मन…

माझे दुबळे रे मन, झुले काळाच्या झुल्यात…

त्याची आंदोलने मला नेती वहात वहात…

मझे दुबळे रे मन, चुकलेला वाटसरु…

येत्या-जात्याला पुसते कोणती मी वाट धरु…

माझे भांबावले मन, मीहि त्याच्याच कह्यात…

त्याच्या मागून राहिले मीहि वहात वहात…

जन लावतात बोल, म्हणती हे कुलक्षण…

उठे कोवळ्या कळीला रक्ताळला एक व्रण…

असे वहातच जाणे नसे मान्य जनमनी…

मनाचीही नदी वाहे, जन्मजन्मांच्या मागुनी..

तिच्या प्रवाहाला बांध कुणी घालावा, कसा तो?!

काळ आवरावा कुणी, तो मनासोबती धावतो…

समुद्राला घाल मिठी असे म्हणतो का कुणी…

सूर्यालाही विझवील, असे मिळते का पाणी…

मन अज्ञात वाटते, जसा सागराचा थांग…

मन भासते तेजाळ, जसा भास्कराचा दाह…

माझे दुबळे रे मन, बळ मोठे त्याजपाशी…

वेडे उतार सोडुनी वाहे उंच तेजापाशी…

मार्च २००४

सोन्याची फुले..

अंगणात माझ्या उभे खोड सोन्याचे झळाळ…

पाने चांदीची त्याला, मागे सोन्याचा वहाळ…

मृदु मातीत सांडली सुवर्णाची सोनफुले…

येते नाजुक झुळुक, त्यांची सोनपकळी डुले…

झुकलेल्या फांदीवरी झुले सोन्याचा हिंदोळा…

तेथे झुलुनिया मन करी फूल फूल गोळा…

एक एक फूल जणु बहर मनाला…

गोल अस्फुट अश्रुंनी माझा मीच शिंपलेला…

मोठे आक्रंदन आहे, सुवर्णाच्या झाडामागे…

जणु काळेभोर नभ शुभ्र चंद्रापाठी लागे…

करते रे जग कींव हुंदक्याची, आसवांची…

मोह सर्वांना घालती, माझी फुले ही सोन्याची…

मार्च २००४

कापराची जमात आम्ही…

कापराची जमात आम्ही, कुणा न कळता उडून जातो…

दुष्ट नव्हे, ना सुष्ठही आम्ही, केवळ येतो निघून जातो…

अर्थशून्य हे अमुचे असणे, तसे निरर्थक विरून जाणे…

अम्हा न ठावे दीप म्हणोनी शांतवृत्तिने तेवत राहणे…

दीप म्हणे हा विझतानाही कसे वाटते सार्थक झालो…

मागे ठेवुन विझल्या वाती, प्रभुच्या चरणी कामी आलो…

आम्ही जळतो क्षणात आणि विझणी अमुची केविलवाणी…

आम्ही जळलो अथवा विझलो नाही हसते रडते कोणी…

मागे ठेवुन क्षीण पोकळी आलो तैसे निघून जातो…

कापराची जमात आम्ही कुणा न कळता उडून जातो…

मार्च २००४

वादळ…

असं एखादं यावं वादळ, झुंजारपणे भिडणारं

न्यावं त्याने सारंकाही, हळुवारपणे सलणारं

या वादळाचा झंजावात, झेपावत यावा…

त्याने जीव माझा अलगद सोडवून न्यावा…

असं एखादं यावं वादळ, झुंजारपणे भिडणारं

फुंकून जावं सल त्याने, खोल आत जाळणारं

त्या वादळापाठी यावी, पाऊसगार ओली हवा…

थेंबाथेंबातून झंकारावा, चिंब भिजला मारवा…

असं एखादं वादळ येईल झुंजारपणे भिडणारं

उडवून नेईल माझ्यापाशी उरलेलं सारं

त्या वादळात उधळण्यासाठी थेंब थेंब साठवते आहे…

जीवभर भोगलेले क्षण क्षण आठवते आहे…

ऑक्टोबर २००५

मनगुज

हे माझ्या मनाचं सुरेल अलगुज आहे. कुठलंही अलगुज हे सुरेलच अस्तं मुळी! पण जसा श्वास फुंकावा तसाच सूर उमटतो.

तसंच मनाचंही आहे… जसा भाव असेल, तसा त्या मनाचा सूर उमटत जातो.

त्या मनाच्या सगळ्या सुरावटी मी इथे लिहीत जाणार आहे. सगळ्याच काही गोड वाटणार नाहीत तुम्हाला… सगळेच सूर जुळावेत असा हट्ट देखिल नाही मी करणार.

तुमची,

अनुज्ञा