्हा तिचे डोके उशीवर ठेवायला गेले तेव्हा तिचा श्वास थांबला होता.  मी तिला सांगत होते, “श्वास घेत रहा” अन तिने मान डोलावली माझ्याकडे पाहात. तिला तेव्हाही विश्वास वाटत होता, मी सांगतेय तसा श्वास घ्यायचा ती प्रयत्न करणार होती……
तोवर मी जोरात ओरडून त्या नर्सला हाक मारली. अलार्म… हाका…. डॉक्टर आले…. व्हेन्टिलेटर्स, इमर्जन्सीवाले….

कुणाच्यातरी लक्षात आले कि मी अजून तिच्या शेजारीच आहे. यावेळी मात्र मला बाहेर काढले. आत तिचा श्वास परत सुरू करण्याचे प्रयत्न चालू होते….. पंधरा मिनिटं प्रयत्न करून त्यांनी बाहेर येऊन मला “घरच्यांना बोलाव. आता अजून प्रयत्न करण्यात अर्थ नाही” असं सांगितलं. मी पुन्हा पुन्हा विनवत होते…एकदा अजून प्रयत्न करा म्हणात होते…. डॉकटर शोना नागशी फोनवर बोलले. त्या जेव्हा म्हणाल्या, “तिला खूप त्रास होत होता. Let her go.” तेव्हा मी अचानक शांत झाले. फोन ठेवला अन फक्त बसून राहिले. पुढचं सगळं एका बधिर आठवणीसारखं आहे…. माझी आत्या आधी पोहोचली…. मग बाबा…. बाकीचे लोक…. खूप गर्दी होती.

मावशी अन माझा आतेभाऊ, दादा मला घरी घेऊन आले. मी रडत नव्हते, खूप शांत होते. घरी आल्याआल्या मी आधी गीता गीताई काढली. असलं काहीतरी मला कुठून सुचलं कोण जाणे. “ वासांसि जीर्णानि यथा विहाय….” दोन चारदा मनातच जोरजोरात वाचला तो श्लोक. मग बाकीच्या सोपस्कारात टिकून राहणे जमून गेले.

 

११. वर्तुळ

लोक येत होते… भेटत होते. मला रडवू पहात होते. काही लोक समजूतदार… काही लोक काहीबाही…. पण मला राग येत नव्हता. त्यांना मला फक्त सहानुभूति द्यावीशी वाटतेय इतकंच कळत होतं. त्याबद्दल राग कसा येईल?! मात्र आईचं संरक्षक कवच नाहिसं झाल्यावर लोक वेगळे वागतात हे लक्षात आलं.

चांगले लोक माझ्या अधिक जवळ आले… इतके जोडले गेले कि मला काही गमावल्याच्या दु:खाला कुरवाळता येईना! वाईट लोक चाचपून पाहू लागले, माझ्यात कुठे दुर्बलता दिसते का, असा उघड शोध घेऊ लागले! त्यांना माझ्या दु:खावर मात करून शांत राहण्यात योग्य ते उत्तर मिळाले बहुदा. माझा शांत चेहरा पहून बाबालाही खूप धीर आला असावा. त्याच्याकडे पाहून मला अधार वाटण्यापेक्षा अधिक जबाबदार वाटू लागले.

तो कुटुंबप्रमुख वगैरे असला तरी भयंकर हळवा, भावनाप्रधान आहे. मी थोडी आईसारखी रुक्ष आहे…. किंवा होऊ शकते! या जबाबदार वाटण्यात खूप ताकद असते… सहन करण्याची ताकद. आईचं घर पुन्हा चालतं ठेवण्याची ताकद.

थोडे दिवस राहून नातेवाईक परत गेले. रिकामं घर छातीवरती जड ओझं होऊन रहात असे. पण विचार करायला वेळच कुठे होता. माझ्या शेवटच्या वर्षाचा thesis पूर्ण करायला माझ्याकडे फक्त १५ दिवस होते. माझ्या thesis guide, माझे शाळा गॅंगचे मित्र, त्यांच्या मैत्रिणी…सगळे मदतीला उभे होते.

Architecture चा गंध नसलेल्या माझ्या वेड्याबगड्या लोकांनी मला मदत केली…. हार मानू दिली नाही. रडत बसायला जागाच ठेवली नाही! सगळं पूर्ण करून जूरीला उभी राहिले तेव्हा मात्र भिती वाटली, आता मी कोसळू नये! मी काय उत्तरं दिली अन पास कशी काय झाले ते युनिव्हर्सिटी जाणे. असंही कुणालाच कधी ते कळत नाही!

पुन्हा कामाला लागले…. कॉलेजमधे जितकी आळशी वाटले होते त्यापेक्षा बरीच उपयुक्त आहे हा शोध लागला. माणसांच्या जगाशी अधिक जबाबदारीने…. अधिक धीराने सामोरी जायला लागले.

आई नसण्याची पोकळी कधीच भरून येत नाही. तिच्यासारखं टापटीप घर राखता येत नाही. तिच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण कराव्यात वगैरे असली काहीही काव्यमय स्वप्न मी पाहिली नाहीत. मात्र अजूनही तिचा दरारा आहे… तिचा सत्यनिष्ठ स्वभाव…. असामान्यतेची भूक अजून सापडते घरातल्या कोनाकोपऱ्यात. अजूनही स्वत:चाच विचार करताना दोन क्षण थबकते मी… तिचा त्रागा आठवून.

तिच्यानंतर आयुष्य खूप पुढे आलं आहे. पण नकळत माझ्यात अन बाबामधेही तिच्या पाऊलखुणा अस्पष्ट दिसत राहतात. तिचा चेहरा… तिचा स्पर्श एरव्ही धूसर होत गेला आहे. पण अगदी खोल…आतमध्ये असतो तो जिवंत. कधीतरी एकांतात उघडून पहायचा खजिना असावा तसा!

आईच्या सगळ्या उपदेशांना फाट्यावर मारून मी स्वार्थ निवडला…. अन त्याच्या पराकोटीला गेले…. पुण्यातल्या त्यातल्यात्यात अधिक पगार मिळवणाऱ्या ताज्या आर्किटेक्टपैकी एक झाले. पैसे अन माज कमावला थोडा वेळ… मात्र सहज जाताजाता इकॉलोजिकल सोसायटीत जायला लागले. गोळेसर महाजनसर आदिकाचं बोलणं ऐकायला लागले. या लोकांनी माझ्या स्वर्थाच्या सीमा फक्त थोड्या पुढे नेऊन ठेवल्या. अन सगळी उलथापलथ सुरू झाली. नोकरी सोडली… करियरवर विचित्र प्रयोग केले. सगळे नियम…सगळे ठरलेले सवयीचे रस्ते मोडून खाचखळग्यातून फिरणे सुरू केले.

बहिर्मुख होत जात असलेली मी अचानक माझ्याच मनातल्या एका विचित्र प्रवाहात पडले. खोल खोल आत जात असताना माझ्यात तिच्या प्रतिमा दिसत आहेत. अजूनही माझं नवं असं खूप काही आहे…. पण त्यासगळ्यात वेगळं काढता येणार नाही असं तिचं काहीतरी आहे.

आता या प्रवाहाने मला जीवनशैलीच्या बदलासमोर आणून उभं केलं आहे. एका वेगळ्या कारणाने… तिच्यापेक्षा कदाचित वेगळ्या विचाराने मी आज पुन्हा शहर सोडून गावाकडे चालले आहे….

माझा स्वार्थच मला पुन्हा त्याच वाटेला नेत आहे. तिला नाईलाजाने सामाजिक काम अर्धे टाकून पुण्यात यावे लागले. एका वेगळ्या तऱ्हेने ते वर्तुळ पूर्ण करण्याची मला संधी मिळते आहे. माझ्या कामाला अचानक दिशा मिळत जाते आहे.

एरव्ही नियती अन काव्यमय न्यायावर विश्वास नाही ठेवला तरी चालेल. माझ्याच निर्णयांनी मी इथे पोहोचले आहे, मला कुणी जादूने आणले नाही! पण परिस्थिती अन माझ्यातले बदल यातच आज मला एक नियतीचा धागा दिसतो आहे…. अतिशय तलम…. दिसेल न दिसेल असा. मला स्वातंत्र्य आहे इथून मागे फिरण्याचे, सामान्य आयुष्य निवडण्याचे….. किंवा माझ्या स्वार्थातून उमलत गेलेल्या अजब विचरसरणीचा पाठपुरावा करत अजून पुढचा शोध घेण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आहे. मात्र आता मला हे पक्के कळले आहे कि मी रोजच्या शहरी सामान्य आयुष्यात परत जाऊ शकत नाही. तिला पुण्यात राहण्याचा जसा त्रास झाला, तसाच होतो आता मला. इथे जीव घुसमटतो माझा.

आईकडे पुण्यात राहण्यासाठी बाबाची सोबत…लग्न, परिवार, मी… अशी अनेक कारणं होती…. एक दिलासा होता. मला मात्र या शहराशी बांधून घालणारं काही एक नाही आहे. ती माझ्यासाठी जे स्वातंत्र्य अपेक्षून होती ते खरोखर आज आहे मला!

आता ही तिची अचाट इच्छाशक्ती आहे कि आमच्यातले जनुकीय साधर्म्य कोण जाणे… पण असे वाटते आहे जणू काळाचे एक भलेमोठे पान उलटले जात आहे. एका मोठ्या नवीन पानाच्या सुरुवतीला मी उभी आहे. काहीतरी नवीन… काहीतरी उपयोगी असं लिहिण्याची…..जबाबदारी माझ्यावर अजिबात नाही….. ती माझी इच्छा आहे…. माझा मनापासून घेतलेला निर्णय आहे. आता पुढे या पानावर मी काय खरोखर लिहिते ते पाहता येईल!