या ग्रामपरीच्या प्रकरणात पडायचंच नव्हतं मला खरंतर….
अगदी नक्की ठरवलं होतं मी कि आता उडाणटप्पूपणा बास करायचा अन शहाण्यासारखं एखाद्या आर्किटेक्टकडे काम करायचं नाकासमोर दररोज दहा ते सहा!
***
इकॉलोजिकल सोसायटीच्या वर्गातला माझा मित्र, रेनी, पाचगणीत काहीतरी काम करायचा म्हणे. ऑयकॉसमधल्या पर्यावरण सर्व्हेसाठी या भूगोलशास्त्रज्ञ मित्राला सोबत घेऊन भरपूर भटकायला मिळालं. तेव्हा मी त्याच्या मूळ कामाबद्दल चौकश्या सुरू केल्या.
तो एम आर ए च्या ग्रामीण पर्यावरण केंद्रात (ग्रामपरी) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचं काम करत होता. आता यातून मला सुद्धा काडीचा अर्थबोध झाला नाही. प्रत्यक्ष जाऊन काय काम आहे ते पाहिल्याशिवाय जिवाला स्वस्थता लाभलीच नसती, म्हणून मी ऑयकॉसचा निरोप घेतल्यावर एका दिवशी तडक उठून पाचगणीला गेले.
सहजच गेले…. या ग्रामपरीच्या प्रकरणात पडायचंच नव्हतं मला खरंतर….
तो जागतिक स्त्री दिन होता. ग्रामपरीच्या आवारात बरीच लगबग चालू होती. आसपासच्या गावातल्या महिला सरपंच अन त्यांचे पुरुष उपसरपंच (आहे किनी मज्जा!) जमले होते. ग्रामपंचायतीच्या कामकाजातला महिलांचा सहभाग निव्वळ प्रतिनिधित्व मिळून सुधारलेला नाही. मात्र ग्रामपरीमधे थोडं प्रशिक्षण घेऊन, कायदेतज्ञांशी, अनुभवी कार्यकर्त्यांशी चर्चा करून या महिला लोकप्रतिनिधींचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला दिसला मला….
रेनीच्या मदतीने ग्रामपरीतल्या सगळ्यांशी ओळखी झाल्या. हसऱ्या जयश्री आंटी, रेनीचे बॉस, डॉ. जॅरेड अन सौम्यावर तर मी बेहद्द खूष होते! हे लोक ग्रामपरीचे डायरेक्टर वगैरे असतात याची फार गंभीर कल्पना नव्हती मला!
कोण कुठल्या देशातून उठून इथे पाचगणीत राहून माझ्या लोकांना पाण्याचं व्यवस्थापन, स्थानिक पर्यावरण, स्वच्छता, योग्य शौचालय बांधणी वगैरेबद्दल विचार अन काम करायला उद्युक्त करणारे हे कोण चमत्कारिक लोक आहेत?!
माझ्या नेहमीच्या अबोलपणावर कडी करून माझे सगळे विचित्र प्रश्न बाहेर उड्या मारत होते. अन तात्पर्य असं की रोजच्यासारख्या त्या साध्या दिवसाच्या शेवटी जॅरेडने मला ग्रामपरीत काम करायचं आवतन दिलं!
मी खूप घाईघाईने होकारार्थी मान डोलावून, तोंडाने नाही म्हणत होते….
पुढच्या आठवडयात जॅरेडसोबत गोडवली गावात चालू असलेलं झऱ्यांच्या व्यवस्थापनाचं काम बघायला गेले. (त्यावर एक अजून पोस्ट लिहू आपण) पण नुसतं बघायला माझं काय जात होतं…..
असंही या ग्रामपरीच्या प्रकरणात पडायचंच नव्हतं मला….
त्याच दिवशी माझ्या कामाचं स्वरूप, कामाचे तास, दिवस अन इतर तपशील ठरत गेले. पुढच्या आठवड्यात मी ग्रामपरीसोबत काम करण्याचा करार केला! हा दोन महिन्यांचा करार अतिशय हुशारीने आखलेला असून त्याच्या कालावधीत भविष्यात वाढ करण्याची तरतूद करण्यात आली आहे! मी मात्र नाही म्हणणार आहे….
अजूनही या ग्रामपरीच्या प्रकरणात पडायचं नाहीये मला….
मग जमेल तेव्हा घरून काम करणं सुरू झालं. झरे पुनरुज्जीवन प्रकल्पाचं संपूर्ण दस्तावेज दोन भाषांत तयार करणे हे मुख्य काम. भरपूर रेखांकने, नकाशे अन चित्रं वापरून पश्चिम घाटात अथवा तत्सम प्रदेशात वापरता येईल असं भूजल व्यवस्थापन हस्तपुस्तक तयार होत आहे.
मात्र त्यासाठी मलाच आधी भूजलसाक्षर होणं भाग होतं. त्याशिवाय कसली रेखाचित्रं काढणार होते?!
मग माझ्या पुणे पाचगणी फेऱ्या सुरू झाल्या. आता एसटी महामंडळ माझं दुसरं घरच झालंय. पुणे महाबळेश्वर निमआरामच्या सगळ्या कंडक्टरांना मी ओळखते आताशा! त्याशिवाय माझ्या नमुनेदार सहप्रवाशांवर एक सविस्तर पोस्ट लिहेन कधीतरी!
पाचगणीत दरवेळी बसमधून उतरले की एक खोल श्वास घेते मी….. सगळा सह्याद्री…. सगळं जंगल… सगळे झरे, दरीवर घिरट्या घालणारे गरूड, पायरीदार भातखाचरं अन भन्नाट गार वारा…. हे सगळं सगळं एका श्वासात भरून घेते!
आता इथून पुढे या सगळ्या प्रकरणात न पडणं शक्यच नाही हे लक्षात येतं माझ्या…..
एम आर ए च्या आवारात शिरतानाच मी दात काढत हसायला लागलेली असते…. जणूकाही संचार होतो माझ्यात कुठल्यातरी उत्साही चिवचिवत्या पक्ष्याचा! चालत जाते कि उडत जाते तेही लक्षात येत नाही!
मग भरपूर चर्चा, झालेल्या कामाचा मागोवा, पुढे काय काय रेखांकने करायची याचा विचार…. कधीकधी सकाळ ते संध्याकाळ गावात चालू असलेल्या कामाची पहाणी. अर्थात त्याला पहाणी म्हणणं हास्यास्पद आहे. जॅरेड अन त्याचे सहायक अशोकभाऊ यांच्यासोबत मी देखिल पोती उचल, सिमेंट कालव असले उद्योग करते. जुने दगडी हौद खराट्याने साफ करण्यापासून सिमेंटची घमेली वाहून नेण्यापर्यंत अन जॅरेडसाठी दिवसभर धावते भाषांतर करण्यापासून ते एमआरएच्या आवारात, कमळाच्या तळ्याकाठी बसून रेखांकने करण्यापर्यंत सगळेकाही माझे काम आहे!
एका दिवशी सकाळपासून भाषांतरे करून मी इतकी बावचळले होते की गोडवलीच्या मीटींगमधे मी गावकऱ्यांशी इंग्रजी अन जॅरेडशी मराठी बोलायला सुरुवात केली. अख्खं गाव हसत होतं मला! मग एका तुकाराम आबांनी आवाज टाकला, “ताईंसाटी च्या सांगा रे!”
***
एम आर ए मधे रहाण्याजेवण्याची सोय फारच उत्तम आहे. मला विचाराल तर माझ्या जरूरीपेक्षा खूपच लाड होत आहेत! शिवाय मला स्वयंपाक करावा लागत नाही हा बोनस!
इथली जेवणवेळ हा एक विशेष कार्यक्रम असतो. सुरुवातीला इतक्या साऱ्या अनोळखी लोकांसोबत जेवायला मी फार घाबरत असे. कुठे बसू? कुणाशी बोलू? अन काय बोलू?!
मुळातच ही संस्था समजून घेणं अन एका पोस्टमधे समजावून सांगणं अशक्य आहे माझ्यासाठी…
मात्र बघता बघता या जेवणवेळा माझ्या सगळ्यात मोठ्या शैक्षणिक संधी झाल्या. अनोळखी लोक हा शिकण्याचा केवढा मोठ्ठा खजिना असतो! रोज मी नवीन टेबलाशी बसते. कधी माझ्या शेजारी एम आर ए मधे काम करायला आलेले इंटर्न्स असतात, कधी माझे बॉस लोक असतात, त्यांचेही वरिष्ठ पदाधिकारी, एम आर ए चे जुने सहकारी, निवासी कर्मचारी, स्वयंसेवक…. वेगवेगळ्या देशातून आलेले विविधरंगी लोक! त्यातल्या प्रत्येकाचं काम, पूर्वेतिहास, त्यांच्या प्रेरणा… सगळं किती वेगळं!
मी मात्र जे सापडेल त्याला प्रश्न विचारून सोडते! एकदा एम आर ए च्या सेक्रेटरी काकांचं ताट माझ्या प्रश्नांची उत्तरं देतदेता सुकून गेलं आहे! (नंतर बहुदा त्यांनी माझं टेबल टाळलं असावं!)
रोज किमान शंभर दिडशे लोक जेवणार म्हणजे घासण्यात भांडी किती पडत असतील! इथे रोज एका विभागातले लोक ताटं वाट्या विसण्याचं काम करतात. गाणी म्हणत, चेष्टा मस्करी करत भांडी घासायला मीही जाऊ लागले. तसंही मला लहानपणी भांडी घासण्याचा खूप षोक होता…
मोठं झाल्यावर (म्हणजे ओट्यावर हात पुरण्याइतकं मोठं!) भांडी घासण्याचं स्वप्न असं पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं!
एका विशेष गर्दीच्या दिवशी भांडी घासायला मदत केल्याबद्दल आमच्या आफ्रिकन इंटर्न “योना”ने चक्क मला मिठी मारली! मीही बावचळल्यागत हसून साबणाच्या फ़ेसात घातलेले हात तिच्या गळ्यात टाकून मोकळी झाले!
याच मुलीने एका संध्याकाळी प्रार्थनागृहात तिच्या मधाळ आवाजात कुठलीतरी आर्त देवकवनं गायली होती….. तो स्वच्छ घंटेसारखा नाद देवाच्या कानावर न पडणं अशक्य आहे!
***
उरलेल्या गोष्टी वेळ काढून लिहीत आहेच…. आणिक फोटो सुद्धा टाकेन पु्ढच्या पोस्टमधे!