अदृष्य प्रेम…

काही माणसं चालतात खाली पहात…. चित्रविचित्र दगड, वनस्पती, रानफुलं, कीटक….अन प्राण्यांच्या पाऊलखुणा. काही माणसं चालतात वर पहात…वृक्ष, त्यावरल्या वेली, पक्षी, आकाश अन चांदणं.

प्रत्येकाचा मानेचा कोन त्याचा दृष्टिकोनच उलगडून सांगत असतो! प्रत्येकाच्या नजरेला त्याच्या त्याच्या कोनातून हे जग वेगळे दिसते…

याशिवायही असतात लोक…सगळीकडेच भिरभिर नजरेने पाहणारे. काहीजण शोधत असतात अस्तित्त्वाची मुळं, जगाच्या विस्तृत पटावर….काहीना दिसतात गहिरे अर्थ, वरकरणी निरर्थक वाटणार्‍या भौतिकात. काहींना जग दिसतच नाही, दिसतात ती फक्त स्वप्नं!

कोणी असतात सगळ्याच्या पल्याड, निराकारावर दृष्टी लावून….

असे ऐकले होते कुठेतरी, कि डोळे म्हणजे आत्म्याची खिडकी…. आपल्या असण्याचे इतके स्वच्छ प्रतिबिंब दर्शवणारे हे डोळे…

काही डोळे संवेदनशील….समोरच्याला नखशिखांत वाचणारे. काही डोळे अतीव बोलके! कधी ते सजग, अन कधी हरवलेले…. कुणाचे बेभान अन कुणाचे लाजरे…. क्वचित भेटतात कणखर डोळे, सूर्यासारखे तेजाळलेले…. कधी मनस्वी, अन कधी हातचे राखून ठेवणारे…..

प्रत्येकाचे हे दोन डोळे म्हणजे एक स्वतंत्र महाकाव्य….प्रत्येक दोन डोळ्यात उभा आहे इतिहास मानवी नात्यांचा… त्यातले भावनिक नाट्य…भरती-ओहोटीच्या हेलकाव्यांसहीत ओसंडताना दिसते प्रत्येक दोन डोळ्यांतून….

माणासाचे डोळे सुसंस्कृत्तेच्या सगळ्या आवरणांमधून थेट छेद देउन नि:शब्द आदिमनात नेऊन सोडतात. छोट्या छोट्या आशा, अपेक्षा, थोडी हाव, थोडा त्याग, लज्जा अन धारिष्ट्य, भीति, असूया अन राग… मुख्य म्हणजे युगायुगांचे प्रेम…. रोज माझ्यावर विनाकारणच अमर्याद प्रेम करणारे अनंत डोळे दिसतात मला… त्यांचे प्रेम साक्षात आदिदेवापासून कितीक डोळ्यांमधून वहात आले असावे माझ्यापर्यंत!

रोज “त्याच्या” अदृष्य प्रेमाचा दृष्टांत होतो.

तोच जाणे या प्रेमाची परतफेड किती जन्म करत आहे मी बिचारी!

तरीही माझे ऋण काही फिटत नाही….

“त्याचे” मजवरले प्रेम अदृष्य, तरीही आटत नाही….