प्रश्नोत्तर….

आभाळभर तेज थेंबभर ज्योतीतून उजळतं. आणि अंधाराच्या काळ्या कळजाला त्या थेंबाएवढं भोक पडतं. ज्योतीचं किती लोभसवाणं धाडस! तिचं भाल्याच्या टोकासारखं सदैव रोखलेलं तेज…. य:कश्चित किड्यांनाही भूल पडावी असं तिचं दर्शन! तिच्यावर झेपावणाऱ्या किड्यांना दिसते फक्त तिची धारदार चमक…. एक क्षणावर उधळून देतात त्यांचं अस्तित्वंच….आणि तिचंही!

तिच्या तेजाची दाद देतात जिवाला ओवाळून टाकत…. ही कसली जीवघेणी रसिकता?! दोघंचाही जीव घेऊन मिथ्यकथा होणारी! सगळी बरोबर-चूकची गणितं उधळून लावणारी….

पुन्हा दाटणाऱ्या अंधारात दोष कुणाचा? तेजाला ग्रासणाऱ्या किड्याचा कि मुळात असलं धाडस करणाऱ्या ज्योतीचा?

ती ज्या क्षणी पेटली, त्याच क्षणी निश्चित झालं तिचं विझणंही. मरणाच्या तोंडात उतरून तिने जगण्याचा उत्सव मांडला होता! काय कारण असेल अशा विजिगिषेमागे?! चारी दिशांनी धावत येणाऱ्या अंधारात एकटंच तेवत रहायचं वाण का उचलावं तिने?!

किड्यालाही जर एवढं आकर्षण होतं, तर स्वत:चा आणि तिचाही विद्ध्वंस करून काय साधलं त्याने?! त्या एका तेजोमय क्षणासाठी अनंतकाळाचा अंधार त्याने का कबूल केला असावा?

कोण देईल या प्रश्नांची उत्तरं?

ज्या विधात्याच्या जगात एकही घटना नाहक घडत नाही त्याला तरी त्याची ही अगम्य कलाकृती उमगली आहे का?! कि तोही शोधतो आहे उत्तरं त्याच्याच शंकांची, आपल्यासगळ्यांमधून जगत जगत!!