शेजार….

माणसांच्या आयुष्याचे…. त्यांच्या बरोबर-चूकचे संदर्भ असतात वेगवेगळे. सरळ आयुष्याला कौतुकमिश्रित तिरस्कार वाटतो आडनिड्या वाटेने भटकणाऱ्या स्वच्छंदी आयुष्याचा…. अन मुक्तपणे विहरत उलघडत जाणाऱ्या आयुष्याला त्याच सरळ आयुष्याच्या स्थिरतेचे….. विश्वासाचे असाध्य अप्रूप असते….

माझ्या शेजारणीला षोक आहे स्वच्छतेचा….. माझ्याहूनही जास्त! तिच्या दाराखिडक्यांनाच काय सभोतीच्या भिंतीना देखिल तिच्या भुश्शकन पाणी ओतणाऱ्या बादलीची सवय! बरं पुन्हा तिच्या स्वच्छतेचे शिंतोडे माझ्या घरात उडले तर काय फरक पडणार असा?!

असंही माझ्या घराला स्वच्छतेच्या शिस्तीपेक्षा लहरी नादिष्टपणाचेच अधिक डोहाळे….. मग तिच्या घरातून अलगद वाऱ्यावर स्वार होत आलेल्या कचऱ्याचा अनमान कसा करावा, तोही निमूट माझ्या केराच्या टोपलीत जाऊन बसतो….. शेवटी आम्हा दोघींची घरे स्वच्छ झालीच ना!

माझ्या बागेतल्या कचऱ्याच्या वाफ्याशी मात्र सखी शेजारणीचे कट्टर वैर आहे…. जिथे मला ओल्या कचऱ्यापासून पाहता पाहता उमलणारी मोगऱ्याची फुलं दिसतात तिथे तिला कांद्याची साले, मटाराची टरफले अन असलंच काहीबाही दिसतं…..

चौदा वर्षात हळूहळू कंपोस्टच्या वासावर माझे प्रेम जडले आहे! इतका मऊसूत, जमिनीशी बांधलेला, मार्दवी वास लोकांना दुर्गंध कसा वाटू शकतो असा कैक वेळा विचार करून पाहिला…. पण तरीही पुन्हा मातीत हात घालताना सुखाची शिरशिरी आल्याखेरीज रहात नाही! शेजारीण मात्र पहात असते तिला शिसारी आल्यागत!!

कदाचित माझ्या हसण्याची बाधा तिला होऊ नये म्हणून आठ्यांचे संरक्षण घेत असावी!

मला मात्र कचऱ्यावर पोसलेल्या अळूचे, दोडक्या-कारल्यांच्या वेलींनी घातलेल्या वळ्से-वेलांटयांचेच कौतुक….. कचऱ्यातच पडलेल्या मिरच्यांच्या बिया रुजून जेव्हा चांदणीदार फुलोरे वाऱ्यावर डोलले तेव्हा तर आमच्या घरात नव्या बाळजन्मागत आनंद झाला साऱ्यांना….. त्या झुडपातल्या मिरच्या शोधून तोडून स्वयंपाकघरात नेल्या जात तेव्हा उगाच स्वयंपाक अधिक चांगला झाल्यागत वाटत असे….

या बागेत मी हौसेनी लावलेल्या रोपा-झाडांपेक्षा स्वत:च्या मर्जीने मूळ धरणाऱ्या उत्साही झाडांचेच राज्य अधिक चालते! त्याभोवतीच्या पसाऱ्यात आमच्या घरातल्या इतर छंदांचे अवशेष सापडतात ते वेगळेच! गेल्या चैत्रातल्या मातीकामाचे वेडाचे भेगाळलेले नमुने, पुनरुज्जीवनाची वाट पहात बसलेल्या फुटक्या कुंड्या, गेरूची सुकली ढेकळं अन मातीच्या गिलाव्याची नवी पद्धत आजमावून पाहताना भिंतीवर केलेले नमुन्याचे सारवण!

तिथंच मांडी ठोकून चहा घेत, आपल्याच पसाऱ्याचे कौतुक करत, येत्या रविवाराला आवराआवरीचे खोटेच वचन देत मी रोजची सकाळ घालवते! टागोरांच्या पोरवयापासून ते रविवार लोकसत्तेच्या पुरवण्यांपर्यंत साऱ्या “साहित्यावर” माझ्या बागेच्या मातीचे शिक्कामोर्तब कधीनाकधी होतेच! आमच्या घरातून नव्या जुन्या गाण्यांच्या लकेरी आकंठ येत राहतात जाग असेपर्यंत सारा वेळ….. अन असल्या पावसाळी हवेत इथे उंच डोंगरातून जेव्हा वारा घुमतो तेव्हा दुपारच्या नीरव शांततेलाही कसलीशी राकट, आदिम नैसर्गिक ओढ लावून जातो…. झुळकेवरला श्रावणगंध हुंगून मन भरत नाही….

सारे आकाश ढगाळ ढगाळ…. अन बाहेरच्या कदंबावर फुलोऱ्यांचे चेंडू लटकत असतात वाऱ्यावर झोके खात! सकाळी थोडे जरी ऊन आले तर त्यांवर झुंबड उडते पक्षी, फुलपाखरं अन मधमाश्यांची! खिडकीत अडकावलेल्या खोक्याच्या घरट्यातून चिमणा-चिमणीची पोक्त लगबग चालूच असते….. खाली दरीत माझं लाडकं पुणं उन्हाची वाट पहात सुस्तावलेलं…… कट्ट्यावर आमचा शुभ्र पांढरा बोका देखिल तसाच पहुडलेला, उन्हाची तिरीप आलीच एखादी तर पाठीवर लोळून सूर्यस्नान घेणारा!

मग मीही नि:श्वास सोडत वेताच्या झुल्यात अंग सोडून देते….पुढच्या रविवारच्या सफाईचे नियोजन करत करत डोळा बरा लागतो! जाग येते तेव्हा मी कौतुकाने पहाते तिच्याकडे, शेजीबाई मात्र घसघसून खिडक्या पुन्हा धूत असते आठ्या घालून!