दृष्टीकोन…

गणपती संपताच माझी ऑफिसच्या कामांची गाडी जोरात सुरु झाली…. या दोनच आठवड्यात चार साईटवर काम करायला जाऊन आलेय… अन चाललेय!

त्यातली एक साईट व्हिजीट गोव्यात होती. खूप गडबडीत येजा झाली…. त्यामुळे गोवा म्हणताच जे चित्र सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं तसं काहीच करायला वेळ नव्हता. पण मला वेळखाऊ रेल्वे प्रवास फार आवडतात… त्यात जो सक्तीचा शांत वेळ मिळतो तो मी स्थिर जमिनीर पाय असताना कधीच घेऊ शकत नाही! गोव्याला निघताना इथली कामं उरकायची अन वेळेत पोहोचायची ती घाई ट्रेनमध्ये बसताच अचानक शांत झाली, जणू खरोखर घरी पोहोचले असावे! अन परत पुण्यात येईपर्यंत मी त्याच संथ शांततेत होते…. खूप गोष्टी होत्या मनात ज्यांचा विचार करायला स्वस्थता या प्रवासात मिळाली….
मी जे काम हातात घेते आहे…. त्यात इतक्या अडचणी अडथळे आहेत…. पर्यावरण पूरक आर्किटेक्चर असं काही उदरभरणाचे साधन होऊ शकतं का हे देखील मला या क्षणी माहीत नाही…
सगळी तुमची कॅपिटलिस्ट यंत्रवादी दुनिया एका मोठ्या आडदांड प्रवाहासारखी माझ्या सभोवती वाहात असताना असं उलट पोहायचा उद्योग करतेय….. टिकेन कि विरून जाईन असा प्रश्न पडतो अधूनमधून….
पण कामाच्या तगाद्यात असा विचार करणं घातक असतं म्हणून तो मागे टाकत राहिले….गोवा प्रवास हे एक उत्तम साधन झालं तो विचार तळापासून तपासून पहायला. अन मग मला पुन्हा उभारी आली…. आपण जे करतोय ते वाया नाही जाणार असा विश्वास आला….
सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणं शक्य आहे. शाश्वत विकासाच्या कल्पना शक्य आहेत….त्यातून मानवी स्वभावाशी तडजोड नं करता…केवळ पैसाच नव्हे तर संपन्नता निर्माण करणं शक्य आहे….
हे शास्त्रसिद्ध अन सहज नैसर्गिक आहे…. कदाचित खूप किचकट… अन वेळखाऊ असेल… पण त्याला एक चिरंतन स्पर्श आहे…..त्यात समाधान अन सार्थक आहे……
या कामात जो रचनात्मक जोर आहे…एकप्रकारचा हट्टी रगेलपणा अन तरीही चांगली भूमिका आहे…तेच तर हवं आहे! यशापयशाची चिंता आता करण्याचं कारणच नाही….
असं एकदा ठरवल्यावर मग मला गोव्यात फिरताना एक हल्लकपणा आला…. ते कोवळं ऊन अन झाडं झुडपं…. गच्च हिरवे नेचे अन लालबुंद जांभे दगड हे सगळे आपलेसे वाटायला लागले!
आपण जेव्हा एखादी गोष्ट पहातो अन अनुभवतो….तेव्हा एका दृष्टीकोनातून ती वस्तू आपलीशी करतो नाही का?! ही सगळी जमीन अन झाडं अन हलणार प्रत्येक हिरवं पान माझं स्वत:चं असतं… अचानक उत्साहच आला मला!