असति का ऐसे कुणी?!

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे…..

हो… माझ्या भ्रष्टाचाराने पोखरलेल्या, महागाईने गांजलेल्या, भुकेल्या, निर्वस्त्र, बेघर देशावर माझे प्रेम आहे.

इथला कचरा, गटारे, बेशिस्त, हुल्लडबाजी, सिनेमाची थिल्लर गाणी, गुंड अन मवाली, प्रदूषण अवर्षण यावर माझे प्रेम आहे.

रस्त्यावरची भटकी कुत्री, गाय, बैल, डुकरे, कावळे… यांवर माझे प्रेम आहे.

इथली कोरडी क्षार शेते, मृत नद्या अन आटलेली तळी, काळवंडले समुद्रकिनारे अन हरवलेली जंगले यांवर माझे प्रेम आहे.

इथल्या रस्त्यातले खड्डे, फुटलेले नळ अन गळणाऱ्या टाक्या, गेलेली वीज अन दुर्मिळ पेट्रोल यांवर माझे प्रेम आहे.

रिकाम्या शाळा, भरलेली मल्टीप्लेक्स, धुळकट वाचनालये अन चकाकते बाजार यांच्यावर माझे प्रेम आहे.

कारण..

यांच्यावर नाहीतर कोणावर प्रेम करू? Iphone वर कि ipad वर?! यातले काहीही मला परवडत नाही. हा देश मला परवडतो. परवडतो काय, जन्मापासून फुकटच मिळाला आहे! तेव्हा मी त्याच्यावरच प्रेम करते.

तो दोषरहित आहे का? परफेक्ट आहे का? नाही…त्यामुळे याबद्दल मी प्रेम करू शकत नाही.

मात्र मी त्याला थोडासा बरोबर करू शकते. त्याचे चार दोष दूर करू शकते. प्रेम न करता कसा दुरुस्त करू? जनावराला ही जर माणसाळवायचे असेल तर प्रेम करावे लागते… Unconditional की काय तसले प्रेम. हा तर हजारो वर्षे वयाचा वयोवृद्ध तरुण देश आहे. याला पुढे न्यायचे असेल तर याच्या गुणदोषासहित याच्यावर प्रेम केले पाहिजे…

पण म्हणूनही मी याच्यावर प्रेम करत नाही! प्रेम तर उगाच दाटून येते! वात्रट मुलावर त्याच्या आईला येत असेल तसेच! चुका केल्या, उर्मटपणे वागलो म्हणून आमच्या आईबाबांनी आम्हाला सोडून दिले का?! उलट अमच्या चुका दुरुस्त करायला शिकवले…. आता त्यांच्यापेक्षा आम्ही शहाणे झालो, म्हणून आईबाबांना सोडून देतो का आम्ही? मग देश सुद्धा आईबाबांसारखाच असतो. त्याला दूषणे देऊन बाजूला कसे होता येईल? कार्ल शुर्झला देखिल असेच वाटले असावे, “माझा देश, बरोबर अथवा चूक, बरोबर असेल तर तसाच जतन करावा असा, अन चूक असेल तर दुरुस्त करावा असा.”

इथल्या चुकीच्या गोष्टी दिसत नाहीत असं नक्कीच नाही. अन रागही येतो की! आलाच पाहिजे राग! पण त्या रागातून सुधारणा व्हाव्यात. त्या रागातून काहीतरी सृजनशील घडावे.

स्वत:च्या देशाची प्रगती दुसऱ्याने दिलेल्या मापदंडाने मोजता येत नाही. दुसऱ्या देशातली प्रगती इथे “कॉपी पेस्ट” करून चिकटवता देखिल येत नाही. इथले हवा, पाणी, जमीन, संस्कृती, माणसं यांच्यामधून ती प्रगती घडवावी लागते. माणसाला देखिल त्याच्या भूतकाळाला सारून भविष्य घडवता येत नाही. इथे तर दहा हजार वर्षांचा बरावाईट इतिहास आहे. त्याला पुसून टाकून प्रगती होईल?! इतिहासातून देशाचे व्यक्तिमत्त्व घडत जाते. नाहीतर झकपक पोषाख केलेल्या अडाणी माणसासारखा देश नुसताच वरवर आधुनिक दिसतो. त्याला प्रगती म्हणाता येत नाही…. जागतिक हसे मात्र होते!

प्रश्न आहेत. पण त्या प्रश्नांकडे अपण किती creatively पाहतो? जर तसे पाहिले तर प्रश्नातच उत्तरे दडलेली दिसतील. आपले सगळ्यांचे एक उदास निराशावादी conditioning झाले आहे कदाचित. त्याला भेदून बाहेर पाहिले तर ती लपलेली उत्तरे आपल्याकडे पाहून हसताहेत असे वाटते…. “या नि काहितरी भारीपैकी करा बघू!” असे म्हणताहेत असे वाटते.

खूप प्रयत्न करावे लागतील, कष्टाला निलाजरेपणाने सामोरे जावे लागेल, खूप खूप झगडावे लागेल…. प्रवाहाविरुद्ध पोहावे लागेल. मात्र त्याकडे कष्ट म्हणून पाहिले तर सुरू करण्यापूर्वीच कंटाळा येईल ना! त्यात मुक्त आनंद, एक रगेल हास्य अन अशक्य समाधान दिसते आहे…. ते मिळवायचे असेल तर खूप चिकाटी, धीर अन कमालीची हिंम्मत हवी!

“असति का ऐसे कुणी?!”