ग्रामपरीच्या प्रकरणात अधिक खोलवर….

भाग १: ग्रामपरीच्या प्रकरणात…

एमआरएचं आवार गेल्या चाळीस वर्षात राखलेल्या झाडांची फुला, पक्ष्यांनिशी नांदती राई आहे. इथे सकाळी, संध्याकाळी, रात्रीच्या शांततेत….कधीही एकांत धावून येतो, जिवलग मित्रागत! मला तर या एकांतात इथल्या पायवाटांनी भिरीभिरी फिरतच रहावंसं वाटतं!

एखाद्या पायवाटेवर मधेच अचानक गुलमोहराचा भडक लालबुंद तुरा उगवलेला असतो…. तर वळणापलीकडे जॅकरांडाने निळ्या जांभळ्या मखमलीच्या पायघड्या घातलेल्या असतात…मधेच जणू आहेत ते रंग कमीच पडले असावेत असा बहाव्याचा सोनपिवळा संभार उसळून येतो! माझ्या कमळांच्या तळ्याभोवतीची झाडी पाण्यावर ओठंगलेली असते…. त्यात धिटाईने नाचणारे दयाळ अन बुलबुल माझ्याकडे तुच्छ दुर्लक्ष करतात! त्याच झाडांत राहणारा एमआरएचा निवासी पॅराडाइझ फ्लायकॅचर एखाद्या सेलिब्रिटीसारखा क्वचित दर्शन देतो! कुण्या रसिकाने त्याचं नाव स्वर्गीय नर्तक ठेवलंय कोण जाणे….पण त्याचे कमनीय विभ्रम मी फक्त मुक्याने पाहून घेतले आहेत. सौंदर्याच्या पुराव्यासाठी फोटो काढत बसण्याइतकी जागरूक पर्यावरणप्रेमी नाहीच बहुदा मी!

संध्याकाळी एखाद्या पायवाटेनं जरा लांबवर गेले तर रानमोगऱ्याने सगळा सुवासिक दंगा घातलेला असतो! करवंदी अन जांभळांचे घोस पाहून आताशा हरखून जाणं बंद केलंय मी…. त्या झाडांवर माझ्यापेक्षा अधिक अवलंबून असलेले पक्षी, किडे अन छोटी पोरं जास्त महत्त्वाची आहेत!

अर्थात निसर्गवर्णनात मला आग्या माश्यांचा उल्लेख मोठ्या आदराने केला पाहिजे. या वात्रट माश्यांनी माझ्या सकाळच्या “वॉक”चा “जॉग” केला होता! त्यांची घोंघों माझी पाठ सोडत नव्हती अन मग धूम पळत खोलीत जावं लागलं होतं!!

माझी रहायची व्यवस्था “व्हॅली व्ह्यू” नावाच्या इमारतीत आहे. इथून पाचगणीची हिरवीगार दरी दिसते हे पुन्हा सांगायला नकोच. वळवाचा पाऊस अन गारा या दरीतून उसळी खात अंगावर धावून येतात तेव्हा मात्र “रौद्र” या शब्दाचा अर्थ नीट कळतो!

अजून देखिल खूप आवडीच्या जागा आहेत माझ्या या आवारात विखुरलेल्या…. सोनचाफ्याच्या झाडाखाली गोलाकार लावलेले बाक, बॉटलब्रशच्या झिपऱ्या झाडाखाली गप्पांच्या आमंत्रणासारख्या रेंगाळलेल्या खुर्च्या…

अन ग्रामपरीच्या शेतांभोवती अती सलगीने वावरणारे मोर! आवारातच उंडारणारे दोन चार भटके कुत्रे कंटाळा घालवायला या मोरांच्या मागे लागतात. पण हे अगोचर पक्षी आपला अवजड संभार घेऊन मोठ्या चपळाईने उंच कुंपणावर जाऊन बसतात….. तेही मोठ्या तोऱ्यात! यातल्या एका बेट्याने ग्रामपरीत काम करणाऱ्या मावशींच्या मागे मागे फ़िरून त्यांना चोची मारून अगदी वैताग आणला होता म्हणे!

क्वचित कधीतरी त्यांच्या आर्त केका साऱ्या दरीत घुमून येतात…. एखाद्या ढगाळ संध्याकाळी तो आवाज मन ढवळून काढतो…. काहीतरी सलणारं, एरव्ही मनाच्या कोपऱ्यात अडगळ म्हणून सारलेलं वर येऊ पाहतं…. मात्र असल्या सुंदर जागी दुखऱ्या आठवणी देखिल नकोश्या होत नाहीत…. बरंवाईट सगळंच आपलंसं होऊन जातं….माझ्या अस्तित्वासाठी पूरक होऊन जातं….

***

ग्रामपरीच्या सेंद्रीय शेतात काम करणाऱ्या  सुनीताताईंच्या (नाव वेगळं आहे) घराची दुरुस्ती चालू आहे. त्यात मदत करायला सौम्या (ग्रामपरीच्या “वॉश” प्रकल्पाची प्रमुख), मला घेऊन गेली होती. सुनीता ताई अन त्यांच्या नवऱ्याची मिळून मासिक कमाई दहा हजार पण नाही. घरात स्वत:ची अन नात्यातली मिळून पाच लहान मुलं आहेत. वाटणीत मिळालेला घराचा पडका भाग दुरुस्त करण्यासाठी अन नवीन शौचालय बांधण्यासाठी त्यांना ग्रामपरीतले सगळे मदत करत आहेत. सौम्या अन मी सुनीता ताईंच्या घरी गेलो तेव्हा जोरदार पाहुणचार झाला…. आमच्यासाठी ते माझाच्या जातीतलं मॅंगो ड्रिंक आणण्यात आलं…. त्या पडक्या घरात माझाची बाटली चकाकत होती… मात्र अजिबात शोभत नव्हती….उगाच मला टोचत होती! सौम्याने मला डोळ्यानेच दटावले. पाहुणचार नाकारून त्यांचा अपमान करणे अधिक वाईट आहे. पण आम्हा दोघींनाच ते सरबत अजिबात गिळवेना. मग सुनीता ताईना मी अजून थोडे कप आणायला सांगितले. सौम्याने सगळ्यांसाठी थोडं थोडं ओतलं. तिच्या सहजतेनं, मोकळ्या आपुलकीनं सगळे आपपर भाव पुसून टाकले! माझाच्या पार्टीवर पोरं जाम खूष होती! त्यांचं शुभ्र हसू पाहून माझा कडवटपणा कमी न होता तर काय!

आज पुण्यात कतरीना कैफचं माझाच्या जाहिरातीचं मोठ्ठं होर्डिंग अन त्याच्या भोवतीचा झगझगीत उजेड पाहिला कि….त्या घराच्या पडक्या भिंती आठवतात….

मोठ्ठा प्रश्न उगारावासा वाटतो विकासाच्या, सुखाच्या उपऱ्या कल्पनेवर!

हे ग्रामपरी प्रकरण फार जड जाणार आहे मला….
***
पाचगणीत महागडं ग्रिल्ड सॅंडविच, स्ट्रॉबेरी विथ क्रीम खाणे, अवाच्या सवा किमती लावलेल्या अनावश्यक वस्तू खरेदी करणे हे सगळं पूर्वी केलंय मीही. पण माझ्या भोवतीच्या आवाराने आता मला इतकं घट्ट गुंतवून ठेवलंय कि गेल्या दोन महिन्यात मी एकदाही बाजारात गेले नाहीये. अद्याप काहीही खरेदी केलं नाहीये…. अन तेव्हापेक्षा मळक्या कपड्यात, चिखला मातीत, साध्या चपला घालून मी अधिक आनंदात आहे…. हे कसं काय?!
आता पाचगणीच्या बाजारात आनंद विकत घेता येणार नाही का मला?! पाचगणीतल्या महागड्या हॉटेलांना विकण्यासाठी आसपासच्या गावातून पाणी उपसून आणणारे टॅंकर, त्या गावातला वर्गसंघर्ष, राजकारण, पाण्याचं विकृत असमान वाटप…. दरवर्षी आटत चाललेल्या, पाण्याच्या हावेपोटी अधिक खोल अधिक रुंद होत असलेल्या विहिरी विसरताच येणार नाहीत?!

पाचगणीतल्या हिरव्या जंगलावर कडी करून उगवणारे अत्याधुनिक गृहप्रकल्प…. त्यांच्या सिमेंटने माखलेल्या उजाड जमिनी…. जांभ्या दगडाच्या हावेपोटी कुरतडून खाल्लेले सह्याद्रीचे लचके….

डोळ्यासमोर वणव्यात भस्मसात झालेली साडेतीनशे देशी झाडांची रोपं…. स्ट्रॉबेरीच्या अतिरिक्त लागवडीने गिळून टाकलेले डोंगरउतार…. उजाड झालेली टेबल लॅंड, हरवलेली जंगलं…. कायमचे उडून गेलेले पक्षी…. यांचा सगळ्याचा हिशेब पाचगणीच्या बाजारात मिळेल का मला?!

अस्वस्थ करून सोडणाऱ्या खूप गोष्टी आहेत इथल्या साजऱ्या पर्यटनाच्या चेहऱ्यामागे….. त्यांचे सगळे वाभाडे इथे काढणं कदाचित योग्य नाही…. माझ्या लोकांना त्याचा त्रास होता कामा नये.

मात्र या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आक्रमक न होता देण्याची हिंमत अन चिकाटी आहे आमच्या ग्रामपरीकडे…. विकासासाठी आपल्यापेक्षा दुर्बळाचा बळी द्यावा नाही लागत…. निसर्ग अन माणूस, श्रीमंत अन गरीब माणूस, लहान अन मोठा माणूस हे सगळे एकत्र सुखाने वाटचाल करू शकतात हा विश्वास आहे….

शाश्वत बदलाची सुरुवात स्वत:च्या अंतर्मनातच करावी लागते. एकदा तिथे परिवर्तन सुरू झालं कि त्याचे पडसाद बाहेरच्या जगात पडू लागतात. चांगल्या बदलांची शृंखलाच सुरू होते. एमआरएच्या व्यापक पसाऱ्याचा गाभा इतक्या साध्या विचारसरणीत आहे!

सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सगळी आदर्शवादी बकवास खरंच प्रत्यक्षात आणू शकणारे लोक आहेत! साध्या वेषात, हसऱ्या चेहऱ्याने, सहजतेने बोलणारे…. माझ्यातल्या वेडेपणाला अधिकाधिक अभिव्यक्त करू देणारे…. आयुष्याची फार मोठी रहस्य जेवणाच्या टेबलावर गप्पा मारत वाटून घेणारे… आहेत अजून जगात!

या संस्थेची मी देत असलेली माहिती कदाचित अपुरी आहे. अधिक सविस्तर माहिती संकेतस्थळांवर पाहता येईल

http://www.iofc.org/panchgani तसेच www.grampari.org

प्रेमाने बांधलेले…

खूप वर्षांपूर्वी उंच उंच गगनचुंबी इमारती माझ्या पुण्यात बांधण्याचं स्वप्न मी पहात असे. हे शहर कुठल्यातरी उंच गच्चीवरून मनभरून पाहण्याचं स्वप्न! मी लहान होते, या शहराचा नवा अध्याय लिहिण्यासाठी उत्सुक होते! पुण्यावर अतोनात प्रेम करणारी अस्सल पुणेकर!

पण गेल्या वर्षभरात काहीतरी गडबड झाली आहे. नाही…. पुण्यावर प्रेम अजूनही आहे माझं, हेच घर आहे ना! पण आता मला त्या आकाशाला खिजवणाऱ्या इमारती नको आहेत….अगदी अज्जिबात! मी अन माझा सगळा गोतवळा इथेच रहात अहोत, किती पिढ्यांपासून! या नव्या शहरातील घर अन त्यासाठी आवश्यक अशी महागडी जीवनशैली आम्हाला परवडेल का?

कोणाला परवडेल, ते ठाऊक आहे मला आता. आम्ही ज्यांच्यासाठी रोज रोज कष्ट करतो, ज्यांची चाकरी करतो, त्यांना परवडेल हे सारे. ते लोक आम्हाला स्वप्न दाखवतील, “खूप मेहनत करा म्हणजे एक दिवस तुम्हीही आमच्यासारखे व्हाल!” मग आम्ही त्यांच्यासारखे होऊ…..सुख-सुविधा विकत घेण्याची ऐपत येईतो मान खाली घालून काम करून झिजलेले म्हातारे! आमच्या सोयी पुरवण्यासाठी कितीकांचा जगण्याचा हक्क हिरावला गेला आहे त्याची रोज जाणीव असेल आम्हाला. अन मग त्या सगळ्या सोयी अन सुविधा पोकळ वाटू लागतील. मग आम्ही त्या पोकळीला न जुमानण्याची सवय करून घेऊ….काहीही मनाला लावून न घेण्याची सवय करून घेऊ, अगदी शुद्ध आनंद देखिल!

हा विनोद इतका क्रूर आहे कि हसू येणार नाही. काचेच्या चकचकाटामागे लपलेल्या या बांधकाम क्षेत्राच्या सत्याने मला काही गुपितं शिकवली आहेत. मी ज्यांच्यासाठी कम करते ते लोक मला या शहराचा चेहरा अन नशीब कधीच बदलू देणार नाहीत. माझ्या स्वप्नातली नगरी प्रत्यक्षात बांधण्याची लोभसवाणी संधी ते मला देतील….फक्त काही तडजोडी करण्याच्या बोलीवर. माझे शहर पुन्हा उजळवण्यासाठी मी साऱ्या तडजोडी मान्य करत जाईन. पण माझ्या कल्पनाशक्तीचे मालक ते लोक असतील. माझं स्वप्न ते तुकड्या-तुकड्याने विकतील, तशी ऐपत असलेल्या लोकांना! माझे उरलेले आयुष्य एखाद्या काड्यापेटी- घरात घालवत मी अभिमानाने पाहेन त्या गगनचुंबी शहराकडे, “हे मी उभारले!”. मी कधीही न संपणाऱ्या रांगांमधे उभी राहीन, गर्दीत घुसमटेन, पण खोकत, गुदमरत मी वर पाहेन, “हे मी उभारले!”. गरीब अधिक गरीब होतील, श्रीमंत अधिक श्रीमंत होतील, दोघे एकमेकांना आळीपाळीने लुटतील, माझ्याने बघवले नाही तर मी नजर टाळण्यासाठी वर पाहेन, “हे मी उभारले!”

इथून पुढे, दहा वर्षांनी “हे मी उभारले” असा शिक्का नको आहे मला…. हे उभारण्यासाठी मी हातभार लावलेला नको आहे मला. मान्य आहे ते लोक माझ्याशिवाय देखिल बांधतील, अधिकच भयंकर बांधतील. पण मला त्यातला वाटा नको. माझे घर…माझे शहर कदाचित नष्ट होईल, पण मी मात्र स्वत:चा जीव वाचवण्यासाठी इथून पळून जाणार आहे. माझ्याआधी खूप लोक गेले आहेत! पूर्वी मी त्यांना हसत असे, घाबरट म्हणून हिणवत असे…. पण आता मलाही या बुडत्या नावेतून उडी मारावी लागेल.

नशीब माझे! मला बांधता येते! कुठल्यातरी अज्ञात जागी मी पुन्हा दुसरे घर बांधेन, ज्याच्या पायाभरणीत माझ्याच भाईबांधवांचे तळतळाट नसतील….जे घर केवळ एका विराग्याची गुहा असेल…कलाकाराचे झोपडे असेल….यहून अधिक काहीही नाही.

माझ्यासारखे अजूनही आहेत लोक….ते देखिल येतील. मी त्यांच्यासाठी सुद्धा प्रेमाने बांधेन. आमच्या स्पर्शाने या जमिनीच्या जखमा पुन्हा भरून येतील. ती मनापासून फुलेल. मीही बहरेन थोडी तिच्यासोबतीने, एके दिवशी शांतपणे मरण्यासाठी, माझी माती तिच्या मातीत मिसळून टाकण्यासाठी….