देवदार बोलावतोय…

सरसरत्या धुक्याच्या अवगुंठनात हरवलेली हिरवाई
अन दरीकपारीतून झरणारी वार्‍याची नरमाई…
नि:शब्द बरसणे…कधी हिमाचे
अन कधी सोनसळी परागांचे
शतकांपासून सगळ्या निसर्गविभ्रमांना तो पहातोय..
तटस्थ उभा देवदार आज मला बोलावतोय…

धरणीची करणी की स्वर्गाचे दार
“त्याच्या” सलामीत जणू उभे देवदार…
निस्वार्थ बहरणे… इवल्या फ़ुलांचे….
अन या प्रचंड नगाधिराजाचे…
खुज्या माणसाला तो नभाशी जोडतोय…
तटस्थ उभा देवदार आज मला बोलावतोय..

देवबनातून घुमतेय हलकी शीळ वार्‍याची…
धुक्यात गवसलेली सोनेरी तिरीप उन्हाची..
निस्संग विहरणे, कधी विहंगांचे
अन कधी माझ्याच मनाचे…
अवघ्या हिमालयाचा आत्मा माझ्या मिठीत घेतोय..
आज मीच देवदार झालोय, मी तुम्हाला बोलावतोय…