समर्पण

कसली तरी हुरहूर लागून राहिली आहे…मी उदास आहे कि उत्सुक हेही कळत नाही…
किती काही होत आहे दर क्षणाला! तरी मन काळाच्या पुढे धावतंय…
त्याला भूतकाळ टाळण्याचीच सवय लावली आहे.. तरीही शतकांपूर्वीच्या कुठल्या वळणाकडे वळून वळून पाहतंय…
ही अस्वस्थता….गूढगर्भ शांतता…माझ्या भूतकाळाची सावली आहे कि अज्ञात भविष्याचा पायरव?
सगळे काळ प्राशून मन आता कालातीत होत जाईल का?

प्रत्येक पावली प्रश्न पडतो… पाऊल टाकू की नको… श्वास घेऊ कि नको?
स्वत:च्याच चाहुलीने ह्रदय धडधडतंय…त्याला सावरू कि नको?
कदाचित त्याला कळले आहे तुझे विश्व-गुपित…. मला मात्र स्वत:चीच प्रतिमा परकी झाली आहे…
तू तर वाट पाहतो आहेस मी मलाच परकी होण्याची! तेव्हाच कदाचित तुझी होऊ शकेन…

एक नाद आहे… अनाहत..जणू पावले चालतानाच कुठल्या अनामिक ठेक्यात पडावीत…
कुणाचा ताल आहे हा? याचा कोणी कर्ता नाही असे तर नक्कीच नाही!
पण तू तर पुढे येणार नाहीस आपले स्वामित्त्व गाजवीत…
माझ्या हट्टाला फक्त गालात हसून पहात राहशील…
यशोदेच्या हाती जो गवसला नाही… जो राधेच्या प्रेमातही आजन्म बंदी झाला नाही…
ज्याला शोधत सॉक्रेटिस अन मीरा विषाचे चषक रिते करून गेले
तोच तू…
माझ्या थरथरत्या ओंजळीत स्वत:चे दान टाकशील का तरी?!
कदाचित येशील सामोरा अन माझ्या निश्चल देहातून मला हात देशील…
तेव्हा ओंजळ नसेल माझ्याकडे…. केवळ असशील तू…