ग्रामपरीच्या प्रकरणात अधिक खोलवर….

भाग १: ग्रामपरीच्या प्रकरणात…

एमआरएचं आवार गेल्या चाळीस वर्षात राखलेल्या झाडांची फुला, पक्ष्यांनिशी नांदती राई आहे. इथे सकाळी, संध्याकाळी, रात्रीच्या शांततेत….कधीही एकांत धावून येतो, जिवलग मित्रागत! मला तर या एकांतात इथल्या पायवाटांनी भिरीभिरी फिरतच रहावंसं वाटतं!

एखाद्या पायवाटेवर मधेच अचानक गुलमोहराचा भडक लालबुंद तुरा उगवलेला असतो…. तर वळणापलीकडे जॅकरांडाने निळ्या जांभळ्या मखमलीच्या पायघड्या घातलेल्या असतात…मधेच जणू आहेत ते रंग कमीच पडले असावेत असा बहाव्याचा सोनपिवळा संभार उसळून येतो! माझ्या कमळांच्या तळ्याभोवतीची झाडी पाण्यावर ओठंगलेली असते…. त्यात धिटाईने नाचणारे दयाळ अन बुलबुल माझ्याकडे तुच्छ दुर्लक्ष करतात! त्याच झाडांत राहणारा एमआरएचा निवासी पॅराडाइझ फ्लायकॅचर एखाद्या सेलिब्रिटीसारखा क्वचित दर्शन देतो! कुण्या रसिकाने त्याचं नाव स्वर्गीय नर्तक ठेवलंय कोण जाणे….पण त्याचे कमनीय विभ्रम मी फक्त मुक्याने पाहून घेतले आहेत. सौंदर्याच्या पुराव्यासाठी फोटो काढत बसण्याइतकी जागरूक पर्यावरणप्रेमी नाहीच बहुदा मी!

संध्याकाळी एखाद्या पायवाटेनं जरा लांबवर गेले तर रानमोगऱ्याने सगळा सुवासिक दंगा घातलेला असतो! करवंदी अन जांभळांचे घोस पाहून आताशा हरखून जाणं बंद केलंय मी…. त्या झाडांवर माझ्यापेक्षा अधिक अवलंबून असलेले पक्षी, किडे अन छोटी पोरं जास्त महत्त्वाची आहेत!

अर्थात निसर्गवर्णनात मला आग्या माश्यांचा उल्लेख मोठ्या आदराने केला पाहिजे. या वात्रट माश्यांनी माझ्या सकाळच्या “वॉक”चा “जॉग” केला होता! त्यांची घोंघों माझी पाठ सोडत नव्हती अन मग धूम पळत खोलीत जावं लागलं होतं!!

माझी रहायची व्यवस्था “व्हॅली व्ह्यू” नावाच्या इमारतीत आहे. इथून पाचगणीची हिरवीगार दरी दिसते हे पुन्हा सांगायला नकोच. वळवाचा पाऊस अन गारा या दरीतून उसळी खात अंगावर धावून येतात तेव्हा मात्र “रौद्र” या शब्दाचा अर्थ नीट कळतो!

अजून देखिल खूप आवडीच्या जागा आहेत माझ्या या आवारात विखुरलेल्या…. सोनचाफ्याच्या झाडाखाली गोलाकार लावलेले बाक, बॉटलब्रशच्या झिपऱ्या झाडाखाली गप्पांच्या आमंत्रणासारख्या रेंगाळलेल्या खुर्च्या…

अन ग्रामपरीच्या शेतांभोवती अती सलगीने वावरणारे मोर! आवारातच उंडारणारे दोन चार भटके कुत्रे कंटाळा घालवायला या मोरांच्या मागे लागतात. पण हे अगोचर पक्षी आपला अवजड संभार घेऊन मोठ्या चपळाईने उंच कुंपणावर जाऊन बसतात….. तेही मोठ्या तोऱ्यात! यातल्या एका बेट्याने ग्रामपरीत काम करणाऱ्या मावशींच्या मागे मागे फ़िरून त्यांना चोची मारून अगदी वैताग आणला होता म्हणे!

क्वचित कधीतरी त्यांच्या आर्त केका साऱ्या दरीत घुमून येतात…. एखाद्या ढगाळ संध्याकाळी तो आवाज मन ढवळून काढतो…. काहीतरी सलणारं, एरव्ही मनाच्या कोपऱ्यात अडगळ म्हणून सारलेलं वर येऊ पाहतं…. मात्र असल्या सुंदर जागी दुखऱ्या आठवणी देखिल नकोश्या होत नाहीत…. बरंवाईट सगळंच आपलंसं होऊन जातं….माझ्या अस्तित्वासाठी पूरक होऊन जातं….

***

ग्रामपरीच्या सेंद्रीय शेतात काम करणाऱ्या  सुनीताताईंच्या (नाव वेगळं आहे) घराची दुरुस्ती चालू आहे. त्यात मदत करायला सौम्या (ग्रामपरीच्या “वॉश” प्रकल्पाची प्रमुख), मला घेऊन गेली होती. सुनीता ताई अन त्यांच्या नवऱ्याची मिळून मासिक कमाई दहा हजार पण नाही. घरात स्वत:ची अन नात्यातली मिळून पाच लहान मुलं आहेत. वाटणीत मिळालेला घराचा पडका भाग दुरुस्त करण्यासाठी अन नवीन शौचालय बांधण्यासाठी त्यांना ग्रामपरीतले सगळे मदत करत आहेत. सौम्या अन मी सुनीता ताईंच्या घरी गेलो तेव्हा जोरदार पाहुणचार झाला…. आमच्यासाठी ते माझाच्या जातीतलं मॅंगो ड्रिंक आणण्यात आलं…. त्या पडक्या घरात माझाची बाटली चकाकत होती… मात्र अजिबात शोभत नव्हती….उगाच मला टोचत होती! सौम्याने मला डोळ्यानेच दटावले. पाहुणचार नाकारून त्यांचा अपमान करणे अधिक वाईट आहे. पण आम्हा दोघींनाच ते सरबत अजिबात गिळवेना. मग सुनीता ताईना मी अजून थोडे कप आणायला सांगितले. सौम्याने सगळ्यांसाठी थोडं थोडं ओतलं. तिच्या सहजतेनं, मोकळ्या आपुलकीनं सगळे आपपर भाव पुसून टाकले! माझाच्या पार्टीवर पोरं जाम खूष होती! त्यांचं शुभ्र हसू पाहून माझा कडवटपणा कमी न होता तर काय!

आज पुण्यात कतरीना कैफचं माझाच्या जाहिरातीचं मोठ्ठं होर्डिंग अन त्याच्या भोवतीचा झगझगीत उजेड पाहिला कि….त्या घराच्या पडक्या भिंती आठवतात….

मोठ्ठा प्रश्न उगारावासा वाटतो विकासाच्या, सुखाच्या उपऱ्या कल्पनेवर!

हे ग्रामपरी प्रकरण फार जड जाणार आहे मला….
***
पाचगणीत महागडं ग्रिल्ड सॅंडविच, स्ट्रॉबेरी विथ क्रीम खाणे, अवाच्या सवा किमती लावलेल्या अनावश्यक वस्तू खरेदी करणे हे सगळं पूर्वी केलंय मीही. पण माझ्या भोवतीच्या आवाराने आता मला इतकं घट्ट गुंतवून ठेवलंय कि गेल्या दोन महिन्यात मी एकदाही बाजारात गेले नाहीये. अद्याप काहीही खरेदी केलं नाहीये…. अन तेव्हापेक्षा मळक्या कपड्यात, चिखला मातीत, साध्या चपला घालून मी अधिक आनंदात आहे…. हे कसं काय?!
आता पाचगणीच्या बाजारात आनंद विकत घेता येणार नाही का मला?! पाचगणीतल्या महागड्या हॉटेलांना विकण्यासाठी आसपासच्या गावातून पाणी उपसून आणणारे टॅंकर, त्या गावातला वर्गसंघर्ष, राजकारण, पाण्याचं विकृत असमान वाटप…. दरवर्षी आटत चाललेल्या, पाण्याच्या हावेपोटी अधिक खोल अधिक रुंद होत असलेल्या विहिरी विसरताच येणार नाहीत?!

पाचगणीतल्या हिरव्या जंगलावर कडी करून उगवणारे अत्याधुनिक गृहप्रकल्प…. त्यांच्या सिमेंटने माखलेल्या उजाड जमिनी…. जांभ्या दगडाच्या हावेपोटी कुरतडून खाल्लेले सह्याद्रीचे लचके….

डोळ्यासमोर वणव्यात भस्मसात झालेली साडेतीनशे देशी झाडांची रोपं…. स्ट्रॉबेरीच्या अतिरिक्त लागवडीने गिळून टाकलेले डोंगरउतार…. उजाड झालेली टेबल लॅंड, हरवलेली जंगलं…. कायमचे उडून गेलेले पक्षी…. यांचा सगळ्याचा हिशेब पाचगणीच्या बाजारात मिळेल का मला?!

अस्वस्थ करून सोडणाऱ्या खूप गोष्टी आहेत इथल्या साजऱ्या पर्यटनाच्या चेहऱ्यामागे….. त्यांचे सगळे वाभाडे इथे काढणं कदाचित योग्य नाही…. माझ्या लोकांना त्याचा त्रास होता कामा नये.

मात्र या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आक्रमक न होता देण्याची हिंमत अन चिकाटी आहे आमच्या ग्रामपरीकडे…. विकासासाठी आपल्यापेक्षा दुर्बळाचा बळी द्यावा नाही लागत…. निसर्ग अन माणूस, श्रीमंत अन गरीब माणूस, लहान अन मोठा माणूस हे सगळे एकत्र सुखाने वाटचाल करू शकतात हा विश्वास आहे….

शाश्वत बदलाची सुरुवात स्वत:च्या अंतर्मनातच करावी लागते. एकदा तिथे परिवर्तन सुरू झालं कि त्याचे पडसाद बाहेरच्या जगात पडू लागतात. चांगल्या बदलांची शृंखलाच सुरू होते. एमआरएच्या व्यापक पसाऱ्याचा गाभा इतक्या साध्या विचारसरणीत आहे!

सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सगळी आदर्शवादी बकवास खरंच प्रत्यक्षात आणू शकणारे लोक आहेत! साध्या वेषात, हसऱ्या चेहऱ्याने, सहजतेने बोलणारे…. माझ्यातल्या वेडेपणाला अधिकाधिक अभिव्यक्त करू देणारे…. आयुष्याची फार मोठी रहस्य जेवणाच्या टेबलावर गप्पा मारत वाटून घेणारे… आहेत अजून जगात!

या संस्थेची मी देत असलेली माहिती कदाचित अपुरी आहे. अधिक सविस्तर माहिती संकेतस्थळांवर पाहता येईल

http://www.iofc.org/panchgani तसेच www.grampari.org

ग्रामपरीच्या प्रकरणात…..

या ग्रामपरीच्या प्रकरणात पडायचंच नव्हतं मला खरंतर….

अगदी नक्की ठरवलं होतं मी कि आता उडाणटप्पूपणा बास करायचा अन शहाण्यासारखं एखाद्या आर्किटेक्टकडे काम करायचं नाकासमोर दररोज दहा ते सहा!

***

इकॉलोजिकल सोसायटीच्या वर्गातला माझा मित्र, रेनी, पाचगणीत काहीतरी काम करायचा म्हणे. ऑयकॉसमधल्या पर्यावरण सर्व्हेसाठी या भूगोलशास्त्रज्ञ मित्राला सोबत घेऊन भरपूर भटकायला मिळालं. तेव्हा मी त्याच्या मूळ कामाबद्दल चौकश्या सुरू केल्या.

तो एम आर ए च्या ग्रामीण पर्यावरण केंद्रात (ग्रामपरी) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचं काम करत होता. आता यातून मला सुद्धा काडीचा अर्थबोध झाला नाही. प्रत्यक्ष जाऊन काय काम आहे ते पाहिल्याशिवाय जिवाला स्वस्थता लाभलीच नसती, म्हणून मी ऑयकॉसचा निरोप घेतल्यावर एका दिवशी तडक उठून पाचगणीला गेले.

सहजच गेले…. या ग्रामपरीच्या प्रकरणात पडायचंच नव्हतं मला खरंतर….

तो जागतिक स्त्री दिन होता. ग्रामपरीच्या आवारात बरीच लगबग चालू होती. आसपासच्या गावातल्या महिला सरपंच अन त्यांचे पुरुष उपसरपंच (आहे किनी मज्जा!) जमले होते. ग्रामपंचायतीच्या कामकाजातला महिलांचा सहभाग निव्वळ प्रतिनिधित्व मिळून सुधारलेला नाही. मात्र ग्रामपरीमधे थोडं प्रशिक्षण घेऊन, कायदेतज्ञांशी, अनुभवी कार्यकर्त्यांशी चर्चा करून या महिला लोकप्रतिनिधींचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला दिसला मला….

रेनीच्या मदतीने ग्रामपरीतल्या सगळ्यांशी ओळखी झाल्या. हसऱ्या जयश्री आंटी, रेनीचे बॉस, डॉ. जॅरेड अन सौम्यावर तर मी बेहद्द खूष होते! हे लोक ग्रामपरीचे डायरेक्टर वगैरे असतात याची फार गंभीर कल्पना नव्हती मला!

कोण कुठल्या देशातून उठून इथे पाचगणीत राहून माझ्या लोकांना पाण्याचं व्यवस्थापन, स्थानिक पर्यावरण, स्वच्छता, योग्य शौचालय बांधणी वगैरेबद्दल विचार अन काम करायला उद्युक्त करणारे हे कोण चमत्कारिक लोक आहेत?!

माझ्या नेहमीच्या अबोलपणावर कडी करून माझे सगळे विचित्र प्रश्न बाहेर उड्या मारत होते. अन तात्पर्य असं की रोजच्यासारख्या त्या साध्या दिवसाच्या शेवटी जॅरेडने मला ग्रामपरीत काम करायचं आवतन दिलं!

मी खूप घाईघाईने होकारार्थी मान डोलावून, तोंडाने नाही म्हणत होते….

पुढच्या आठवडयात जॅरेडसोबत गोडवली गावात चालू असलेलं झऱ्यांच्या व्यवस्थापनाचं काम बघायला गेले. (त्यावर एक अजून पोस्ट लिहू आपण) पण नुसतं बघायला माझं काय जात होतं…..

असंही या ग्रामपरीच्या प्रकरणात पडायचंच नव्हतं मला….

त्याच दिवशी माझ्या कामाचं स्वरूप, कामाचे तास, दिवस अन इतर तपशील ठरत गेले. पुढच्या आठवड्यात मी ग्रामपरीसोबत काम करण्याचा करार केला! हा दोन महिन्यांचा करार अतिशय हुशारीने आखलेला असून त्याच्या कालावधीत भविष्यात वाढ करण्याची तरतूद करण्यात आली आहे! मी मात्र नाही म्हणणार आहे….

अजूनही या ग्रामपरीच्या प्रकरणात पडायचं नाहीये मला….

मग जमेल तेव्हा घरून काम करणं सुरू झालं. झरे पुनरुज्जीवन प्रकल्पाचं संपूर्ण दस्तावेज दोन भाषांत तयार करणे हे मुख्य काम. भरपूर रेखांकने, नकाशे अन चित्रं वापरून पश्चिम घाटात अथवा तत्सम प्रदेशात वापरता येईल असं भूजल व्यवस्थापन हस्तपुस्तक तयार होत आहे.

मात्र त्यासाठी मलाच आधी भूजलसाक्षर होणं भाग होतं. त्याशिवाय कसली रेखाचित्रं काढणार होते?!

मग माझ्या पुणे पाचगणी फेऱ्या सुरू झाल्या. आता एसटी महामंडळ माझं दुसरं घरच झालंय. पुणे महाबळेश्वर निमआरामच्या सगळ्या कंडक्टरांना मी ओळखते आताशा! त्याशिवाय माझ्या नमुनेदार सहप्रवाशांवर एक सविस्तर पोस्ट लिहेन कधीतरी!

पाचगणीत दरवेळी बसमधून उतरले की एक खोल श्वास घेते मी….. सगळा सह्याद्री…. सगळं जंगल… सगळे झरे, दरीवर घिरट्या घालणारे गरूड, पायरीदार भातखाचरं अन भन्नाट गार वारा…. हे सगळं सगळं एका श्वासात भरून घेते!

आता इथून पुढे या सगळ्या प्रकरणात न पडणं शक्यच नाही हे लक्षात येतं माझ्या…..

एम आर ए च्या आवारात शिरतानाच मी दात काढत हसायला लागलेली असते…. जणूकाही संचार होतो माझ्यात कुठल्यातरी उत्साही चिवचिवत्या पक्ष्याचा! चालत जाते कि उडत जाते तेही लक्षात येत नाही!

मग भरपूर चर्चा, झालेल्या कामाचा मागोवा, पुढे काय काय रेखांकने करायची याचा विचार…. कधीकधी सकाळ ते संध्याकाळ गावात चालू असलेल्या कामाची पहाणी. अर्थात त्याला पहाणी म्हणणं हास्यास्पद आहे. जॅरेड अन त्याचे सहायक अशोकभाऊ यांच्यासोबत मी देखिल पोती उचल, सिमेंट कालव असले उद्योग करते. जुने दगडी हौद खराट्याने साफ करण्यापासून सिमेंटची घमेली वाहून नेण्यापर्यंत अन जॅरेडसाठी दिवसभर धावते भाषांतर करण्यापासून ते एमआरएच्या आवारात, कमळाच्या तळ्याकाठी बसून रेखांकने करण्यापर्यंत सगळेकाही माझे काम आहे!

एका दिवशी सकाळपासून भाषांतरे करून मी इतकी बावचळले होते की गोडवलीच्या मीटींगमधे मी गावकऱ्यांशी इंग्रजी अन जॅरेडशी मराठी बोलायला सुरुवात केली. अख्खं गाव हसत होतं मला! मग एका तुकाराम आबांनी आवाज टाकला, “ताईंसाटी च्या सांगा रे!”

***

एम आर ए मधे रहाण्याजेवण्याची सोय फारच उत्तम आहे. मला विचाराल तर माझ्या जरूरीपेक्षा खूपच लाड होत आहेत! शिवाय मला स्वयंपाक करावा लागत नाही हा बोनस!

इथली जेवणवेळ हा एक विशेष कार्यक्रम असतो. सुरुवातीला इतक्या साऱ्या अनोळखी लोकांसोबत जेवायला मी फार घाबरत असे. कुठे बसू? कुणाशी बोलू? अन काय बोलू?!

मुळातच ही संस्था समजून घेणं अन एका पोस्टमधे समजावून सांगणं अशक्य आहे माझ्यासाठी…

मात्र बघता बघता या जेवणवेळा माझ्या सगळ्यात मोठ्या शैक्षणिक संधी झाल्या. अनोळखी लोक हा शिकण्याचा केवढा मोठ्ठा खजिना असतो! रोज मी नवीन टेबलाशी बसते. कधी माझ्या शेजारी एम आर ए मधे काम करायला आलेले इंटर्न्स असतात, कधी माझे बॉस लोक असतात, त्यांचेही वरिष्ठ पदाधिकारी, एम आर ए चे जुने सहकारी, निवासी कर्मचारी, स्वयंसेवक…. वेगवेगळ्या देशातून आलेले विविधरंगी लोक! त्यातल्या प्रत्येकाचं काम, पूर्वेतिहास, त्यांच्या प्रेरणा… सगळं किती वेगळं!

मी मात्र जे सापडेल त्याला प्रश्न विचारून सोडते! एकदा एम आर ए च्या सेक्रेटरी काकांचं ताट माझ्या प्रश्नांची उत्तरं देतदेता सुकून गेलं आहे! (नंतर बहुदा त्यांनी माझं टेबल टाळलं असावं!)

रोज किमान शंभर दिडशे लोक जेवणार म्हणजे घासण्यात भांडी किती पडत असतील! इथे रोज एका विभागातले लोक ताटं वाट्या विसण्याचं काम करतात. गाणी म्हणत, चेष्टा मस्करी करत भांडी घासायला मीही जाऊ लागले. तसंही मला लहानपणी भांडी घासण्याचा खूप षोक होता…

मोठं झाल्यावर (म्हणजे ओट्यावर हात पुरण्याइतकं मोठं!) भांडी घासण्याचं स्वप्न असं पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं!

एका विशेष गर्दीच्या दिवशी भांडी घासायला मदत केल्याबद्दल आमच्या आफ्रिकन इंटर्न “योना”ने चक्क मला मिठी मारली! मीही बावचळल्यागत हसून साबणाच्या फ़ेसात घातलेले हात तिच्या गळ्यात टाकून मोकळी झाले!

याच मुलीने एका संध्याकाळी प्रार्थनागृहात तिच्या मधाळ आवाजात कुठलीतरी आर्त देवकवनं गायली होती….. तो स्वच्छ घंटेसारखा नाद देवाच्या कानावर न पडणं अशक्य आहे!

***

उरलेल्या गोष्टी वेळ काढून लिहीत आहेच…. आणिक फोटो सुद्धा टाकेन पु्ढच्या पोस्टमधे!

भाग २: ग्रामपरीच्या प्रकरणात अधिक खोलवर

धामापूरचा तलाव…

हरवणे हा लहानपणी माझा फावल्या वेळातला छंद होता. बाहेर गेल्यावर मोठ्यांचा हात सोडून कुठेतरी कोपऱ्यात तंद्री लावून बसणे तर ठीकच…मी घरात अन आजूबाजूला देखिल हरवत असे! सरावाने आईला माझ्या “हरवण्याच्या” जागा बऱ्यापैकी ठाऊक झाल्या होत्या. ती मला बरोबर हुडकून काढीत असे घराभोवतीच्या बागेतून!

त्यावर माझी आजी शेलका मालवणी शब्दखजिना उपडा करीत असे, “चुकला ढॉर धामपूरच्या तळ्यावर!” म्हणी कळण्याचे वय नव्हते त्यामुळे आपली जनावराशी तुलना झाली एवढे सुद्धा कळत नसावे मला तेव्हा!

मात्र धामापूर अन तळे ही स्वप्नवत जोडगोळी मनाच्या अडगळीत उगाच जमून राहिली. जरा मोठी झाले तेव्हा आईने मला सुनीता देशपांड्यांची “ती” गोष्ट सांगितली…. “यक्षाचं तळं”. अन तेव्हापासून धामापूरच्या तलावावरला स्वप्नवत धुक्याचा अलवार पडदा अधिकच मनात भरला…

झुळझुळीत चंद्रकळा नेसून, हिऱ्यांचे दागिने लेवून भगवतीच्या देवळाच्या पयरीवर उभ्या असलेल्या सुनीताबाई, त्यांच्या मनातून माझ्या मनात उतरल्या…तलावाच्या पायऱ्या उतरून पाण्याशी गुज करावे तसे हसल्या माझ्या मनात….

तलावातल्या प्रतिबिंबात सुनीताबाईंना त्यांची आजी कशी दिसली असेल? देवळाच्या आवारातले चाफे अजूनही फ़ुलत असतील का पन्नास वर्षांपूर्वी फुलले असतील तसेच?! अशा अनेक प्रश्नांची गूढ किनार धामापूरच्या तलावाभोवती होती…..DSC_0432

बऱ्याच वर्षांनी कधीतरी मामा-मामीसोबत कोकणात गेले होते… अन अचानक सुपारीच्या उभ्य उभ्या स्तंभांची गर्दी समोर आली…. त्यांच्या हिरव्या गर्दीत हरखून गेलेल्या मला खरेच वाटेना की मी खरोखरी त्याच स्वप्नातल्या गावात…. धामापुरात आलेय! मामीच्या मागेमागे भगवतीच्या देवळाकडे निघाले अन बाळपणीचा मित्रसखा अवचित हात पसरून हसत सामोरा यावा तसा तो आरस्पानी तलाव दिसला.

संध्याकाळचं लाल जांभळं आकाश पसरलं होतं तलावाच्या आरशात….अन तलावाचा काठ गच्च हिरव्या झाडीने विणून काढला होता. जांभ्याच्या खरबरीत पायऱ्या उतरून पाण्याशी आले अन डोकावून पाहिले…तेव्हा माझी आजी खरीच होती माझ्या मागे उभी! तिची मऊसूत साडी अन पायरी उतरताना माझ्या हातावर टेकलेला सुरकुतला स्पर्श….सुनीताबाईंच्या आजीचा हातही त्यांना असाच वाटला असेल का?!

जुन्या दगडी देवळात अंधार दाटला होता. भगवतीसमोरच्या इवल्या दिवलीने मात्र एकटीनेच प्रकाशाचा उत्सव साजरा केला होता…. गर्भगृहातून गाऱ्हाणं घुमत होतं…त्याचा ठेका अन आर्त स्वर वाऱ्याने कापरा होत असे तलावाशी येतायेता….DSC_0399-001

संध्याकाळभर दगडी पायरीवर बसून पावलाशी झोंबणाऱ्या माशांना पहात राहिले मी मनभरून….. मामीने हाक दिली तेव्हा तलावावर चांदण्यांची नक्षी उमटली होती….सुनीताबाईंची चंद्रकळाच का तलावावर लहरत होती? कोण जाणे… त्यांनी गोष्ट लिहिली होती त्यांच्याच भूतकाळाची…. कि माझ्यासारख्या छोट्या पोरींच्या स्वप्नाची?!

मुक्यानेच घरी परतले त्या रात्री अन माझे काहीतरी त्या तलावातच विसरून आले जणू…. माझे मन त्या चुकलेल्या ढोरागत पुन्हा पुन्हा त्या तलावाभोवती घुटमळते अजून.

अगदी अलीकडेच मामी पुन्हा मला घेऊन गेली कोकणात. पुन्हा ती सुपाऱ्यांची गर्दी समोर आली अन मी बावचळून गेले! मामीने अगदी न सांगता मला अलगद नेले त्याच तळ्याच्या भेटीला, मला पुन्हा एकदा हरखलेली पहाण्यासाठी… मीही उत्साहात निघाले आजीचा हात धरून पुन्हा त्याच भगवतीला भेटायला. “नवरा सापडला किनी, कि मला याच तळ्याकाठी लग्न करायचे आहे!” असा उफराटा बेत देखिल मी मामीला सांगून चुकले!

मात्र यावेळी काहीतरी वेगळेच झाले. माझ्या जांभ्याच्या पायऱ्या आता सिमेंटच्या झाल्यात. मातीच्या वाटेवर फरश्या लागल्यात. चाफ्याच्या झाडाभोवती कुंपण आले…. तलावाच्या नितळ गहिऱ्या रंगावर भडक प्लॅस्टिकचे तराफे आलेत. त्यांच्या आड कचरा साठून कुजतो आता अन त्याचा उग्र तवंग रेंगाळतो पाण्यावर. आता बोटिंगची सोय आहे धामापुरात!! विकास झालाय खरा…..

उगाच भडभडून आले मला…. त्या जुन्या बालमित्राने अचानक सुटबुटात येऊन ओळख दाखवल्या न दाखवल्यासारखे केले तर कसे वाटेल ना, तसेच काहीतरी….

असं म्हणतात बालपणीची स्वप्न मोठेपणी विसरली जातात…. माझं धामापूरच्या तलावाचं स्वप्न मात्र दुखरी नस बनून ठसठसत राहिलं आहे खोल आतवर. माझ्या स्वर्थासाठी विकासालाच पायबंद बसावा असं म्हणत नाहीये मी…. मात्र विकास म्हणजे काय हो नक्की?! असं विचारावंसं वाटतंय काकुळतीला येऊन….

DSC_0404

माझी आजी सांगते, पूर्वी म्हणे धामपूरच्या तळ्यात एक यक्ष रहात असे. गावात कुणाच्या घरी देवकार्य असेल तर त्या घरची स्त्री तलावाच्या पायरीशी फुलांचे दागिने परडीत घालून ठेवत असे, अन यक्षाने दिलेले सोन्याचे दागिने घेऊन जात असे. मात्र कार्य पूर्ण होताच ते दागिने तलावात परत द्यावे लागत. एकदा कुणीतरी लोभापायी ते परत केले नाहीत अन तेव्हापासून यक्षाने मदत करणे बंद केले…

आजही आम्ही माणसं कदाचित हेच करत आहोत. विकासाच्या नावाखाली निसर्ग ओरबाडून खात आहोत….निसर्गाचे दान आदरपूर्वक वेळीच परत दिले नाही तर एके दिवशी तो आम्हाला अन्नाला महाग करेल. त्या तलावाची हाय लागू नये अशी प्रार्थना त्या भगवती देवीसमोर करून आले. तिला सांगून आले हळूच कि आम्हा माणसांना आमच्यातल्याच दैत्यावर मात करण्याची बुद्धी दे…. तुझ्या हिरव्या पदराला राखण्याची शक्ती दे.

देवळातून निघताना वळून पाहिले तिच्याकडे दोन क्षण. ती हसलीशी वाटते माझ्या वेड्या गाऱ्हाण्याला…. तिची हिऱ्याची चमकी दिवलीच्या प्रकाशात हललीशी वाटते.DSC_0448

असति का ऐसे कुणी?!

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे…..

हो… माझ्या भ्रष्टाचाराने पोखरलेल्या, महागाईने गांजलेल्या, भुकेल्या, निर्वस्त्र, बेघर देशावर माझे प्रेम आहे.

इथला कचरा, गटारे, बेशिस्त, हुल्लडबाजी, सिनेमाची थिल्लर गाणी, गुंड अन मवाली, प्रदूषण अवर्षण यावर माझे प्रेम आहे.

रस्त्यावरची भटकी कुत्री, गाय, बैल, डुकरे, कावळे… यांवर माझे प्रेम आहे.

इथली कोरडी क्षार शेते, मृत नद्या अन आटलेली तळी, काळवंडले समुद्रकिनारे अन हरवलेली जंगले यांवर माझे प्रेम आहे.

इथल्या रस्त्यातले खड्डे, फुटलेले नळ अन गळणाऱ्या टाक्या, गेलेली वीज अन दुर्मिळ पेट्रोल यांवर माझे प्रेम आहे.

रिकाम्या शाळा, भरलेली मल्टीप्लेक्स, धुळकट वाचनालये अन चकाकते बाजार यांच्यावर माझे प्रेम आहे.

कारण..

यांच्यावर नाहीतर कोणावर प्रेम करू? Iphone वर कि ipad वर?! यातले काहीही मला परवडत नाही. हा देश मला परवडतो. परवडतो काय, जन्मापासून फुकटच मिळाला आहे! तेव्हा मी त्याच्यावरच प्रेम करते.

तो दोषरहित आहे का? परफेक्ट आहे का? नाही…त्यामुळे याबद्दल मी प्रेम करू शकत नाही.

मात्र मी त्याला थोडासा बरोबर करू शकते. त्याचे चार दोष दूर करू शकते. प्रेम न करता कसा दुरुस्त करू? जनावराला ही जर माणसाळवायचे असेल तर प्रेम करावे लागते… Unconditional की काय तसले प्रेम. हा तर हजारो वर्षे वयाचा वयोवृद्ध तरुण देश आहे. याला पुढे न्यायचे असेल तर याच्या गुणदोषासहित याच्यावर प्रेम केले पाहिजे…

पण म्हणूनही मी याच्यावर प्रेम करत नाही! प्रेम तर उगाच दाटून येते! वात्रट मुलावर त्याच्या आईला येत असेल तसेच! चुका केल्या, उर्मटपणे वागलो म्हणून आमच्या आईबाबांनी आम्हाला सोडून दिले का?! उलट अमच्या चुका दुरुस्त करायला शिकवले…. आता त्यांच्यापेक्षा आम्ही शहाणे झालो, म्हणून आईबाबांना सोडून देतो का आम्ही? मग देश सुद्धा आईबाबांसारखाच असतो. त्याला दूषणे देऊन बाजूला कसे होता येईल? कार्ल शुर्झला देखिल असेच वाटले असावे, “माझा देश, बरोबर अथवा चूक, बरोबर असेल तर तसाच जतन करावा असा, अन चूक असेल तर दुरुस्त करावा असा.”

इथल्या चुकीच्या गोष्टी दिसत नाहीत असं नक्कीच नाही. अन रागही येतो की! आलाच पाहिजे राग! पण त्या रागातून सुधारणा व्हाव्यात. त्या रागातून काहीतरी सृजनशील घडावे.

स्वत:च्या देशाची प्रगती दुसऱ्याने दिलेल्या मापदंडाने मोजता येत नाही. दुसऱ्या देशातली प्रगती इथे “कॉपी पेस्ट” करून चिकटवता देखिल येत नाही. इथले हवा, पाणी, जमीन, संस्कृती, माणसं यांच्यामधून ती प्रगती घडवावी लागते. माणसाला देखिल त्याच्या भूतकाळाला सारून भविष्य घडवता येत नाही. इथे तर दहा हजार वर्षांचा बरावाईट इतिहास आहे. त्याला पुसून टाकून प्रगती होईल?! इतिहासातून देशाचे व्यक्तिमत्त्व घडत जाते. नाहीतर झकपक पोषाख केलेल्या अडाणी माणसासारखा देश नुसताच वरवर आधुनिक दिसतो. त्याला प्रगती म्हणाता येत नाही…. जागतिक हसे मात्र होते!

प्रश्न आहेत. पण त्या प्रश्नांकडे अपण किती creatively पाहतो? जर तसे पाहिले तर प्रश्नातच उत्तरे दडलेली दिसतील. आपले सगळ्यांचे एक उदास निराशावादी conditioning झाले आहे कदाचित. त्याला भेदून बाहेर पाहिले तर ती लपलेली उत्तरे आपल्याकडे पाहून हसताहेत असे वाटते…. “या नि काहितरी भारीपैकी करा बघू!” असे म्हणताहेत असे वाटते.

खूप प्रयत्न करावे लागतील, कष्टाला निलाजरेपणाने सामोरे जावे लागेल, खूप खूप झगडावे लागेल…. प्रवाहाविरुद्ध पोहावे लागेल. मात्र त्याकडे कष्ट म्हणून पाहिले तर सुरू करण्यापूर्वीच कंटाळा येईल ना! त्यात मुक्त आनंद, एक रगेल हास्य अन अशक्य समाधान दिसते आहे…. ते मिळवायचे असेल तर खूप चिकाटी, धीर अन कमालीची हिंम्मत हवी!

“असति का ऐसे कुणी?!”

चौकट….

शाळेत चित्रकला विषयात मला नेहमी दहापैकी नऊ गुण मिळत. एक गुण कापला जाई, चित्राला चौकट न काढल्याबद्दल! सुदैवाने कुणी दहापैकी दहा मिळव म्हणून भुणभुण करीत नसे! मलाही नऊ गुण मिळवून पुरेसा आनंद होत असे त्यामुळे साधी एक चौकट काढून दहा गुण मिळवायचे मात्र लक्षात आले नाही!

पुढे सरकारी चित्रकला परीक्षेत मी नापास झाले, बहुदा चौकट नसल्याने बाद केले असावे!! तर त्यामुळे मला कलेचा “गाभा” शोधावासा असे वाटू लागले! असा काही एक गाभा नसतो शोधण्यासाठी हे तर अगदी इतक्यात कळले. मात्र तोपर्यंत या रंग-रेषांच्या जगाने माझ्या दृष्टीभोवती एक अदृष्य वलय विणून टाकले आहे. या झिरझिरीत जादूच्या पडद्यातून बाहेर पाहताना, सारे जग एखाद्या अचाट चित्रविषयासारखे दिसते! तुमच्याशी संवाद साधण्यासाठी देखिल मला या वलयातून व्यक्त व्हावे लागते. पण त्याने माझ्या अभिव्यक्तीला मर्यादा पडण्याऐवजी अधिक खुलवून आणले आहे!

माझ्या चित्राला अजूनही चौकट नाही…. अन आताशा नापस झाल्याने कुणी माझे गुण कधीच कापत नाही! कला अशा प्रकारे माणसांना अतिशय आनंद देते!

प्रेमाने बांधलेले…

खूप वर्षांपूर्वी उंच उंच गगनचुंबी इमारती माझ्या पुण्यात बांधण्याचं स्वप्न मी पहात असे. हे शहर कुठल्यातरी उंच गच्चीवरून मनभरून पाहण्याचं स्वप्न! मी लहान होते, या शहराचा नवा अध्याय लिहिण्यासाठी उत्सुक होते! पुण्यावर अतोनात प्रेम करणारी अस्सल पुणेकर!

पण गेल्या वर्षभरात काहीतरी गडबड झाली आहे. नाही…. पुण्यावर प्रेम अजूनही आहे माझं, हेच घर आहे ना! पण आता मला त्या आकाशाला खिजवणाऱ्या इमारती नको आहेत….अगदी अज्जिबात! मी अन माझा सगळा गोतवळा इथेच रहात अहोत, किती पिढ्यांपासून! या नव्या शहरातील घर अन त्यासाठी आवश्यक अशी महागडी जीवनशैली आम्हाला परवडेल का?

कोणाला परवडेल, ते ठाऊक आहे मला आता. आम्ही ज्यांच्यासाठी रोज रोज कष्ट करतो, ज्यांची चाकरी करतो, त्यांना परवडेल हे सारे. ते लोक आम्हाला स्वप्न दाखवतील, “खूप मेहनत करा म्हणजे एक दिवस तुम्हीही आमच्यासारखे व्हाल!” मग आम्ही त्यांच्यासारखे होऊ…..सुख-सुविधा विकत घेण्याची ऐपत येईतो मान खाली घालून काम करून झिजलेले म्हातारे! आमच्या सोयी पुरवण्यासाठी कितीकांचा जगण्याचा हक्क हिरावला गेला आहे त्याची रोज जाणीव असेल आम्हाला. अन मग त्या सगळ्या सोयी अन सुविधा पोकळ वाटू लागतील. मग आम्ही त्या पोकळीला न जुमानण्याची सवय करून घेऊ….काहीही मनाला लावून न घेण्याची सवय करून घेऊ, अगदी शुद्ध आनंद देखिल!

हा विनोद इतका क्रूर आहे कि हसू येणार नाही. काचेच्या चकचकाटामागे लपलेल्या या बांधकाम क्षेत्राच्या सत्याने मला काही गुपितं शिकवली आहेत. मी ज्यांच्यासाठी कम करते ते लोक मला या शहराचा चेहरा अन नशीब कधीच बदलू देणार नाहीत. माझ्या स्वप्नातली नगरी प्रत्यक्षात बांधण्याची लोभसवाणी संधी ते मला देतील….फक्त काही तडजोडी करण्याच्या बोलीवर. माझे शहर पुन्हा उजळवण्यासाठी मी साऱ्या तडजोडी मान्य करत जाईन. पण माझ्या कल्पनाशक्तीचे मालक ते लोक असतील. माझं स्वप्न ते तुकड्या-तुकड्याने विकतील, तशी ऐपत असलेल्या लोकांना! माझे उरलेले आयुष्य एखाद्या काड्यापेटी- घरात घालवत मी अभिमानाने पाहेन त्या गगनचुंबी शहराकडे, “हे मी उभारले!”. मी कधीही न संपणाऱ्या रांगांमधे उभी राहीन, गर्दीत घुसमटेन, पण खोकत, गुदमरत मी वर पाहेन, “हे मी उभारले!”. गरीब अधिक गरीब होतील, श्रीमंत अधिक श्रीमंत होतील, दोघे एकमेकांना आळीपाळीने लुटतील, माझ्याने बघवले नाही तर मी नजर टाळण्यासाठी वर पाहेन, “हे मी उभारले!”

इथून पुढे, दहा वर्षांनी “हे मी उभारले” असा शिक्का नको आहे मला…. हे उभारण्यासाठी मी हातभार लावलेला नको आहे मला. मान्य आहे ते लोक माझ्याशिवाय देखिल बांधतील, अधिकच भयंकर बांधतील. पण मला त्यातला वाटा नको. माझे घर…माझे शहर कदाचित नष्ट होईल, पण मी मात्र स्वत:चा जीव वाचवण्यासाठी इथून पळून जाणार आहे. माझ्याआधी खूप लोक गेले आहेत! पूर्वी मी त्यांना हसत असे, घाबरट म्हणून हिणवत असे…. पण आता मलाही या बुडत्या नावेतून उडी मारावी लागेल.

नशीब माझे! मला बांधता येते! कुठल्यातरी अज्ञात जागी मी पुन्हा दुसरे घर बांधेन, ज्याच्या पायाभरणीत माझ्याच भाईबांधवांचे तळतळाट नसतील….जे घर केवळ एका विराग्याची गुहा असेल…कलाकाराचे झोपडे असेल….यहून अधिक काहीही नाही.

माझ्यासारखे अजूनही आहेत लोक….ते देखिल येतील. मी त्यांच्यासाठी सुद्धा प्रेमाने बांधेन. आमच्या स्पर्शाने या जमिनीच्या जखमा पुन्हा भरून येतील. ती मनापासून फुलेल. मीही बहरेन थोडी तिच्यासोबतीने, एके दिवशी शांतपणे मरण्यासाठी, माझी माती तिच्या मातीत मिसळून टाकण्यासाठी….

 

 

भेट

वाहिलेल्या फुलांच्या ढिगाऱ्याखाली गुदमरत

तुला पाहण्यापेक्षा मी तुझे दर्शन घेतलेच नाही…

तुझी कर्णकर्कश मिरवणूक बाहेर गाजत असताना..

माझे दरवाजे मात्र घट्ट मिटून घेतले होते …

मला दूषणे दिली गेली त्याच चढ्या आवाजात…

ज्या आवाजात तुझी जयगीते गायली जात होती…

तुझी प्रार्थना करणे सोडून दिले आता..

कारण मागायचे असे काहीच नाही ना!

अन आताशा कुठलेच गीत नाही मी गात…

तुला मौनच उमगते अधिक नेमकेपणाने!

मात्र कधीतरी मोकळ्या माळावर जाते निघून…

तिथे भेटतोस तुझ्या हसऱ्या घननीळ अस्तित्त्वामधून!

असंबद्ध खजिना…

वाऱ्यावर उडणारी धूळ अन डोक्यावर कडाडते ऊन, पायाला चटका देणारे कातळ अन गारेगार नितळ ओढे… गच्च वेलींनी जमिनीला बांधून घातलेली अन तरीही आकाशाला जाऊन भिडलेली जंगले… जंगलवाटेवरचे पानातून गाळून उतरलेले कवडसे….

“मोठ्या जनावराची” नुसती पावलट पाहून उडणारी घाबरगुंडी!

संध्याकाळी सुकल्या फाट्याची मोळी डोक्यावर घेऊन गुरे हाकीत घरी निघालेली एखादी सुरकुतली म्हातारी…. विहिरीवरच्या गुपित-गप्पा, सुना-मुलींच्या वेण्याफण्या, भडक्क फेटे मिरवीत पारावर टेकलेले, पांढरीच मिशी पुन्हा पुन्हा पिळणारे सुरकुतलेले म्हातारे…. टायरमागे काठ्या घेऊन पळणारी शेंबडी पोरे!

चुलीवरच्या तव्यातून निखाऱ्यावर भाकरी पडताच सुटणारा खरपूस भुकेचा वास!

मिरचीची फोडणी, खोबऱ्याचे वाटण…. हिरवट ओले मऊशार सारवण….

मुलायम काळ्या मातीत पाट सोडताना घमघमणारा मृद्गंध…. अन त्या पाण्याच्या जोरावर स्वार होऊन डोलणारी पोपटी हिरवी शेतं…

ज्वार-बाजरीचे ढीग… अन भातखाचरातली गाणी….

बांधावरच्या सर्पदेवाला कोंबड्याचा निवद! सक-सकाळी दरीत घुमणारी मोरांची केक!

दुपारभर वळचणीला चिमण्यांची घाई… चिखलामधून टोच्या मारीत कोंबडीची पिलावळ…

दूर आकाशात गिरक्या घेत पिलांपाशी लक्ष ठेवणारी घार…

जत्रेमधल्या रंगीत बांगड्या…. आकाशपाळण्याची सफर!

रात्रीच्या थंडीत टोचऱ्या घोंगड्याची ऊब! शेकोटीभवती थरथरत ऐकलेल्या भुताच्या गोष्टी… सावलीमधून लवलवणारा पिंपळावरचा मुंजा!

देवघरात निरांजन, अंगणात रांगोळी…. दारावर लावलेली आंब्याची डहाळी…

सूर सनईचे मुलायम, ताशाचे कडक! कुस्तीचे….अन तमाशाचे फड…

देवळात घंटा…. आरतीला बेताल टाळ्या!

सूक्त, स्तोत्र, मनाचे श्लोक….

अंधारे नागमोडी जिने अन त्यांच्यावरल्या गुप्त प्रेमकथा!

 

या साऱ्यांचा काही काही संबंध नाही… पण तरीही हे सारे मी उगाच कवटाळून बसले आहे… एका लालबुंद संध्याकाळी.

रस्त्याकडेची संस्कृती…..

रोज घरी जाताना मी रस्त्याकडेला थांबून भाजी घेते. मीच काय आपल्या घरातलं कुणी ना कुणी हे काम करतंच की! काल मात्र रस्त्याची कड स्वच्छ अन सुनीसुनी होती. एका टोकाला महापालिकेचा ट्रक उभा होता…. अन त्यात कोवळ्या कोवळ्या मेथी, कोथिंबीरीच्या जुड्या भरलेली पोती कोंबली होती. भाजीवाले अन पालिकेचे लोक एका घोळक्यात घासाघीस करीत उभे होते…..

हा काही आजचा प्रसंग नाही… अधूनमधून रोजचाच प्रसंग आहे. वृत्तपत्रात यावर किती वर्ष किती लिहिलं गेलं आहे…. “अनधिकृत” फेरीवाले पथारीवाले, त्यांचे प्रश्न, त्याची उत्तरं, त्यावर चर्चा….अजूनही चालू आहे.

अगदी वाहतुकीच्या आड येईतो हा बाजार वाढत जातो. गाड्या अडतात… वाहतुकीची कोंडी अन भांडणे….. मग लेखी तक्रारी…. मग कुणीतरी उपाय काढला कि शहराच्या प्रत्येक भागात एक छोटी मंडई बांधावी, तिथले गाळे भाजी विक्रेत्यांना वाटून द्यावे. मग या छोट्या बाजारातले गाळे भरपूर ओळखीपाळखी असलेल्या दलालांना मिळाले. भाजीबाजार मात्र रस्त्याकडेने चालूच राहिला. भाजी घेणाऱ्याना घरी जाताजाता भाजी मिळतेय अन हातोहात विक्री होतेय… छोटे भाजीविक्रेते रस्त्याचा काठ काही सोडत नाहीत.

चूक त्यांची नाही… भाजी घेणाऱ्या लोकांचीही नाही…. रस्त्याला अडथळा नको म्हणून अनधिकृत हातगाड्या उचलणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्याची चूक असेल का…. तो रस्त्यापर्यंत फर्निचर मांडून बसलेल्या दुकानवाल्या मारवाड्याला ठणकावू शकत नाही पण हातावर पोट असलेल्या भाजीवाल्याची हातगाडी खसकन ओढून ट्रकमध्ये टाकू शकतो…. हे कसे?

चूक आपल्या व्यवस्थेची आहे… आपण वागतो पौर्वात्य मनाने…. अन व्यवस्था मात्र पाश्चिमात्य उचलतो. त्यातून होणारे गोंधळ निस्तरताना अजून खोल पाय अडकतो आपला….

“तिकडे अमेरिकेत नाय हा असले घाण रस्ते”, या देशी-अमेरिकनांच्या वाक्याचीच आताशा चीड येऊ लागली आहे. मनात येतं, “हे माझे रस्ते आहेत. नाही तुम्हाला पटत तर जावा तुमच्या अमेरिकेतच! इकडे जसं अळूचं फद्फदं मिळतं तसं अमेरिकेत नाही की मिळत! म्हणून आम्ही म्हणतो का कि अमेरिका चांगली नाही?!” इकडे मात्र अमेरिकन मोजमाप कशासाठी?

एका ठरलेल्या ठिकाणी, “मॉलमध्ये” प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला बाजार भरवण्याची पद्धत पाश्चिमात्यांची आहे. आपली बहुसंख्य जनता कामावरून घरी येता जाता “ताजी” भाजी घेऊन जाते. मग आपला बाजार रस्त्याच्या कडेनेच चालणार. पुण्यात आल्याच की टोलेजंग मॉल, पण रस्त्यावरचा भाजीबाजार इंचाने तरी मागे हटला का?!

भाजीवाले… त्यांचे वरच्या पट्टीत हेल काढून ओरडणे…. घासाघीस अन बाचाबाची… वैयक्तिक ओळखी अन त्यातून मिळणारे बिनहिशेबी डिस्काउंट!! “ताई तुमच्यासाठी कोथिंबीर सात रुपये लावली, बाहेर नऊ रुपयाच्या खाली नाही भेटणार!” काकूंच्या पिशवीआडून तोंड घालत कोबीचा गड्डा फस्त करणारी भटकी गाय… धंद्याच्या टायमाला तिला हकालाणारा पण रात्री गर्दी सरली कि उरलेल्या भाजीतली कोमेजल्या पाल्याची जुडी स्वत:च्या हाताने त्या गायीला घालणारा भाजीवाला….

हे सगळं अनधिकृत कसं असू शकेल?

या सगळ्या गोंधळाची… कोलाहलातच स्फुरणाऱ्या जीवनाची सांस्कृतिक किंमत शून्य कशी असेल?

नाहीत आमचे एकूणएक रस्ते स्वच्छ….नाहीत सगळे रस्ते गुळगुळीत आठपदरी अतिवेगवान द्रुतमार्ग….

पण या रस्त्यांना एक संस्कृती आहे, एकेक भिन्न व्यक्तिमत्त्व आहे…

सिंहगड रस्ता मला एखाद्या घरगुती बाईसारखा वाटतो, गृहोपयोगी वस्तूंनी गजबजलेला…. सध्या घरच्या सुगरणीसारखा!

लक्ष्मी रस्ता मात्र नावाप्रमाणे, ठेवणीतली नऊवार नेसून, पेटीतले दागिनेबिगीने लेऊन आलेल्या घरंदाज बाईसारखा…

फर्ग्युसन रस्ता फटाकड्या कॉलेजकन्येसारखा इवल्या कपड्यात ठुमकत पाणीपुरीपासून महागड्या कॉफीपर्यंत सारे खात खिदळत मिरवणारा!

रस्त्याकडेलाच तर समाजाचे व्यक्तिमत्त्व जन्माला येते…वाढते…. अन त्याचीच संस्कृती तयार होते…. त्यावर अधिकृततेची मोहर लावा न लावा काय फरक पडतो?!

या विविधरंगी संस्कृतीला पुसून टाकूनच शिस्त अन स्वच्छता आणावी लागेल का? तशी बाहेरून ती आमच्यात रुजेल का?

कि छोट्या मनातून रुजवून फुललेल्या एका रंगीत, जिवंत, सुसंस्कृत अन स्वच्छ रस्त्याचे अन पर्यायाने देशाचे स्वप्न आम्ही पाहू शकू?

कमला सारंग….

गाण्यासारखा हेल काढीत घोळवलेल्या इंग्रजीत प्रत्येक मल्याळी माणसाने मला बजावले होते कि जर तू लगून पहिले नाहीत तर तू केरळ पुरता पहिलाच नाहीस! मी देखील हसून मान डोलावली होती. आमच्या गाईडसाहेबांच्या नियोजनात लगून होते कि नाही समजणे अवघडच होते!

पण “त्याने” त्याच्या या देवभूमीत माझ्यासाठी काही खास योजले होते!

परतीची रेलवे तिकिटं शेवटच्या दिवसापर्यंत पक्की झालीच नाहीत. पुण्यात येण्यासाठी पुढची सोय होईतो मला कुमारक्कमच्या वेम्बनाद लगूनमधल्या हाउसबोटवर एक रात्र काढण्यावाचून पर्यायच उरला नाही!!

परतीच्या सोयीची चिंता वाऱ्यावर अन गाईडवर सोडून मी दात काढत हाउसबोटीकडे मोर्चा वळवला. नारळाच्या झावळ्यांनी विणलेली हाऊसबोट मंद लाटांवर डोलत होती. तिच्या अणीवर चकचकीत पितळी पाटीवर तिचे नाव कोरले होते, “वॉटरलिली” मनात तिचे मराठी बारसे करूनच टाकले….कोय-कमला!

या कमलेचे मालक, थॉमस अब्राहम आपले सुदन्त हास्य करीत स्वागताला आले. त्यांचे टोपण नाव “अनियन कुंजू” (म्हणजे छोटा भाऊ) त्यांच्या मूळ नावापेक्षा मोठे नाही का हा प्रश्न मी गिळला. साधे मुंडू नेसलेला हा मल्याळी छोटा भाऊ हाउसबोटीसोबत लगूनमधल्या काही भात खाचरांचा देखिल मालक होता!

आम्ही बोटीवर (शक्य तितके) स्थिरस्थावर होताच दोन आडदांड दिसणाऱ्या अबोल मल्याळी माणासांनी बोटीचा सुकाणू हातात घेतला. काठाने हळूवार मागे सरत जाणाऱ्या नारळाच्या बागा अन त्यात लपलेली मंगळूरी कौलाची घरं पाहण्यात मी हरखून गेले असताना आमची बोट बंदर सोडून लगूनच्या जादुई विश्वात शिरत होती….

वरच्या डेकवर, मुख्य डेक सारखा गलबलाट अन गोंगाट नव्हता….तिथल्या शांत एकांतात, गार वारा अन सोनेरी निवते ऊन मान उंचावून चेहऱ्यावर घेत कुणालाही जॅक डॉवसनसारखे वाटेल! विश्वाचे सम्राट असल्यागत!

या हाउसबोटीवर तथाकथित ऐष-आरामाच्या सर्व सुविधा असतात… वातानुकूलित खोल्या, अत्याधुनिक स्नानगृह, जेवणाचा डेक अन सर्व तऱ्हेची मदिरा! इथले जेवण म्हणजे एक साग्रसंगीत कार्यक्रमच असतो. चमचमीत मासे अन जोडीला वाईनचे ग्लास टेबलावर येत होते…त्यासोबत गप्पांना ऊत आला होता… सरतेशेवटी सगळ्यांचा हसून निरोप घेतला…

आता वरचा डेक पूर्ण शांत, निर्मनुष्य होता… चांदण्यात न्हायलेल्या तिथल्या लाकडी फ़रशीवर चालताना कसे आबदार वाटत होते…. डेकच्या दुसऱ्या टोकाला टेबलावर वाईनचे ग्लास मंद चमकत हेलकावत होते…. केरळी लघुकथांचं माझं पुस्तक हलक्या वाऱ्यावर पान फलकावत राहिलं होतं….

खालच्या तळ्यात चंदेरी लाटांच्या रेषा उमटत होत्या….जणू वितळलेल्या चांदण्यातच माझी बोट हेलकावत उभी असावी. दूर क्षितिजाजवळ माडांच्या काळयासावळया आकृती धुक्याने झिरझिरीत झाल्या होत्या…. सगळ्या आसमंतात “त्याचे” मिष्किल मंद स्मित भरून राहिले होते… मग मीही उत्तरादाखल हसले किंचित, माझ्या तिथे असण्याला…. अन असूनही हरवण्याला….

मला समजले होते कि त्या रात्रीचे सौंदर्य अन अविस्मरणीय जादू ही काही त्या तलावतून, चांदण्यातून किंवा बोटीतून जन्माला येत नाही…. तर ते आपल्यातल्याच अंत:स्थ सुंदरतेचं प्रतिबिंब असतं.

सगळी रात्र मी जागी होते की स्वप्नात कोण जाणे… पण पूर्वेला पहाटेची गुलाबी छटा येताना मी मनात एक अविस्मरणीय रात्र साठवून घेतली होती. सकाळ उत्साही अन जिवंत झाली तीच बोटीभोवती पक्ष्यांच्या हालचालीने…. बदकं, बगळे अन किती तऱ्हेचे पाणपक्षी आपापल्या पोटापण्याच्या कामाला लागले होते. जवळच्या एका तारेवर वेडा राघू मोठ्या गंभीर आविर्भावात बसला होता. मधेच एखादी अनपेक्षित झेप घेऊन तो पुन्हा त्याच्या जाअगेवर बसे तेव्हा चोचीत एखादा गलेलठ्ठ चतुर पकडलेला असे!

आमचे कॉफीचे कप रिते होईतो ऊन चढू लागलं होतं. घरी परतण्याची तयारी करताना, हे घर नसल्याची उदास जाणीव टोचू लागली! मुख्य डेकवर आमच्या बोटीचे “खलाशी” सज्जीवन-अन्टोनी निघायची तयारी करीत होते. मी सज्जीवनला विचारले, “मल्याळम मधे बोट चालवणाऱ्याला काय म्हणतात?” हा काय प्रश्न झाला?! अशा थाटात त्याने सहज उत्तर दिले, “सारंग!”

कोकणापासून कितीक किलोमीटर दक्षिणेला मला माझ्याच मायबोलीतला शब्द पुन्हा भेटला… कोकणातला एखादा सख्खा नातलग भेटावा तस्साच!

सज्जीवनने सुकाणू माझ्या हाती दिला अन बोटीचे पंखे उजवी-डावीकडे कसे फ़िरवायचे याचे शिक्षण दिले…. पाणवनस्पतींच्या बेटाबेटांतून वाट काढत आम्ही पाण्यावरच्या अन काठावरच्या आयुष्यावर गप्पा मारत निघालो. सज्जीवनला त्याचे काम अन लगूनवर राहणे आवडत होते. त्याचे उरलेले कुटुंब कोट्टयमला होते अन त्याची मुलगी, “अनुश्री” तिथे इंजिनियरिंग कॉलेजात शिकत होती. (बाकी केरळभर इंजिनियरिंग कॉलेजांची रेलचेल आहे!)

या सारंगाच्या कुशल हाताखाली आमची कमला हेलकावत बंदराला लागली…. सवयीच्या लाडक्या मातीवर पाय ठेवला अन निरोप घ्यायला वळले… कमलासारंग सज्जीवन-अन्टोनीच्या जोडगोळीला हसून हात करताना पावले जड होण्याचे काही कारण नाही असे स्वत:ला दटावले.

परतीच्या प्रवासात सज्जीवनचे सहज शब्द मनात घुमत होते, “नाव वळवतो तो…..सारंग”

या विचित्र अनुभवांच्या बेटांतून मला वळवतो अन त्याचे चंदेरी प्रतिबिंब साऱ्या जगाच्या तळ्यात दाखवतो तो….. सारंग

संतसाहित्यात देवाला नेहमीच नावाड्याची उपमा दिली ती उगाच नाही. जगाच्या खडकाळ किनाऱ्यापासून आत्म्याची नाव अथांग आनंदाच्या खोल समुद्रात वळवणारा….. सारंग.