शेजार….

माणसांच्या आयुष्याचे…. त्यांच्या बरोबर-चूकचे संदर्भ असतात वेगवेगळे. सरळ आयुष्याला कौतुकमिश्रित तिरस्कार वाटतो आडनिड्या वाटेने भटकणाऱ्या स्वच्छंदी आयुष्याचा…. अन मुक्तपणे विहरत उलघडत जाणाऱ्या आयुष्याला त्याच सरळ आयुष्याच्या स्थिरतेचे….. विश्वासाचे असाध्य अप्रूप असते….

माझ्या शेजारणीला षोक आहे स्वच्छतेचा….. माझ्याहूनही जास्त! तिच्या दाराखिडक्यांनाच काय सभोतीच्या भिंतीना देखिल तिच्या भुश्शकन पाणी ओतणाऱ्या बादलीची सवय! बरं पुन्हा तिच्या स्वच्छतेचे शिंतोडे माझ्या घरात उडले तर काय फरक पडणार असा?!

असंही माझ्या घराला स्वच्छतेच्या शिस्तीपेक्षा लहरी नादिष्टपणाचेच अधिक डोहाळे….. मग तिच्या घरातून अलगद वाऱ्यावर स्वार होत आलेल्या कचऱ्याचा अनमान कसा करावा, तोही निमूट माझ्या केराच्या टोपलीत जाऊन बसतो….. शेवटी आम्हा दोघींची घरे स्वच्छ झालीच ना!

माझ्या बागेतल्या कचऱ्याच्या वाफ्याशी मात्र सखी शेजारणीचे कट्टर वैर आहे…. जिथे मला ओल्या कचऱ्यापासून पाहता पाहता उमलणारी मोगऱ्याची फुलं दिसतात तिथे तिला कांद्याची साले, मटाराची टरफले अन असलंच काहीबाही दिसतं…..

चौदा वर्षात हळूहळू कंपोस्टच्या वासावर माझे प्रेम जडले आहे! इतका मऊसूत, जमिनीशी बांधलेला, मार्दवी वास लोकांना दुर्गंध कसा वाटू शकतो असा कैक वेळा विचार करून पाहिला…. पण तरीही पुन्हा मातीत हात घालताना सुखाची शिरशिरी आल्याखेरीज रहात नाही! शेजारीण मात्र पहात असते तिला शिसारी आल्यागत!!

कदाचित माझ्या हसण्याची बाधा तिला होऊ नये म्हणून आठ्यांचे संरक्षण घेत असावी!

मला मात्र कचऱ्यावर पोसलेल्या अळूचे, दोडक्या-कारल्यांच्या वेलींनी घातलेल्या वळ्से-वेलांटयांचेच कौतुक….. कचऱ्यातच पडलेल्या मिरच्यांच्या बिया रुजून जेव्हा चांदणीदार फुलोरे वाऱ्यावर डोलले तेव्हा तर आमच्या घरात नव्या बाळजन्मागत आनंद झाला साऱ्यांना….. त्या झुडपातल्या मिरच्या शोधून तोडून स्वयंपाकघरात नेल्या जात तेव्हा उगाच स्वयंपाक अधिक चांगला झाल्यागत वाटत असे….

या बागेत मी हौसेनी लावलेल्या रोपा-झाडांपेक्षा स्वत:च्या मर्जीने मूळ धरणाऱ्या उत्साही झाडांचेच राज्य अधिक चालते! त्याभोवतीच्या पसाऱ्यात आमच्या घरातल्या इतर छंदांचे अवशेष सापडतात ते वेगळेच! गेल्या चैत्रातल्या मातीकामाचे वेडाचे भेगाळलेले नमुने, पुनरुज्जीवनाची वाट पहात बसलेल्या फुटक्या कुंड्या, गेरूची सुकली ढेकळं अन मातीच्या गिलाव्याची नवी पद्धत आजमावून पाहताना भिंतीवर केलेले नमुन्याचे सारवण!

तिथंच मांडी ठोकून चहा घेत, आपल्याच पसाऱ्याचे कौतुक करत, येत्या रविवाराला आवराआवरीचे खोटेच वचन देत मी रोजची सकाळ घालवते! टागोरांच्या पोरवयापासून ते रविवार लोकसत्तेच्या पुरवण्यांपर्यंत साऱ्या “साहित्यावर” माझ्या बागेच्या मातीचे शिक्कामोर्तब कधीनाकधी होतेच! आमच्या घरातून नव्या जुन्या गाण्यांच्या लकेरी आकंठ येत राहतात जाग असेपर्यंत सारा वेळ….. अन असल्या पावसाळी हवेत इथे उंच डोंगरातून जेव्हा वारा घुमतो तेव्हा दुपारच्या नीरव शांततेलाही कसलीशी राकट, आदिम नैसर्गिक ओढ लावून जातो…. झुळकेवरला श्रावणगंध हुंगून मन भरत नाही….

सारे आकाश ढगाळ ढगाळ…. अन बाहेरच्या कदंबावर फुलोऱ्यांचे चेंडू लटकत असतात वाऱ्यावर झोके खात! सकाळी थोडे जरी ऊन आले तर त्यांवर झुंबड उडते पक्षी, फुलपाखरं अन मधमाश्यांची! खिडकीत अडकावलेल्या खोक्याच्या घरट्यातून चिमणा-चिमणीची पोक्त लगबग चालूच असते….. खाली दरीत माझं लाडकं पुणं उन्हाची वाट पहात सुस्तावलेलं…… कट्ट्यावर आमचा शुभ्र पांढरा बोका देखिल तसाच पहुडलेला, उन्हाची तिरीप आलीच एखादी तर पाठीवर लोळून सूर्यस्नान घेणारा!

मग मीही नि:श्वास सोडत वेताच्या झुल्यात अंग सोडून देते….पुढच्या रविवारच्या सफाईचे नियोजन करत करत डोळा बरा लागतो! जाग येते तेव्हा मी कौतुकाने पहाते तिच्याकडे, शेजीबाई मात्र घसघसून खिडक्या पुन्हा धूत असते आठ्या घालून!

दिवास्वप्न….

(हा दिवास्वप्नाचा पहिला भाग आहे. सगळं एकाच वेळी लिहिणं मला आणि वाचणं तुम्हाला शक्य नाही म्हणून….)

दु:स्वप्नासारखा सुरु झालेला प्रवास होता तो….सहा तास बेंग्लोर बस स्थानकावर संपूर्ण उनाडक्या करण्यात घालवले होते…रात्री आठ वाजता हरिहरपुराची बस आली तर खरी, पण तिने बेंग्लोर सोडायला दहा वाजवले… रस्त्यात दुसऱ्या बसला ठोकून झालं, चाकाचं पंक्चर (ला मराठी शब्द?!) काढून झालं, डायवरसायबांचं खाऊन (पिऊन?!) झालं… मग कुठे खडखडत प्रस्थान ठेवलं!

अतिमानवी पाठीच्या हिशेबाने बनवलेल्या “आराम” सीटवर रात्रभर अवघडून बसायची मनाची तयारी केली होतीच मी. पण रात्रीच्या लांब पल्ल्याच्या बसमधे एकटीच प्रवास करणारी तेवीस वर्षांची मुलगी असणं आजकालच्या काळात इतकी डोळे फाडफाडून बघायची गोष्ट असते हे जरा मला नवीन होतं!

माझ्या फ़ोनने वीसबावीस तासांच्या सेवेनंतर मान टकली होती… म्हणजे आता मी सर्वार्थाने एकटी असणार होते…. कानात गाण्याची बुचं (ipod) घालून शाल गुंडाळून मी मनोभावे झोपदेवीची आराधना सुरु केली. पण ती येते कसली?! सामान आणि शेजारच्या डोळेफाडू सहप्रवाशांच्या कृपेने झोपेची गाडी फारशी ताल धरत नव्हती. बसचे धक्के आणि आचके होतेच सोबतीला….आणि तो रात्रीच्या “यष्टीतला” खास रंगीत उजेड!

या सगळ्यातून पोहोचेन ते ठिकाण अजून काय काय समोर घेउन येणार आहे ही विवंचना पण माझी (आधीच अवघडलेली) पाठ सोडत नव्ह्ती…. बसने हळूहळू सूर आणि रस्ता पकडला… गार वाऱ्याच्या झुळुका शांतवायला झेपावत आल्या…. बसच्या धक्क्यांच्याच तालावर डोळा लागला माझा थोडासा….

बसच्या धुरकटलेल्या काचेबाहेर रात्रीचं गहिरं आकाश पसरलं होतं…. कुणीतरी तिथे गालात हसत माझ्या वैतागात झोपलेल्या चेहऱ्याकडे पहात होतं….

कचकचून ब्रेक मारत डायवरमहाशयांनी माझ्य झोपेला ब्रेक मारला…. दचकून उठत मी खिडकीबाहेर नजर टाकली…बसच्या हेडलाईट्च्या (ला मराठी शब्द?) झोतात रस्ता उजळत होता खरा… पण पहाटेच्या धुक्याच्या पडद्यातून फार दूरचं दिसतच नव्हतं…. रस्त्याच्या दोन्ही बाजूने गच्च दाटून आलेलं बांबूचं बन वरून झुंबरासारखं दोलायमान झालेलं…. त्यातल्या प्रत्येक फटीतून दिसणाऱ्या आकाशाचा इंचन्‌इंच रत्नचांदण्यांनी मढला होता….माझ्या दु:स्वप्नासारख्या प्रवासाचं इतक सुंदर स्वप्न झालं होतं?! मी खरंच जागी झाले होते का असा प्रश्न पडला मला…!!

पुढ्चे दोन दिवस त्याच सुंदर दिवास्वप्नात घालवले मी… सुंदरतेच्या परिसीमा पुन: बदलायला लावेल असा निसर्ग, आणि त्यावर मात करतील असे सुंदर मनाचे लोक माझी वाट पहात होते….

त्या आकाशामागून गालात हसणाऱ्या कुणाकडे तरी पाहून आता मलाही हसू आलं! पुन्हा हुरुप आला त्याची जादुभरली कथाकादंबरी पुढे न्यायचा…!

हरिहरपुर यायला सकाळचे सहा वाजले…अन स्वप्ननगरीत उतरल्यासारखी मी रिकाम्या बस स्थानकावर उतरले…मला तिथे टाकून बस पुढे गेली… आता रिक्षा शोधायचं दिव्य करायला मी निघतच होते कि एक घनदाट काळा अजस्र मनुष्य पुढे झाला…

जिथल्या भाषेचा मला गंधही नाही, अशा अनोळखी गावात अपरिचित चेहऱ्यावरचं हास्य किती आश्वसक वाटतं! तो रिक्षावाला मला न्यायला बस स्थानकावर गेला तासभर उभा होता….. बस उशीरा आल्याबद्दल मीच त्याची तोडक्यामोडक्या भाषेत माफी मागत हलक्या मनाने त्याच्या रिक्षेत बसले… एरव्ही सगळीकडे स्वत:चं सामान उचलायची सवय होती मला. पण माझ्या सगळ्या प्रयत्नांना दूर सारून त्याने माझं सामान स्वत:च उचलून ठेवलं. रिक्षावाल्यांनी एवढं चांगलं वागवायची सवय नसते आपल्याकडे!

मी हौसेने आणि नवीन आलेल्या उत्साहाने त्याला नाव विचारलं… रावणा!!

हसऱ्या चेहऱ्याने हा रावण माझं कुठं हरण करून घेऊन जात होता कुणास ठाऊक. पण रिक्षेबाहेर पाहताना अशी काही दृष्य उलगडत होती कि मनातल्या शंकाकुशंका धुळीसारख्या धुवून जात होत्या…. फुटबॉलच्या मैदानासारखी विस्तीर्ण भाताची शेतं सकाळच्या कोवळ्या उजेडात स्तब्धपणे उजळत होती…. सह्याद्रीतल्या पायरीदार छोट्या शेतांची सवय असलेली मी त्या भाताच्या मैदानांना पाहून अचंबित झाले होते.

त्या पावसाळी मार्दवी हवेत पोसलेली बांबूची बेटं सगळ्या दृष्यांना आधी लपवून ठेवतात… दर पुढच्या वळणावर नवा नजारा पेश करत हसतात माणसाच्या ऱ्हस्वदृष्टीला! पुन: त्या दृश्याभोवती आपल्या वळसेदार पानांची चौकट विणत राहतात…

अशाच एका वळणानंतर या सगळ्या मायाजगाची मालकीण…. तुंगभद्रा नदी प्रकट झाली. वळणं घेत…धीरगंभीर प्रवाहाने वहात बांबूच्या बेटांतून ती जात होती…हे सगळं स्वप्नवत जग तिचंच होतं. तिच्याभोवती एकवटलेलं, तिच्याच जीवनरसावर पोसलेलं कर्नाटकातलं हे छोटंसं हरिहरपूर तिच्याच वळसेवेलांट्यांत ढगांची दुलई लपेटून अजून झोपलं होतं….

रिक्षा थांबली तेव्हा प्रबोधिनी गुरुकुल समोर होतं….सगळ्या विचित्र प्रवासाच्या शेवटच्या टोकाला.. तिथेच… स्थिर असलेलं. किती स्वप्नं पाहिली होती मी…किती मनोरे रचले होते…नियोजन केलं होतं…पैसे जुळवले होते…चमत्कारिक प्रवास केले होते…. पण त्या क्षणी रिक्षातून खाली पाऊल ठेवताना पहिल्यांदा मला जिवंतपणा समजला होता… सगळ्या जगण्याची धडपड का करतो माणूस ते समजलं होतं…..डोळे मिटून, झोपेत चालल्यासारखं रोजचं आयुष्य “वास्तव” म्हणून मुकाट जगता जगता मी त्या स्वप्नवत गावात अचानक डोळे उघडले होते….

तो एक जिवंतपणाचा सोनेरी क्षण….उरलेल्या निद्रिस्त वर्षानुवर्षांच्यापेक्षा मौल्यवान होता…. पावसाने ओथंबलेल्या आकाशाच्या आडून माझ्या स्तिमित अवस्थेला पाहून पुन: कोणीतरी गालात हसत होतं….

तळ्टीप: हरिहरपूरच्या आधिक फोटोंसाठी: http://picasaweb.google.com/anujnaa/PrabodhiniGurukula?feat=directlink

(क्रमश:)

दिवास्वप्न भाग II