भेट

वाहिलेल्या फुलांच्या ढिगाऱ्याखाली गुदमरत

तुला पाहण्यापेक्षा मी तुझे दर्शन घेतलेच नाही…

तुझी कर्णकर्कश मिरवणूक बाहेर गाजत असताना..

माझे दरवाजे मात्र घट्ट मिटून घेतले होते …

मला दूषणे दिली गेली त्याच चढ्या आवाजात…

ज्या आवाजात तुझी जयगीते गायली जात होती…

तुझी प्रार्थना करणे सोडून दिले आता..

कारण मागायचे असे काहीच नाही ना!

अन आताशा कुठलेच गीत नाही मी गात…

तुला मौनच उमगते अधिक नेमकेपणाने!

मात्र कधीतरी मोकळ्या माळावर जाते निघून…

तिथे भेटतोस तुझ्या हसऱ्या घननीळ अस्तित्त्वामधून!

शेवट…

असाच असावा शेवट सुरुवातीच्या जोडीचा….
पावसाळ्यात आठवणा़र्‍या आमरसाच्या तोडीचा….
असाच असावा शेवट… कधीच न संपणारा….
एक क्षण सावरलेला, सरणारा… सदैव उरणारा…
शेवट म्हणजे व्हावी सुरुवात, अंतापुढल्या सुरुवातीची…
थोडी रडवेली अन थोडी हसर्‍या गाली मिरवायाची!

देवदार बोलावतोय…

सरसरत्या धुक्याच्या अवगुंठनात हरवलेली हिरवाई
अन दरीकपारीतून झरणारी वार्‍याची नरमाई…
नि:शब्द बरसणे…कधी हिमाचे
अन कधी सोनसळी परागांचे
शतकांपासून सगळ्या निसर्गविभ्रमांना तो पहातोय..
तटस्थ उभा देवदार आज मला बोलावतोय…

धरणीची करणी की स्वर्गाचे दार
“त्याच्या” सलामीत जणू उभे देवदार…
निस्वार्थ बहरणे… इवल्या फ़ुलांचे….
अन या प्रचंड नगाधिराजाचे…
खुज्या माणसाला तो नभाशी जोडतोय…
तटस्थ उभा देवदार आज मला बोलावतोय..

देवबनातून घुमतेय हलकी शीळ वार्‍याची…
धुक्यात गवसलेली सोनेरी तिरीप उन्हाची..
निस्संग विहरणे, कधी विहंगांचे
अन कधी माझ्याच मनाचे…
अवघ्या हिमालयाचा आत्मा माझ्या मिठीत घेतोय..
आज मीच देवदार झालोय, मी तुम्हाला बोलावतोय…

फितूर

मन आधीच तुझ्यासाठी आतूर…
त्यात नशीब माझं, तेही तुलाच फितूर…

किती प्रयासे मी गायले गीत असे बेसूर…
तुझी बासरी तरी जोडते कसा रे स्वर्गसूर..

महत्निश्चये चालते मी तुझ्या घराहून दूर…
वाट दिसेना परंतु दाटे डोळा माझ्या पूर..

परत केली तुझी बासरी, तुझेच सारे सूर..
मनात माझ्या तरी वाजती तुझे चरण नुपूर..

मन आधीच तुझ्यासाठी आतूर…
त्यात नशीब माझं, तेही तुलाच फितूर…

दुर्गाहर…

भस्मविलेपित व्याघ्रांबरधर मनी असा भरला…

हिमालयाच्या पुत्रीने शिव महादेव वरला…

ध्यानमग्नसे तीक्ष्ण नेत्र अन प्रचंड तांडवकर्ता…

महत्संकटे विरून जाती शिवरूप असे स्मरता…

दुर्घट भारी ऎसी दुर्गा, क्रोध तिचा नुरला…

हिमालयाच्या पुत्रीने शिव महादेव वरला…

***

शिरचरण शिवरूप, मज स्मरण शिवरूप।

देहकरण शिवरूप, दे मज मरण शिवरूप।।

धरा गगन शिवरूप, सूर्यकिरण शिवरूप।

पूर्णशरण शिवरूप, दे मज मरण शिवरूप।।

तुझी आठवण- II

तुझी आठवण आता खरंतर नाही यायला पहिजे ना…
दिसणार नाहीस रोज याची सवय व्हायला पाहिजे ना…

दिवस म्हणजे मख्खपणा
रात्र शिरशिरी सरत नाही…
रडणंबिडणं मूर्खपणा तरी
डोळचं पाणी खळत नाही…
आता तरी वेडेपणा शहाणा व्हायला पाहिजे ना?!
तुझी आठवण आता खरंतर नाही यायला पाहिजे ना…

तुझं एकुलतं एक पत्र
अजून कशाला उशाशी?
माझ्याकडल्या तुझ्या वस्तू
ठेवून दिल्यात हाताशी…
आता तरी मन यातून मोकळं व्हायला पाहिजे ना?!
तुझी आठवण आता खरंतर नाही यायला पाहिजे ना…

प्रेम प्रेम म्हणजे काय
कधी कुणाला कळलंय का?
ज्यांना कळलं त्यांना तरी
या जन्मी ते वळलंय का?!!
आता मात्र तुला हसून निरोप द्यायला पहिजे ना?!
तुझी आठवण आता खरंतर नाही यायला पाहिजे ना…

तरी तुझ्या दारावरती
एक क्षण नजर थांबते…
लवून पापण्या अश्रूंवरती
प्रेमाचा ती मुजरा करते…
प्रेमकविता टुकार असतात तरीही लिहायला पाहिजेच का?!
तुझी आठवण आता खरंतर नाही यायला पाहिजे ना…

कवितावाद…

http://amrutsanchay.blogspot.com/2011/01/blog-post_23.html इथे सुरुवातीची सुरुवात वाचा…

😦
दारे-खिडक्या सताड उघड्या
बाहेर पडू देत नाहीत अदृश्य बेड्या
खिडकीतल्या आभाळात मळभ साठतयं…
मला फार एकटं वाटतयं…
😦

-स्वानंद

आकाशात बसलेली बोळकी आज्जीबाई
तिला म्हणावं करत जा थोडी साफसफाई…
झाडू फिरव आकाशात, बघ मळभ सरतंय…
आज्जीबाई आहे ना, मग कश्श्याला एकटं वाट्टंय?!!

-अनुज्ञा

म्हटलं मी आज्जीला “झाडू जरा मार”
“मला नाही वेळ” -म्हणे “कामे आहेत फार”
कुरकुरणार्‍या आज्जीशी हुज्जत कोण घालणार ?
एकटं वाटायचं ते एकटंच वाटत राहणार…

-स्वानंद

कुरकुरणाऱ्या आज्जीला दे लिम्लेटची गोळी…
काम जरा राहू देत, आधी शोध तिची कवळी…
गोष्ट सांग एखादी, म्हणावं, झाडू मग नंतर…
कुरकुरणारे आजी-नातू, दोघांत नाही अंतर!!

-अनु्ज्ञा

नेहमी का ‘मी’च चांगले वागायचे?
दुसर्‍याच्या मनासाठी स्वत:चे मारायचे
आजी नको, गोष्ट नको, नको कोणी कोणी
एकटचं इथे राहू दे मला वेड्यावाणी

-स्वानंद

ठीक आहे…
ठीक आहे तुला मुळी नको कोणी कोणी…
आता मीही धाडणार नाही शब्दांमागून गाणी…

-अनुज्ञा

कुणाला कशाला उगाच माझा त्रास?
माझाच मला लखलाभ प्रवास…

-स्वानंद

नको नको करता प्रसविता…
ही घडतेच पुन्हा कविता…
रुसल्या कवीला कशास पुसता…
हसतो पडता, रडतो हसता…

-अनुज्ञा

या कवितावादाचे मूळ कवी इथे सापडतील….

http://amrutsanchay.blogspot.com/

“माझे मन… माझ्या कविता..”

-स्वानंद मारुलकर

रे नभा…

कशी इथे उभी कंपित अधरा…
रे नभा कवेत घे तुझी ही धरा….

शतकांची भ्रमणे अन ग्रहणे सरली…
दिवसांची पडछाया रात्र पसरली…
श्वासांचे धरणीकंप रोधुनी जरा…
रे नभा कवेत घे तुझी ही धरा…

सावर…

मोजल्या मात्रा अन तोलले मी शब्द आजवर
पण त्यात ओतलं माझं मन ओंजळभर…
प्रेम शब्द मात्र टाळला, जशी टाळली नजर…
तू तर साद ही दिली नाहीस, तरी राहिले मी हजर….

पण तुझा तर साराच मुक्त छंद…
गुलाबांचे ताटवे अन भ्रमण स्वच्छंद…
मागे घेऊन प्रेमाचा जाच मी सरले थोडी दूर…
पण दुराव्यातही ओतलं माझं मन ओंजळभर…

आत्ता कुठे होतं आपल्यात एका श्वासाचं अंतर
पाहता पाहता वाढलं अन झालं की मैलभर…
हाक माझी केविलवाणी विरून गेली वाऱ्यावर..
संपलंय त्राण माझ्यामधलं आता तूच सावर…

तुझी आठवण…

तुझी आठवण येते तेव्हा…

मी तुझ्याच आठवणी उलगडून बसते…

तुझी आठवण येते तेव्हा…

मी मलाच नकळता हसते….

तुझे शब्द, तुझी गाणी….

तुझी आठवण, डोळ्यात पाणी…

तुझी माया, तुझा स्नेह…

तुझाच स्पर्श, पण जळणारा माझा देह…

माझ्या मिठीत तुझा एक विसरलेला सदरा….

तुझ्या हातात माझ्या अश्रुंचा कोमेजेलेला गजरा….

तुझं माझं फार करते, अन तुझ्याशीच भांडते…

मी भलती हट्टी, तरीही तुझ्याशीच संसार मांडते…

तुझ्या रागापोटी होतं आकाश पाताळ एक…

मी तुझ्या वादळातली क्षणभराची विद्युत रेघ…

तुझ्या प्रेमाचा वसंत फुलतो तेव्हा….

मी उमलते प्रत्येक फुलात, तू हसतोस जेव्हा…

तूच मांडतोस खेळ रेषांचा, तूच पुसून टाकतोस!

मी ती आकारहीन वाळू, ज्यावर तू हात फेरतोस…

तुझी आठवण येते तेव्हा…

मी तुझ्याच आठवणी उलगडून बसते…

तुझी आठवण येते तेव्हा…

मी मलाच नकळता हसते….