या मनगुजाची सुरुवात झाली, तेव्हापासून हा शब्द मनात घोळायला लागला…. गूज.
गूज म्हणजे गुपित….मनात साठवून ठेवलेला स्पर्शातीत खजिना…
गूज म्हणजे नाजुक संवाद… मनातली गुप्त गाठ सोडवून, मन हलकं करणारं हितगुज… बाळपणी मैत्रिणीच्या कानांत खुसुखुसू सांगितलेल्या गुजगोष्टी इतकं जवळचं….
गूज म्हणजे नाद…. नादवणारा, घुमारदार आवाज….कानांत हलकेच मध ओतणारा, आणि तरीही दशदिशा व्यापणारा….
गूज म्हणजे त्या राजस्थानी जाळीदार महालातून घुमलेली मीराबाईची आळवणी…
गूज म्हणजे आईच्या पदराआडून डोकावणारी लबाड कबुली…
गूज म्हणजे शाळेतून बाबाच्या हाताला लटकून घरी जाणारी बडबड…
गूज म्हणजे वरकरणी नकार पांघरलेला आतूर होकार…
गूज म्हणजे तो पहिला हुंकार….पुन्हा नव्या सुरुवातीला….