आपण सूक्ष्मजीवांना का घाबरतो…?

एका वाक्यात सांगायचं तर आपल्याला डेटॉलने घाबरवलं…. बाकी काहीच नाही झालं.

आपल्या भोवतीची हवा, पाणी, आपलं अन्न, इतकंच काय आपले केस, त्वचा, तोंड सगळीकडे सूक्ष्मजीव उदंड नांदत असतात.

सूक्ष्मजीवांच्या मदतीशिवाय दही, चीज, इडली, डोसा, ब्रेड शक्य नाहीत. आपल्या पचनसंस्थेतील सूक्ष्मजीवांच्या मदतीशिवाय अन्नपचन शक्य नाही, कुठल्याही जैविक वस्तूचं विघटन शक्य नाही.

या पृथ्वीवर सूक्ष्मजीव आपले निव्वळ शेजारी नाहीत तर सहचर देखिल आहेत. त्यांची संख्या, वैविध्य अन सभोवतालाशी नवनवीन प्रकारे जुळवून घेत टिकून राहण्याची जिगीषा पाहता अनेक अभ्यासक असं मानतात की सूक्ष्मजीवांनी व्यापलेल्या या जगात एक आपली माणूसजमात देखिल राहते!

इतकेच काय तर, माणसाचा इतिहास हा बराचसा जंतूंनी घडवला आहे असे प्रतिपादन काही अभ्यासक करतात! साथीचे रोग अन त्यातून झालेल्या राजकीय उलाढाली पाहता त्यात काहीच चूक नाही. आपण सूक्षजीवांशी पिढ्यानपिढ्यांपासून भांडत आहोत. गेल्या दोन शतकातील वैज्ञानिक प्रगती नंतर आपल्याला सूक्ष्मजीवांचे विश्वव्यापी स्वरूप लक्षात आले पण त्यांच्यावर मात करता आलेली नाही हेच सत्य आहे.

सूक्ष्मजीवांच्या अभ्यासातून व्यक्तिगत स्वच्छतेच्या अनेक नियमांना सबळ पुरावा मिळाला. नियमित आंघोळ, शौचानंतर अथवा जेवण्यापूर्वी हात धुणे, खाण्यापिण्याचे पदार्थ अन पाणी स्वच्छ ठेवणे इतपत ढोबळ पायाभूत स्वच्छतेच्या नियमांचे आरोग्य राखण्याच्या दृष्टीने महत्त्व आपल्याला समजले.

एकीकडे सामाजिक स्वच्छतेचे नियम तर सांगूनही आपल्याला अजून आचरणात आणता येत नाहीत. मात्र दुसरीकडे सूक्ष्मजीवांचा नायनाट करण्याच्या हौसेला मोल उरले नाही. “मॉं माने सिर्फ डेटॉल का धुला” हेच स्वच्छतेचं ब्रीदवाक्य झालं. ते टीव्हीवर सूक्ष्मदर्शकाच्या गोलात एका बाजूला वळवळणारे जंतू अन दुसरीकडे स्व्च्छ पांढरं हे प्रतीकात्म चित्र आपल्याला खरंच वाटू लागलं. संडासात बसून माणसांच्या आरोग्यावर हल्ला करण्याचे बेत आखणारे हिरवे-पिवळे विचित्र जीव पाहता पहता सरसकट सगळेच सूक्ष्मजीव आधुनिक खलनायक झाले. आणि त्यांचा पाडाव करण्यासाठी जहालातील जहाल रसायनांचा वापर अपरिहार्यच झाला.

त्यांचे जग साध्या मानवी डोळ्यांनी दिसत नाही अन सूक्ष्मजीवांचा संपूर्ण नायनाट माणसाच्याने शक्यच नाही. खरंतर आपल्या ऍंटीबायोटीक्स, डिस इनफेक्टंट इत्यादींनी सूक्ष्मजीवांना काहीएक फरक पडत नाही हे गेल्या काही दशकात अभ्यासकांच्या लक्षात आले आहे. आपण जर सूक्ष्मजीवांना हरवू शकत नसू तर काय करायचं?! त्यांनाच सोबत घेऊन लढता आलं तर?!

पायाभूत स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे, योग्य आहार अन व्यायामाने शरीराची काळजी घेणे अन आपली प्रतिकार शक्ती उत्तमातल्या उत्तम स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करणे इतकेच खात्रीशीर आपल्या हातात असते. कितीही प्रयत्न केले तरी रोग पसरवणारे सूक्ष्मजीव माझ्या संपर्कातच येऊ नयेत अशी काळजी घेणे निव्वळ अशक्य अन हास्यासपद आहे. मात्र आपल्या शरीरात रोग पसरवणाऱ्या सूक्ष्मजीवांसोबत त्यांना विरोध करणारे जीव देखिल जर असतील तर आपण रोगाला प्रतिकार करू शकू. म्हणजेच आपली खरी सुरक्षितता सूक्ष्मजीवांच्या जैवविविधतेत आहे.

आपल्या शरीरातील “अंगभूत” प्रतिकारशक्ती भलतीच मजेदार गोष्ट आहे. अनेक प्रकारच्या जीवाणू अन विषाणूंना आपल्या पांढऱ्या रक्तपेशी ओळखत असतात. त्यातील बहुतेक जीवांना रोखणारी प्रथिने आपल्याला बनवता येतात. एकदा एका प्रकारच्या प्रथिनाची ओळख पटली कि पुन्हा त्याच infection ला आपण सहजी बळी पडत नाही. आपण आपल्या शरीराला जितक्या अधिकाधिक जैववैविध्याची, पण मर्यादेत ओळख करून देऊ तितकी आपली रोगप्रतिकारक शक्ति अधिकाधिक ’सशक्त’ होते.

याविरुद्ध १००% जीवाणूमुक्त जगण्याचा प्रयत्न कधीच सफल होत नाही. जितकी नवी रसायने वापरावी तितके सूक्ष्मजीव अधिकाधिक धीट होत जातात, मात्र त्या नादात आपली प्रतिकार शक्तीच आपण घालवून बसलेलो असतो.

सूक्ष्मजीवांची भीति बाळगत सतत स्वच्छतेचा अतिरेक करणे हे पुढारलेपणाचे लक्षण नसून नवे वैचारिक अंधत्व आहे. आणि वैचारिक अंधत्वाला विज्ञान कधीच साथ देत नाही.

गेल्या काही वर्षात अनेक लोकांशी बोलून, प्रतिकारशक्ती अन सूक्ष्मजीवांविषयी उपलब्ध असलेली अथांग अन तरीही अपूर्ण माहिती समजून घेऊन, स्वत:च्या जीवनशैलीत हळूहळू बदल करत मी माझे स्वत:चे सूक्ष्मजीव धोरण बनवते आहे. यात अनेकानेक चित्रविचित्र लोकांचे, अभ्यासक-विचारवंतांचे, फ़िरस्त्यांचे मौल्यवान योगदान आहे. मात्र माझ्या वेडेपणाबद्दल भरपूर लोकांना आक्षेप असणार हे गृहित धरून अन्य वेड्यांचा उल्लेख न केलेला बरा….

मात्र हे सूक्ष्मजीव धोरण सांगण्यापूर्वी काही स्पष्टीकरण गरजेचे आहे…

  • या धोरणात स्थल-कालानुसार, परिस्थिती तसेच गोष्टींच्या उपलब्धतेनुसार ’धोरणीपणे’ बदल होतात. हे एक लवचिक धोरण आहे, धर्म नव्हे!
  • मी वैद्यकीय अभ्यासक, डॉक्टर अथवा तज्ञ नाही. मात्र माझ्या आरोग्याचे निर्णय हवे तसे घेण्याचे मूलभूत स्वातंत्र्य मी पुरेपूर वापरते आहे, इतकेच.
  • हे माझे धोरण आहे आणि निव्वळ उदाहरणादाखल घ्यावे. हे जसेच्या तसे दुसऱ्यांना लागू होऊ शकत नाही, त्यामुळे प्रत्येकाने आपापले धोरण ठरवावे अन पाळावे, मात्र आपल्या धोरणाचा दुसऱ्यांच्या आरोग्याला अथवा धोरणाला त्रास होईल असे काही सहाजिकपणे करू नये!
  • आपल्याला आपले धोरण ठरवायचे नसेल तरीही काहीच प्रश्न नाही. डेटॉल ते काम आपल्या सगळ्यांसाठी करतेच. आपण मुकाट ते सांगतील तसे करावे. बराच मनस्ताप वाचतो!

माझे सूक्ष्मजीव धोरण

तर… मी कामानिमित्त भरपूर फिरते, अन तेही बहुतेक वेळा बऱ्यापैकी दुर्गम भागात, आडगावातून. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आजकाल सगळीकडे विकत मिळतात, पण त्यांचा कचरा मागे सोडत फिरणे अजिबात पटत नाही. मला स्वत:ला सूक्ष्मजीवांपेक्षा अधिक भीति प्लॅस्टीकची वाटते. मी माझी-माझी धातूची पाण्याची बाटली घेऊन फिरते. स्थानिक पाणपोया, चहाच्या टपऱ्या किंवा होटेलं, बस स्थानके अशा सर्वसामान्यपणे अस्वच्छ मानल्या जाणाऱ्या जागी बाटली भरून घेते. घरी देखिल गेली अनेक वर्षे साधं नळाचंच पाणी पिते आहे. कुठलाही फिल्टर नाही, पुण्यात, त्यतल्या त्यात आमच्या भागात तरी बरं पाणी येतं. आपली काहीही तक्रार नाही.

बाहेर खाण्याची वेळ खूपदा येते, तेव्हा स्वच्छतेचा अजिबात विचार करत नाही. मात्र मुक्कामी पोहोचल्यावर स्थानिक, घरचे जे काही पानात वाढले जाईल ते आनंदाने खाते. क्वचित पोटात किरकोळ गुडगुड होण्याव्यतिरिक्त गंभीर काही त्रास आजवर झालेला नाही.

भारतातल्या बहुतेक सर्व गावांमधून आसपासच्या शेतांतून पिकवलेले, घरचे, कधीकधी चुलीवरचे, साधे, शाकाहारी अन स्वच्छ जेवण मिळतेच मिळते. त्यात रासायनिक खता-कीटकनाशकांचा वापर जवळात जवळील शहरापर्यंतच्या अंतराच्या व्यस्त प्रमाणात असतो. जितका भाग दुर्गम तितका रसायनांचा वापर कमी.

मात्र प्लास्टिक सर्व चराचरात भरलेले असल्यामुळे आजकाल गावागावात चूल पेटवण्यासाठी लेय्ज, कुरकुरेची पाकिटं जाळली जातात. त्या तसल्या निखाऱ्यात फुलवलेल्या भाकऱ्यांची मला थोडी भीति वाटते.

पुण्यात रोज सकाळी उठून धुरात अजून धूर सोडत गाडी चालवत, रस्त्यावरच्या मुर्दाड लोकांशी भांडत कामावर जाणे बंद केल्यापासून गाड्यांचा धूर खायला मिळेनासा झालाय. तेव्हापासून सर्दी-पडसं होणं जवळपास बंदच झालं. पूर्वी माझा खोकला महिना महिना ठाण मांडून बसत असे… आजकाल जरा घसा खवखवला तरी आश्चर्य वाटते. पडशाच्या जंतूंना मी आवडेनाशी झाले बहुदा.

त्यातून दोनेक वर्षात एखादं पडसं झालंच तर मी मनाला लावून घेत नाही. उगाच कुठले जंतू आपल्या नाकातोंडात गेले असतील असा विचार करत बसत नाही. चार दिवस मस्त आराम करणे परवडते कारण वर सांगितल्याप्रमाणे रोज गाडी काढून कुठे घडघड करत जायचे नसते.

गावकडची कामं निवांत चालतात… स्वत:च्या आरोग्याशी तडजोड करत खेचावे लागत नाही. पैशांशी तडजोड मात्र करावी लागते थोडी…

स्वत:च्या घरात भांडी-कपड्यासाठी रिठा- लिंबू घालून केलेले व्हिनेगर पुरते. आंघोळीला मसुरीच्या पिठाचे उटणे, साय किंवा स्वयंपाकघरातील बऱ्याच गोष्टी आलटून पालटून चालतात मला! रिठा-लिंबू व्हिनेगर शांपू म्हणून माझ्या केसांना चालते. (सूक्ष्मजीव नसते तर माझे व्हिनिगर कुणी बनवले असते?!)

रिठा-व्हिनिगरचा फेस मस्त होतो आणि सांडपाण्याबरोबर नदीत वहात गेल्याने नदीतील जैववैविध्याला त्याचा काहीही अपाय नाही.

महाराष्ट्र ते दक्षिण भारतात खोबरेल, उत्तरेत, थंडीत सरसोचे तेल केसांना चालते. दही, अंडे असल्या स्वयंपाकघरातील गोष्टी कंडिशनर म्हणून अधून मधून केसांना लावल्या की आपलेच लाड केल्याचे समाधान!

दही, ताक, इडली, डोसे, ब्रेड अन इतर फरमेंट्स आवडीने खाते (आणि पिते). तेवढीच माझ्या पाळीव जैववैविध्यात भर! प्रवासामुळे अधूनमधून अस्वच्छ हाताने रस्त्यावरचे अन्नपदार्थ होतातच….

एरव्हीच्या या असल्या वेडेपणासोबत घरी अथवा मुक्कामाच्या गावी मात्र हात-पाय न चुकता धुते… ज्या गावात पाणी असेल त्या गावात आंघोळ करते, नाहीच मिळाली करायला तर चालवून घेते.

भरपूर ऋतुजन्य, स्थनिक फळं, भाज्या, रानभाज्या मिळतील तशा आवर्जून खाते. रोजरोज गव्हाची साधी पोळी नकोच त्यापेक्षा वेगवेगळ्या धान्यांची विशेषत: नाचणी-तांदळाची भाकरी (स्वत:च्या घरी असेन तर) चालते. तुरीची डाळ गेल्या वर्षी एकदा खाल्ली होती. मसुर डाळ, मूग डाळ किंवा अन्य (कुठल्याही राजकारणात भाव खाऊन न चढणाऱ्या) डाळी खायला लागल्यावर अधिक आवडू लागल्या.

कांदा महाग झाला म्हणजे तो खाण्यासाठीचा योग्य ऋतु नाही असं आपलं मला वाटतं. बरेचदा तेव्हा रानभाज्यांची चंगळ असतेच. काही बिघडत नाही.

स्वयंपाकासाठी रिफाईड तेल नाही. घाण्याचं शक्यतो दरवेळी वेगवेगळं तेल वापरते. एकाच तेलाला काय डोक्यावर घ्यायचं?! मला कुठल्याही तेलाचा वास त्रासदायक होत नाही अन कुठल्याही प्रदेशातील अन्नसंस्कृती अद्याप तरी नावडली नाही.

सगळ्यात ’वैविध्य’ जमलं की कुठलेही एकाच प्रकारचे जंतू पोसले जात नाहीत. त्यांचं वैविध्य जितकं तेवढी आपली तब्येत चांगली रहात असावी असं माझं निरिक्षण आहे.

त्यातून जे मला खात येत नाही ते ते सगळं आमचे कंपोस्टमधले सूक्ष्मजीव खातात… अधूनमधून मिर्च्या, कारली, टोमॅटो उगवलेच तर ते परत मीच खाते!

सूक्ष्मजीवाय नम:!

अर्थात या सगळ्यात मी फारशी आजारी पडत नाही यात माझे काहीच कर्तृत्व नाही, कारण आपली प्रतिकारशक्ती ही अजबच असते, व्यक्तीनुसार बदलते. फारतर माझ्या पूर्वजांच्या जनुकांना अन सूक्ष्मजीवांना धन्यवाद… वयानुसार अन इतर कारणांनी जंतूंमुळे न होणारे आजार होऊच शकतात. मात्र त्यासाठी सूक्ष्मजीवांना बोल लावणार नाही मी!

अजून अनेक गोष्टी अशा अहेत जिथून बाजारू रसायनांना दरवाजा दाखवून सूक्ष्मजीवांना मोकळं सोडायला आवडेल… काम सावकाश चालू आहे. कारण कुठल्याही एकाच धोरणाचा अतिरेक म्हणजे अंधश्रद्धाच पुन्हा…