सलाम…

त्याच्या मनाला शरीराचं जडत्व नव्हतं. त्याला दिसत नव्हते समोरचे निर्जीव शिळाखंड….त्याच्या शरीराच्या हजारपट विशालकाय आणि जड… त्या तरल विदेही मनाला दिसत होतं एक अतुल्य शिलाकाव्य. संपूर्ण जगातलं प्रेम अन उत्तुंग आनंद त्या मनात दाटला होता… त्याच्या उमेदीला शरीराचे किंवा समोरच्या शिळेचे बंध मान्यच नव्हते! त्या मनातली अतिमानवी ताकद असह्यपणे शरीरातून ओसंडत होती. त्याचे थरथरणारे हात शिळेवरुन फिरत होते. त्यांच्यातून स्रवणरा आनंद त्या शिळेचा आत्मा बनत होता…..

तेच हात जेव्हा छिन्नी-हातोडी घेऊन शिळेवर उठले तेव्हा ते स्थिर होते, अचूक अन शक्तिशाली. तिथे सुरु झाला प्रतिभेचा सगळ्यात खडतर प्रवास. मनातलं तरल, स्पर्शातीत काव्य शिळेत उतरवायचा भगीरथ प्रयत्न… तरलतेला धक्का लागू न देण्याची धडपड आणि शरीराच्या मर्यादा…

आजही ती शिल्पं पाहताना जणवतो त्यांचा प्रवास. तो शिल्पकार तर हजारो वर्षांपूर्वीच नामशेष झाला. पण ती शिळा मागे उरली. त्याचा उन्माद, त्याचा विषाद….त्याच्या प्रवासाची ecstasy त्या शिळेवर आजही रेखलेली आहे…

तेव्हा जर त्याच्याकडे काळापुढची तंत्रकुशलता असती, (technology असं आता ज्याला मराठीत म्हणतात ना, तेच ते!!) तर त्याने शिळेतून विश्वनिर्मिती केली असती. पण त्याने जशी मिळाली तशी आदिम शस्त्रं वापरून जी निर्मिती केली तिलाच आपण शिरसावंद्य आश्चर्य मानतो!! अपौरुषेय, अतुल्य कलाकृती मानतो!! आता हाताशी असलेल्या technology ने त्याच्या शिल्पकाव्याच्या (Xerox) photocopies सरसकट सगळ्या दगडांवर, कागदांवर काढून दाखवतो अभिमानाने! शिल्पकाराचं तरल मन अजूनही घुटमळतं त्या शिळेभोवती. आक्रोश करतं मानवी कानांना ऎकूच न येणारा…. “अरे, हे तर अयशस्वी शिल्प होतं रे!! कुणीतरी यापेक्षा सुंदर काहीतरी घडवा रे! कुणीतरी या दगडाचं खरं सौंदर्य बाहेर काढा रे….”

पण माणसं बहिरी आहेत….त्यांना हा आक्रोश ऎकूच येणार नाही…. ती तर या बिचाऱ्य़ाच्या अयशस्वी प्रयोगाचा कीस पाडत राहतात….कौतुक करत राहतात…तेच अपयश पुन: भोगत राहतात….त्याच्या दु:खावर जणु डागण्या देत राहतात….

आज त्या शिल्पकाराच्या जमिनीने साद घातली आहे….त्याच्या स्वप्नातली तंत्रकुशलता इथल्या शिळांवर उतरवा….त्यच्यासारखं अपौरुषेय स्वप्न या जमिनीच्या अंगावर प्रसवा…. तिच्या हृदयातला उकळता, रसरसता दगड तिने समोर ओतलाय… त्यातून घडवा तुमच्या तरल कल्पनेचे चमत्कार….त्या अज्ञात शिल्पकाराला तुमच्या प्रतिभेचा सलाम घडू द्या…

तळटीप:  हा सगळा मनोव्यापार फार जुना आहे…. महाबलीपुरम् मधल्या गल्ल्याबोळांतून पसरलेल्या शिल्पांकडे पहात रस्त्यावरच मुक्काम ठोकून एका शिल्पकन्येच्या आधाराने लिहिलेलं एक चिठोर सापडलं माझ्या अजागळ संसारात! त्यावर बेतून ही गोष्ट लिहिली आहे… तेव्हा कथेला सत्याचा आधार कसा असतो हे मला ठाऊक आहे!