सुखाची झोप…

एका छोट्याशा फुलाचं उमलणंसुद्धा केवढा मोठा व्यापार असतो! त्या झाडाला मुळापासून कोवळ्या टोकापर्यंत ताकद लावावी लागते.केवढातरी जीवनरस ओतावा लागतो. किती काळ वाट पहावी लागते…. तेव्हाकुठे तो रंग गंधाचा उत्सव काही तासांचं आयुष्य धारण करतो….

विश्वाच्या कारभाराचा विचार करता किती क्षणभंगुर असतं रे फुलाचं आयुष्य! तरीही त्याचं सौंदर्य, त्याची कोमलता, सुगंध आणि निरागस डोलणं कणानेही उणावत नाही. अंत आहे म्हणून कोणी सुरुवातच करायचं टाळत नाही…. मरण आहे म्हणून कोणी जगायचं टाळत नाही….

त्या झाडाला तरी काय खात्री असते, उद्याच्या सूर्यदर्शनाची? मूळ पोखरलं एखाद्या मुंगीने तर उभ्याउभ्या वठून जातं ते! जागच्याजागी मुळापासून पानांच्या टोकापर्यंत चढत जाणारं स्वत:चंच मरण जगत असतं ते….

मरेपर्यंत ते आपला जीवनधर्म सोडत नाही…..इतकी अश्राप श्रद्धा असावी आयुष्यावर, कि मरण म्हणजे फक्त सुखाची झोप वाटावी!