Latest Entries »

शेवट…

असाच असावा शेवट सुरुवातीच्या जोडीचा….
पावसाळ्यात आठवणा़र्‍या आमरसाच्या तोडीचा….
असाच असावा शेवट… कधीच न संपणारा….
एक क्षण सावरलेला, सरणारा… सदैव उरणारा…
शेवट म्हणजे व्हावी सुरुवात, अंतापुढल्या सुरुवातीची…
थोडी रडवेली अन थोडी हसर्‍या गाली मिरवायाची!

तपश्चर्या

सकाळचं कोवळं सोनं आकाशात चढत चढत गेलं. सूर्याचं तापट बिंब आता ओढ्याच्या हिरवट निळसर पाण्यात चमचमू लागलं. लाल-हिरवे चतुर स्तब्ध पाण्यावर थरथरते तरंग उमटवीत असताना पाण्याखाली छोट्या माश्यांची अन्न शोधायची लगबग अजून चालू होती.

ओढ्याच्या दोन्ही काठांना ही इवली इवली जीवनचक्र नि:शब्द नांदत होती. काठांवर ओठंगलेली गर्द झाडी, अन ओढ्याच्या पात्रातच ठिय्या देऊन बसलेली शेरणीचे झुडपं आपल्या मुळ्याच्या आडोश्याने कितीक इवले संसार फुलताना पहात होती…

कडेच्या निळ्या हिरव्या डोहांमध्ये डोकावून आपलीच प्रतिमा कौतुकाने न्याहाळणारे बांबू आपापली बेटं बनवून झुलत होते मदमस्त हत्तीच्या डौलात!

सकाळी पाण्यावर उतरलेले हॉर्नबिल अन बगळे आपले रुंद पंख पसरून दिमाखात उडून गेले होते जोड्या जोड्यांनी….

आता ओढ्याकाठी होती नीरव शांत दुपार अन आपली जाडजूड मुळ पाण्यात सैलावून बसलेला पोक्तसा वृक्ष… त्याच्या खरबरीत खोडावर पाण्यावरून कवडसे उमटत होते…. त्याचे प्रतिबिंब पाण्यात अन पाण्याचे प्रतिबिंब जणू त्याच्यात उतरले होते…

ही एकरूपता कित्येक वर्षांची तपश्चर्या होती…..वृक्षाने ओढ्याकाठी अन् ओढ्याने वृक्षाखाली मांडलेली…

विंचुर्णी….

गतजन्मीचे हरवलेले वेडे पुन: सापडताच माणसाला वेडेपणाचे अधिकच डोहाळे लागत असावेत. त्यामुळे हिमालयाच्या जादूगिरीतून बाहेर येतायेता आम्हाला आता विंचुर्णीच्या माळाचे वेध लागले. सामान्य मानवी डोळ्याना जिथे वैराण माळ दिसत होता तिथे आम्हाला जैवविविधतेचे अभयारण्य दिसणार होते….!

धुळीच्या लोटांमधून पहिले दर्शन होताच लक्षात आले, गौरी देशपांडेच्या विंचुरणीशी आपली जुनीच ओळख आहे कि! मैलोनमैल पसरलेले मोकळेढाकळे सोनेरी माळ. त्यावर वेड्या बाभळीचे हिरवे ठिपके….त्याखाली मोठ्या मुष्किलीने दिसणारी…..सावली. वैराण डोळ्यांना सुखावणारी गारव्याची बेटं.

थकलेले, थबकलेले, आटून आक्रसलेले ओढे-नाले. पावसाळ्याच्या एखाद्या ओल्या आठवड्यात त्यांना भरभरून वाहण्याचं सुख मिळतं. इथे वर्षाचा सगळा पाउस केवळ काही तासात पडतो. मग सगळे ओढे नाले भरून ओसंडून जाणार…रानससे अन मेंढरांचे कळप त्या चार दिवसांच्या हिरवळीवर पोसणार… त्यांच्या मागे संधी साधत एकटे दुकटे रेंगाळणारे लांडगे! कितीक वर्षांच्या चक्रात अडकलेले हे विंचुर्णीचे माळ…

अधूनमधून पाहुणचाराला हक्काने येणारे अवर्षणाचे सावट… अन त्याच्याशी खेळत भांडत असल्या रानवटपणात संस्कृती वसवणारा माणूस…. त्यानं वर्षातून एकदाचा भरभरून ओसंडणारं पाणी थांबवलं, जिरवलं…पुरवून पुरवून वापरलं.फळबागा तगवल्या. डाळिंब चिक्कू रुजवले. चिंच पिंपळ अन वडाच्या गरगरीत वृक्षांनाही अवर्षणाचं कौतुक नव्हतं. कडुनिंबाची हिरवट बेटं देखिल बांधाबांधावर तग धरून रहात….

निरखून पाहिलं तरच या सोनेरी माळाचं हिरवं काळीज उलगडतं. दुरूनच आठ्या घालून पाहणाऱ्या नवख्या पाव्हण्याला हा आडमुठा माळ एका झुळकेसरशी धूळ चारतो!

तोच ठसका घेऊन जन्माला येत असावीत विंचुर्णीची माणसंही?! कठोर, शुष्क पण गुंतवून ठेवणारी….कपड्यांत अडकलेल्या कुसळासारखी मनात रुतलेली माणसं…टोचरी पण तुटल्याशिवाय पदर न सोडणारी…

तुम्ही चाचपडत हसाल तर तोंडभर हसून उत्तर देणारी….एखाद दोन तासात चिंब भिजवून जाणाऱ्या विंचुर्णीच्या पावसासारखी…..

 

माणूस हा सामाजिक प्राणी आहे यावर विश्वास बसायला मला कितीक वर्षे लागली! मुळातच एकटी रमत होते कि परिस्थितीनुरूप तशी होत गेले कुणास ठाऊक, पण जगाशी जमवून घेण्यास जरा वेळच लागला….

माणसांचे तर्‍हेतर्‍हेचे स्वभाव, लकबी, सवयी, संस्कृती, भाषा, आचारविचार, बरोबर चूकच्या विविध कल्पना, सरळपणा, लांड्यालबाड्या हे सगळे समजण्याचे ते वयही नव्हते…. इवल्या मनात किती प्रश्न वादळ होऊन घोंघावत….

खूप लहानपणी कुठल्याशा रागाने पिसे चढलेल्या मला बाबाने शिकवले होते…. “माणूस जगात स्वत:ची किंमत अन जागा केवळ उपयुक्ततेच्या जोरावर मिळवू शकतो. जर तुम्ही इतरांसाठी काही करू शकत असाल तर आणि तरच पैसा, आदर अन मैत्र कमावता येते.”

हा काही क्रूर अमानवी व्यवहार नाही, साधा सोपा निसर्गनियम आहे. जे जे अस्तित्त्वात आहे त्याचा काही उपयोग आहे. अन जेथे उपयुक्ततेचा नाश होतो, तेथे विघटन अन पुनर्वापर सुरू होतो. त्याला काळाची न थांबवता येणारी गती आहे.

रागाचे अन रडण्याचे उमाळे एका क्षणात शांतवले, जेव्हा त्याने मला जगाच्या कुलुपाची साधी सोपी किल्ली सहजच हाती दिली. त्या एका वाक्याचे किती अर्थ, पडताळे शोधण्यात राग अन दु:ख करायचे विसरून गेले मी….

आजही या किल्लीने किती दरवाजे माझ्यासाठी आनंदाने हात पसरताना पाहतेय! विनाकारण दुरावलेले किती डोळे पुन: माझ्यावर हास्याची बरसात करताना पाह्ते आहे. त्यात प्रेम असते, कौतुकमिश्रित अचंबा असतो…..क्वचित आदरही असतो….. माझ्या वरकरणी निरपेक्ष देण्यातला स्वार्थ त्यांना दिसत नाही. केवळ मदतीचे शस्त्र उगारून त्यांना जिंकले गेले आहे हेच समजण्यास वेळ लागत असावा!

विश्वनियम आहे हा, ज्याचा उपयोग त्यास भरभराट….जेथे साठा, साचलेपणा तेचे कुजट वाया जाणे हेच सर्वत्र पहावयास मिळते.

जितके द्यावे तितके अधिक हाती पडत राहते…. जितके साचवावे, तितके नासून जाते…

पाहता पाहता देण्यातला आनंद भिनत जातो…. हसत हसत हजार हातांनी सारे काही या जगावर लुटून मोकळे व्हावे इतका आनंद मनात नाचू लागतो…. या आनंदाची लागण असपासच्यांना नकळत होणारच! त्यांच्या हास्याचे श्रीमंत धनी केवळ तुम्हीच असणार नाही का? कितीही मनांवर राज्य करावे असल्या हसर्‍या हातांनी….त्यांना कधीच काही कसे कमी पडावे?!

देणार्‍याचे ते हात जमेल तेव्हा जमेल तसे हावरेपणाने घेत जावे….त्या हातांना लक्ष्मीचे वरदान असते…. त्या हातांना तुटले बंध सांधण्याचे कौशल्य असते….टोचरे दु:ख शांतवण्याचा स्पर्श असतो….निराशेच्या अंधारात सावरणारा आधार असतो…. केवळ मानवी जगातच नव्हे तर चल अचल सृष्टीत मानाने, आनंदाने जगण्याचा अधिकार असतो….

अदृष्य प्रेम…

काही माणसं चालतात खाली पहात…. चित्रविचित्र दगड, वनस्पती, रानफुलं, कीटक….अन प्राण्यांच्या पाऊलखुणा. काही माणसं चालतात वर पहात…वृक्ष, त्यावरल्या वेली, पक्षी, आकाश अन चांदणं.

प्रत्येकाचा मानेचा कोन त्याचा दृष्टिकोनच उलगडून सांगत असतो! प्रत्येकाच्या नजरेला त्याच्या त्याच्या कोनातून हे जग वेगळे दिसते…

याशिवायही असतात लोक…सगळीकडेच भिरभिर नजरेने पाहणारे. काहीजण शोधत असतात अस्तित्त्वाची मुळं, जगाच्या विस्तृत पटावर….काहीना दिसतात गहिरे अर्थ, वरकरणी निरर्थक वाटणार्‍या भौतिकात. काहींना जग दिसतच नाही, दिसतात ती फक्त स्वप्नं!

कोणी असतात सगळ्याच्या पल्याड, निराकारावर दृष्टी लावून….

असे ऐकले होते कुठेतरी, कि डोळे म्हणजे आत्म्याची खिडकी…. आपल्या असण्याचे इतके स्वच्छ प्रतिबिंब दर्शवणारे हे डोळे…

काही डोळे संवेदनशील….समोरच्याला नखशिखांत वाचणारे. काही डोळे अतीव बोलके! कधी ते सजग, अन कधी हरवलेले…. कुणाचे बेभान अन कुणाचे लाजरे…. क्वचित भेटतात कणखर डोळे, सूर्यासारखे तेजाळलेले…. कधी मनस्वी, अन कधी हातचे राखून ठेवणारे…..

प्रत्येकाचे हे दोन डोळे म्हणजे एक स्वतंत्र महाकाव्य….प्रत्येक दोन डोळ्यात उभा आहे इतिहास मानवी नात्यांचा… त्यातले भावनिक नाट्य…भरती-ओहोटीच्या हेलकाव्यांसहीत ओसंडताना दिसते प्रत्येक दोन डोळ्यांतून….

माणासाचे डोळे सुसंस्कृत्तेच्या सगळ्या आवरणांमधून थेट छेद देउन नि:शब्द आदिमनात नेऊन सोडतात. छोट्या छोट्या आशा, अपेक्षा, थोडी हाव, थोडा त्याग, लज्जा अन धारिष्ट्य, भीति, असूया अन राग… मुख्य म्हणजे युगायुगांचे प्रेम…. रोज माझ्यावर विनाकारणच अमर्याद प्रेम करणारे अनंत डोळे दिसतात मला… त्यांचे प्रेम साक्षात आदिदेवापासून कितीक डोळ्यांमधून वहात आले असावे माझ्यापर्यंत!

रोज “त्याच्या” अदृष्य प्रेमाचा दृष्टांत होतो.

तोच जाणे या प्रेमाची परतफेड किती जन्म करत आहे मी बिचारी!

तरीही माझे ऋण काही फिटत नाही….

“त्याचे” मजवरले प्रेम अदृष्य, तरीही आटत नाही….

गैरसमज…

प्रत्येक बाईच्या मनात काही निरागस अन ठाम गैरसमज असतात. त्यातून तिचे भावविश्व कितीही फुलत असले तरी ती त्याचा कधी न कधी त्रास करून घेते…

त्यातलाच एक समज म्हणजे तिला जे हवे ते मिळवण्यास ती एकटी (बरंका, ए क टी) समर्थ आहे! पण तरीही प्रत्येक बाईच्या मनात एक गुप्त वळकटी असते देवाला घातलेल्या साकड्याची…. आता ही एवढी समर्थ असलेली बाई देवाला कशाला मनोमन आळवीत असेल?! गंम्मत अशी आहे कि ही बाई देवाला इतके काही मागून भंडावून सोडत असते, ते सारे असते तिच्या जवळच्या माणसांसाठी! तिची प्रेमाची माणसे मात्र इतकी नाजूक असावीत कि हिच्या साकड्याशिवाय त्यांचे कसे व्हावे! हाही अचाट गैरसमज! तिच्या या गैरसमजांभोवती वळसे घेत, त्यांना जोपासत जेव्हा जग तिलाच सांभाळून घेत असते तेव्हा तिच्या स्त्रीसुलभ प्रेमाचा वर्षाव होऊ लागतो. तिच्या वेड्या गैरसमजात ताकद असते विस्कटलेले घर बांधून घालायची…..चुकलेले पाऊल पुन: सावरायची….सतीच्या राखेतून पार्वती बनून उभं रहायची…..

तिचे गैरसमज दूर करून तिला शहाणपण शिकवू पाहणार्‍यास अरसिक नाहीतर स्त्रीवादी म्हणत असावे….!

समर्पण

कसली तरी हुरहूर लागून राहिली आहे…मी उदास आहे कि उत्सुक हेही कळत नाही…
किती काही होत आहे दर क्षणाला! तरी मन काळाच्या पुढे धावतंय…
त्याला भूतकाळ टाळण्याचीच सवय लावली आहे.. तरीही शतकांपूर्वीच्या कुठल्या वळणाकडे वळून वळून पाहतंय…
ही अस्वस्थता….गूढगर्भ शांतता…माझ्या भूतकाळाची सावली आहे कि अज्ञात भविष्याचा पायरव?
सगळे काळ प्राशून मन आता कालातीत होत जाईल का?

प्रत्येक पावली प्रश्न पडतो… पाऊल टाकू की नको… श्वास घेऊ कि नको?
स्वत:च्याच चाहुलीने ह्रदय धडधडतंय…त्याला सावरू कि नको?
कदाचित त्याला कळले आहे तुझे विश्व-गुपित…. मला मात्र स्वत:चीच प्रतिमा परकी झाली आहे…
तू तर वाट पाहतो आहेस मी मलाच परकी होण्याची! तेव्हाच कदाचित तुझी होऊ शकेन…

एक नाद आहे… अनाहत..जणू पावले चालतानाच कुठल्या अनामिक ठेक्यात पडावीत…
कुणाचा ताल आहे हा? याचा कोणी कर्ता नाही असे तर नक्कीच नाही!
पण तू तर पुढे येणार नाहीस आपले स्वामित्त्व गाजवीत…
माझ्या हट्टाला फक्त गालात हसून पहात राहशील…
यशोदेच्या हाती जो गवसला नाही… जो राधेच्या प्रेमातही आजन्म बंदी झाला नाही…
ज्याला शोधत सॉक्रेटिस अन मीरा विषाचे चषक रिते करून गेले
तोच तू…
माझ्या थरथरत्या ओंजळीत स्वत:चे दान टाकशील का तरी?!
कदाचित येशील सामोरा अन माझ्या निश्चल देहातून मला हात देशील…
तेव्हा ओंजळ नसेल माझ्याकडे…. केवळ असशील तू…

सरसरत्या धुक्याच्या अवगुंठनात हरवलेली हिरवाई
अन दरीकपारीतून झरणारी वार्‍याची नरमाई…
नि:शब्द बरसणे…कधी हिमाचे
अन कधी सोनसळी परागांचे
शतकांपासून सगळ्या निसर्गविभ्रमांना तो पहातोय..
तटस्थ उभा देवदार आज मला बोलावतोय…

धरणीची करणी की स्वर्गाचे दार
“त्याच्या” सलामीत जणू उभे देवदार…
निस्वार्थ बहरणे… इवल्या फ़ुलांचे….
अन या प्रचंड नगाधिराजाचे…
खुज्या माणसाला तो नभाशी जोडतोय…
तटस्थ उभा देवदार आज मला बोलावतोय..

देवबनातून घुमतेय हलकी शीळ वार्‍याची…
धुक्यात गवसलेली सोनेरी तिरीप उन्हाची..
निस्संग विहरणे, कधी विहंगांचे
अन कधी माझ्याच मनाचे…
अवघ्या हिमालयाचा आत्मा माझ्या मिठीत घेतोय..
आज मीच देवदार झालोय, मी तुम्हाला बोलावतोय…

भाग्यवंत…

एकटाच जन्मला, मरणार एकला..
कोण सोबती, कुणाच्या जन्मास पुरला?!
ज्याच्या मनी नि:स्तब्ध एकांत,
आयुष्य झाले त्याचे सुखांत…
निर्मनुष्य पोकळी जसे मनाचे गर्भ..
तेथेच शून्याचे होती खर्व निखर्व…
ज्या सोबती एकांत तो मज भासे भाग्यवंत..
देव ज्याचा भुकेला असा नास्तिक मूर्तिमंत!

फितूर

मन आधीच तुझ्यासाठी आतूर…
त्यात नशीब माझं, तेही तुलाच फितूर…

किती प्रयासे मी गायले गीत असे बेसूर…
तुझी बासरी तरी जोडते कसा रे स्वर्गसूर..

महत्निश्चये चालते मी तुझ्या घराहून दूर…
वाट दिसेना परंतु दाटे डोळा माझ्या पूर..

परत केली तुझी बासरी, तुझेच सारे सूर..
मनात माझ्या तरी वाजती तुझे चरण नुपूर..

मन आधीच तुझ्यासाठी आतूर…
त्यात नशीब माझं, तेही तुलाच फितूर…

Follow

Get every new post delivered to your Inbox.